जातीची दलदल..!! सुरज साठे, वाटेगाव
“आप्पा तुम्ही घरातन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसनी बाहेर काढचीला पण माझ्या डोस्क्यातन आंबेडकर तुम्ही कसा बाहेर काढणार??” अस म्हणत चंद्रा आपल्या बापावर गरजला….
चंद्रा एकदा आपल्या दोस्तासंगट नागपूरला गेला होता अन् त्यावेळी त्यानं नागपूरच्या दीक्षाभूमीवर जाऊन तथागत बुद्ध अन् डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं अन् परत येताना त्यानं तिथून बाबासाहेबांची काही निवडक पुस्तक घेतली. दीक्षाभूमीच्या बाहेरच तथागत बुद्ध अन् बाबासाहेबांच्या फोटो फ्रेमचा एक मोठा स्टॉल त्याला दिसला. अन् सहजच तो अन् त्याचा जोडीदार त्या स्टॉलकडे गेले त्या स्टॉलवर त्याला बाबासाहेबांचा एक सुंदर फोटो दिसला अन् दिसल्याबरोबर तो फोटो त्याच्या मनात ही भरला. त्यानं क्षणाचा ही विलंब न करता तो फोटो विकत घेतला. अन् ते नागपूरमधून निघाले प्रवासातच चंद्राने बाबासाहेबांचं पुस्तक हातात घेतलं अन् ते वाचू लागला. तो पुस्तक वाचताना मध्येच बाबासाहेबांचा फोटो हातात घेऊन त्याच्याकडे एकटक बघायचा अन् तो फोटो कितीही पाहिला तरी त्याच मन भरत नव्हता. पण थोड्यावेळाने तो फोटो लगेच बाजूला ठेवून तो पुस्तक हातात घ्यायचा अस करत करत प्रवासात त्यानं ते सगळ पुस्तक वाचून काढल अन् त्या वाचनाच्या धुंदीत घर कधी जवळ आल हे त्याला कळलच नाही.
तो घरात आला अन् पहिल्यांदा त्यानं एक मोळा घेतला अन् त्याला भिताडावर ठोकला अन् लगेचच त्याच्यावर ती बाबासाहेबांच्या फोटोची फ्रेम लावली. तवा कुठ त्याचा जीव भांड्यात पडला. पण तो बाबासाहेबांचा फोटो घराच्या भिंतीवर लावलेला चंद्राच्या बापाला अन् आईला काय रुचला नव्हता. तरीबी पोरग लांबन आलंय उगच आल्या आल्या वादा वाद नको म्हणून त्यांनी आपली तोंड आवरली.
तीन चार दिवसांचा प्रवास करून चंद्रा थकला होता. त्यानं भाकरी खाल्ली अन् लगेचच अंथरुणावर आडवा झाला. तोवर त्याच्या आईबापाचा राग मावळला होता. पहाटे चंद्राच्या घरातील सगळेजण आपापल्या कामाला लागले. बघता बघता दिवस मावळला पूर्वेचा सूर्य पश्चिमेला विलीन झाला. चंद्राचा बाप निवांत टॉवेल आडवा लावून अंगात बनियान घालून बसला होता. तेवढ्यात तिथं भिकाजी आला. हा भिकाजी म्हणजे अतिशय चहाटाळ अन् चाबरा मनुष्य तो रोज संध्याकाळी कुणाच्या ना कुणाच्या तरी घरी जायचा अन् काहीतरी उचापती करायचा त्याच्या या स्वभावामूळ त्यानं कित्येक जणांचा पोटभर मार देखील खाल्ला होता पण त्याच्यात सुधारणा काही होत नव्हती. त्याची पोटची पोर त्याच्या या स्वभावाला किनासली होती.
भिकाजी आला अन् आप्पाला म्हणाला—“काय आप्पा निवांत बसलायस”
आप्पा—“मग आता काय उड्या मारू”
भिकाजी—“आर तस् नव्हं” बोलता बोलता भिकाजीन आप्पाच्या घरात नजर फिरवली अन् आप्पाला म्हणाला—“ती नव्हं आप्पा तू महार कधी र झालास?”
आप्पा—“भिक्या काय बोलतूयास भडवीच्या जीभला लगाम घाल”
भिकाजी बळ बळ हसत—“आर तस नाय तुझ्या घराच्या भिताडावर हेव् आंबेडकरांचा फोटो दिसला म्हणून म्हणल. आंबेडकरांचा फोटो महरांच्याच घरात असतुय नव का.”
तसा आप्पाचा चेहरा रागान लालबुंद झाला. अन् त्याचा हा उग्र चेहरा बघून भिक्यान उंबऱ्यातल पायतान पायात न घालता हातात घेऊन पळ काढला. अन् तेवढ्यात तिथं चंद्रा आला. अन् चंद्राला बघून आप्पा त्याच्यावर खेकसला अन् बाबासाहेबांच्या फोटोकड बोट दाखवून त्याला म्हणाला—“चंद्रा ही काय हाय?”
चंद्रा—“डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हाय.”
आप्पा — “आर पर हेव फोटो हीत कशापायी लावलायस”
आप्पा अन् चंद्रा यांच्यात त्या बाबासाहेबांच्या फोटोवरून जोरात धुसमुस सुरू झाली होती चंद्रा आप्पाला बोलायला ऐकत नव्हता अन् आप्पाला पुढं काय बोलायचं हे सुचत नव्हत. तेवढ्यात चंद्राच्या आईन आप्पाला शांत केलं. तसा चंद्राही शांत झाला अन् क्षणात हे भांडण नीवळल. चंद्राच्या बहिणीनं आप्पा एवढं का चिडलेती याच कारण त्याला सांगितलं. त्यानं ठीक म्हणून विषय तिथच संपवला.
दिवसामागून दिवस उलटून जात होते. चंद्राला वाचनाचं अन् पुस्तकांच जणू वेडच लागलं होत. तो गावातल्या तालुक्यातल्या ग्रंथालयातून नवं नवी पुस्तक आणायचा अन् वाचायचा. बघता बघता सहा महिने निघून गेले. पावसाळा सरला अन् हिवाळा सुरू झाला. त्यात दिवाळी झाली अन् जिकड तिकड लग्नांची जमवाजमवी सुरू झाली. काही ठिकाणी लग्नाचे बार देखील उडू लागले.
एकेदिवशी चंद्राच्या बहिणीला बघायला पाहुणे आले होते. पाहुणे घरी आले चहा, नाश्ता झाला. अन् बोलाचाली सुरू झाली. त्यातला “एकजण म्हणाला पोरगीला बोलवा आता बाहीर.” तसा आप्पान आपल्या बायकोला डोळ्यान इशारा केला. तेवढ्यात एक आडमुठा पावणा म्हणाला “बर ती नव्हं पावन नेमकी तुमची जात कुनची म्हणायची? माझ्या बोलण्याचा गैर अर्थ काढू नका. भीतीवर आंबेडकरांचा फोटू दिसला म्हणून विचारलं.”
त्या पावण्याच्या या आडग्या प्रश्नानं चंद्राचं डोस्कच फिरल अन् चंद्रा त्या पावण्याला म्हणाला “तुम्ही जात न बघताच पोरगी बघायला कसं काय आलायसा? अन् दुसरी गोष्ट अशी की तुमची नेमकी जात कूनची? बोलण्याचा गैर अर्थ काढू नका पण तुमच्या या असल्या बोलण्यामुळ विचारलं.
चंद्रान फटकारल्यावर पावण्यांनी मुंड्या खाली घातल्या. त्यातले काहीजण त्या आडमुठ्या माणसावर डोळे वटारून खेकासले.
तसा चंद्रा पुन्हा म्हणाला “तुम्ही म्हणताय आमचा पोरगा लय शिकलाय. पण तेव कुनामुळ शिकलाय हे माहीत हाय का? डॉ.बाबासाहेब आंबेकडरांच्यामुळ ते नसते तर आज तुमच्या पोराला शाळच्या आजूबाजूला बी कुणी फिरकू दिलं नसत. अन् दुसरी गोष्ट तुमचा पोरगा आज जिथं नोकरी करतोय क नाय तिथं त्याला कुणी पुसायला बी ठेवला नसता. पण आज आंबेडकरांमूळ तो तिथं चांगल्या हुद्द्यावर नोकरी करतोय याची जरा जान आणि भान ठेवा.”
चंद्राच हे बोलण पावण्यांच्या चांगलच जिवारी लागलं. त्या पावण्यांनी चंद्राची माफी मागितली. अन् पोरगी बघण्याचा कार्यक्रम उरकून त्यांनी आपल्या घरचा रस्ता धरला.
पण या प्रकरणावरून आप्पा मात्र पार बिथरला होता. तो रागान फुनफूनत होता. तो चंद्राला म्हणाला “ए चंद्रा आत्ताच्या आत्ता तेव फुटू इथन काढ नायतर माझ्या सारखा वाईट दुसरा कोण नसल.”
चंद्रा म्हणाला “पण का? काढू मी फोटो.”
आप्पा “मी सांगतुय म्हणून. ही घर माझं हाय. ह्या घराचा प्रमुख अजून बी मीच हाय. त्यामुळं मी जी सांगील तीच पूर्व दिशा. आत्ताच्या आत्ता हेवं फुटू इथन काढ.
चंद्रा “ठीक हाय. आप्पा तुम्ही घरातन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसनी बाहेर काढचीला पण माझ्या डोस्क्यातन आंबेडकर तुम्ही कसा बाहेर काढणार? अन् एक गोष्ट लक्षात ठेवा. एकदिवस तुम्ही स्वतः हा फोटो सन्मानानं इथ लावचीला माझा शब्द हाय”
अस म्हणत चंद्रा आपल्या बापावर गरजला अन् तो फोटो त्यानं तिथून काढला.
दोन दिवस निघून गेले. चंद्राच्या बहिणीला बघून गेलेल्या पाहुण्यांचा आप्पाला फोन आला. तो पावना तिकडन म्हणाला “पावन आम्हाला तुमची पोरगी पसंद हाय. पर पावन खर सांगतो तुमच्या पोरान आमचं डोळ उघाडल. ज्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यावर उपकाराचा डोंगर रचलाय. आओ अंगाच कातड जरी काढून त्यांच्या पायावर घातलं तरी त्यांच उपकार फिटणार न्हायती अशा बाबासाहेबासनी आपुन जातीच्या तराजूत तोलत होतो. आओ आपल्या खेड्यापाड्यांमध्ये शिक्षणाचा प्रसार जरी व्हायला लागला असला. गावांमध्ये आधुनिकता आली तरी आपल्या माणसांची मानसिकता अजून बी नीचच हाय बघा. आणि काल आम्ही आमच्या घरात बाबासाहेबांचा फोटो बसवला बघा. अन् फक्त फोटोच बसवला नाय तर त्यांची पुस्तकं बी आणलेती. वेळ मिळल तसा घरातला प्रत्येकजण ती पुस्तक वाचतोय.
बर आता आम्ही आमचा निर्णय कळवलाय अन् तुम्ही बी तुमचा निर्णय लवकर कळवा म्हणजे आपुन पुढच्या बैठकीच्या तयारीला लागू.”
अस सांगून पावण्यांनी फोन ठेवला. आप्पा मात्र विचारात गुंग होऊन गेला होता. त्याला कुठेतरी कालच्या वागण्याचा फस्तावा वाटत होता. तो असाच विचारमग्न होऊन घराच्या बाहेर आला. घराच्या बाहेर चंद्रा अन् त्याचा आज्जा बोलत बसले होते. चंद्रान आपल्या आज्ज्याला एक प्रश्न विचारला तो म्हणाला “तात्या तुमचा काळ कसा होता ओ.”
तात्या “हे आमचा काळ लय घाण. आर आम्ही लय हाल सोसल. घरात गरिबी पोटाला अन्न नसायचं अन् दुसरीकड जातीवाद आर आम्हाला कुणी शिवुन घेत नव्हत का? का तांब्याभर कुणी पाणी देत नव्हत. आर आम्ही दुसऱ्यांच्या रानात कामाला जायाचो दिवसभर काम करून लय तहान लागायची त्यावेळी रानाचा मालक आम्हाला पाणी संडासच्या तंबरेलातून द्यायचा. लय घाण दिस काढल आम्ही आर आजची तुमची पिढी जर आमच्या वक्ताला असती तर टाचा घासून मिली असती.”
तात्या सांगत होता अन् चंद्रा कान लावून ऐकत होता. अन् त्यांचं हे बोलण आप्पा बी ऐकत होता.
मध्येच चंद्रा म्हणाला ” तात्या मग ही सगळ थांबिवल कुणी?
तात्या “आमचा हेव वनवास आंबीडकरान सपिवला बघ. देवाच्या बी वरचा माणूस कोण असल तर ती आंबीडकर हायती बघ.”
चंद्रा “तात्या बरोबर हाय तुमचं डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे आज आपुण माणसात हाय बघा. नायतर कुत्र्यान बी आपल हाल खाल्ल नसत.”
चंद्रा अन् तात्यानी आपल्या बैठकीचा शेवट केला. अन् ते दोघे उठले. चंद्राची नजर आप्पाकड गेली आप्पा मान खाली घालून बसला होता. त्याच्या तोंडावर पश्चातापाची भावना स्पष्ट उमटली होती. आप्पा घरात आला अन् चंद्रा झोपलाय का जागा हाय याचा त्यानं कानोसा घेतला. चंद्रा झोपला होता. आप्पा हळूच चोरासारखा चंद्राच्या खोलीत शिरला अन् बाबासाहेबांचं एक पुस्तक घेऊन बाहेर आला.
दर दोन तीन दिवसांनी चंद्राच्या खोलीतल एक एक पुस्तक गायब होत होत एकेदिवशी चंद्राला शंका आली. दिवसेंदिवस पुस्तक कमी होत आहेत ही गोष्ट त्याच्या ध्यानात आली होती. पण पुस्तक जातेती कुठ हे त्याला काय कळत नव्हत. चंद्रा अंथरुणावर डोळे झाकून पडला होता. अन् तो पुस्तकांच्या विचारांत मग्न झाला होता. तेवढ्यात आप्पा आत खोलीत शिरला. आप्पाला वाटल चंद्रा झोपला आहे. म्हणून हळूच त्यानं कपाटातून एक पुस्तक घेतल व हळूच निघून गेला. चंद्रा झोपेचं सोंग घेऊन हे सगळ बघत होता. आप्पा बाहेर गेल्याबरोबर चंद्रा आप्पांच्या मागे गेला. पुढं त्यानं जे बघितल ते बघून त्याला फार मोठा धक्काच बसला. ज्या माणसाने बाबासाहेबांचा फोटो बाहेर काढला आज तोच माणूस बाबासाहेबांची पुस्तक वाचत होता. चंद्राला तो क्षण अतिशय सुखद वाटत होता. जग जिंकल्यासारखी मुद्रा त्याच्या चेहऱ्यावर झळकत होती. तो हळूच मागे फिरला अन् आपल्या खोलीत गेला.
दुसऱ्या दिवशी एक फार भयंकर घटना घडली. सकाळच्यापारी भिकाजी धापा टाकीत आप्पाजवळ आला. तो आलेला बघून चंद्रा देखील बाहेर आला आज तो काय उचापत काढतोय हे त्याला बघायचं होत. पण झालं उलटच भिकाजीच्या डोळ्यातून पाणी गळत होत अन् ते थांबायचं नाव घेत नव्हत. आप्पान त्याला शांत केला अन् काय झालय का रडतूयास?
तसा भिकाजी म्हणाला “आप्पा म्या दुनियेचा नीच माणूस हाय. पर माझी पोर लय गुणी हायती. कुणाच्या आद्यामद्यात नसतेती.”
मध्येच आप्पा म्हणाला “आर हो ते आम्हासनी ठाव हाय. तुझी पोर लय चांगली हायती. पर नेमक झालय काय ती तर सांग.”
तसा भिकाजी म्हणाला “आप्पा आर माझी पुरगी रात्री कलासासन घरला येत हुती तवा गावातल्या काय पोरांनी तिची छेड काढली. अन् ही गोष्ट आमच्या पोराला कळल्यावर तेव त्यासनी जाब विचारायला गेला. ते सारेजण दारू पिऊन पार टल्ली झाली हुतीती. ते माझ्या पोराला म्हणले की तुमची जात म्हणजे आमच्या पायाची पायतान हाय. तुम्ही लय माजलायसा. तुमच्या जातीन नेहमी आमच्या पायापशीच पडून राहील पाहिजे. तुमच्या पोरींनी आणि तुम्ही शिकून आमच्या डोक्यावर मिऱ्या वाटायच्या नादाला लागायच न्हाय. अन् म्हणून आम्ही तुझ्या भनीला छेडली. उद्यापसन तिची शाळा बंद करून टाकायची. अस म्हणून त्यांनी माझ्या गरीब भाबड्या पोराला मरुस्तर मारलंय बघ.”
तसा आप्पा म्हणाला “आर ही नेमक झालय कधी”
भिकाजी “राती झालय”
आप्पा “आर मग ही गोष्ट तू आत्ता सांगतूयास व्हय”
भिकाजी “आर आप्पा राती काय करू अन् काय नको मला काय सुचत नव्हत बघ. पहिल्यांदा पोराला दवाखान्यात नेलं. अन् आत्ता कुठ त्याला सुद आल्यावर मी तुझ्याकड आलूय. तुझा चंद्रा हुशार हाय त्याला कोर्ट कचेरीतल समद कळतंय. ज्यांनी ज्यांनी विनाकारण माझ्या पोराला मरणाच्या दारात ढकाललय त्यासणी म्या सोडणार नाय. आप्पा तुला एक विनंती हाय तुझ्या चंद्राला माझ्याबर पोलीस स्टेशनला लावून दे”
तसा चंद्रा म्हणाला “ही बघा भिकू नाना मी येतो तुमच्याबर पण एक गोष्ट आत्ता ही बोलायची वेळ नाय पण मला बोलल पाहिजे. भिकू नाना आता आपण पोलीस स्टेशनला जाणार त्यांच्यावर केस घालणार पण हे सगळे अधिकार आपल्याला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेती. मग केस घातल्यावर तुम्ही महाराच हुशीला. तुम्हाला ही चाललं का?
भिकाजी म्हणाला “चंद्रा आर चुकल माझं. आर या जगात डॉ.बाबासाहेब आंबेडकर हेच आपले वाली हायत. बाकी दुसर कोण नाय बघ आपल्याला माझी चूक भूल पोटात घे. अन् माझ्याबर चल तुझ लय उपकार हुतीली.”
चंद्रा “आओ नाना उपकार कसल सागर माझा भाव हाय. अन् तुम्ही इथ आला जरी नसता तरी मला ही बातमी कळताच मी लढायला सज्ज झालो असतो. कारण बाबासाहेबांनी सांगितलय अन्याय अत्याचारा विरोधात बंड करून पेटून उठा. चला आता.”
अस म्हणून ते पोलीस स्टेशनला गेले अन् त्यांच्याविरोधात तक्रार नोंद केली. पोलिसांनी आरोपींवर लगेच कारवाई केली.
एक आठवडा या साऱ्या लडतरीत निघून गेला. चंद्रा दुपारचा घरात वाचत बसला होता. तोच बाहेर ढोलताशाचा आवाज घुमत होता. चंद्रा उठला अन् काय भानगड हाय हे बघायला बाहेर गेला. अन् समोरच दृश्य बघून नकळत त्याच्या डोळ्यातून एक थेंब घसरला अन् तो मनातच म्हणाला “बा भीमा तुमचं हृदय फार विशाल आहे. बरेचजण तुम्हाला नाकारतात. तुमचा तिरस्कार करतात पण तुम्ही मात्र सर्वांना आपल्या छत्रछायेत घेऊन त्यांना न्याय, बंधुता अन् समतेन जवळ घेता.”
आप्पान ढोल ताशे अन् रथामधून बाबासाहेबांच्या फोटोची वाजत गाजत मिरवणूक काढली होती. अन् ती मिरवणूक आप्पाच्या दारात येऊन थांबली होती. पुढं ढोल ताशे वाजवनारे वादक त्यांच्या मागे मध्ये बाबासाहेबांचा तोच फोटो जो आप्पान घरातन बाहेर काढायला सांगितला होता तो फोटो फुलांनी सजवलेल्या रथात ठेवला होता. अन् त्याच्या पाठीमागे शेकडो समाजबांधव उपस्थित होते. रथ घरापाशी आल्यावर आप्पान तो फोटो घेतला अन् ज्या जागेवर चंद्रान फोटो लावला होता. त्याच जागेवर त्यानं सन्मानाने तो फोटो लावला. अन् सगळ्यांसमोर तो चंद्राला म्हणाला “चंद्रा माझं चुकल मी या जातीच्या दलदलीत भरकाटलू हुतू. पण तू बोलला हुतास की आप्पा बाबासाहेबांसनी घरातून बाहेर काढन शक्य हाय पण डोस्क्यातन बाबासाहेब जात न्हायत अन् म्हणून पहिल्यांदा मी बाबासाहेबासनी डोक्यात घेतल. अन् जेव्हा मी डोक्यात घेतल तेव्हा मला कळलं की या जगातला समतेचा सूर्य अन् या देशाचा मुक्तिदाता दुसरा तिसरा कोणी नसून फक्त आणि फक्त डॉ.बाबासाहेब आंबेडकरच हायती. आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी बी सांगितलय जग बदल घालुनी घाव, सांगुनी गेले मज भीमराव. गुलामगिरीच्या या चिखलात ऋतूनी बसला का ऐरावत अंग झाडूनी निघ बाहेरी घे बिनिवरी घाव. जग बदल घालुनी घाव, सांगुनी गेले मज भीमराव”
लेखक/कवी~सुरज साठे
लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे
जन्मभूमी , वाटेगाव
9370626619
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत