पालि भाषेलाही अभिजात दर्जा मिळावा
अरविंद भराडे
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार असल्याची चर्चा अधूनमधून होत असते. वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारकडून दिला जाणारा अभिजात हा एक दर्जा आहे. भारतात सध्या सहा भाषांना अभिजात दर्जा दिलेला आहे. तामिळ (२००४), संस्कृत (२००५), कन्नड (२००८), तेलुगु (२००८), मल्याळम (२०१३) आणि ओडिया (२०१४)
एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारने काही निकष ठरवलेले आहेत, ते असे –
१) भाषा प्राचीन आणि साहित्य श्रेष्ठ असावे.
२) भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षांचे असावे.
३) भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावे.
४) प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रूप यांचा गाभा कायम असावा. इत्यादी.
अभिजात भाषेचे वरील निकष विचारात घेतल्यास प्राचीन असलेल्या पालि भाषेलादेखील अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यास अडचण नसावी.
भाषा मानवी समाजाच्या आचार, विचार आणि संस्कृतीचं प्रतिनिधित्व करत असते. सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी प्राकृतातून निर्माण झालेली पालि ही तत्कालीन व्यवहार भाषा, लोकभाषा होती, असे अभ्यासक म्हणतात. अशोककालीन अनेक शिलालेख पालिभाषेतील आहेत.
महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांनी आपला उपदेश पालि भाषेत केला. तथागतांची प्रज्ञा, करुणा, शील आणि मैत्री तत्व अभिव्यक्त करण्यास पालि भाषा समर्थ ठरली, हे पालि भाषेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. बुद्धांच्या वाणीत राग, द्वेष याला अजिबात थारा नाही. त्यामुळे पालि भाषादेखील अतिशय सुंदर, सुमधुर आणि विनयशील भाव व्यक्त करणारी वाटते.
पालि भाषेतील धम्म, कम्म, सब्ब, वग्ग, निब्बाण हे शब्द ऐकण्यास सुखद वाटतात. पण याच शब्दांनी संस्कृत रूप धारण केल्यानंतर ते रफार युक्त बनतात. जसे धर्म, कर्म, सर्व, वर्ग, निर्वाण हे शब्द उच्चारण्यास आणि ऐकण्यास कठोर वाटतात. पालिमध्ये रफारऐवजी शब्दांची द्विरूक्ती झालेली दिसते.
खरंतर अडीच हजार वर्षांपूर्वीच्या पालि भाषेतील अनेक शब्द आजही आजच्या मराठीच्या भाषिक व्यवहारात थोड्याफार फरकाने अस्तित्वात असल्याचे दिसतात. (इतरही काही भारतीय भाषांच्या भाषिक व्यवहारात पालि भाषेतील असे काही शब्द आजही आढळून येत असतील.)
‘एतं बुद्धानु सासनं’ – ‘सासनं’ अर्थात शासन-शिकवण, नियम. ‘देव मनुस्स’ अर्थात देव माणूस, मनुस्स-मनुष्य ही काही उदाहरणं सांगता येतील.
धम्मपदातील काही शब्द जसे की, पसन्नेन (प्रसन्न), वेर (वैर), उभयत्थ (उभयत ), पमाद (प्रमाद), सेट्ठ (श्रेष्ठ), कुसल (कुशल), भमर (भ्रमर), सुभासिता (सुभाषित), सुत्त (सूत्र), दीघं (दीर्घ ), पुनब्बसू (पुनर्वसू), सहस्स (सहस्र), पुनप्पुनं (पुन्हा पुन्हा), तितिक्खा (तितिक्षा), पसवती (प्रसवती), निम्मला (निर्मला), परिपक्को (परिपक्व), अनुट्ठहानो (अनुष्ठान), पुत्त (पुत्र), रट्ठ (राष्ट्र), सिथील (शिथिल) इत्यादी.
मी काही पालि भाषेचा अभ्यासक नाही. पण मराठी भाषेचा विद्यार्थी आहे. त्या आधारावर मला पालि भाषेच्या अनुषंगाने जी वैशिष्ट्ये जाणवली ती मांडली. पालि भाषेचे अभ्यासक यावर आणखी प्रकाश टाकतील.
संस्कृत ही भाषा संस्कारित भाषा मानली जाते. एकेकाळी ही भाषा शिकण्यासाठी विशिष्ट जातींनाच परवानगी होती. ती बहुजनांची कधीच झाली नाही. अगदी विसाव्या शतकाच्या प्रारंभापर्यंत बहुजनांना संस्कृत बंदी होती. मग संस्कृत साहित्यात शोषित, बहुजनांच्या व्यथा-वेदनांचे चित्रण असेल काय? मनुस्मृतीसारखा भेदाचं तत्वज्ञान मांडणारा ग्रंथ संस्कृत भाषेत आहे, ती भाषा अभिजात ठरते. या उलट ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय, लोकानुकंपाय’ हा उदघोष करणारी, प्रज्ञा, शील, करुणा आणि मैत्रीचे तत्वज्ञान सांगणारी पालि भाषा आहे. त्रिपिटकात प्रचंड पालि साहित्य भांडार आहे. जगभरातील बौद्ध राष्ट्रात ही भाषा पोहचली आहे. या अर्थाने ती वैश्विकही आहे. मात्र तरीही पालि भाषा अभिजात ठरत नाही!
सध्या आकाशवाणीवर संस्कृत वार्तापत्र प्रसारित होतात. शाळा-महाविद्यालय-विद्यापीठात हा ऐच्छिक विषय आहे. त्या तुलनेत समृद्ध असलेली पालि भाषा मागे आहे. शिक्षण प्रक्रियेत पालि भाषेला योग्य ते स्थान मिळाले पाहिजे. महाराष्ट्रात पालि भाषेच्या स्वतंत्र विद्यापीठाची मागणी आहे, मात्र अद्याप ती कृतीत उतरली नाही.
सध्या महाराष्ट्रात जे पालि भाषा, साहित्य आणि लिपीचे अभ्यासक आहेत त्यांनी पालि भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठीच्या मोहिम राबवून पुढाकार घेतला तर ते निश्चित परिणामकारक ठरेल, अशी नम्र सूचना करावी वाटते.
अभिजात भाषेचे फायदे
एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर त्या भाषेच्या प्रचार, प्रसार आणि संवर्धनासाठी काही लाभ मिळतात.
म्हणून पालि भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी आवश्यक तो पुढाकार घेऊन प्रयत्न करावे लागतील. कारण एखाद्या भाषेला अभिजात दर्जा दिल्यानंतर सांस्कृतिक मंत्रालय त्या भाषेसाठी काही संस्था उभारते. या भाषांमधल्या प्रकल्पांना पाठबळ देण्यासाठी आर्थिक तरतूदही केली जाते. यात प्रत्येक अभिजात भाषेसाठी दरवर्षी काही कोटी रुपये देण्याची तरतूद केली जाते.
-पालि भाषेला अभिजात दर्जा मिळाला तर या भाषेचा अभ्यास, संशोधन, साहित्यसंग्रह करण्यास गती मिळेल.
- पालि भाषेतील प्राचीन ग्रंथ, साहित्य अनुवादित करता येईल.
-पालिच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत करणे शक्य होईल.
महाबोधी महाविहार मुक्तीचे संकल्पक अनागरिक धम्मपाल यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या केल्या जाणाऱ्या विश्व पालि भाषा गौरव दिनी पालि भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी आणि तिच्या प्रचार, प्रसार व संवर्धनासाठी कटीबद्ध होण्याचा संकल्प करू या.
अरविंद भराडे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत