गाय म्हणं राज्यमाता होणार!
आता राष्ट्रमाता जिजाऊंवर बारी आलीय!
‘शिवाजी व संभाजी आता अब्राह्मणी साहित्याचे हीरो होतील. दोघे पितापुत्र अब्राह्मणी प्रबोधनाची अमोघ अस्त्रे होतील. हिंदुत्ववाद्यांना शिवाजी मग ‘लाएबिलीटी’ (जबाबदारी ) होईल.’
शिवाजीच्या हिंदीवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण- महंमदी की ब्राह्मणी?
या पुस्तकाच्या प्रस्तावनेतून.
(कंस वगळून )काॅ. शरद पाटील
जातिनिर्मूलक/ अवैदिक/शाक्त/तांत्रिक प्रवाहाचा वारसा सांगणार्या संभाजी राजांचे महत्त्व कमी करण्यासाठी ब्राह्मणी छावणीने विषेश मोहिमा राबवून त्यांना बदफैली, स्त्रीलंपट, व्यसनी ठरवले . शिवाजी राजांना अक्षरशत्रू(प्रबोधनकारांची साक्ष काढून लिहतेय!) ठरवत रामदास या ब्राह्मण जातीयाची शिवाजीराजांचे गुरू म्हणून चतुराईने स्थापना करण्याचा प्रयत्न केला तो पण फसला!
जिजाऊ बदनामीच्या कानगोष्टींची डाळ शिजली नाही. तेव्हा हतबल ब्राह्मणी छावणीने साळसूदपणे राष्ट्रमातेचा /राज्यमातेच्या स्थानी गायीला बसवण्याचा घाट घातलाय. गाय पूजनीय आहे, असावीच. पण त्या पूजनीयतेचं निमित्त करत जिजाऊंना राष्ट्रमातेच्या स्थानावरून अदृश्य करण्याचं राजकारण सुरूय हे आम्ही ओळखून आहोत.
राष्ट्रनिर्माण करायचं तर राष्ट्रीची आवश्यकता असते…
शिवाजी महाराजांची प्रेरणा राष्ट्री ‘तुळजाभवानी’ होती तर दुसरी जिजाऊ…
‘(सभा आणि समिती )ही स्त्रीसत्तेची देणगी आहे.
सभा ही फक्त स्त्रीयांचीच होती. सभा सदस्य असतील त्या ‘सभ्या’! पुरूष सभेचा भाग नव्हते आणि म्हणून ते सभ्य होऊ शकत नव्हते. (अजून तरी पुरूष कुठे सभ्य आहेत!)पुरूषांना सोबत घेऊन स्त्रीसत्ता अधिक व्यापक बनली. समिती स्त्री आणि पुरूषांची बनली. समिती बनवणारी निऋती. म्हणजे निऋतीने तुम्हाला लोकशाही प्रक्रियेत आणलंय.
द्विगृही (सभा आणि समिती ) लोकशाही राष्ट्र निर्माण करणारी राष्ट्री आहे. ( काॅ. शरद पाटील)
स्त्रीद्वेष्ट्या कपटी लोकांनी, राष्ट्रीला बेदखल करण्याचं क्रूर भाषिक राजकारण किती दामटलं तरी अजूनही ‘राष्ट्र’ संकल्पना पुल्लिंगी शब्दरूपात ते देऊ शकले नाहीत! ‘राष्ट्र’ शब्द पुल्लिंगी करणं अजून जमलं नाही त्यांनी पुरूष राष्ट्रदेव केला! तो काय नीट पावला नाही या निवडणुकीत.
राष्ट्र बनवण्याची अट जर राष्ट्री म्हणजे स्त्रीच आहे तर ती राष्ट्री राष्ट्रमाता जिजाऊच दुसरे कोणी नाही……
‘राष्ट्रमाता’ म्हणून फुले- आंबेडकर सांस्कृतिक चर्चाविश्वात जिजाऊचं आदराचं स्थान आहे.
मार्जिनल जातींना भूमी आणि शस्त्र देऊन राजकीय सत्तेत सहभागी करून घेण्याची प्रेरणा जिजाऊंनी आपला पुत्र शिवाजीला दिली. ब्राम्हणी छावणी पुढची नेमकी रणनीती काय? तर फुले आंबेडकरांना सांस्कृतिकदृष्ट्या न स्विकारलेल्या जातींच्या तळमानात जातीधर्मीय सलोखा आणि जातिनिर्मूलक प्रवाहाची मूळ नाळ असलेली तीन प्रतिकं म्हणजे जिजाऊ -शिवाजी -संभाजी यांना किरकोळ करणे, फोल ठरवणे म्हणजे मग या जाती सरंजामी माजात रमतील किंवा जातवर्गीय दुख:वर मात करण्यासाठी क्रांतीदोस्त न शोधता स्वघात करतील. (मराठा समाजातल्या वाढत्या स्वहत्या याचंच चिन्हंय)
शिवाजी राजांचा मालवण मधला पुतळा+ उद्घाटन पाच कोटीची उधळपट्टी करून पण पडला….! हे ताजेच उदाहरण आहे. शिवाजीराजांमध्ये जीव गुंतलेल्या जनतेला शिवाजीराजांचे प्रतिकार्थी उध्वस्तीकरण सहज घेण्याची, त्यांच्या डोक्यावर केलेल्या कृष्णाजी भास्कर कुलकर्णीने केलेला वाराची/ घावाची सवय लावणं हा त्या कटाचा भाग होता.
संभाजीराजांना तर अगोदरच ब्राम्हणी छावणीतील इतिहासकार आणि साहित्यिकांनी बदफैली, व्यसनी म्हणून जनमनातून उतरवलेच होते.
आता राष्ट्रमाता जिजाऊंवर बारी आलीय!
जिजाऊचं राष्ट्रमाता हे स्थान चालाख ब्राह्मणी छावणी गायीला देऊ करत आहे. जरा सांस्कृतिक संघर्षाचे भान आणि जातिनिर्मूलक पूर्वजांचा अभिमान असेल तर
एखदा जाहीरपणे गाईला राज्यमाता म्हणणार्यांना खबरदार करा!
धम्मसंगिनी
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत