निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय
यापुढील निवडणूका आघाडी, युतीने होणार नाहीत!
महेंद्र कुंभारे,
संपादक तथा कामगार नेते, भिवंडी.
सोमवार दि. 28 ऑक्टोबर 2024.
मो.नं. 8888182324.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या 29 ऑक्टोबर रोजी शेवटचा दिवस आहे. अजूनही महाविकास आघाडीच्या 20 आणि महायुतीच्या 16 जागांवर उमेदवारांची घोषणा होणे बाकी आहे. इतक्या मोठ्या प्रमाणातील जागांवर पक्षांचे एकमत होत नाही. महाविकास आघाडी आणि महायुतीत अनेक छोटे घटक पक्षांबरोबरच दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादीमुळे जास्त पेच निर्माण झाला आहे. आघाडी आणि महायुती दोन्हीमध्ये इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यातही भाजपने शिंदे गटावर दबाव टाकून 5 जागेवर भाजपचे उमेदवार शिंदेंच्या धनुष्यबाणावर उभे केले आहेत. उद्या शेवटच्या दिवशी आघाडी आणि युतीमध्ये एकमत झाले नाही तर मैत्रीपूर्ण लढत आणि एकमत झाले तरी मोठ्या प्रमाणात बंडखोरी होऊन आपलेच उमेदवार पाडण्यासाठी प्रयत्न केले जातील.
तसेच आघाडी आणि महायुतीकडून ज्या जागांवर उमेदवारांची घोषणा झाली आहे त्या बहुतेक जागांवर मोठ्या प्रमाणात उमेदवार विरोधात असंतोष पहायला मिळत आहे. प्रत्येक पक्ष जास्तीत जास्त जागा जिंकून आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून प्रयत्न करताना दिसत आहे. त्यामुळे प्रत्येक जागेसाठी एकमेकांवर कुरघोडी करण्यातच पक्षांचा वेळ वाया जात आहे. त्यामुळे सर्वपक्षीय इच्छुक उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. म्हणून आघाडी , युतीपेक्षा स्वबळावर निवडणूक लढावी असा एकीचा सूर कार्यकर्त्यांकडून निघत आहे.
तसेही 2029 मध्ये नवीन जनगणनेच्या आधारे पुर्नवार्डरचना होऊन लोकसभा, विधानसभेच्या जागा वाढणार आहेत. दाटीवाटीच्या लोकवस्त्यांमुळे लोकसंख्या कव्हर होऊन कमी एरीयामध्ये खासदार आणि आमदार निवडून येणार आहेत. त्यामुळे त्यावेळी तर इच्छुकांची संख्या प्रचंड प्रमाणात असणार आहे. प्रत्येकाला वाटेल आपण सहजच खासदार, आमदार होऊ शकतो. त्यामुळे सर्वच पक्षांच्या नेत्यांना आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना न्याय देता येणार नाही. त्यावेळी बंडखोरांची संख्याही वाढणार आहे. म्हणून आघाडी, युती करणे शक्य होणार नाही. कारण आघाडी, युती करुन कमी जागा घेण्यापेक्षा सर्वच जागा लढवून जास्तीत जास्त पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना न्याय देता येऊ शकतो. म्हणून यापुढे होणा-या सर्व निवडणूका या आघाडी आणि युतीने न होता स्वबळावरच लढल्या जातील यात तिळमात्र शंका नाही! ✍️
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत