मणिपूर समस्येचे मूळ कशात ? – रणजित मेश्राम

रणजित मेश्राम
राष्ट्रपती राजवट लागल्याने मणिपूर पुन्हा झोतात आले. सारे दबावबळ वापरून झाले. मनात लागलेल्या आगीचे हे असेच असते. सहज विझेना. समस्येच्या वर ही समस्या गेलीय.
नव्याने पेरलेला बहुसंख्यांकवाद व द्वेष हे मणिपूर समस्येचे मूळ असण्याचे कारण शोधावे. मणिपूर राज्याचा नव्वद टक्के भूभाग डोंगराळ आहे. खळाळत्या नद्या, कोसळते धबधबे, रंगीबेरंगी फुले, सर्वत्र हिरवाई ही मणिपुरची निसर्ग वैशिष्ट्ये आहेत ! याचमुळे इंग्रजांनी मणिपुरला भारताचे स्वित्झर्लंड म्हटले होते. ते असे अस्वस्थ का असेल ? गेल्या दहा वर्षातील ही पतझड आहे. सत्तेची कूस बदलली की मनाची पुनर्रचना व्हावी असे हे आहे.
राष्ट्रपती राजवट लागली म्हणजे राष्ट्रपती लक्ष घालतील असेही नाही. निर्वाचित राजवट अपयशी ठरल्याने असे घडले. डबल इंजिन सरकार प्रचाराचे हसे झाले. विशेष म्हणजे मणिपूर विषयावर प्रधानमंत्री बोलत नाहीत. महामहिम राष्ट्रपती आदिवासी आहेत. इथे मुद्दा ‘आदिवासी’ हाच आहे. तरीही हे राज्य सांसदीय अनाथ झालेय.सध्या ओरिसाचा खासदार संबित पात्रा याचा शब्द इथे चालतो. त्याला जेड प्लस सुरक्षा आहे. त्याचाच शब्द चालतो. आधी तो भाजपचा राष्ट्रीय प्रवक्ता होता. आता भाजपचा मणिपूर प्रभारी आहे. त्यातले प्र केंव्हाच गळले. तोच भारी आहे.
मणिपूरमध्ये भाजपचे राज्य होते. मुख्यमंत्री राहीलेले एन विरेंद्रसिंह हे बऱ्यापैकी चौफेर आहेत. डुरंड खेळलेले फुटबॉलपटू आहेत. एका दैनिकाचे संपादक होते. सरळ भाजपात आले नाहीत. आधी इथल्या डेमोक्रॅटिक रिव्हाल्युशनरी पीपल्स पार्टीत होते. नंतर कांग्रेस मध्ये. कांग्रेसच्या राज्य राजवटीत शिक्षा मंत्री होते. नंतर भाजपात. तिथे मुख्यमंत्री झाले. २००२ पासून हिंगांग विधानसभेचे प्रतिनिधित्व करीत आहेत. महाशय पक्ष बदलतात पण क्षेत्र तेच असते. जातीने मैतेई आहेत.
इथल्या कलहाला गेल्या काही वर्षाची पार्श्वभूमी आहे. देशात भाजप आले. संघ प्रबळ झाले. अन् इथली विचारकूस बदलली. संघाने गेल्या काही वर्षांत पूर्वोत्तर (north-east) राज्यात विशेष लक्ष दिले, हे विशेष ! पूर्वोत्तर राज्यात आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, नागालँड व सिक्कीम ही राज्ये येतात. पूर्वोत्तरमध्येच मणिपूर येतेय. या मणिपुरात मैतेई, कुकी व नागा हे राहतात. मैतेई हे खालच्या जातीचे हिंदू आहेत. ६० टक्के असतील. कुकी व नागा हे ख्रिस्ती आहेत. हे ४० टक्के आहेत.सखल , पठारी भागात मैतेई राहतात.डोंगराळ भागात कुकी व नागा राहतात. कुकी व नागा आदिवासी (एसटी) समाजात येतात. या तिन्ही जाती जमातीचे लोक आधीपासून इथे आहेत. आधी कलह वगैरे नव्हते.
नव्याने बहुसंख्यांकवाद इथे शिरला अन् सारे विस्कटले.
मणिपूरमध्ये ९० टक्के डोंगराळ प्रदेश आहे. १० टक्के सखल व पठारी भाग आहे. ९० टक्के डोंगराळात कुकी व नागा वसतात. डोंगराळ जमीन केवळ आदिवासीच घेऊ शकतो असा कायदा आहे. इथेच पाल चुकचुकली.आम्ही बहुसंख्यांक आहोत. राज्य आमचे आहे. सत्ता आमची आहे. आम्ही हिंदू आहोत. आम्ही आदिवासीही आहोत. आमचे ऐकले जावे. मैतेईंच्या डोक्यात नव्यानेच असे भिनले.
६० आमदारांच्या मणिपुरात अंदाजे ४० आमदार मैतेई तर २० आमदार कुकी-नागा असतात. सत्ता मैतेईकडे असते. सध्या मैतेई भाजपात आहेत. राजधानी ईम्फाल सखल भागात आहे. त्याच भागात मैतेई वसले आहेत. तिथेच राजकीय, प्रशासनिक, शैक्षणिक, व्यापार केंद्रे आहेत. मैतेई शिक्षित आहेत. सर्व केंद्रांवर त्यांचाच प्रभाव आहे.
आता मैतेई जर आदिवासी झाले तर आरक्षणावर ताबा त्यांचा होईल. नोकऱ्याही ते घेतील. एकूण दोन लोकसभा आहेत. एक आदिवासीसाठी सुरक्षित आहे. तिही जाईल. जमिनही जाईल. अशी कुकी-नागा यांची सल आहे.
मैतेईंना वाटते .., सत्ता आमची. वरखाली सरकारे आमची. आम्ही डोंगराळ जमीन का का घेऊ शकत नाही ? तसे आम्हीही आदिवासी आहोत.हा नवा तिढा उभा झालाय.बाब कोर्टात गेली. उच्च न्यायालयाने २७ मार्च २०२३ ला मैतेई हे आदिवासी असण्यावर बाजूने निर्णय दिला. आणि भडका उडाला. ३ मे २०२३ ला याविरुद्ध ‘ट्राईबल साॅलिडारिटी मार्च’ (आदिवासी एकजुटता मार्च ) निघाला. आणि मणिपुरात भयंकरतेला प्रारंभ झाला. एरवी कुकी व नागा यांचे पटत नाही. पण मैतेई विरोधावर दोन्ही आदिवासी जमाती एक झाल्या. प्रतिकार कडवा व्हायला लागला.
सरकारे मैतेईंची आहेत.भयंकरता सुरुच आहे. प्रतिशोध दोन्हीकडून सुरु झालाय. आगीने भलतेच वळण घेतलेले दिसतेय. रोज एक भयंकर कानावर येते.
ईथे हिंदू – ख्रिस्ती ही छटा आहेच. संख्यावाद हा मुद्दा आहेच. भयंकरतेची ही द्वेषलाट देशभर पसरेल की काय ?
नव्या भारताची ही चुणूक म्हणावी.
० रणजित मेश्राम
👤
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत