रिपब्लिकन पक्षातील मातीवाद
रिपब्लिकन पक्षाचे १९५९ पर्यंतचे मजबुत संघटन फार काळ टिकले नाही. पक्षाला लाभलेले नेतृत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणे निस्वार्थी, खंबीर व समाजाला योग्य दिशा दाखविणारे नव्हते. त्यांच्यात वैयक्तिक मतभेद, नेतृत्वाची लालसा व स्वार्थ या दुर्गुणांमुळे पक्षात बेशिस्त निर्माण झाली. त्यामुळे ते नेतृत्व व्यापक व राष्ट्रीय स्वरूपाचे बनू शकले नाही. सामाजिक व राजकीय उत्थानाची पूनर्बाधनी करणे त्यांना शक्य झाले नाही. सत्तेच्या लोभामुळे नेत्यांमध्ये अंतर्गत कलह निर्माण झाले व पक्षाचे विविध गटात विभाजन झाले. प्रारंभी, रिपब्लिकन पक्षाची साम्यवाद्यांशी वाढती मैत्री बी. सी. कांबळे यांना नको असावी; कारण चीनने तिबेटवर आक्रमण केल्याने दलाई लामा भारतात आले. चीनी कम्युनिस्टांनी अनेक तिबेटींना ठार मारले. तेथील बौद्ध विहार उद्ध्वस्त केले. या घटनेमुळे बी. सी. कांबळे यांनी कम्युनिस्टांसोबत रिपब्लिकन पक्षाने जाऊ नये ही भूमिका घेतली. त्यांच्या या भूमिकेला रिपब्लिकन पक्षाने दाद दिली नाही. त्यामुळे ते नाराज झाले. त्यांनी दि. १४ मे १९५९ रोजी नागपूर येथे आपल्या विचारांच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्षाचे अधिवेशन स्वतःच भरविले. यावेळी त्यांनी ‘रिपब्लिकन पक्ष दुरुस्त गट’ तयार केला. या गटात बी. सी. कांबळेसोबत बाबू हरिदास आवळे, दादासाहेब रुपवते, ए. जी. पवार आले. त्यामुळे दुरुस्त व नादुरुस्त असे दोन गट पक्षात पडले.
नादुरुस्त गटाचे नेतृत्व एन. शिवराज यांनी केले.त्यांच्या गटात दादासाहेब गायकवाड, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे, आर.डी.भंडारे,रा.सु.गवई होते.
दादासाहेब गायकवाड यांनी १९६७ च्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेसशी युती केली. ह्यावेळी पक्षाला फारसे यश मिळाले नाही. त्या प्रित्यर्थ काँग्रेसने १९६८ मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेवर उपसभापती म्हणून निवडून रा. सु. गवई यांना व बॅ. खोब्रागडे यांना राज्यसभेवर उपसभापती म्हणून पाठविले. १९६८ मध्ये रा. सु. गवई यांची रिपब्लिकन पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीमध्ये निवड झाली. केंद्रीय कार्यकारिणीतील निवड व विधान परिषदेवर मिळालेले उपसभापतीपद या दोन्ही पदांमुळे रा. सु. गवई यांची महत्त्वाकांक्षा वाढली व त्यांच्या अपेक्षा उंचावल्या. याच काळात दादासाहेब गायकवाड यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे रिपब्लिकन पक्षनेता निवडीचा प्रश्न निर्माण झाला. गवईंना बॅ. खोब्रागडे अडसर वाटत होते. तो दुर करण्यासाठी गवईंनी शांताबाई दाणी यांच्या मार्फत आपले वजन वाढविले. त्यामुळे, दादासाहेब गायकवाड यांना गवई जवळचे वाटू लागले. ऑक्टोबर १९७०ला नागपूर येथे दादासाहेब गायकवाड प्रणित गटाचे अधिवेशन भरविले. दुसरीकडे याचवेळी बॅ. खोब्रागडे यांनी देखील अधिवेशन भरविले व दोन गट रिपब्लिकन पक्षात उदयास आले.
दादासाहेब गायकवाड यांच्या मृत्यूनंतर या गटाला ‘गवई गट’ असे म्हणले जाऊ लागले. यानंतर शांताबाई दाणी व गवई यांच्यात वाद झाला. शांताबाईंनी गायकवाड गटाला पुनरुज्जीवित केले. अशाप्रकारे १९५९ ते १९७९ या वीस वर्षांच्या काळात रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट तयार झाले. प्रत्येक गट स्वतःला अखिल भारतीय स्तरावरील रिपब्लिकन पक्ष असल्याचा खोटा दावा करू लागला. कुणी काँग्रेससोबत सख्य साधून; तर कुणी जनसंघाशी सख्य साधून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर दलितांच्या मतांची सौदेबाजी करून जास्तीत जास्त राजकीय लाभ मिळविण्याच्या प्रयत्नात तथाकथित नेते मशगुल झाले. त्यामुळे १९५७ च्या यशासारखे घवघवीत यश या पक्षाला मिळाले नाही. फाटाफुटीच्या या काळात रिपब्लिकन पक्ष ऐक्याविषयी जे प्रयत्न झाले, ते निरुपयोगी ठरले व पक्षाची वाताहत झाली. रिपब्लिकन पक्षाच्या या वाताहतीचा परिणाम म्हणून पुढे ‘दलित पॅंथरचा उदय झाला.
रिपब्लिकन पक्षातील फाटाफूटीची विचार केला तर ही फाटाफूट नसून पश्चिम विभाग, खानदेश विभाग,विदर्भ विभाग असा हा मातीवाद होता.असे माझे निरीक्षण आहे.परंतु, ह्या मातीवादाने बुध्द बाबासाहेबांना हिंदू महापुरुषांच्या संचात स्थापित करुन त्यांचे अवमूल्यन केले नाही.रिपब्लिकन शब्दांवरील श्रध्दा कधीच ढळू दिली नाही. परंंतु १९८४ साली रामभूमीकडून एक नवा बहुजन नावाचा मातीवाद आला. ह्या कॅडरप्रेमींनी रिपब्लिकन पक्ष व बौध्द धम्मात बहुजन नावाच्या नव्या मातीवादाचे बेमालुमपणे मिश्रण करुन नागपूरच्या आशिर्वादाने नव्याने जातीवाद बळकट केला.
दादासाहेब गायकवाड यांना विनम्र अभिवादन!
✍️
शरद आढाव,
मुंबई
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत