१६ ऑक्टोबर जागतिक अन्न दिन
१६ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि कृषी संघटनेची स्थापना झाली. त्या दिवसाचे औचित्य साधून १९७९ पासून हा दिवस जगभरात साजरा केला जातो. हंगेरी चे माजी कृषी आणि अन्न खात्याचे मंत्री डॉ. पल रोमानी यांनी अन्न आणि कृषी संघटनेच्या २० व्या परिषदेमध्ये या संदर्भातील संकल्पना सर्वप्रथम मांडली आणि जगभरात हा दिवस साजरा केला जावा हा विचार पुढे आणला. तेव्हा पासून जवळपास १५० देशांमध्ये हा दिवस साजरा केला जातो. अन्नदिनाच्या निमित्ताने गरीबी आणि भूकमारी विषयी जागरूकता वाढवण्यावर आणि त्या संदर्भातील उपाय योजनांवर भर देण्यात येतो. १९८१ पासून जागतिक अन्नदिनाच्या निमित्ताने दरवर्षी एक वेगळी संकल्पना मांडली जाते.
जगभर विविध इतर दिन उत्साहाने साजरे केले जातात. त्यापैकी अन्न दिन महत्त्वाचा मानावा लागेल, कारण त्याचा थेट मानवी जीवनाच्या अस्तित्वाशी संबंध आहे. अन्न सुरक्षे बाबतची एकंदर परिस्थिती पाहता अन्न दिनाबाबत जागरूकता वाढीस लागण्याची गरज आहे. अन्नधान्य मुबलक मिळायला हवे, मात्र ते स्वस्तातच हवे अशी अपेक्षा दारिद्य्र रेषे खालील माणसा पासून ते श्रीमंता पर्यंत सर्वांचीच असते. मध्यमवर्गीयांना तर बाकी काही महागले तरी चालते, पण अन्नधान्य मात्र स्वस्तातच मिळायला हवे असते. आपल्याला पगार भरपूर मिळावा, मात्र वर्षानुवर्षे मातीत राबणाऱ्या शेतकऱ्याने मात्र पंधरा-वीस वर्षांपूर्वीच्याच भावात अन्नधान्य द्यावे असे या वर्गाला वाटत असते.
बाजारभावाच्या निम्म्याहून कमी पैसे शेतकऱ्याच्या हातात पडतात हे वास्तवही त्यांना नीट माहीत नसते, किंबहुना ते जाणून घेण्याची निकडही त्यांना भासत नाही. तापमानवाढ, मोसमी पावसाची अनियमितता, रोग-किडींचा वाढता प्रादुर्भाव, खते बियाण्यांसह अन्य कृषी निविष्ठांची अपुरी उपलब्धता, बाजार यंत्रणेकडून होणारी फसवणूक अशी अनेक आव्हाने खांद्यावर घेऊन शेतकरी काळ्या आईची सेवा मनोभावे करतो आहे. तो नवी आव्हाने पेलण्यासही समर्थ आहे, पण किमान पाठीवर हात ठेवून “लढ” म्हणण्या इतके औदार्य समाजाने दाखवायला हवे. सरकारी यंत्रणेनेही त्याच्याप्रती असलेले औदासीन्य सोडायला हवे. पीक कर्जासारख्या साऱ्या बाबींची वेळेत पूर्तता करून द्यायला हवी. ‘अन्नदाता सुखी भव’ म्हणून आपण यजमानांना दुवा देत असतो, पण खरा अन्नदाता शेतकरी आहे याचा विसर सर्वांनाच पडलेला असतो. या जगाच्या पोशिंद्याचे कल्याण करायचे असेल तर त्याने पिकवलेल्या मोत्यांना वाजवी किंमत देण्याची दानतही समाजाने अंगी बाळगली पाहिजे. जागतिक अन्न दिवसाच्या निमित्ताने हे आपण लक्षात घ्यावयास पाहिजे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत