देशधमचक्र प्रवर्तन दिन विषेशांकमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

धम्मस लिपी धम्म लिपी

मानवजातीच्या इतिहासातील अनेक महान अविष्कारांपैकी “लिपि” विज्ञान हा एक महत्वपूर्ण शोध आहे. साधारणतः पंधरा हजार वर्षांपूर्वी नवपाषाण युगाला प्रारंभ झाला, पाषाणाची औजारे बनू लागली, शेतीकार्याला सुरुवात झाली व गावांची स्थापना होऊ लागली. तोपर्यंत लिपि विकसित झाली नव्हती मात्र काही सांकेतिक अंक किंवा भाव अस्तित्वात आले होते. साधारणतः सहा हजार वर्षांपूर्वी ताम्रयुगाला प्रारंभ झाला. नगरांची स्थापना होऊ लागली आणि लोकांच्या संचित जमीन संपत्तीची मोजदाद तसेच नगरप्रमुखाच्या आदेशासाठी ‘लिपि’ची गरज भासू लागली व याच काळात लिपिचा अविष्कार झाला. प्राचीन भारताची सिन्धु संस्कृती, मेसोपोटेमिया, इजिप्त तसेच चीन या सर्व संस्कृती, ताम्रयुगाच्या संस्कृती होय. या काळात लिपि पूर्ण विकसित नव्हती मात्र काही सांकेतिक आणि गरजेपुरते चिन्ह अस्तित्वात आली होती. इतिहासाच्या अभ्यासातून कळते कि लिपिचा विकास मुख्यतः तीन स्तरावर झाला आहे – चित्रलिपि, भावलिपि व ध्वनीलिपि.

लिपिची वर्णमाला बनण्यापूर्वी लेखनाचा आधार चित्र होती. लिपिचे हे सर्वात प्राचीन रूप होय. विचारांची अभिव्यक्ती अथवा संदेश देण्यासाठी जी चित्र बनविण्यात आली ती चित्रात्मक लिपि म्हणजेच चित्रलिपि होय. प्राचीन मानवाने ज्या प्रदेशात वावर केला तिथे आपल्याला ही चित्रलिपि पाहायला मिळते. मेसोपोटेमियात आढळलेली चित्रलिपि ‘किलक्षर’ नावाने प्रसिद्ध आहे तर इजिप्त मध्ये आढळणारी हिरोग्लिफिक्स ही देखील एक चित्रलिपि आहे. मध्यप्रदेशातील भीमबेटका येथील गुहांमध्ये चित्रलिपि आढळलेली आहेत.

प्राचीन काळी मनुष्याची जेव्हा भाव व्यक्त करण्या पर्यंतची प्रगती झाली, तेव्हा ती व्यक्त करण्यासाठी त्याने जी चित्रे काढली ती वेगवेगळ्या भाव दर्शविणाऱ्या वस्तूंची काढली. उदाहरण द्यायचे झाले तर सूर्याचे चित्र हे उष्णता अथवा प्रकाशाचे प्रतीक बनले, डोळ्यांतून पडणारे अश्रू हे दुःखाचे प्रतीक बनले. भावलिपि ही चित्रलिपिची पुढची पायरी होती.

मनुष्याच्या उत्कर्षा बरोबरच, व्यक्त केलेल्या प्रत्येक ध्वनीला, त्याने लिपिबद्ध करण्याचा प्रयत्न केला. हीच ध्वनिलिपि, लिपिच्या विकासातील तिसरी पायरी होय. देशकालपरत्वे, ध्वनिलिपि वेगवेगळे आकारात विकसित झाली. जैन सूत्रांमध्ये उल्लेख केलेल्या अठरा लिपि आणि ललितविस्तार या बौद्ध ग्रंथात उल्लेख केलेल्या चौसष्ट लिपि या ध्वनी लिपि आहेत. या सर्व ग्रंथात लिपिची नावे दिली आहेत मात्र त्याबद्दल कुठलीच माहिती सध्या अस्तित्वात नाही. काही लिपि प्रादेशिक, सांप्रदायिक किंवा त्या काळातील काही जाती जमातीच्या पुरतीच मर्यादित असू शकतील. अनेक अभ्यासकांना वाटते कि यातील बहुतेक लिपि या लेखनाचे प्रकार असावेत मात्र भाषा विद्वान डॉ. राजबली पांडे म्हणतात कि या सर्व लिपि भारतात किंवा भारता बाहेर तयार झालेल्या असाव्या मात्र त्या प्राचीन भारतात वापरल्या जात होत्या. चौसष्ठ लिपिंपैकी फक्त दोनच लिपि, ज्यांना सर्वसाधारणपणे ब्राम्ही आणि खरोष्टी म्हणतात, त्यांचे लिखित प्रमाण मिळते, इतर कुठल्याही लिपिचे अस्तित्व कुठेच पाहायला मिळत नाही.

लिपिंचा अभ्यास करताना एक सर्वात मोठी समस्या येते ती म्हणजे या लिपिंचे झालेले नामकरण. लिपिंच्या नामकरणावरून विद्वानांमध्ये मतभेद आहेत. अशोककालीन लिपिला ब्राम्ही लिपि का म्हटले जाते यावर देखील अनेक मतेमतांतरे आहेत. मात्र ज्या कारणामुळे हे नाव दिले गेले, ते अपुरे वाटते. अभ्यासावरून असे दिसते कि केवळ अनुमानाच्या आधारे ब्राम्ही हे नाव दिले गेले आहे. वेदपंडित सायणाचार्यांच्या मते ब्राम्हीचा अर्थ म्हणजे ‘जी ब्राह्मणांच्या द्वारा उच्चरली गेली’ तर नारदस्मृती आदी ग्रंथात लिहिल्या प्रमाणे ‘ब्रम्हा द्वारा आविष्कृत लिपि म्हणजे ब्राम्ही’. जैन ग्रंथानुसार ‘भगवान ऋषभदेव यांनी आपल्या मुलीला – ब्राम्हीला, अक्षरज्ञान देताना ज्या लिपिचा प्रयोग केला ती ब्राम्ही होय’. अर्वाचीन संस्कृततज्ञ प्रा. विश्वंभरशरण पाठक यांनी ब्राम्ही शब्द ऋग्वेद मध्ये आढळत असल्यामुळे ही लिपि वेदकालीन आहे असे अनुमान काढले. मात्र सबळ पुराव्याशिवाय काढलेले अनुमान किती मान्य होईल? जर ब्राम्ही लिपि वेदकालीन असती आणि संस्कृत भाषेसाठी प्रचलित असती तर अमरसिंहांनी “अमरकोश” या ग्रंथात त्याचा उल्लेख केला नसता का? ब्राम्ही लिपि ही वेदकालीन लिपि आहे या अर्थाने कुठल्याही कोशात लिहिलेले नाही.

अशोककालीन लिपिला ‘ब्राम्ही’ म्हणून का संबोधले गेले हे विचार करण्यासारखे आहे. १९व्या शतकातील भाषातज्ज्ञ Terrien de Lacouperie यांनी जैन आणि बौद्ध ग्रंथ आणि चिनी विश्वकोश फा-वन-सु-लिव (६८८ इ.स.) यांचा अभ्यास करून अशोककालीन लिपिला ‘ब्राम्ही’ हे नाव सुचवले. प्रसिद्ध इतिहासकार आणि लिपीतज्ञ ब्यूलरने देखील Lacouperie चे हे मत मान्य केले. मात्र लिपितज्ञ रिचर्ड सालोमन यांचे मत विचारात घेण्यासारखे आहे. ते लिहितात – “‘ब्राम्ही’ हे नाव जरी भारतातील या प्राचीन लिपिला देण्यात आले आणि सर्वांनी ते मान्य केले तरीही आपल्याला अजूनही हे माहित नाही कि अशोक काळात खरंच या लिपिला हे नाव होते कि या नावाची दुसरीच कुठली लिपि त्याकाळी अस्तित्वात होती.”

Terrien de Lacouperie यांनी पुढे असे लिहिले आहे कि डावी कडून उजवीकडे लिहिली जाणारी लिपि ही ब्राम्ही होय आणि उजवीकडून डावीकडे लिहिली जाणारी लिपि खरोष्ठी होय. ज्या ग्रंथांचा त्यांनी आधार घेतला ते म्हणजे समवायांग सूत्र, पन्नवणा सूत्र आणि भगवती सूत्र या जैन ग्रंथात लिहिलेले १८ लिपिंची नावे आणि ललितविस्तार हा बौद्ध ग्रंथात लिहिलेल्या ६४ लिपिंची नावे. या ग्रंथांमध्ये पहिल्या दोन लिपिंची नावे म्हणजे ब्राम्ही आणि खरोष्ठी होय. मात्र डावीकडून लिहिली जाणारी लिपि म्हणजेच ब्राम्ही आणि उजवीकडून लिहिली जाणारी लिपि म्हणजेच खरोष्ठी याला पुष्टी देणारा कुठलाही पुरावा Lacouperie देऊ शकले नाहीत. एवढेच नाही तर या ६४ लिपिंमध्ये इतर लिपि कुठल्या दिशेने लिहिल्या जात होत्या हे आजपर्यंत कुठल्याही संशोधकाने सप्रमाण सिद्ध केले नाही किंवा याच दोन लिपिंची ही नावे आहेत याचेही कुठले प्रमाण हे लिपितज्ञ देऊ शकले नाहीत. सम्राट अशोककालीन लिपि (जिचा ब्राम्ही म्हणून उल्लेख केला जातो) पुढे गुप्त, शारदा किंवा नागरी रूपात विकसित होत, नंतरच्या काळात, संस्कृत भाषेच्या ग्रंथांची लिपि झाली असेल, मात्र ही लिपि निश्चितच वैदिक संस्कृतची लिपि नव्हती, हे सत्य आहे. वैदिक संस्कृत मध्ये असलेले स्वर, व्यंजन आणि संयुक्त अक्षरांचे कित्येक वर्ण अशोककालीन लिपि मध्ये दिसत नाही. स्वर वर्ण जसे कि ऋ, लृ हे अशोककालीन लिपि मध्ये दिसत नाही याचे मुख्य कारण म्हणजे सम्राट अशोकांच्या शिलालेखांची भाषा प्राकृत व पालि होती आणि या भाषेंमध्ये या स्वरांना स्थान नाही.

सम्राट अशोकांच्या शिलालेखांमधील या लिपिला ब्राम्ही म्हणावे असे कुठलेच प्रमाण अजून पर्यंत तरी मिळाले नाहीत. ज्या लिपिपासून भारतासह श्रीलंका, थायलंड, लाओस, कंबोडिया, म्यानमार, नेपाळ, भूतान या देशांच्या लिपिचा उगम झाला व हे सर्व देश ‘लिखित’ झाले, त्या लिपिचे मग खरे नाव काय होते?

भारताचा लिखित इतिहासचा प्रारंभ होतो ते सम्राट अशोकांच्या या शिलालेखांपासून. त्या अगोदरच्या काळातील कुठलाही लिखित पुरावा अजून पर्यंत तरी उपलब्ध झाला नाही. ज्या लिपिमध्ये सम्राट अशोक यांनी एवढे शिलालेख लिहिले, त्या लिपिचे नाव त्याकाळी काय असू शकेल? लिपितज्ञ म्हणतात त्याप्रमाणे ब्राम्ही आणि खरोष्ठी ही नावे असावीत कि ६४ लिपिंपैकी आणखीन कुठले नाव असेल? एवढे मात्र खरे कि अशोक यांनी शिलालेखांसाठी निवडलेली लिपि ही त्याकाळी अस्तित्वात असलेल्या अनेक लिपिंमधील सर्वश्रेष्ठ आणि दगडावर कोरण्यालायक लिपि असावी. एवढेच नव्हे तर अशोकांच्या अफाट साम्राज्यातील सर्वसामान्यांना ती समजत देखील असावी कारण अशोकांचे शिलालेख आपल्याला त्यांच्या राज्याच्या चोहोबाजूच्या सीमेवर कोरलेले दिसतात. जर ती लिपि सर्वसामान्यांना समजत होती तर याचाच अर्थ असा होतो कि ती अनेक शतकांपासून प्रचलित असावी आणि म्हणूनच तिला विशिष्ट नाव देखील असावे.

भारतामध्ये आजपर्यंत जवळपास अडीच कोटी हस्तलिखिते सापडली आहेत ज्यात भूर्जपत्रे, ताम्रपत्र, शिलालेख, स्तंभलेख, इत्यादी वर्गीकृत आहेत. या हस्तलिखितांमध्ये कुठेही या लिपीला ब्राम्ही म्हणून संबोधण्यात आले नाही अथवा तसे सूचित करण्याचा प्रयत्न दिसत नाही.

सम्राट अशोकांच्या शिलालेखांपासून भारताच्या लिखित इतिहासाला प्रारंभ होतो हे आपण वर पहिलेच आहे. अशोकांनी लिहिलेल्या प्रत्येक शिलालेखात एक ओळ हमखास नजरेस पडते आणि ती म्हणजे – “इयं धम्मलिपि देवानंपियेन पियदसीना राज्ञा लेखापिता” याचा अर्थ – “या धम्मलिपि मध्ये विद्वानांचा, पंडितांचा, श्रेष्ठांचा व सर्वसामान्यांचा प्रिय राजा हा लेख लिहीत आहे”. याचाच अर्थ असा होतो कि सम्राट अशोकांच्या काळी ब्राम्ही म्हणविणाऱ्या लिपिला “धम्मलिपि” म्हणत होते! एवढेच नव्हे तर सम्राट अशोकांनी टोपरा येथील स्तंभ लेखात स्पष्ट लिहिले आहे कि “ही धम्मलिपि जेथे जेथे स्तंभ अथवा शिळा असेल तेथे तेथे लिहिण्यात यावी जेणे करून ती चिरस्थायी टिकेल” म्हणजेच सम्राट अशोकांच्या काळी अस्तित्वात असलेल्या अनेक लिपिंपैकी धम्मलिपि ही लिहिण्यास आणि समजण्यास सोपी होती आणि तिला राजमान्यता देखील होती. या धम्मलिपित अशोकांनी आपले सर्व लेख लिहिले कारण ही लिपि सर्वसामान्यांमध्ये प्रचलित होती. शिलालेख किंवा स्तंभलेख लिहिण्याचे मुख्य कारण म्हणजे सम्राट अशोकांना आपली नीतिपर शिकवण त्यांच्या राज्यातील सर्व लोकांपर्यंत पोहचवायची होती.

धम्मलिपिमध्ये पूर्ण विकसित वर्णमाला आहे तसेच ती एक ध्वन्यात्मक आणि वैज्ञानिक लिपि आहे. त्याकाळी अस्तित्वात असलेल्या अन्य लिपिं पेक्षा ती सरस होती आणि मुख्य म्हणजे पालि आणि प्राकृत भाषा व्यक्त करण्यासाठी तिचा वापर होत होता. अशोकांच्या पूर्वीपासून पालि आणि प्राकृत या दोन्ही लोकमान्य भाषा होत्या. प्रदेशानुसार धम्मलिपित उत्तर आणि दक्षिण शाखा तयार झाल्या आणि काळानुरुप अक्षरात बदल होत गेले आणि हे बदल त्याकाळातील राजवंशाशी जोडण्यात आले. इ.स पूर्व ३ शतकात, म्हणजे सम्राट अशोकांच्या काळात सुरु झालेला धम्मलिपिचा हा प्रवास आत्ताच्या नागरी लिपि पर्यंत येऊन पोहचतो.

अशोकांच्या शिलालेखांचा अभ्यास न करता कुठलाही लिपीतज्ञ भारतातील लिपिंचा इतिहास लिहू शकत नाही. मग प्रश्न पडतो कि कोणत्या आधारावर या भाषा व लिपि तज्ज्ञांनी, अशोकांनी लिहिलेल्या धम्मलिपिला ब्राम्ही लिपि संबोधले? अशोकांच्या शिलालेखांचा अभ्यास न करता केवळ अपुऱ्या माहितीवर भारतातील या सर्वात प्राचीन लिपिला ब्राम्ही संबोधणे म्हणजे २४०० वर्षांपूर्वी अशोकांनी दिलेले किंवा त्याकाळी अस्तित्वात असलेले धम्मलिपि हे नाव नाकारणे. यात या तज्ज्ञांची व इतिहासकारांची एकल व कोती मानसिकता स्पष्ट दिसते.

जेष्ठ संस्कृत अभ्यासक आणि माजी निर्देशक, गुजरात विद्यापीठाचे प्रा.वसंतकुमार भट्ट म्हणतात, ” जर अशोकांनी आपल्या शिलालेखांमधील लिपिला ‘धम्मलिपि’ हा शब्द वापरला असेल, तर आपण सर्वांनी, भारताच्या या प्राचीन लिपिला ‘धम्मलिपि’ म्हणणेच संयुक्त होईल”.

म्हणूनच ज्या सम्राट अशोकांनी संपूर्ण जगाला या लिपिची सर्वात पहिल्यांदा ओळख करून दिली आणि ज्यांनी या लिपिला “धम्मलिपि” असे नाव दिले, त्या लिपिला आपण ब्राम्ही न म्हणता फक्त धम्मलिपिच म्हणावे.

भारताच्या लिखित इतिहासाला प्रारंभ करणाऱ्या सम्राट अशोकांना आपण सर्वांनी वाहिलेली ती एक आदरांजली असेल.

अतुल मुरलीधर भोसेकर
९५४५२७७४१०

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!