देश-विदेशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला बौद्ध धम्म तुलनात्मक अभ्यास

हंसराज कांबळे ✍️
8626021520
नागपूर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा तुलनात्मक अभ्यास करावा म्हणजे स्वतःला समजून येईल याचे उत्तर , 

संत कबीर यांचा कबीर पंथ धर्म होता. धम्म नाही

महात्मा ज्योतिबा फुले यांचा सत्यशोधक समाज होता , धर्म किंवा धम्म नाही

परंतु बुद्धाचाच एकमेव धम्म जो सर्व जगात पसरलेला होता आणि आहे. ज्यात स्वातंत्र्य , समता आणि बंधुता आहे, असा धर्म जगात कोणताही नाही….
आपण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला बौद्ध धम्म समजून घ्यायचा असेल तर आपल्या मनातील पूर्वाग्रह , अंधश्रद्धा , कपोलकल्पित , मनगंढत कथा या सर्वांचा त्याग करावा लागेल. अन्यथा धम्म समजणे कठीणच नाही तर असंभव आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि इंग्रजीमध्ये जो ग्रंथ लिहिला आहे त्याचे नाव – THE BUDDHA AND HIS DHAMMA अर्थात बुद्ध आणि त्यांचा धम्म आहे. त्याचे नाव THE BUDDHA AND HIS RELIGION असे नाव दिले नाही. यावरून आपण समजू शकतो की , डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना बुद्धाचा धम्म आहे असे स्पष्ट करायचे होते. परंतु लेखन आणि खंड मध्ये प्रचलित भाषेत धर्म हा शब्द प्रयोग केलेला आहे.संदर्भ – खंड. 18 भाग – 3.पृष्ठ. क्रं. 199. अनुच्छेद.266. बौद्ध धर्मामुळे भारत देश महान बौद्धधर्मीय भिक्खूचाही समुदाय , पृष्ठ. क्रं. 204. अनुच्छेद – 267 बुद्ध धर्मीय देशांनी धर्माच्या वाढीसाठी त्याग करावा. याच अनुच्छेदात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात – बुद्ध धर्माबद्दल आस्था असल्यामुळे…….. जगात बुद्ध धर्माची लाट…… 27 देशाचे बुद्ध धर्मीय प्रतिनिधी….. पृष्ठ. क्रं. 205. बुद्ध धर्म जागृत आहे की तो केवळ परंपरागत आहे हे पाहण्यासाठी आपला हेतू आहे. बुद्ध धर्मीय देशांनी त्या धर्माच्या वाढीचे कंकण बांधून त्यासाठी त्याग केला पाहिजे.बुद्ध धर्माचे आचार नि उपचार…

  आपल्या म्हणण्यानुसार , इतर धर्मियांवर टीका करण्यात वेळ घालू नका पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तुलनात्मक अभ्यास आणि त्याचे आकलन करून आपणा सर्वांना बुद्धाचा धम्म दिला जुने धर्मग्रंथ बाबत ते काय म्हणतात ते पहा - 

जुने धर्मग्रंथ विज्ञानाच्या कसोटीवर घासून त्यातले जे जे सध्य परिस्थितीस अनुकूल ते ते स्वीकारावे , जे जे संघटनेस अयोग्य, उन्नतीस अपायकारक  ते ते त्याज्य मानावे

संदर्भ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र. धनंजय किर. पृष्ठ. क्रं. 121. पैरा – पहिला मधली ओळ.

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः म्हणतात - माझ्या इतका धर्मशास्त्र वेत्ता कोणी आहे संदर्भ - खंड. क्रं. 18 भाग - 3 पृष्ठ. क्रं. 469.पैरा - 3.चवथी - पाचवी ओळ. इतकेच नाही तर ते धर्मशास्त्र , अर्थशास्त्र समाजशास्त्र, मानववंश शास्त्र  , निर्बंध शास्त्र आणि इतिहास यांचे ते ज्ञाता होते.संदर्भ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र. धनंजय कीर. पृष्ठ. क्रं.  .पैरा - दुसरा.. वाचा.  

आद. माने सर , आपण म्हणता - आपला विज्ञानवादी बौद्ध धम्म....
 कोणताही धर्म विज्ञान सांगत नाही , आध्यात्मिक तत्त्वज्ञान आणि भौतिक विज्ञान यात मोठा फरक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर याबद्दल काय म्हणतात ते पहा - 
 विज्ञान आणि धर्म या दोन गोष्टी अगदी निरनिराळ्या आहेत. एखादी गोष्ट विज्ञानाचे तत्व आहे की धर्माची शिकवण आहे याचा विचार केला पाहिजे.

संदर्भ – खंड. 18 भाग – 1 पृष्ठ. क्रं. 504.मन लावून वाचा.

 अशा प्रकारचे मिळते जुळते मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म मध्ये व्यक्त केलेले आहे. पहा - 
 भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या दोन अगदी अलग अलग गोष्टी होत पृष्ठ. क्रं. 168.अनु. क्रं. 25. 
 परंतु आपण बुद्धाला साक्षात देवच मानतो म्हणून हे सर्व गैरसमज होत आहे. तरीही धम्माची आवश्यकता आहेच. कारण धर्मामुळेच आपण एका मंचावर येतो. त्यामुळे मानसिक बळ आणि संघशक्ती निर्माण होते. हीच संघटन शक्ती आपल्यावरील अन्याय,-  अत्याचाराच्या विरोधात कार्य करण्यास मदत करते. 
धम्माची आवश्यकता कां  ? त्याबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले मत व्यक्त केलेली आहे ते पहा - 

 असे म्हणतात की , ( Religion ) हा वैयक्तिक असून ज्याने त्याने तो स्वतःपुरताच मर्यादित ठेवावा. सार्वजनिक जीवनात त्यास अवसर देऊ नये

 याच्या उलट धम्म हा सामाजिक आहे. मूल्यत:व तत्वतः सामाजिक आहे 

धम्म म्हणजे सदाचरण. म्हणजे जीवनाच्या सर्व क्षेत्रात माणसातील व्यवहार उचित असणे 

यावरून स्पष्ट होते की , मनुष्य एकटाच असला तर त्याला धम्माची आवश्यकता नाही.

परंतू ज्यावेळी दोन माणसे कोणत्याही संबंधाने एकत्र येतात त्यांना आवडो अगर न आवडो धम्म हा पाहिजेच. त्यापासून व्हायची नाही 

दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे समाज धम्माशिवाय असू शकत नाही 

संदर्भ – भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. पृष्ठ. क्रं. 244 अनु. क्रं. 7 ते 12.प्रकरण – 2. धम्म धर्मापासून ( Religion ) वेगळा कसा.

वरील निष्कर्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काढलेले असून ते सूत्तपिटकात मध्ये मिळणार नाही. 

 यावरून आपण समजू शकतो की , धम्माला किंवा धर्माला सामाजिक जीवनात किती महत्त्वाचे स्थान आहे. आज देशात 3.5 टक्के शातीर ब्राह्मण मनुवादी व्यवस्था प्रस्थापित करण्याचा प्रयत्नात  असेल तर त्याला कारण हिंदू धर्म हाच आहे. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या धम्मग्रंथाचे अध्ययन करणे फारच आवश्यक आहे. तेही तुलनात्मक अभ्यास व आकलन करावे लागेल तेव्हाच कुठे खरा धम्म समजेल. 

आपला विषय इतर धर्मियांवर टीका करू नका ? बुद्धाच्या विधानातही भेसळ केलेली आहे. जसा दूधवाला दुधात पाणी घालून भेसळ करतो अगदी त्याचप्रमाणे ब्राह्मण बौद्ध भिक्षूने त्या बुद्धाच्या मूळ विधानातही भेसळ केलेली आहे. तीच आपणाला ओळखावी लागेल. बुद्ध म्हणतात - 

भगवान पुढे म्हणाले  , " हे कालामांनो  , तुम्ही जे केवळ ऐकता त्यावर विश्वास ठेवू नका , जे केवळ पुष्कळ लोक सांगतात म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. जे केवळ धर्म पुस्तकात लिहिलेले आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. जे केवळ तर्कशास्त्रानुसार आहे म्हणून ते मानू नका. जे केवळ सकृतदर्शनी पटण्यासारखे आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. या समजुती आणि मते अनुकूल वाटतात म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवू नका. जे केवळ बाह्यातकारी सत्य म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. एखादे वचन कोणा एका यतीने अथवा आचार्यने सांगितले एवढ्यानेच त्यावर विश्वास ठेवू नका

संदर्भ – भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. पृष्ठ. क्रं. 214 – 215.अनु. क्र. 14. यातील भेसळ पहा……

 बुध्दाच्या वेळी कोणतेही धर्मग्रंथ लेखी स्वरूपात लिहिलेले नव्हते.  मग ते , ' जे केवळ धर्म पुस्तकात लिहिलेले आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका हे कोणत्या आधारावर म्हणतात.

दुसरा मुद्दा –
जे केवळ तर्कशास्त्रानुसार आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका असे म्हणतात. जर ते तर्कशास्त्रानुसार आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका म्हणत असतील तर –
बुद्धाने कपिलाचे दोन सिद्धांत –

1) प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे perception म्हणजे आकलन , समज, पाहण्याची किंवा जाणण्याची क्षमता आणि

2) अनुमान म्हणजे Inference म्हणजे तर्क किंवा अनुमान कसे मान्य आहे
पहा बुद्ध काय म्हणतात ते –
देव अस्तित्वात आहे किंवा त्याने विश्व निर्माण केले हे गृहीत धरण्याचा तर्कशास्त्राचा किंवा वस्तुस्थितीचा कोणता आधार नाही हे त्यांनी मान्य केले
संदर्भ – भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. पृष्ठ. 73 अनु. क्रं. 35.प्रकरण – 2. तत्ववेत्ता कपिल. प्रथम खंड.भाग पाचवा.

  जर त्याने तर्कशास्त्राचा किंवा वस्तुस्थितीचा कोणताही आधार नाही हे त्यांनी मान्य केले. याचा अर्थ , त्यांनी तर्कशास्त्र आणि वस्तुस्थितीचा आधार असला तर ते त्यांना मान्य होते. 

तिसरा मुद्दा –

ते म्हणतात  - जे केवळ न्याशास्त्रानुसार आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका  , जर ते न्याय शास्त्रानुसार असूनही मान्य करू नका असे म्हणतात तर---

सिद्धार्थाचा चुलत भाऊ देवदत्ताने आकाशात उडत असलेल्या पक्षाला बाण मारून जखमी केलेल्या पक्षाचे प्राण वाचवले. आणि त्या पक्षावर रक्षण करणाऱ्यांचा हक्क प्राप्त होतो  , यासाठी ते लवादाकडे नेण्यात आला आणि सिद्धार्थला न्याय मिळाला 

संदर्भ – उपरोक्त. पृष्ठ. क्रं. 13 – 14 अनु. क्रं. 27 ते 35.
मग सिद्धार्थाने न्यायशास्त्रानुसार मिळालेल्या न्यायला का मानले? हीच भेसळ बौद्ध मनुवादी भिक्खु यांनी ग्रंथात करून ठेवली आहे.

बुद्धाने ब्राह्मणवादी व्यवस्थेला वैचारिक क्रांती करून वैदिक धर्माचे अस्तित्व नष्ट केले होते. म्हणूनच बृहद्रथाच्या सैन्यात असलेला ब्राह्मण सेनापती पुष्पमित्र शृंगाने बृहद्रथाला ठार मारले आणि मौर्य वंशाच्या बदलीत आपल्या शृंग वंशाच्या नावाने ब्राह्मणी राज्य चालविले. ही पहिली रक्तरंजित क्रांती होय.
पहिले कारण –
एका धर्माचे राज्य म्हणून बौद्ध धर्म नष्ट करणे व भारतात ब्राह्मण सर्व सत्ताधीश करणे की, ज्यामुळे ब्राह्मण शाहिच्या मागे सर्व राजकीय शक्ती येऊन बौद्ध धर्मावर ब्राह्मण शाहिचा विजय होईल हा पुष्पमित्राच्या क्रांतीचा मूळ हेतू होता
संदर्भ – क्रांती – प्रतिक्रांती. पृष्ठ. क्रं. 38.पैरा – 2. आणि त्यामुळे बौद्ध धम्म विलुप्त झाला.

दुसरे कारण –
विदेशी आक्रमणांपैकी मुसलमानाद्वारे बौद्ध धर्माला अधिक झळ पोहचली. मुसलमान लोक प्रतिमा व मूर्तीचे विरोधी होते. त्यांनी बुद्धाच्या मूर्तीची तोडफोड केली व भिक्षूंना ठार मारले.. त्यांनी नालंदाच्या विशाल बौद्ध विश्वविद्यालयाला सैनिकी किल्ला समजून व चिवरधारी भिक्षूंना सैनिक समजून त्यांचा संहार केला. जे भिक्षु त्या भीषण रक्तपातातून वाचले ते नेपाळ , चीन ,तिबेट इत्यादी देशात पळून गेले. कोणताही धर्म जिवंत राहण्यासाठी त्यातील धर्मगुरू व पुरोहित कायम राहणे आवश्यक असते. बौद्ध धर्माचा लोभ होण्याचे विशेष कारण म्हणजे बौद्ध भिक्षूचा अभाव निर्माण झाला होता. बौद्ध भिक्षूची कोणतीही जात नव्हती. कोणी ही व्यक्ती बौद्ध धर्माला शरण जाऊन उपासक , श्रामनेर , भिक्षुक किंवा स्थिर – महास्थवीर होऊ शकत होता. भिक्षू लोक समाजापासून दूर विहारात राहत असत. नंतरच्या काळात मागासवर्गीय लोकांना भिक्षू बनवून बौद्धांची परंपरा कायम राखण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु चांगल्या प्रकारे शिक्षित नसल्यामुळे ते भिक्षू ब्राह्मणांच्या युक्तीवादाला उत्तर देऊ शकते नाही व त्यामुळे त्यांची हार झाली
संदर्भ – खंड.18 भाग – 3 पृष्ठ. क्रं. 211.प्रथम पैरा , शेवटचा पैरा आणि पृष्ठ. क्रं. 212. सुरुवातीच्या दोन ओळी.

 आणि हीच अवस्था आजही आहे. ज्या आळशी आणि ऐतखाऊ लोकांना कुटुंबातील लोकांनी नाकारले. बहुतांश काही अपवाद वगळता तेच लोक बुद्धाच्या भिक्खू संघात सामील झाले. आणि कोणताही अभ्यास न करता दोन्ही डोळे मिटून शरीरात निर्माण होणाऱ्या आंतरिक तरंगाच्या क्षणिक सुखात तल्लीन झाले. आणि तोच खरा बुद्धाचा धम्म आहे असे मानून समाजातील अनेक उपासक-उपासिकांना ध्यान शिबिराच्या माध्यमातून प्रशिक्षण देऊ लागले

तिसरे कारण –
हिंदू धर्म आणि बौद्ध धर्म ह्या याबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मत जाणून घेऊ या ते म्हणतात –
हिंदू धर्म आचरण्यास सोपा आहे म्हणून तो राहिला आणि बौद्ध धर्म आचरण्यास कठीण असल्याने तो अस्तास गेला. हे त्याचे साधे , सरळ उत्तर आहे. याशिवाय भारतातील राजकीय वातावरण जसे हिंदू धर्माला अनुकूल होते ( आणि आजही आहे ) तसे बौद्ध धर्माला नव्हते ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे
संदर्भ – खंड. 18 भाग – 3.पृष्ठ. क्रं. 215.शेवटचा पैरा.

बौद्धधम्म विलुप्त होण्याचे चौथे कारण ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात –

भारतातून बौद्ध धर्म लोप झाला त्याबद्दल मी सम्राट अशोकाला जबाबदार समजतो 

  प्रश्न असा निर्माण होतो की , जो धर्म इतका श्रेष्ठ होता व त्याचा प्रसार इतका झाला होता त्याचा भारतातून लोप कसा झाला?  

 या प्रश्नाची उत्तरे अनेक असली तरी त्याबद्दल मी सम्राट अशोकाला जबाबदार समजतो. अशोक वाजवीपेक्षा जास्त सहनशील होता. त्यामुळे मी त्याला दोष देत आहे. सम्राट अशोकाने आपल्या कारकीर्दीत बौद्धधर्मा शिवाय अशा अनेक धर्मांना प्रचाराची मुभा देऊन ठेवली होती की , जे बौद्ध धर्माचे कट्टर दुश्मन होते. यामुळे बौद्ध धर्माच्या विरुद्ध असणाऱ्या धर्मांना आपली शक्ती वाढविण्याची पुरेपूर संधी प्राप्त झाली व हाच बौद्ध धर्माला पहिला आघात होय असे मला वाटते

संदर्भ – खंड 18.भाग – 3.पृष्ठ. क्रं. 208 – 209 पैरा – 2 – 3 वाचा.

 ज्या कारणामुळे सम्राट अशोकांनी इतर धर्मांना मुभा दिली त्याचप्रमाणे बुद्धाने सुद्धा इतर धर्माचे आचरण करण्याची मुभा दिली. म्हणून बौद्ध धर्माचा ऱ्हास झाला अशा आरोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर बुद्धावर लावतात ते सुद्धा सत्य आहे.

 म्हणूनच ते पुढे म्हणतात  - 

  धम्म प्रवेशासाठी धम्मदीक्षा नसणे ही एक गंभीर उणीव होती. ज्या अनेक कारणांनी भारतात बौद्ध धर्माचा ऱ्हास झाला त्यापैकी हे एक कारण आहे 

 या दीक्षाविधीच्या अभावी उपासक एका धर्मातून दुसऱ्या धर्मात भ्रमण करू शके आणि अधिक वाईट गोष्ट म्हणजे दोन धर्म एकाच वेळेला आचरण्याची त्याला मुभा मिळत असे

संदर्भ – भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. पृष्ठ. क्रं. 342 अनु. क्रं. 12 आणि 13.प्रकरण – 1. भिक्षापाश. पंचम खंड. भाग चौथा.

 बौद्धधम्म विलुप्त होण्याचे चवथे महत्वपूर्ण कारण म्हणजे, ध्यानसाधना , समाधी वास्तविक ध्यानधारणा किंवा समाधी ही " हिंदूच्या वेदांतील एक भाग म्हणजे ज्ञान " होय असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात - 

 ज्ञान ,  विश्वास आणि ध्यानधारणा, समाधी यांच्यासह जर यज्ञ केला तर तो अधिक प्रभावी होतो. या ग्रंथात स्पष्टपणे म्हटले आहे की , यज्ञ कार्याचा एक भाग म्हणजे ज्ञान होय 

संदर्भ – क्रांती – प्रतिक्रांती. पृष्ठ. क्रं. 26.अनु. क्रं. 4. यात यज्ञ कार्य सोडले तर ध्यानधारणा (समाधी ) ही हिंदू धर्मातील यज्ञकार्याचा एक भाग होय. असे निश्चित ठामपणे म्हणता येईल. ही ध्यानधारणा (समाधी ) हिंदू धर्मातील कट्टर मनुवादी समर्थक आचार्य गोयंका गुरुजीने बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गातील शेवटचे सम्यक समाधीला नाकारून प्रज्ञा , शील आणि फक्त समाधीचा प्रचार – प्रसार केला आहे किंवा आनापानसती हे आहे. ज्या समाधी , आनापानसती किंवा विपश्यनाला बुद्धाने आपल्या मूळ शिकवणुकीत स्थान दिले नाही. तेच बुद्धाच्या नावावर ” त्रिपीटक ” ( तीन पेटारे ) रचनाकार ब्राह्मण बौद्ध भिक्खूने हेतू पुरस्पर घुसाडलेले आहेत आणि हिंदू धर्मातील कट्टर मनुवादी आचार्य गोयंका बुद्धाच्या नावावर हिंदू धर्मातील ध्यान साधना शिकवित आहे. ही वैचारिक क्रांती विद्वान मुत्सद्दी आणि चतुर ब्राह्मण बौद्ध भिक्खूने हेतू पुरस्कर घुसाडलेले आहेत. कारण बुद्धाने स्वतः कोणतेही पिटक लिहिलेले नाही

    ठेविले अनंते तैसेचि रहावे या युक्तीप्रमाणे म्हणणे म्हणजे इतर धर्मियांवर टीका करू नये हाच तो बोलण्याचा एक भाग आहे. 

   बुद्धाच्या धम्माला जर पुनर पल्लवीत करायचे असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे प्रथम क्रांती - प्रतिक्रांती , बुद्ध आणि कार्ल - मार्क्स आणि नंतर भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म एकाग्रतेने अध्ययन करायला पाहिजे. हाच तो डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या खऱ्या विचार प्रणालीतील तुलनात्मक व अध्ययन पद्धती आहे. 

तूर्तास एवढेच !

दि. 17 ऑगस्ट 24.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!