अष्टविनायक म्हणजे बुद्ध ?
मानिक वानखेडे,
कोणतीही गोष्ट स्वीकार करण्यास फक्त दोनच पर्याय असतात. एकतर तुम्हाला पूर्ण माहिती आवश्यक असणे किंवा माहिती नसणे. माहिती असेल तर स्वतः अगदी पुराव्यानिशी तंतोतंत जुळते की नाही ते तपासून पाहाता येते आणि माहिती नसेल तर समोरचा व्यक्ती जे काही सांगतो त्यावर विश्वास ठेवण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसतो. त्याआधी प्रबोधनकार मग तो कोणीही का असेना, कोणत्या धर्माचा आणि मानसिकतेचा आहे हे जाणून घेणे सुद्धा फारच आवश्यक असते.
हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्यक्तीमत्व मा. प्रबोधनकार सीताराम ठाकरे जी आहेत. ह्यांना महाराष्ट्रातच नाही तर साऱ्या भारतात हिंदू सम्राट म्हणून त्यांची ख्याती आहे. ह्यांनी बौद्ध वाङमयाचा थोडा फार अभ्यास केला आणि अष्टविनायक हे बुद्धच आहे असे लोकांना प्रबोधन केले. आणि हाच खोडसाळ प्रचार सायन्स जर्नी ह्या यु ट्युबवर प्रचारीत केल्या जात आहे.
खरंच अष्टविनायक म्हणजे बुद्धच आहे काय ? ह्यावर जिज्ञासू वृत्तीने आणि चिकित्सक विवेकबुद्धी ने तपासून पाहिले असता अष्टविनायक आणि बुद्ध ह्यांचा धरतीच्या उत्तर धृवापासून तर दक्षिण धृवापर्यंत कोणताही संबंध नाही. जर प्रबोधनकार ठाकरेजी म्हणतात की,
हत्ती हा बुद्धाच्या जन्माचे प्रतीक आहे. तसेच हत्ती हा बुद्धाच्या धर्माचे ही प्रतीक आहे आणि बुद्ध हा हत्ती वंशातला आहे म्हणून ब्राह्मण समाजाने पार्वतीच्या मुलाला हत्तीची मान लावली…!!
हे निव्वळ खोटे आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या ग्रंथात हत्तीचा उल्लेख केलेला नाही. महामायेच्या स्वप्नात बोधीसत्व सुमेध आला होता.
इतक्यात सुमेध नावाचा एक बोधिसत्व तिच्यापुढे प्रकट झाला व तिला म्हणाला, “मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याचे ठरविले आहे. तू माझी माता होण्यास कबूल होशील का ?” तिने उत्तर दिले, “मोठ्या आनंदाने. ” त्याच क्षणी महामायला जाग आली. संदर्भ – भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रुष्ठ क्र, ५ अनु क्र १०.
समजा महामायेच्या स्वप्नात हत्ती किंवा बोधीसत्व सुमेध आला असेलही ( हे स्वप्न ब्राम्हण तीन पेटारे रचनाकाराने रचलेले आहे. ) म्हणून सिद्धार्थचा वंश हत्ती कसा होऊ शकतो ? मग बोधीसत्व सुमेधचा वंश कोणता ? हत्ती की दुसरे काही ? पण बुद्ध स्वतः काय म्हणतात ते पाहा-
“होय पिताजी,”भगवंत म्हणाले,”आपण राजांचे वंशज आहोत असे तुम्ही व तुमच्या वंशजांनी वाटल्यास म्हणावे; परंतु मी प्राचीन बुद्धांचा वंशज आहे. ते आपले अन्न भिक्षा मागून मिळवित असत आणि भिक्षेवरच ते नेहमी आपला निर्वाह करीत असत.” संदर्भ – उपरोक्त पृष्ठ क्र १२९ अनु क्र २२. द्वितीय खंड भाग चवथा. प्रकरण १. शुद्धोधनाची शेवटची भेट.
दसऱ्या एके ठिकाणी बुद्ध म्हणतात –
शुद्धोधन आणि महामाया यांचे आपण औरस पुत्र आहोत ह्या पलीकडे स्वतः संबंधित तो अधिक काही म्हणत नाही. संदर्भ – उपरोक्त पृष्ठ क्र,१६७ अनु क्र १२. प्रकरण १. भगवान बुद्धाने आपल्या धम्मात स्वतःसाठी विशेष स्थान राखलेले नाही. तृतीय खंड भाग पहिला.
परंतु राजा बिंबिसार काय म्हणतात ते पाहा –
“सूर्यापासून ज्याचा प्रारंभ झाला आहे असा तुझा वंश, नव तारुण्य डोळ्यांना भुरळ घालणारे सौंदर्य याचा मी जेव्हा विचार करतो तेव्हा मला अचंबा वाटतो की, इतर सर्व गोष्टींशी इतका विसंगत असा, राजोपभोगापेक्षा सर्वस्वी संन्याशाचे जीवन जगण्याचा हा तुझा निर्धार तुझ्या मनात कसा झाला ?” संदर्भ – पृष्ठ क्र.४३ अनु क्र,१५ प्रथम खंड भाग दुसरा.
राजा बिंबिसाराच्या म्हणण्यानुसार बुद्धाचा वंश सूर्य. बुद्धाच्या म्हणण्यानुसार प्राचीन बुद्ध आणि महामाया आणि राजा शुद्धोदन यांचे औरस पुत्र. असे हे तीन वंश तर प्रबोधनकार सीताराम ठाकरेजी यांच्या मते हत्ती ! म्हणजे वंशात सुद्धा गोधळच गोंधळ ! वंशातच इतका गोंधळ घातला आहे तर बुद्धांच्या मुळ शिकवणीत ब्राम्हण बौद्ध भिक्षूने किती गोंधळ घातला असेल ह्याची कल्पनाच केलेली बरी.
आता गणपतीची निर्मिती पाहू –
ब्राम्हण समाजाने काल्पनिक गणपतीला अष्टविनायक म्हटले. ही ब्राम्हण समाजाची दुष्ट कपटनिती प्रबोधनकार सीताराम ठाकरेजीला समजली तर त्यांनी ब्राम्हणांचा चार विषमतेवर आधारित वर्णव्यवस्था, जातिव्यवस्था आणि त्यांचा हिंदु धर्म का स्वीकार केला ? हिंदू धर्म तर ब्राम्हणांचाच आहे ना ! हिंदू धर्मात बुद्धाला कोणते स्थान आहे ? उलटपक्षी बुद्ध हे विष्णूचे नववा अवतार आहे म्हणून हिंदू धर्म ग्रंथात उल्लेख केलेला आहे. ह्यावर मा. प्रबोधनकार सीताराम ठाकरेजी ने आपले स्पष्ट मत व्यक्त का केले नाही ?
आता आपण काल्पनिक गणपतीची निर्मिती कशी झाली ते पाहू ! हिंदू धार्मिक ग्रंथात उल्लेख केल्याप्रमाणे असे म्हणतात ( निव्वळ कपोलकल्पित मनगढंत कथा ) शिवजी पत्नी पार्वतीने आंघोळ करण्याआधी स्वतःच्या अंगाच्या मळ काढून त्या मळापासून एक मुर्ती तयार केली आणि त्यात प्राण टाकून त्याला जिवंत केले आणि त्या घरात (झोपडीत) कोणी परपुरूष येऊ नये म्हणून त्या मळापासून बनविलेल्या बाळाला सांगितले की, ती आंघोळ करीत आहे म्हणून कोणालाही आत प्रवेश करू देऊ नये. तिकडून बमभोले शिवजी आले आणि सरळ त्या घरात (झोपडीत) प्रवेश केला, तेव्हा त्या मळाने बनविलेल्या बाळाने अडविले असता शिवजीने त्याची गर्दन उडविली. विशेष म्हणजे हे होईपर्यंत पार्वतीला काहीच माहीत झाले नाही. पण जेव्हा त्या बाळाचे रक्त पार्वती आंघोळ करण्याच्या ठिकाणी पोहचले तेव्हा कुठे पार्वतीला समजले की, बमभोले शिवजी ने त्या बाळाची गर्दन उडविली आहे. मग पार्वतीने स्त्री हट्ट केला, काहीही करा पण मुलाला जिवंत करा. जर ते खरोखरच सर्वशक्तिमान परमेश्वर होते तर त्यांनी हे जाणायला पाहिजे होते की, हे बाळ पार्वतीने आपल्या अंगावरच्या मळाने तयार केलेले आहे. ते त्यांनी आपल्या दिव्य दृष्टीने जाणले नाही. तरीही त्यांनी तीच कापलेली गर्दन त्याच्या गळ्यावर जोडायला पाहिजे होती ना ? पण तसेही नाही ! ब्राम्हणाला काहीतरी विशेष करून दाखवायचे होते. म्हणून सर्व प्राण्यांतील शरीराने भला मोठा असलेल्या हत्तीच्या पिल्लाचे मुंडके कापले आणि त्या मळापासून बनविलेल्या बाळाच्या धडावर ( गर्दनवर) स्थापित केले तेव्हा पासून गणपतीची कथा प्रचलित आहे. म्हणजे सत् युगातील ही कथा ! ह्यामध्ये हत्तीचे मस्तक त्या बाळाच्या धडावर कसे स्थापित केले असले प्रश्न विचारण्याची आवश्यकता नाही. जे काही लिहिले आहे ते तुम्हाला मान्य करावेच लागेल. म्हणून आजपर्यंत कोणीही उच्च शिक्षित भल्याभल्यांनी त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले नाही. अशी ही गणपतीची कपोलकल्पित मनगढंत कथा ! जर अष्टविनायक हेच बुद्ध आहेत हा सत् युगातील गणपती कलियुगात म्हणजे बुद्धाच्या काळात कसा आला ? की जाणूनबुजून आणला गेला ? असो. तर हिंदू धर्म ग्रंथातील अष्टविनायक, गणपती, वक्रतुंड, सुखकर्ता दुःखहर्ता,विद्येचादेव, श्रीगणेश, गजानन हे कोण आहेत ? हिंदू धर्मातील गणपतीची पूजा अष्टविनायक म्हणून बुद्धाची पूजा करतात काय ? प्रबोधनकार सीताराम ठाकरेजी ब्राम्हणांच्या कटकारस्थानाला बळी का पडले ? हिंदू सम्राट कसे बनले ? हिंदू धर्म म्हणजे वैदिक धर्म, ब्राम्हणी धर्म ह्यांची उत्क्रांती. डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात –
एखाद्या विषयाच्या परंपरेचे यथा योग्य ज्ञान झाल्यानंतरच त्याबद्दल यथार्थ ज्ञान होत असते. म्हणून ज्या परिस्थितीने बौद्ध धर्माला जन्म दिला ती आपण समजून घेतली तरच आपणाला बौद्ध धर्माचे वास्तविक महत्त्व कळू शकेल. भारताचा धर्म नेहमीसाठी हिंदू धर्म होता हे मत मला मान्य नाही. हिंदूधर्म तर सर्वात शेवटी विचारांची उत्क्रांती होत असताना उदयास आला. वैदिक धर्माच्या प्रचारानंतर भारतात तीन वेळा धार्मिक परिवर्तन घडून आले आहे. वैदिक धर्माचे रूपांतर ब्राह्मण धर्मामध्ये झाले आणि ब्राह्मण धर्माची रूपांतर हिंदू धर्मामध्ये झाले संदर्भ – खंड १८ भाग ३ पृष्ठ क्र २०६ पैरा २.
प्रबोधनकार सीताराम ठाकरेजी म्हणतात –
जगामध्ये दुःख आहे हे सांगणारा सर्वात पहिला बुद्ध होता. आणि दुःख नष्ट करण्याचे आठ मार्ग बुद्धानेच सांगितले. प्राचीन भारतात बुद्धाच्या अष्टांग मार्गाने दुःख नष्ट होते हे बुद्धानेच सिद्ध करून दाखविले ज्याने अष्टांग मार्गाचे पालन केले तो दुखापासून मुक्त होऊन कायमचा सुखी झाला. म्हणजे दु:खांना नष्ट करणारा बुद्ध होता आणि सुख मिळवून देणारा सुद्धा बुद्ध होता. म्हणून लोक बुद्धाला सुखकर्ता व दुःखहर्ता असे म्हणत. पण ब्राह्मण समाजाने स्वरचित काल्पनिक गणपतीला सुखकर्ता दुखहर्ता असे म्हटले. बुद्धाला अष्टविनायक म्हणजे आठ विनयाने परिपूर्ण अशा नावाने संबोधले जायचे………..
असे प्रबोधनकार सीताराम ठाकरेजी म्हणतात. परंतु बुद्धाने स्वतःला कधीच दुःखहर्ता म्हटले नाही. ते म्हणाले, ते फक्त मार्गदाता आहेत मुक्तीदाता नाहीत. जर बुद्ध स्वतः म्हणतात, ते मुक्तीदाता नाहीत.तर बुद्ध सुखकर्ता कसे होऊ शकतात ?
तथागत हे केवळ पथदर्शक आहेत. (सोन्नतीचा) प्रयत्न ज्याचा त्याने स्वतः करावयाचा असतो. संदर्भ – भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रुष्ठ क्र, २८५ अनु क्र ९ चतुर्थ खंड भाग तिसरा. प्रकरण १२ सम्यक मार्गानुसरण.
प्रबोधनकार सीताराम ठाकरेजी म्हणतात –
बुद्धाने दुःख नष्ट करण्यासाठी आठ मार्गाचा म्हणजे अष्टांग मार्गाचा अष्टशिलांचा शोध लावला. म्हणजे अष्टमार्गाचा नायक म्हणून लोक बुद्धाला अष्टविनायक असे म्हणत.
परंतु हे सरासर खोटे आहे. कारण बुद्धाला कोणीही आणि कुठेही अष्टविनायक म्हटले नाही. अष्टांगमार्ग हा दुसरे काही नसून जीवन जगण्याचा मध्यम मार्ग आहे. म्हणजे श्रीमंतीने जास्त खाऊन पिऊन उन्मत्त ( माज न करता ) न होता, तसेच शरीराला तपश्चर्या करून क्लेश न देता ( शरीराला अस्थिपंजर न करता ) योग्य मार्गाने जीवन-यापन करणे. ह्याशिवाय दुसरा कोणताही अर्थ नाही. ज्यांचा जन्म झाला तो कोणताही व्यक्ती मग बुद्ध असो डॉ बाबासाहेब आंबेडकर असो की कोणताही सामान्य व्यक्ती असो शारीरिक व्याधींपासून कोणाचीही सुटका नाहीच.
आठ विनय नसून अष्टांग मार्ग (आठ मार्ग )आहेत. विनय भिक्खू साठी २२७ आणि भिक्खूणी साठी ३११ विनय अर्थात नियम आहेत. तरीही बुद्धाला ओढून ताणून अष्टविनायक का म्हणतात ? अष्टविनायक हा शब्द ओढून ताणून बुद्धाला अप्रत्यक्षरीत्या गणपती बाप्पा बनविण्याचा दुष्ट प्रयत्न होय.
प्रबोधनकार सीताराम ठाकरेजी म्हणतात –
या भारत देशाचे खरेखुरे शाक्य गणांचे गणपती होऊन गेले त्याच गणपती शब्दाचे ब्राह्मणांनी ब्राह्मणीकरण करून समाजात खोट्या गणपतीला जन्म दिला आणि काल्पनिक गणपतीच्या नावावर संपूर्ण समाजाला अंधश्रद्धेत बुडविले आणि सण उत्सवाच्या नावावर ब्राह्मणांनी या समाजाकडून धन दौलत उकळण्यास सुरुवात केली. खोट्या गणपतीची पूजा करून ब्राह्मण धन दौलत मिळवतात. प्रत्येक क्षणाला आमचे धन ब्राह्मण घेत असतो.
ह्या गणपती उत्सवाच्या निमित्ताने निश्चितच ब्राम्हण धन दौलत मिळवतात ह्यात काहीच शंका नाही. असे असताना प्रबोधनकार सीताराम ठाकरेजीने हिंदू समाजाला जागृत करून गणपतीची पूजा करण्यास मनाई का केली नाही ? ते तर हिंदू सम्राट होते !
तरीही बुद्धाच्या वेळी शाक्य गणांचे कोणीही गणपती होऊन गेले नव्हते. कारण –
ज्या राज्यांवर राजाची अधिसत्ता नव्हती ती ही होत- कपिलवस्तूचे शाक्य, पावा व कुशिनारा येथील मल्ल, वैशालीचे लिच्छ्वी, मिथिलेचे विदेह, रामग्रामचे कोलीय, अल्लकपचे बळी, रेसपुत्तचे कलिंग, पीप्पलवनाचे मौर्य, आणि ज्यांची राजधानी मिसुमारगिरी होती ते भग्ग. संदर्भ – भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रुष्ठ क्र,३ अनु क्र.४ प्रकरण १. कुळ.
ह्याचा अर्थ असा आहे की, कपिलवस्तुचा राजा शुद्धोदन ह्याची अधिसत्ता नव्हती. त्या राज्यावर राजा प्रसेनजितची अधिसत्ता होती.
ज्या राज्यांवर राजाची सत्ता होती त्या राज्यांना जनपद म्हणत व ज्यावर राजाची सत्ता नव्हती त्या राज्यांना संघ किंवा गणराज्य असे म्हणत असत. संदर्भ – उपरोक्त, अनु क्र ५.
ह्या शासनपद्धतीविषयी डॉ बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात ते पाहा —
कपिल वस्तू येथील शाक्यांच्या शासन पद्धती विषयी विशेष अशी माहिती मिळत नाही. या राज्याची शासन व्यवस्था प्रजासत्ताक होती की, त्यावर काही विशिष्ट लोकांची सत्ता होती हे समजत नाही.
तथापि, हे मात्र निश्चित की, शाक्यांच्या गणतंत्र राज्यात अनेक राजवंश होते व ते आळीपाळीने राजसत्ता चालवीत होते.
संदर्भ – उपरोक्त, पृष्ठ क्र ३, अनु क्र ६ आणि ७.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणण्यानुसार बुद्धाचा राजवंश आहे.
ह्याचा अर्थ असा आहे की, राजा शुद्धोदनाची ज्या राज्यावर ( कपिलवस्तुवर ) सत्ता होती त्याला जनपद म्हणत असे. ह्यात कोठेही राजा म्हणजे गणपती असा उल्लेख केलेला नाही.
बौद्ध लेण्यांबद्दल जी माहिती दिली आहे ती अगदी सत्य आहे.
अशा प्रकारच्या भूलथापांना बळी पडू नये. बुद्ध आणि हिंदू धर्मातील गणपती उर्फ गजानन उर्फ वक्रतुंड उर्फ अष्टविनायक उर्फ दुःखहर्ता सुखकर्ता उर्फ विद्येच्या देवतेला बळी पडू नये. सध्या बरसाती मौसमात ज्या प्रकारे बेडूक टॅंव टॅंव करते त्याचप्रमाणे सध्या यु ट्युबवर सायन्स जर्नी मध्ये अगदी हाच खोटा प्रचार केला जात आहे. म्हणून जरी त्याचे नाव सायन्स जर्नी असले तरी ती वास्तवात सायन्स जर्नी नसून काल्पनिक (imaginary journey) आहे. विज्ञानाच्या नावावर कलंक जर्नी आहे.
मानिक वानखेडे, वर्धा
9860761826
8.9.24
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत