हिंदुत्ववाद्यांनी मातंग समाजाची वैचारिक नसबंदी करून टाकली आहे.
अमोल घाटविसावे. अहमदनगर
पूर्वीचा महार तरी कुठे 100% बुद्ध झालाय तो जत्रा करतोय उपवास करतोय. पुढल्या खोलीत बाबासाहेबांचा बुद्धांचा एक एक फोटो लावून ठेवतोय. आतल्या खोलीत भला मोठा देव्हारा पुजतोय जागरण गोंधळ घालतोय गणपती बसवतोय, फक्त लग्न बुद्ध पद्धतीने बुद्धम् शरणम् गच्छामी करतोय. लग्न झालं का दुसऱ्या दिवशी गाडी भाड्याने करून तुळजापूर गाणगापूर जेजुरी करतोय आमच अमुक अमुक कुलदैवत आहे वगैरे वगैरे बाता मारतोय. जागरण गोंधळ घातल्याशिवाय नव्या आयुष्याची सुरुवात करत नाही यापेक्षा मोठी शोकांतिका काय असू शकते. बौद्ध समाज स्वतःला बाबासाहेबांचे अनुयायी म्हणतो आणि बाबासाहेबांच्या विचाराला हरताळ फासण्याचे काम बौद्ध समाजच करत आहे हेही नाकारून चालणार नाही. बौद्ध समाजाने आधी आपल्या घरात काय शिजतय हे पहावं आणि नंतर मातंगांना व इतर जातींना शिकवावं. बौद्ध समाज हिंदू धर्मा सोबत बाबासाहेबांच्या विचाराचा थोड्याफार प्रमाणात आचरण करत आहे म्हणून इतर बॅकवर्ड जाती पेक्षा बौद्ध समाज नोकरीत व शिक्षणात त्यांच्या दोन पाऊल पुढे आहे. काही प्रमाणात आत्ताचा बौद्ध समाज पुरोगामी विचाराचा व वैज्ञानिक दृष्टिकोन व चिकित्सक वृत्तीचा झालेला आहे इतर मागास समाजापेक्षा विचाराने प्रगल्भ झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. आत्ताच्या बौद्धांनी शंभर टक्के बाबासाहेबांचे विचार स्वीकारले व हिंदू धर्माच्या जुन्या रूढी परंपरेचा त्याग केला तर हा समाज सर्व समाजापेक्षा अधिक प्रगती करेल व आपला उत्कर्ष करून घेईल बौद्ध समाजामध्ये एक जुनी पिढी जिवंत आहे ती अजूनही उपास, नवस यामध्ये अडकून पडलेली आहे 70 टक्के बौद्ध समाज आषाढी एकादशी, महाशिवरात्र चतुर्थी, एकादशी, उपवांस करतो महिलावर्ग ही नवनवे व्रत उद्यापन करत आहेत, त्या कुटुंबातील तरुणही त्याच मार्गाने वाटचाल करत आहेत.
मातंग समाज हिंदू धर्मात आपलं अस्तित्व मान सन्मान उत्कर्ष भरभराट शोधत आहे परंतु हिंदू धर्माने मातंग समाजाला काय दिलय…? हिंदुत्ववाद्यांनी जाणीव पूर्वक मातंग समाज उपरा करून ठेवलेला आहे सनातनी धर्माला मातंग समाज केवळ भिक्षेकरी व आपल्या हातचं बाहुलं पाहीजे आहे मातंग समाज जर आत्मनिर्भर झाला तर आपलं हिंदुत्वाच गाजर घेऊन कोण हिंडणार हिंदू धर्माने मातंग समाजाची वैचारिक नसबंदी करून टाकली आहे. आपल्याला हिंदू धर्माच्या रूढी परंपरेने गुलाम करून ठेवल आहे याची जाणीव मातंग समाजाला नाही, यातून त्यांना स्वतःला हि सुटका करून घ्यायची इच्छा नाही, आरएसएस समर्थित सनातनी दिग्दर्शक प्रवीण तरडे मातंगांना हिंदुत्वाकडे आकर्षित करण्यासाठी वज्रमुठ वगैरे फिल्म मध्ये डायलॉग टाकत आहे. सनातनी हिंदू धर्म मातंग समाजाचा निरोधा प्रमाणे उपयोग करत आहे. हिंदू हिंदु म्हणत हिंदुत्वाच गाजर दाखवत आपले उद्दिष्ट बौद्ध मातंगवाद लावून साध्य करत आहे. त्यांना एक समाज आपला शागीर्द गुलाम करून ठेवायचा आहे ही त्यांची गरज आहे. जाणीवपूर्वक मातंगांना बाबासाहेब बुद्ध कळू दिले जात नाहीत. नव्हे मातंगानाच बाबासाहेब समजून घ्यायचे नाहीत. त्यामुळे मातंगांनाही आम्ही इतर बॅकवर्ड वर्गापेक्षा श्रेष्ठ आहोत असा गोड गैरसमज झाला आहे. तो बळेबळेच ब्राह्मण समाजाच्या शेजारी आपला पाट टाकत आहे याचा राग म्हणून वेळोवेळी मातंगाच्या ढुंगणावरती सवर्ण समाजाने फटके दिलेले आहेत तरीही मातंग समाज सत्य स्वीकारायला तयार नाहीत. नरक स्वर्गाच्या भंपक कल्पनामध्ये मातंग समाजाला गुंतवून ठेवण्यात आतापर्यंत सनातनी हिंदुत्ववाद्यांना यश आलेल आहे.
मातंगांच्या मनात बुद्ध व बाबासाहेबांबद्दल द्वेष, रोष , आकस आहे बुद्धम् शरणम् गच्छामी म्हणलं का ही मंडळी बौद्ध धर्माची टिंगल टवाळी करतात बाबासाहेबांना पाठीमागे शिव्या देतात 14 एप्रिल आलं म्हणजे तुमचा सण आला, बाबासाहेब तुमचा देव आहे का अस उपसात्मक बोलतात. मातंग समाजा मध्ये अजूनही पोतराज आहे जोगणी आहेत दर मंगळवारी शुक्रवारी घरोघर परडी घेऊन जोगवा मागितला जातो केस वाढवून देवीला देवाला पोतराज भिक्षा मागण्यासाठी सोडला जातो. या उलट बौद्ध समाजाचा उत्कर्ष का झाला हे वेगळं सांगायला नको.
मातंग व इतर कोणताही समाज बाबासाहेब स्वीकारणार नाहीत अपवाद काही बोटावर मोजण्यासारखे व्यक्ती आहेत त्यांना बाबासाहेब कळाले बाबासाहेबांनी दिलेल्या सवलती व संविधानाने दिलेल्या आरक्षणाचा फायदा घेत संपूर्ण बॅकवर्ड समाज व इतर आपली सामाजिक आर्थिक स्थिती सुधारत आहेत. परंतु त्यांना बाबासाहेबांचे उपकार आभार मानायचे नाहीत. उलट ते उपवासात्मक रित्या बाबासाहेबांचा अपमानच करत आहेत. बौद्ध सोडून सर्व समाज बाबासाहेबांना कृतघ्न व बेईमान झाला आहे. प्रत्येकाला आपापल्या जातीतील नायक हवा आहे. मातंगांना त्यांचा नायक आयडॉल शोधण्यामध्ये आरएसएस व हिंदुत्ववादी संघटना महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत.
मागच्या तीस वर्षा पुर्वी अण्णाभाऊ साठें, लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती साजरी केली जात नव्हती, लहुजी वस्ताद साळवे हे पण लोकांना फारसे माहित नव्हते किंवा त्यांचे अनुयायी आताच्या इतके पूर्वी कट्टर नव्हते. बाबासाहेबांची बरोबरी करण्यासाठी आता मोठ्या उत्साहात मातंग समाजाकडून दोन्ही नायकांची जयंती साजरी केली जाते मी स्वतः त्यामध्ये भाग घेतो.
मातंग समाज आम्ही हिंदू मांग म्हणत… अगदीच उग्रीट पणे कट्टर बोलत आहे
आणि म्हणूनच की काय मातंग समाज्या कडून अण्णाभाऊ साठेंचा पाट बाबासाहेबांच्या शेजारी टाकला जातोय. बाबासाहेब व अण्णाभाऊ साठे यांची तुलना केली जातेय मी स्वतः अण्णाभाऊ साठे यांचा जबरी फॅन आहे. अण्णांचं बरंच साहित्य मी वाचला आहे साहित्यिक म्हणून अण्णाभाऊ साठे ग्रेट होते यात दुमत नाही परंतु बाबासाहेब आंबेडकर हे जागतीक लीडर होते अण्णाभाऊ साठे फक्त साहित्यिक होते हे मातंग समाजाने ध्यानात घ्यायला हवं बाबासाहेब आणि अण्णाभाऊ साठे लहूजी वस्ताद यांची तुलना होऊ शकणार नाही. मातंग समाजामध्ये नवनव्या मातंग नायकांचा शोध चालू आहे, मातंग समाज स्वतःला आम्ही मातंग ऋषीचे वंशज आहोत सांगत आहे. हा शोध नव्यानेच मातंग समाजाला लागलाय. म्हणुन आम्हीं बौद्ध समाजापेक्षा श्रेष्ठ आहोत सांगण्याचा खटाटोप मातंग समाज करत आहे करत राहील.
अमोल घाटविसावे. अहमदनगर
9579923004
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत