न्यूयॉर्कच्या लिबर्टी पुतळ्याच्या तीन पट उंच असा हा बुद्धांचा १२० मी. उंच पुतळा
जपानमधील जगातील उंच ब्राँझ बुद्ध पुतळ्याची साफसफाई
उशिकू दायबटसू हा जगातील ब्राँझ मधील बुद्धांचा १२० मी. उंच पुतळा जपान देशात आहे. न्यूयॉर्कच्या लिबर्टी पुतळ्याच्या तीन पट उंच असा हा पुतळा आहे. सन २००८ पर्यंत जगातील सर्वात उंच ब्राँझचा बुद्ध पुतळा म्हणून याचे नाव कोरले गेले आहे. धार्मिकता आणि पर्यटकांचे आकर्षण या दोन्ही हेतूसाठी हा पुतळा सन १९९३ मध्ये उभारण्यात आला. या पुतळ्याच्या आत लिफ्ट असून त्यामधून ८५ मी. उंचीवर म्हणजे छाती पर्यन्त जाता येते. हा पुतळा माथ्यापासून ते खालील कमळ प्लॅटफॉर्मपर्यंत वर्षातून एकदा स्वच्छ केला जातो. मोठा दोरखंड घेऊन व त्याच्या साहाय्याने पुतळ्याला लटकून पूर्ण साफसफाई केली जाते. हे मोठे कठीण काम आहे. परंतू गेले २५ वर्ष काजूयोशी तागची आणि काझुमी मिनोवा हे दोघेजण ते करीत आहेत. दोघांनीही आता पन्नाशी ओलांडली आहे.
त्यांनी सांगितले की हा पुतळा धूळ आणि पक्षी बसल्याने खराब होतो. शिवाय वातावरणामुळे देखील त्यावर परिणाम होतो. यास्तव दरवर्षी या पुतळ्याची साफसफाई केली जाते. जेव्हा या पुतळ्याची पहिल्यांदा साफसफाई करण्याचे ठरविले तेव्हा अनेक अडचणी उभ्या राहिल्या. कारण उंच गेल्यावर हवेचा जोरदार झोत वाहतो. त्यामुळे एके जागी स्थिर राहता येत नाही. बांबूच्या झाडूने साफसफाई करण्याचा सुरुवातीचा प्रयत्न असफल झाला. तसेच शिरावरील ४८० केशगाठ भेंडोळ्यामुळे साफसफाई करणे कठीण होत होते. नंतर मात्र हाय प्रेशर वॉटर गन वापरून पुतळ्याची साफसफाई करण्यात येऊ लागली. त्यामुळे पुतळा स्वच्छ होऊ लागला. हे मोठे कठीण काम आहे, परंतु अमिताभ बुद्धांची ही प्रतिमा स्वच्छ करण्यात आम्हाला आनंद वाटतो असे पुढे ते म्हणाले.
जपानमध्ये सार्वजनिक ठिकाणी असलेल्या पुतळ्यांची दरवर्षी साफसफाई केली जाते. हा त्यांच्या परंपरेचा व पवित्र ठिकाणे स्वच्छ राखण्याचा एक भागच आहे. यामुळे येणाऱ्या भाविकांना तसेच पर्यटकांना देखील जपानी बुद्धीझमचे खूप आकर्षण वाटते आणि त्याची गोडी लागते. सन २०१७ मधील सरकारी सर्वेक्षणात ७०% जपानी हे बौद्ध परंपरा पाळतात असे दिसून आले आहे. त्यामुळे बौद्ध स्थळे स्वच्छ ठेवणे ही त्यांची सांस्कृतिक आणि अध्यात्मिक परंपरा असल्याचे दिसून येते. ब्राँझ धातूचे अनेक बुद्ध पुतळे प्राचीन काळापासून जपानमध्ये आहेत. त्यांना केव्हांही बघितले तरी ते चमकदार व लखलखीत वाटतात. जपानच्या टोकियो राजधानी पासून जवळ असलेल्या उशिकू शहरातील या अमिताभ बुद्धांच्या पुतळ्यास माझे नम्र वंदन.
— संजय सावंत
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत