महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक
वांग्याची भाजी आणि भोजनदान !
🌻रणजित मेश्राम
घरी बौध्द पूजापाठ केलंय. पूजेत पत्नी डॉ सविता , मुलगी जुई व मी सहभागी झालोत. परिचित भिक्षू अभय नायक आले होते. पंचशील , त्रीशरण झाले. परित्तदेशना दिली. दरम्यान पूज्य भिक्षूंनी प्रवचन केले. सारे हिताचे ते सांगितले. ओघात भिक्षुंच्या व्यथा ही मांडल्या.
माझ्या नावाचा उल्लेख करुन व्यथा सांगण्याचे प्रयोजन करतोय असेही म्हणाले.
काही व्यथा लक्षवेधी होत्या. ते म्हणाले, आम्ही भोजनदानावर जगतोय.रोज कुणी ना कुणी भोजनदान करतोय. बरेचदा खंड ही पडतो. उपासक अत्यंत आस्थेने भोजनदान करतात. दरदिवशी दाता नवीन असतो. पण दानपात्रावर (ताटावर) बहुधा भाजी ती तीच दिसते. ती म्हणजे वांग्याची भाजी. फरक एव्हढाच की वेगवेगळ्या तर्हेने केलेली असते. पण असतात ती वांगी !
त्यातही तेलाचे प्रमाण फार अधिक असते. सात्विक भोजनदान क्वचितच वाट्याला येतो. परिणामी बहुतेक भिक्षुंना पोटाचे विकार जडले आहेत.
ते असेही म्हणाले , भिक्षूंना विहारात रहायची खूप गैरसोय आहे. प्रत्येक विहारात कमेटी असते. त्यांचीच भांडणे असतात. त्यांचे ध्यानी या बाबी फारशा येत नाहीत. नंतर भन्तेजींनी सांगणे आवरते घेतले.
दानविधी झाल्यानंतर परततांना मी भन्तेजींना पूर्ण सांगून द्या अशी विनंती केली. तेव्हा ते म्हणाले, नागपूर शहरात जवळपास ४५० विहार आहेत. पैकी ३००-३५० विहारात साधे वाॅशरुम नाही. बहुतेक विहारात भिक्षू निवास नाही. विहारात भन्तेंना रहावे लागते. आवास निवासाच्या खूप अडचणी आहेत.
याशिवाय आजारपणात उपचाराची सोय नाही. बरेचदा नाईलास्तव आधीच्या मूळ घरी भिक्षूंना उपचारासाठी जावे लागते.
४०० च्या जवळपास भिक्षूंची संख्या नागपुरात असल्याचे सांगून भन्तेजी म्हणाले , अर्धी संख्या भिक्षुणींची आहे. मोठ्या संख्येने भिक्षू संघ उत्तर नागपुरात राहतो.
ते असेही म्हणाले , विहारात निवास व्यवस्था नसल्याने काही भिक्षुणींनी निवासासाठी कुटी बांधल्या आहेत. काही विहारात वीज बिल स्वतः भिक्षुंना भरावे लागते. काही विहारात केवळ वर्षावास म्हणजे भिक्षूंचे निवास असे मानले गेले.
जाणत्या उपासकांनी या सर्व बाबी कडे अग्रक्रमाने लक्ष द्यायला हवे.
भिक्षू प्रशिक्षण केंद्र नसल्याने खूप अडचणी निर्माण झाल्या आहेत हाही मुद्दा महत्त्वाचा असण्याकडे भन्तेजींनी लक्ष वेधले.
भन्तेजींचा हा सांगावा हे नक्कीच मोठे आव्हान असल्याचे जाणवते. ते अधिक व्यापक होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.
० रणजित मेश्राम
👤
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत