दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणसामाजिक / सांस्कृतिक

जलसा परिषदेस उदंड प्रतिसाद


तथागत भगवान बुद्धाने सुरू केलेली समता प्रस्थापनेची चळवळ 19 व्या शतकापर्यंत ठप्प झाली होती.क्रांतीबा ज्योतिबा फुले यांनी ती 19 व्या शतकात पुन्हा गतिमान केली व त्यांच्याच अनुयायांनी ती ब्राह्मण-ब्राम्हणेतर वादात खेळवत खेळवत स्वत:च ब्राह्मण्यात अडकून पडले. राजर्षी शाहू महाराजांनी ती टिकवण्याचा कसोशीने प्रयत्न केला.त्यात त्यांना तेव्हाच्या जलसाकारांनी अत्यंत मोलाचे सहकार्य केले.सत्यशोधकी तत्त्वज्ञान जलशात भरून त्यांनी 1930-31 पर्यंत ते टिकवून ठेवले. तोपर्यंत जलसा चळवळीने ‘सत्यशोधकी जलसे’ हे नाव धारण केले होते.19 व 20 मार्च 1927 रोजी कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषदेने भारतीय इतिहासाला कलाटणी दिली.या परिषदेने परिवर्तनवादी चळवळीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे एकमुखी नेतृत्व अधोरेखित केले होते. या जलसाकारांनी तेव्हा आपला मोर्चा बाबासाहेबांकडे वळवला व जलशांनी आपल्या पोटात आंबेडकरी तत्त्वज्ञानाला जागा दिली. हे जलसे पुढे आंबेडकरी जलसे म्हणून प्रसिद्धीस पावले. यात आद्य आंबेडकरी जलसाकार भीमराव कर्मकांडाची भूमिका अतिशय महत्त्वाची व क्रांतिकारक आहे. याच भीमराव कर्डकांना उद्देशून बाबासाहेब म्हणाले होते, “माझ्या दहा सभा-मिटिंगा व कर्डकादी जलसाकारांचा एक जलसा सारख्या तोलामोलाचे आहेत.” जेव्हा दस्तुरखुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलसाकारांचा एवढा सन्मान करतात त्या जलसाकारांना कोणी ‘नाचगाणी करणारे लोक’ म्हणून हिणवत असेल तर त्याच्या बुद्धीची कीव केली पाहिजे. हे जलसाकार केवळ कलावंत नव्हते तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अत्यंत स्फोटक व क्रांतिकारी तत्त्वज्ञान पेरणारे क्रांतिकारक होते. हे तत्वज्ञान एवढे स्फोटक होते की, ज्या गावात ‘जलसा’ सादर होई तो गावच्या गाव जलसाकारांवर शस्त्रास्त्रानीशी जीवघेणा हल्ला करीत असे. या प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी या जलसाकारांना आपल्या कलेच्या साहित्यासह काना इतक्या काठ्या व कमरेला शस्त्र खोचून, जीव डावावर लावून मैदानात उतरावे लागे. आताच्या कलावंतांनी आपली कला म्हणजे पोट भरण्याचा धंदा बनवला यावरून जलसा चळवळीचे मूल्यमापन कराल तर तुम्ही बाबासाहेबांचे अनुयायी या व्याख्येतच बसू शकत नाही. आज आम्ही रिपब्लिकन सेनेचे सर सेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांकडे ‘आमचे आजचे बाबासाहेब’ म्हणून पाहतो. अतिशय प्रॅक्टिकल असलेला हा नेता समाजाला तारू शकतो, असा मला स्वतःला विश्वास वाटतो म्हणून मी सर सेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांच्या व्यक्तीमत्वाचे अनेक पैलू उलगडून दाखवण्यासाठी अनेक प्रयोग करतोय. त्यासाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांना ‘मिशन-ए-पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ या चळवळीच्या माध्यमातून ऑनरेबल चेअरमन म्हणून आनंदराज आंबेडकर ‘ही हस्ती काय आहे?’ हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तसेच ‘आंबेडकरी जलसा चळवळ’ पुन्हा एकदा जीवंत करून आनंदराज आंबेडकर साहेबांना आजच्या काळातले आमचे ‘बाबासाहेब’ समजून बाबासाहेबांची चळवळ जीवंत ठेवण्यासाठी कलावंतांनी पुढाकार घ्यावा याकरिता 19 व 20 मार्च 2010 रोजी पहिली दोन दिवसीय अखिल भारतीय आंबेडकरी जलसा परिषद आयोजित केली होती व या वर्षी 17 सप्टेंबर 2024 रोजी एकदिवसीय ‘अखिल भारतीय आंबेडकरी जलसा परिषद’ आयोजित करीत आहोत. या ‘परिषदेचा प्रचार झाला पाहिजे’ अशी इच्छा जेव्हा मी आमचे रिपब्लिकन सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष जेष्ठ पत्रकार व साहित्यिक आबासाहेब चासकर यांच्याकडे बोलू दाखवली तेव्हा त्यांनी ताबडतोब कार्यक्रमाची आखणी केली. ‘रिपब्लिकन सेना ठाणे प्रदेश आणि समता बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट, ठाणे आयोजित ठाणे जिल्ह्यातील कलावंतांचा जाहीर सत्कार सन्मान सोहळा’ आयोजित केला. रविवार दि. 8 सप्टेंबर 2024 दुपारी 4-30 ते रात्री 8-30 असा हा कार्यक्रम ठरला असला तरी हा कार्यक्रम रात्री 10-30 पर्यंत चालला. प्रमुख मार्गदर्शक म्हणून रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष समाजभूषण काकासाहेब खंबाळकर असलेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून ‘ ‘सर्वंकश आंबेडकरी चळवळीत आंबेडकरी जलसा चळवळीचे महत्त्व’ या अनुषंगाने मांडणी करण्याची संधी मला मिळाली. नव्हे नव्हे ती मांडणी करता यावी म्हणूनच आबासाहेबांनी जाणीवपूर्वक या कार्यक्रमाची आखणी केली होती. या कार्यक्रमास जवळपास 200 ते 250 ठाणे प्रदेश व मुंबई प्रदेश या भागातील गायक, वादक, संगीतकार,गीतकार, साहित्यिक व विचारवंत उपस्थित होते. या चळवळीला उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी दरवर्षी वेगवेगळ्या जिल्ह्यांत ही परिषद आयोजित करण्यात येईल असे जाहीर करून समाजभूषण काकासाहेब खंबाळकरांनी, नांदेड येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंबेडकरी जलसा परिषदेस ठाणे व मुंबई प्रदेशातील कलावंतांनी उपस्थित राहावे असे आवाहन कलावंतांना केले. एकंदरीत नांदेड येथे सूर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून 17 सप्टेंबर 2024 रोजी संपन्न होणारी अखिल भारतीय आंबेडकरी जलसा परिषद चांगली होईल असे महाराष्ट्रात वातावरण तयार झाले आहे.
श्रीपती ढोले, मुंबई
सोमवार दि. 9 सप्टेंबर 2024
मो. 9834875500
W. 8888578874

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!