मुख्य पान

इतिहासातील तीन महत्वपूर्ण घटना

(ऐतिहासिक)

अशोक सवाई.

            २४ सप्टेंबर या दिवशी इतिहासात तीन महत्वपूर्ण घटना घडल्या. त्या ही महाराष्ट्राच्या मातीत. त्या घटना भारतीय समाजासाठी आजही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. कट्टर पंथीय समूहाला या घटनांचा इतिहास मिटवता येत नाही. हे त्यांचे अवघड जागेवरचे दुखणे आहे. 

            *१) पहिली घटना: २४ सप्टेंबर १६७४ रोजी छ. शिवाजी महाराजांचा दुसरा राज्यभिषेक-* पहिला राज्यभिषेक ६ जून १६७४ रोजी छ. शिवाजी महाराजांनी गागाभट्ट यांच्या हस्ते करून घेतला. गागाभट्टांनी हो नाही करून आडमुठ्या पध्दतीने जेवढे धन महाराजांकडून लुटता येईल तेवढे लुटण्याचा प्रयत्न केला. राजेंनी सुद्धा राज्यभिषेकासाठी मुक्त हस्ते आपली तिजोरी खुली केली. त्या काळात राज्यभिषेका शिवाय राजेंना राजमान्यता मिळणार नव्हती. जर राजमान्यता मिळणार नव्हती तर भारतातील वेगवेगळ्या संस्थानिकांशी, परकीय राज्यकर्त्यांशी जसे इंग्रज, डच, पोर्तुगीज व वेगवेगळ्या शाहींशी जसे मुघल शाही, निजाम शाही, कुतुब शाही यांच्याशी करार मदार करण्याच्या पत्र व्यवहारावर (खलित्यांवर) राजमुद्रा उमटवता आली नसती. म्हणून कोणत्याही परिस्थितीत छ. महाजांचा राज्यभिषेक होणे गरजेचे होते. राजेंनी परिस्थितीची गरज ओळखून नाखूषीनेच गागाभट्टाकडू पहिला राज्यभिषेक करून घेतला. पहिला राज्यभिषेक झाल्यावर ते स्वतंत्र निर्णय घेण्यासाठी मोकळे झाले. परंतु छ. शिवाजी महाराज या पहिल्या राज्यभिषेकाने बिलकुल समाधानी नव्हते. म्हणून त्यांनी  उणेपूर तीन महिन्यात म्हणजे *२४ सप्टेंबर १६७४* रोजी पुन्हा शाक्त पंथीय असलेले  निश्चलपुरी गोसावी यांच्याकडून शाक्त पद्धतीने दुसरा राज्यभिषेक करून घेतला. शाक्त पंथ ही एक बौद्ध धम्माची शाखा आहे. संत तुकाराम महाराज हे छ. शिवाजी महाराजांचे गुरू होते. लहानपणां पासून छत्रपतींवर त्यांच्या गुरूंकडून कळत न कळत बौद्ध धम्मीय संस्कार होत गेले. आणि किशोरवयीन राजेही आपल्या सवंगड्यांसह पहाड, डोंगर दऱ्यांमधून रपेट मारताना डोंगरात कोरलेल्या बुद्ध मूर्तींचा व बौद्ध प्रतीकांचा ठसा त्याच्या मनावर उमटत गेला. म्हणूनच महाराजांनी त्यांचा दुसरा राज्यभिषेक २४ सप्टेंबर १६७४ रोजी शाक्त पंथीय निश्चलपुरी गोसावी यांच्या हस्ते करून घेतला. 

            *२) दुसरी घटना: २४ सप्टेंबर १८७३ रोजी राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली-* मनुवादी ब्राह्मण शाही व सावकार शाही विरोधात बहुजनांना लढण्यासाठी, बळ देण्यासाठी महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. महात्मा फुलेंनी  छ. शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध घेतल्यावर त्यांनी सन १८६९ पासून शिवजयंती उत्सव करण्यास सुरवात केली. तो त्यांच्या हयाती पर्यंत म्हणजे २८ नोव्हेंबर १८९० पर्यंत सुरू होता. दरवर्षीच्या शिवजयंती उत्सवात सत्यशोधकी कार्यकर्ते मोठ्या जोशात घोषणा देत असत. घोषणा होती *आला आला छत्रपतींचा मेळा, भटा बामणांनो पळा पळा* महात्मा फुलेंच्या मृत्यू नंतर पुढे हा शिवोत्सव सत्यशोधक चळवळीने सुरू ठेवला. त्यात 'देशाचे दुश्मन' या पुस्तकाचे जहाल लेखक दिनकरराव जवळकर, प्रकाशक केशवराव जेधे, या पुस्तकाला ज्यांची प्रथम प्रस्तावना लाभली ते केशवराव बागडे व मुद्रक रामचंद्र लाड हे अग्रणी धुरंधर होते.  टिळक कंपू व मनुवादी ब्राह्मणांच्या मनात सत्यशोधकांची वरील घोषणा काट्यासारखी  सलत होती. म्हणून शिवजयंती उत्सवाचा उत्साह कमी व्हावा किंवा ती शिवजयंती बहुजनांनी विसरून जावी किंवा शिवजयंतीला शह देण्यासाठी  महात्मा फुलेंच्या मृत्यू नंतर म्हणजे सन १८९२ पासून बाळ गंगाधर टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला. 

            सत्यशोधक चळवळीला छ. राजर्षी शाहू महाराजांचा राजाश्रय होता. हे आपल्याला विसरता येणार नाही. छ. शाहू महाराज जसे राजे होते तसेच ते पट्टीचे पहिलवान सुद्धा होते. दुसरीकडे इंग्रजांचे सरकार होते. असा तिहेरी वचक टिळक कंपू व त्यांच्या इतर मनुवादी ब्राह्मणांवर होता. म्हणून ते शिवजयंतीला शह देण्यासाठी गणेशोत्सव सुरू करण्या पलीकडे काही करू शकले नाहीत. तेव्हा मनुवादी ब्राह्मण इंग्रज सरकारला खूप घाबरत असत. त्याचे कारण म्हणजे इ. स. १७७४ ला नंदकुमार देव नावाच्या ब्राह्मणाला इंग्रजांनी 'कंपनी ॲक्ट' म्हणजे इंग्रजी कायद्यानुसार फासी दिली होती. भारताच्या इतिहासात ब्राह्मणाला फाशी देण्याची ही पहिलीच घटना होती. त्यामुळे सर्व ब्रह्मवृंद हादरला. नंदकुमार देव याने कुणाची तरी हत्या केली होती. म्हणून इंग्रजांनी त्यांच्या कायद्यानुसार त्याला फाशी दिली.( संदर्भ: आधुनिक भारतातील स्वातंत्र्याची दोन आंदोलने लेखक- ओहोळ डी. आर.) तेव्हापासून ब्राह्मण वर्ग इंग्रजांना घाबरत आला. म्हणून आर एस एस च्या ब्राह्मणांनी स्वातंत्र्य आंदोलनात कधीही भाग घेतला नाही. हे खरे कारण आहे.  सिंधू सभ्यतेत किंवा संस्कृतीत खऱ्या गणपतीचा खरा इतिहास वेगळा आहे. त्यावर पुन्हा कधीतरी स्वतंत्रपणे लिहता येईल. तर सत्यशोधक समाजाची स्थापना करून १८७३ रोजी ही महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना महात्मा फुलेंनी घडवून आणली. त्यामुळेच बहुजन समाज  आज शिवजयंती मोठ्या थाटामाटात व उत्साहाने साजरी करतो. महात्मा फुलेंनी ही मोठी मौल्यवान ऐतिहासिक देणगी बहुजनांना देवून ठेवली. 

            *३) तिसरी घटना: २४ सप्टेंबर १९३२ रोजी झालेला पुणे करार-* डॉ. बाबासाहेब आंबेडकर  १९३०/१९३१/१९३२ असे सलग तीन वर्षे लंडन येथे झालेल्या गोलमेज परिषदेला उपस्थित होते. इकडे भारतावर इंग्रजांचे राज्य होते. त्याच इंग्रजांच्या राजधानीत जावून तेथे इंग्रजांशी व गांधींजींशी असा दुहेरी लढा देऊन झगडत होते. भारतात इंग्रजांचे राज्य होते म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर इंग्रजांच्या राजधानीत असून सुद्धा घाबरले नाही. ते आपल्या समाजाच्या राजकीय न्याय हक्कासाठी लढत होते. त्यांची महत्त्वाची मागणी होती ती म्हणजे एससी/एसटी समाजासाठी स्वतंत्र मतदारसंघ देण्याची. त्यांना पूर्ण खात्री होती की राजकीय सत्ता बहुजन समाजाच्या हाती आली की तो समाज आपली सामाजिक/शैक्षणिक  उन्नती लवकर करून घेवू शकेल. गोलमेज परिषदेत गांधीजी त्यांच्या मागण्यांना जबर विरोध करत होते. गांधीजी बॅरिस्टर होते. ते आपली बॅरिस्टरी पूर्ण पणाला लावून डॉ. बाबासाहेबांच्या मागण्यांना विरोध करत होते. गांधीजींचा प्रत्येक युक्तिवाद बाबासाहेब आपल्या प्रखर बुद्धिमत्तेने खोडून काढत होते. त्यांच्या युक्तिवादाला क्राॅस युक्तिवाद करून त्यांचे म्हणणे परिषदेला उपस्थित असलेले गांधीजी सहित भारतीय व अध्यक्षासह इंग्रज यांच्यापैकी कुणीही खोडून काढू शकले. नाही. आणि बाबासाहेबांनी लंडनची अख्खी परिषद जिंकली. बाहेर बाबासाहेबांच्या स्विचेस ला इंग्रजी वृत्तपत्रांनी आपल्या फ्रंट पेजसाठी हेडलाइन्स बनवल्या. बाबासाहेब पुढची रणनीती आखण्याचा तयारीत असताना गांधीजी भारतात परतल्यावर त्यांनी आपले नेहमीचे उपोषणाचे अस्त्रे उपसले. आणि पुण्याच्या येरवड्यात ब्राह्मणांच्या प्रेमापोटी  गांधीजी उपोषणाला बसले. म्हणून महात्मा जोतिबा फुले यालाच *'भटा-शेटांचे साटेलोटे'*  म्हणत. 

            इकडे बाबासाहेबांना आपल्या समाजाच्या हक्कांपुढे गांधीजींच्या उपोषणाचे काही सोयरसुतक नव्हते ते आपल्या निर्णयावर ठाम होते. ते एके ठिकाणी म्हणतात *'मुझसे बेहतर गांधीजी को कोई नही जानता'* गांधीजींचे वजन अवघे ४६ किलोचे होते. उषोषणामुळे ते ४१ किलोवर आले होते. त्यामुळे गांधीजींची तब्येत खालावली. कांग्रेस जन परेशान झाले. नेहरू, पटेल, वल्लभ पंत व इतरही कांग्रेसी नेते चिंतेत पडले. गांधीजींचे प्राण वाचवण्यासाठी सरदार पटेल, गांधी पुत्र बाबासाहेबांकडे आले होते. दरम्यानच्या काळात बाबासाहेबांवरचा राग म्हणून एससी/एसटीच्या वस्त्या जाळण्याचा त्यांच्यावर हल्ले करण्याच्या घटना बाबासाहेबांच्या कानावर आल्या. जर मी ज्यांच्या हक्कांसाठी लढतो त्यांच्यावरच हल्ले होत असतील तर त्या हक्कांचा उपयोग काय? आणि शेवटी बाबासाहेब मोठ्या जड अंतःकरणाने  पुणे करावर सही करण्यास तयार झाले. अन् तिकडे गांधीजींचे उपोषण सुटले. पुणे करार झाल्यावर बाबासाहेबांनी फार कडवी प्रतिक्रिया दिली होती. अशा रीतीने पुणे करार घडवून आणला. 

            जर आज स्वतंत्र मतदारसंघातून एससी/एसटी चे १३१ स्वतंत्र उमेदवार संसदेत निवडून गेले असते तर त्यांच्यावर ना सत्ताधारी पक्षाचा दबाव असता ना विरोधी पक्षाचा आणि ना ही सरकारचा दबाव असता. आज त्यांनी कोणत्याही पक्षाच्या सरकारला संविधानाच्या चौकटीत राहूनच  कारभार करायला भाग पाडले असते. देशाच्या भविष्यासाठी बाबासाहेबांची किती दूरदृष्टी होती व ते देशाविषयी किती चिंतीत होते हे यावरून लक्षात येते. पण देशाच्या भविष्याचा आड गांधीबाबा आले आणि आज देशाचे भविष्य डामाडोल झाले. नाही तर आज आपला देश इतर प्रगत राष्ट्रांच्या पुढे जरी नसता तरी त्यांच्या बरोबरीने नक्कीच आला असता. तर २४ सप्टेंबरच्या दिवसी वरील तीन महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना घडल्या. इतिहासाने आपल्या दस्तऐवजात या घटनांची नोंद करून ठेवली. अशा ऐतिहासिक घटना बहुजन महापुरुषच घडवून आणू शकतात. म्हणूनच आपल्या महाराष्ट्राला शिव, फुले, शाहू, आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र म्हणतात. 

-अशोक सवाई.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!