दिन विशेषदेशभारतमहाराष्ट्रमुख्यपान

बाल क्रांतिकारक – शिरीषकुमार मेहता

लेख – २८ डिसेंबर : शिरीषकुमार मेहता जयंती

जगाच्या पाठीवर आपापल्या देशांच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक देशभक्त क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.परंतु भारताच्या स्वातंत्र्य लढ्यादरम्यान एक न भूतो न भविष्यति अशी घटना घडली,ती म्हणजे या लढ्यात शिरीषकुमार मेहता या एका शाळेकरी मुलाने आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले.वास्तविक पहाता, स्वातंत्र्यासाठी विद्यार्थ्याने दिलेल्या बलिदानाची जगातील ही एक दुर्मिळ घटनाच म्हणावी.अशा धाडसी बाल क्रांतिकारकाचा जन्म २८ डिसेंबर १९२६ रोजी नंदुरबार येथे झाला,अन् जणू भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी रक्ताचा अभिषेक करणारा देशभक्त बाल क्रांतीवीर उदयास आला.

सविताबेन ह्या
शिरीषकुमारच्या आई तर, वडील पुष्पेंद्रभाई हेही कट्टर राष्ट्रप्रेमी होते.उल्लेखनीय गोष्ट म्हणजे शिरीषकुमारचे आई-वडीलही स्वातंत्र्य संग्रामात उतरले होते.इतकेच नव्हे तर,शिरीषकुमारचे काका सोमनाथभाई हे देखील या लढ्यात आघाडीवर होते.सविताबेन ह्या राष्ट्र सेवादलाच्या अध्यक्षा,तर तत्कालिन काँग्रेस कमिटीची धुरा पुष्पेंद्रभाई यांच्याकडे होती.वास्तवात मेहता दांपत्याने आपलं सारं आयुष्य देशसेवेला वाहून घेतलं.सांगण्याचं तात्पर्य म्हणजे शिरीषकुमारचं घर म्हणजे जणू क्रांतीचं मंदिरच.त्यांच्या घरात एक सायक्लोस्टाईल मशीन होते.जनमानसात क्रांतीची भावना जागरूक करण्याच्या उद्देशाने त्या मशिनद्वारे
भित्तीपत्रके छापली जायची.अन् हीच पत्रके शिरीषकुमार आणि त्याचे क्रांतीवीर मित्र हे रात्रीच्या अंधारात शहरात जागोजागी लावत असत.जेणेकरून सर्वधर्मीय जनतेला वेळोवेळी आंदोलनाची दिशा कळावी.शेवटी सर्वांचे ध्येय केवळ एकच होते,ते म्हणजे स्वातंत्र्यप्राप्ती.

महत्वाचे म्हणजे याच वास्तूत क्रांतिकारकांच्या गुप्त बैठका,चर्चासत्रे,विचारांचे आदानप्रदान होऊन
जनआंदोलने चालविले जायची.भारतीय तरुणांच्या मनात स्वातंत्र्याची बिजे रोवण्यासाठी पुष्पेंद्रभाई हे आपल्या घरात क्रांतिकारकांची भाषणे ठेवत असत.अशा क्रांतीमय वातावरणात छोट्या क्रांतीवीर शिरीषकुमारची जडणघडण झाली.मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ही उक्ती शिरीषकुमारच्या बाबतीत तंतोतंत खरी ठरली.

देशसेवेचा वारसा लाभलेल्या शिरीषच्या नसानसात
राष्ट्रप्रेमाचे संस्कार भिनले होते.लोकमान्य टिळकांनी लिहिलेला गीता रहस्य हा ग्रंथ शिरीषकुमारने आपला जीवनग्रंथ मानला होता.महात्मा गांधींनी
फिरंग्यांना १९४२ मध्ये चले जाव चा इशारा दिला असता,नंदुरबार शहरात तर जणू क्रांतीचा ज्वालामुखी फुटला होता.बालवीर
शिरीषकुमारच्या नेतृत्वाखाली निघालेल्या प्रभातफेरीत वंदे मातरम् ; इंकलाब जिंदाबाद ;भारत माता की जय ; क्विट इंडिया या गगनभेदी घोषणांनी सारी नंदुरबारनगरी दुमदुमून गेली होती.हे आक्राळविक्राळ जनआंदोलनाचे स्वरूप पाहून,इंग्रजांचे पोलीस पार हादरून गेले होते.लाठीमार करूनही आंदोलक पांगत नव्हते.त्यामुळे गोऱ्या शिपायांचा क्रोध अनावर होत होता.यावर उपाय म्हणून इंग्रज शिपायांनी शक्तीप्रदर्शन करण्यासाठी प्रत्येक रस्त्यावर सशस्त्र परेड सुरू केली.जमाव हाताबाहेर जातोय हे पाहून,इंग्रज अधिकाऱ्यांनी प्रमुख नेत्यांची धरपकड सुरू केली.

सरतेशेवटी इंग्रज अधिकाऱ्यांनी झेंडा दे,अन्यथा गोळी झाडू अशी चेतावणी शिरीषकुमार अन् त्याच्या बालमित्रांना दिली.परंतु त्याला भीक न घालता,शिरीषकुमार अन् आंदोलकांनी तिरंगा देण्यास सफशेल नकार देत घोषणा चालूच ठेवल्या.परिणामी क्रोधापोटी इंग्रज शिपायांनी आंदोलकांच्या दिशेने अंधाधुंद फैरी झाडल्या.एक पाऊल पुढे जावून शिपायांनी प्रभातफेरीतील मुलींवर गोळ्या झाडण्यासठी बंदुका ताणल्या.हे दुष्कृत्य पाहून शिरीषकुमारला भयंकर राग आला अन् तो सैनिकांना उद्देशून क्रोधाने म्हणाला,” भित्र्या,भ्याड नामर्द सैनिकांनो,मुलींवर काय
बंदुका ताणतात,ही पहा माझी छाती,हिंमत असेल तर चालवा गोळ्या!”.या चेतावणीने आधीच चवताळलेल्या शिपायांनी शिरिषच्या दिशेने गोळ्या झाडल्या.क्षणातच गोळी लागून शिरीषच्या छातीतून रक्ताची चिरकांडी उडाली.रक्ताच्या थारोळ्यात शिरीष पडला होता.

तथापि त्याने आपल्या हातातील तिरंगा पडू दिला नाही.तो झेंडा त्यांनी कसाबसा त्याचा वर्गमित्र लालदासकडे दिला.परंतु काही वेळातच तो पण गोळी लागून धारातिर्थी पडला.नंतर तोच झेंडा शशिधरच्या हाती आला.मात्र तोही शिपायाच्या गोळीने शहीद झाला.त्या पाठोपाठ घनश्यामदासने तो झेंडा हातात घेत,इंकलाब जिंदाबाद,भारत माता की जय असा जयघोष केला.परंतु तो पण अखेर इंग्रजांच्या गोळीचा शिकार होऊन मातृभूमीसाठी शहीद झाला.सरतेशेवटी तो तिरंगा धनसुखलाल याने धारातिर्थी पडण्याआधी भारताच्या पवित्र भूमीत रोवला,अन् भारत माता की जय,इंकलाब जिंदाबाद या घोषणा देत हा बाल क्रांतिकारकही क्षणात गोळी लागून जमिनीवर कोसळला.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी या
नंदनगरीतील पंचरत्न बाल क्रांतीवीरांनी ९ सप्टेंबर १९४२ रोजी आपल्या प्राणांची आहुती दिली. शिरीषकुमारसह अन्य चार बाल क्रांतिकारकांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी दिलेलं महान बलिदान भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलं.आता हा दिवस शहीद दिन म्हणून पाळला जातो.या घटनेनंतर स्वातंत्र्यसेनानी अन् साहित्यिक वंदनीय साने गुरुजींनी शिरीषकुमारच्या घरी जाऊन त्याच्या
आईवडिलांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केलं.बाल क्रांतीवीर शिरीषकुमारची शौर्यगाथा गातांना साने गुरूजी म्हणाले,”लहानग्याची मोठी सावली!”

शहीद शिरीषकुमार अन् चार बाल क्रांतिकारकांच्या स्मरणार्थ नंदुरबार येथील माणिक चौकात स्मारक उभारण्यात आले आहे.भारतातल्या प्रत्येक विद्यार्थीने अन् युवा शक्तीने शिरीषकुमार व त्याच्या बाल मित्रांचा आदर्श घेऊन आपल्या मातृभूमीसाठी त्यागाची भूमिका ठेवत तिच्या सर्वांगीण विकासासाठी खारीचा वाटा उचलावा,म्हणजे हीच खरी बाल क्रांतिकारकांना आदरांजली ठरेल.जय हिंद! जय महाराष्ट्र!

✍️ पत्रकार रणवीरसिंह राजपूत,नंदुरबार/ठाणे निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी,महाराष्ट्र शासन (मो.न.९९२०६७४२१९)
……………………………………….
संपादक महोदय
कृपया आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रात सदर लेख २८ डिसेंबरच्या अंकात प्रसिद्ध करावा,ही विनंती.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!