जरांगेंना उमगलेले ‘ सत्य ‘
इतरांना कधी कळणार?
🔘 दिवाकर शेजवळ
उमेदवारांसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस. पण गेले काही दिवस लढणार! पाडणार!! अशा घोषणा करत आलेले मराठा नेते मनोज जरांगे यांनीच आज मैदानातून माघार घेतली!
याआधी जीवाला घोर लागून जरांगे यांच्या मन धरणीसाठी आंतरवाली – सराटीकडे धाव घेतलेल्या सर्व पक्षीय उमेदवारांनी हुश्शsss करत आता सुटकेचा निःश्वास टाकला असेल. पण जरांगे यांच्या आधीच्या निर्धारामुळे अंगी
‘ जोश ‘ आणि ‘ चैतन्य ‘
संचारलेल्या शेकडो मराठा इच्छुक उमेदवारांसाठी
माघारीचा हा अनपेक्षित निर्णय धक्कादायक आणि अवसानघातकी ठरला आहे. त्यातून ते कसे सावरणार हा प्रश्नच आहे.
‘ लढणार नाही, फक्त पाडणार ! ‘ असे आता सांगणारे जरांगे हेच ‘ याला पाडा, त्याला पाडा ‘ असे म्हणत मी फिरणार नाही असेही म्हणत आहेत. मग आपण आता नेमके करायचे काय, हा प्रश्न त्यांच्या समर्थकांना, मराठा कार्यकर्त्यांना आता छळू लागेल.
बहुजन,दलित,अल्पसंख्यांक, समाजाचे कैवारी, तारणहार समजून जरांगे यांच्याकडे धाव घेतलेले आनंदराज आंबेडकर, राजरत्न आंबेडकर आणि मुस्लिम नेते, धर्मगुरू यांचा पुरता भ्रम निरास झाला आहे. ते आता काय करणार?
एक मात्र खरे की, मनोज जरांगे यांनी त्यांना कळून चुकलेले आणि सांगून टाकलेले एक मोठे राजकीय सत्य सगळ्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारे आहे. ते म्हणजे, एका जातीच्या जोरावर राजकारण सफल होवू शकत नाही. एकजातीय संघटना त्या त्या समाजाच्या न्याय आणि हक्कांच्या लढाईत उपयुक्त असतात. त्यातून तुम्हाला जनाधार मिळतो आणि स्वत:ची व्होट बँकही गठित होते. पण राजकारणासाठी तेवढी बेगमी पुरेशी ठरत नसते. त्यासाठी सार्वत्रिक पाठिंब्याची आणि तो प्राप्त करण्यासाठी व्यापक ,सर्वसमावेशक भूमिकेची गरज असते. त्या दिशेने काम करत राहणे ही दीर्घपल्ल्याची गोष्ट आहे. निवडणुकीच्या तोंडावर वा आधी करता येण्यासारखे ते काम नाही. हे सत्य जरांगे यांना कळले. एकजातीय समर्थनावर भिस्त असलेल्या इतरांना कधी ते कधी कळणार?
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत