महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक
मुलीने आंतरजातीय विवाह केला.
अशोक सवाई.
ट्रिंग… ट्रिंग… ट्रिंग…
सकाळचा चहा घेता घेताच मी मोबाईल उचलला. हॅलो... हॅलो... उत्तर नाही. वाटलं राॅंग नंबर असावा पण पाच सात सेकंदात 'हॅ... हॅलो' समोरून आवाज आला. हं बोला कोण बोलताय आपण? 'सवाई सर का?' आवाज भरून आलेला व घोगरा वाटत होता. बोलतोय बोला 'स.. स.. सर... आजच्या पुण्य नगरीतील आपला लेख वाचला' आणि समोरून बोलणाऱ्याच्या घशात हुंदका दाटून आला. फोनवर हमसून हमसून रडण्याचा आवाज आला. मी मात्र गोंधळून गेलो. समोरची व्यक्ती फोनवर रडत आहे हे मला नवीन होतं. मामला काहीतरी गंभीर असल्याचा अंदाज आला. तरी धीराने मी बोललो. साहेब आपण आधी शांत व्हा. थोडा वेळ शांततेत गेला. हुंदके ओसरल्यावर शांत होत ते बोलू लागले. 'सर धुळ्यावरून मी...(नाव सांगीतले होते पण मी आता ते पार विसरून गेलो) बोलतो' बोला बोला शांतपणे बोला. 'आपल्या मुलाप्रमाणेच माझ्याही मुलीने आंतरजातीय विवाह केला. फरक एवढाच आहे की, आपल्याकडील मुलगी आपली सूनबाई म्हणून आली आणि माझी मुलगी दुसऱ्याच्या घरी सूनबाई म्हणून गेली. तुमचा लेख वाचून मला तिची खूपच आठवण आली' आता कुठं मला मामला पूर्ण कळला होता. फोनवरील गृहस्थाचा आवाज सुशिक्षित व सुसंस्कृत वाटत होता.
पुढे ते बोलू लागले. 'तिच्या लग्नाला दोन वर्षे झालीत पण मी अजूनही तिला भेटलो नाही' का? मुलगा व्यसनी आहे का? 'नाही' मग? सासू साऱ्याचा काही त्रास आहे का? 'नाही' मग मुलगा कमावता नाही की त्याचे स्थिर घरदार नाही? 'नाही हो... असं काहीही नाही. मुलगा एका कंपनीत एक्झिक्युटिव्ह पोस्ट वर आहे. त्याचे आईवडील ही चांगले शुशिक्षित व सुसंस्कृत आहेत. बंगला आहे, गाडी आहे, सर्व ठाकठीक आहे' अहो मग बिघडलं कुठे?
'बिघडलं काहीच नाही हो... ती एकुलती एक फुलासारखं जपलं तिला कित्येकदा वाटलं पोरीच्या भेटीला जावं पण नाही गेलो. दोन वर्षापासून तिच्या भेटीसाठी अनावर इच्छा होते तरी सुद्धा नाही जावू शकलो' पण का? 'खरं सांगू का सर, आम्ही उच्च समाज घटकातील आणि ते मागासवर्गीय असल्याने माझी सामाजिक प्रतिष्ठा आड येत आहे.' मी एक दीर्घ श्वास घेतला. थोडा स्तब्ध झालो. कपातला चहा केव्हाच संपला होता. आता लक्षात आल्यावर कप समोरच्या स्टूल वर ठेवला. साहेब एक बोलू का? आपण राग येवू देत नसाल तर स्पष्ट बोलतो. 'बोला सर बोला काहीही बोलले तरी ऐकून घेण्याची तयारी आहे माझी.' साहेब आपली सामाजिक प्रतिष्ठाच नाही तर आपला अहंकार सुद्धा आड येतो तुमच्या मुलीला भेटण्यासाठी. 'असू शकते' असू शकते नाही आहेच. एव्हाना तुम्ही तिला भेटायला केव्हाच गेले असते.
थोडी शांतता पसरली. त्या शांततेचा भंग करून ते बोलते झाले. 'बरोबर आहे सर तुमचं. पण आता मला तिच्या भेटी शिवाय राहवत नाही. त्यात तुमचा लेख वाचल्यावर तिला कधी एकदाचा भेटतो असं झालं.' लेकीच्या भेटीसाठी बापाचा जीव कासावीस झाला होता. त्यांच्या मनातील घालमेल मला कळल्या वाचून राहिली नाही. 'सर मी आता काय करू आणि कसं जावू?' त्यांनी त्यांची घालमेल बोलून दाखवलीच. आता त्यांच्या बोलण्यात बराच मोकळेपणा आला होता. साहेब मी बोलू का? 'बोला बोला आवश्य बोला.'
या जगात सर्वात प्रिय नातं असेल तर ते आहे बाप लेकीचं. इतर कोणत्याही नात्यात तडजोड होवू शकते. होवू शकते काय होतेच. पण लेकीच्या सुखासाठी बाप कोणत्याही तडजोडी साठी तयार नसतो. तुमची सामाजिक प्रतिष्ठा किंवा तुमचा अहंकार तर शुल्लक बाब आहे. दुसरं म्हणजे आपण नौकरीच्या निमित्ताने अजूनही धावपळीचे, धकाधकीचे जीवन जगता आहात. त्यात काही तुमच्या बाबतीत एखादी अघटित घटना घडली तर... तर तुमचा अहंकार किंवा तुमची सामाजिक प्रतिष्ठा काय कामाची? 'नाही सर मी आज आणि आत्ताच निघतो.' वरील माझे थोडे कठोर शब्द त्यांच्या खोल अंतर्मनात शिरले असावे. ते पोरीच्या भेटीसाठी जास्तच बेचैन झाले. घाई करू नका थोडं अजून ऐका. 'बोला सर' हं मुलगी कुठे राहते? 'इथे धुळ्यातच आमच्या घरापासून आठ दहा किलोमीटर वर.' अच्छा! तुम्ही तिला फोन न करता जा. अचानक गेल्यावर तिच्या घरची खरी परिस्थिती सुद्धा कळेल. तिथे गेल्यावर लेकीच्या गळ्यात पडा. तेव्हा बाप लेकीच्या आनंदाश्रूंचा बांध फुटल्या शिवाय राहणार नाही. तिच्या डोक्यावर प्रेमाने थोपटा. तुम्ही जसे तिच्या भेटीसाठी बेचैन आहात तसी तीही असेल. मनसोक्त रडून घ्या अन् मोकळे व्हा. बघा मग मन कसे हलके हलके होते. मनावरचा सर्व ताणतणाव मोरपीसा सारखा हलका होईल व पुन्हा अबोला निर्माण होणार नाही. एक अजून लक्षात घ्या. 'बोला सर' आपल्या भारतीय राज्यघटनेने किंवा संविधानाने प्रौढ मुलामुलींना त्यांचा वैवाहिक जोडीदार निवडण्याचा पूर्ण हक्क, अधिकार दिलेला आहे. त्यामुळे आपण कोणताही किंतु परंतु मनात ठेवू नये. 'नो सर.. नेव्हर...
मी आता निघू का? परत आल्यावर पुन्हा आपल्याला फोन करेलच. आपला खूप आभारी आहे सर!’ आमच्या कडून शुभेच्छा! आमच्या संवादातून पोरीच्या बापात एकंदरीत उत्साह आल्यासारखा वाटत होता. आमचा संवाद तासभर तरी चालला असावा.
माझा लेख वाचून आपल्या डोळ्यावर जातीपातीचा ऐनक लावलेला पोरीचा बाप पोरीच्या भेटीसाठी कसा बेचैन होतो हे जेव्हा मी माझ्या कानाने ऐकले तेव्हा मला खऱ्या अर्थाने कळले की, लिखाणाची ताकद काय असते. आपल्या एका लिखाणामुळे बाप लेकीची भेट होते हे ऐकून खरच धन्य धन्य झालो. ज्याला पुण्य पुण्य म्हणतात ना ते खऱ्या अर्थाने पुण्य हेच असावे. याच्या सारखं दुसरं पुण्य पृथ्वी वर नाही याचा प्रत्यक्षात अनुभव आला.
बरोबर सहाव्या दिवशी त्या गृहस्थाचा पुन्हा फोन आला. 'सवाई सरच बोलताय ना?' हो हो बोला. 'सर आज मी खूपच आनंदी आहे. जीवनातील सर्वात मो.. मोठा आनंद आहे हा. हे सर्व तुमच्या ले.. लेखामुळेच.' आधीच्या फोन मधून त्यांच्या दु:खा मुळे शब्द फुटत नव्हते आताच्या फोन मधून आनंदा मुळे. 'सर आम्ही पती पत्नी दोघेही जावून आलो. मुलगी व जावई दोघांचीही राहिलेली हौसमौज पुरवून आलो. मुलीच्या घरचेही खूप आनंदी होते तर मुलीच्या आनंदाला पारावार नव्हता. खरं सांगू का सर मी शोधून सुद्धा असं स्थळ तिच्यासाठी सापडले नसते. हे प्रामाणिकपणे सांगतो. तिच्या घरी जाऊन आमच्या अहंकाराची आम्हालाच लाज वाटू लागली होती. राहिला जातीपातीचा प्रश्न तर तो चष्मा आम्ही कधीच मोडतोड करून फेकून दिला. आज खूप छान व हलके हलके वाटत आहे.'
'सर तुम्हाला विनंती आहे की, धुळ्याला आलात की घरी जरूर या. आम्ही पुन्हा आपले आभारी आहोत.' संभाषण संपले. तो दिवस आमच्या दोघांसाठी खरोखरच खुशीचा दिवस होता. त्यांना त्यांच्या मुलीची भेट झाल्यामुळे तर मला माझ्या लेखामुळे त्या दोघांची भेट झाल्यामुळे. आमच्या दोघांसाठी एका गीताच्या दोन ओळी सारख्याच प्रमाणात होत्या.
जो खुशी मिली है मुझको,
मैं खुशी से मर न जाऊ…
– अशोक सवाई.
किवळे, देहूरोड, पुणे.
91 5617 0699.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत