माता सावित्रीबाई फुले( जन्मदिन 3 जाने निमित्त )

हंसराज कांबळे
8626021520
नागपूर.
सामाजिक क्रांतीची अग्रदूत माता सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव जिसानारा येथे झाला होता. इ. स.1840 मध्ये महात्मा. ज्योतिराव फुले यांच्याशी त्यांचे लग्न झाले. त्यावेळेस ज्योतिबाचे वय तेरा वर्षाचे तर सावित्रीबाईचे वय नव वर्षाचे होते.
जिच्या हाती पाळण्याची दोरी, तीच जगाला उधारी! या परंपरेने चालत आलेल्या बुळसट विचारला झुगारून महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या अशिक्षित पत्नी सावित्रीबाईला सर्वप्रथम शिक्षण देऊन शिक्षित केले व नंतर त्यांची शिक्षिका म्हणून नेमणूक केली. सावित्रीबाई शाळेत शिकवू लागल्या. तेव्हाच सनातन्यांचे डोके ठणकले व बायकांनी शिकणे किंवा शिकविणे हे महापाप आहे असा संताप व्यक्त केला. याच उद्देशाने सावित्रीबाईला त्रास द्यावयास सुरुवात केली. काही लोक सावित्रीबाई शाळेत जाताना पाहून निंदानालस्ती करीत, काही शिवीगाळ तर काही कर्मठ लोक चिखल – शेण फेकीत. प्रतिगामी इथेच थांबले नाही तर महात्मा ज्योतिरावांच्या वडिलांचे कान भरले. महात्मा ज्योतिबा फुले यांचे वडील गोविंद रावांनी 1849 मध्ये ज्योतिबा व सावित्रीबाईंना घराबाहेर काढले. सन 1863 मध्ये फुल्यांनी विधवा स्त्रियांच्या निराधार मुलांसाठी अनाथालय काढले. यामधून या मानवतावादी जोडप्याने यशवंत या अनाथ मुलाला दत्तक घेतले. माता सावित्रीबाई आणि महात्मा फुले ह्यांच्या ह्यातीत घडलेल्या सनातन्याच्या जुलमी जाचा बाबत महात्मा फुले आपल्या शब्दात वर्णन करताना म्हणतात – भट लोक आपले पोट भरण्याकरता आपले स्वार्थी ग्रंथांतून वारंवार जागोजागी अज्ञानी शूद्र ( पूर्वीचे ) लोकास उपदेश करतात, त्याचमुळे त्यांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी पूज्यबुद्धी उत्पन्न होऊन त्यास त्यांनी ( भट लोकांनी ) ईश्वरालाच मात्र जो योग्य सन्मान तो आपणास देवविण्यास लावले आहे, हा काही लहान सहान अन्याय नव्हे. पुढे ते मनुष्य स्वतंत्रता या विषयावर बोलताना, लिहिताना म्हणतात – मनुष्याला स्वतंत्रता असणे ही एक मोठी जरुरीची गोष्ट आहे. जेव्हा मनुष्य स्वतंत्र असतो तेव्हा त्यास आपले मनात उद्भवलेले विचार इतर लोकांस बोलून अथवा लिहून दाखविता येतात. तेच विचार त्यास स्वतंत्रता नसल्यामुळे मोठे महत्त्वाचे असून लोकांचे हितावह का असेनात, तथापि ते त्यास दुसरे कोणास कळविता येत नाहीत, आणि असे झाले म्हणजे काही काळाने ते सर्व विचार लयास जातात.
पुन्हा ते मनुष्य गुलामगिरी बाबत म्हणतात –
गुलामाच्या स्थितीत असता मनुष्यमात्रास किती दुःखे सोसावी लागतात, याचा प्रत्यक्ष अनुभव त्या वाचून अथवा वर सांगितलेले गुलामा वाचून इतर लोकास थोडाच असेल………… त्यास जी दुःखे प्राप्त झाली ती ऐकूनच मात्र पाषाण हृदयी मनुष्याचे अंतःकरण तर काय, परंतु प्रत्यक्ष मूर्तीमंत काहाराचा पाषाणही कलकल उकलून आतून दुःखाश्रुचे लोटचे लोट चालून त्याचमुळे पृथ्वीवर इतके जळ होईल की, ज्यांचे पूर्वजांनी शूद्रा – अतिशुद्रास गुलाम केले जे वंशज हल्लीचे भटबंधू त्यापैकी जे आपले पूर्वजासारखे कठोर हृदयाचे नसून कोमल अंतकरणाचे आहेत, त्यास असे वाटेल की , हा एक जलप्रलयच आहे.
संदर्भ – पुस्तकं – गुलामगिरी. लेखक – महात्मा ज्योतिबा फुले.पैरा – प्रस्तावना.
भारत देशातील मूळचे रहिवाशी असलेल्या लोकांवर भट लोकांचा मुख्याधिकारी नामे परशुराम गृहस्थाने किती क्रूरता दाखविली.महिलाच्या पोटच्या मुलांना आणि पतीला मारून टाकले, याविषयीं महात्मा ज्योतिबा फुले लिहितात आणि म्हणतात – आम्ही स्वतः बलहीन म्हणून आम्हास अबला म्हणतात व आम्हास आमचे पतीचे जे काही बल होते तेही या दुष्टाने हारण केले.
संदर्भ – उपरोक्त. प्रस्तावना
संघशक्तीहीन परावलंबी माणसाचे जिने कसे हालाखीचे असते त्यांना पूर्वीच्या भट लोकांनी कसे धुळीस मिळविले ह्याचे उदाहरण देऊन ते म्हणतात – एक शहाणा मनुष्य दहा अज्ञानी मनुष्याचे आपणाकडेच मन वळवून त्यास तो आपले ताब्यात ठेवू शकतो. आणि दुसरे असे की , ती दहा अज्ञानी मनुष्य जर एकाच मताची असती तर त्या शहाण्या मनुष्याचे काही चालू दिले नसते. परंतु ते दहा जण निरनिराळे मतांचे असल्यामुळे शहाण्या मनुष्यास त्यास फसविण्यास काहीच अडचण पडत नाही. म्हणून महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले या दाम्पत्यांनी दलितांच्या दुःखाला व दैन्याला वाचा फोडणारे पहिले भारतीय होत. जननिंदेची तमा न बाळगता आपल्या ध्येयासाठी ते अहोरात्र झगडले. त्यामुळे त्यांचा अतोनात छळ झाला. पण त्या थोर महात्म्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केली नाही. महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला त्रिवार वंदन !
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत