दिन विशेषनागपूरमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

!! भाऊंची आठवण !!रणजित मेश्राम

भाऊंचे जाणे तेव्हाही अखरले होते. आजही अखरतेय. क्वचित एखादाच भाऊ होऊ शकतोय. भाऊ लोखंडे होते तसेच ! स्मरणीय .. अविस्मरणीय ..!

जीवन जर सामाजिकतेचे क्रमशः पृष्ठ असेल तर ते वाचावेच लागेल. भाऊ लोखंडे हे लक्षवेधी असे स्वर्णिम पृष्ठ होते. वेधक, उदबोधक अन् भेदक सुध्दा !

कोवीड काळात २२ सप्टेंबर २०२० ला त्यांचे निधन झाले. चार वर्षे होऊन गेली. ती फार मोठी सामाजिक हानी होती. ती आजही आहे.

   भाऊ, वक्तृत्वाचे बेताज बादशहा होते. सभागृह असो की जंगी मैदान. भाऊंचे नाणे खणाणत असे. त्यांची प्रसंगावधानतेवर प्रचंड पकड होती. ते हुकमी बोलत.

   त्यांच्यासारखे तेच. जगण्यातही. असण्यातही. कलप केलेले केस. भडक रंगांची रंगसंगती. टापदार. डौलदार. चारचौघात आले की नजरा खेचून घ्यायचे. त्यांची भय्या म्हणण्याची शैली, अवीट होती.

   ते आवडते होते. तितकेच नावडते ! चविष्ट होते, तितकेच तिखटही ! या अशा दोन्ही बाजू भाऊंच्या प्रबळ होत्या. त्यांची संपादित गुणवत्ता उत्तुंग होती. वाचन अफाट होते. शिवाय चौफेर. त्यांची तुलना कुणाशी करावी ? कुणी दिसत नसे. या अनुत्तरतेतच त्यांची महत्ता असायची. 

   पाली भाषेचे विद्वान प्राध्यापक म्हणून त्यांची ओळख होती. देशभर त्यांची गणना व्हायची. 'निकाय' नावाचे सुंदर मासिक त्यांनी काढले होते. त्या मासिकाचे ते संपादक होते. त्यांनी पुस्तके व इतर असे प्रचंड लेखन केलेय.

   त्यांच्या संवाद सामर्थ्याने दोन पिढ्या घडल्या. हजारो लोक त्यांना ऐकायला अधीर असतं. ते केवळ ऐकणे नसे. आंबेडकर-बुध्द जगणे असे. संवादावर भाऊंची विलक्षण हुकूमत होती. ते संवादाला अशा वळणावर आणत की, उर्दू शेर चपखल बसे. तात्काळ टाळ्यांचा वर्षाव होई.

ते मराठीत बोलत.
ते हिन्दीत बोलत.
ते इंग्रजीत बोलत.

   लिहायची त्यांची धारही वक्तृत्वासारखी धाराप्रवाही असे.

   त्यांच्यासोबतचा प्रवास खमंग व्हायचा. हसायला कोणताच कोपरा सुटत नसे. प्रसंगांचा, घटनांचा धबधबा कोसळे. खूप खूप सांगायचे. संगतीत खूप लहान होऊन जायचे. ते उत्तम खवैये होतेच ! 

   ते निमित्त शोधत असत. घरी येऊन काहीतरी देणे भाऊंना आवडे. कधी त्यांच्या घरच्या झाडाची फळे असायची. कधी एखादी भेटवस्तू. ती त्यांची खास खासियत होती.

   अखेर अखेर ते खिन्नतेत रमत. त्यातही इतिहास असे. तोही ऐकावासा वाटायचा.

   भाऊंच्या जगण्याला अर्थ होता. वेगळेपण होते. संदर्भासह संदर्भ होता. ते जेव्हढे दिसले त्यापेक्षा कितीतरी मोठे होते. 

त्यांची सदोदित आठवण राहील. भाऊंना स्मरणासह नमन !

० रणजित मेश्राम

👤

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!