महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

आधुनिक जगातील स्त्री निर्णयक्षम झाली आहे .!

अरुण निकम.

         आज 26 ऑगस्ट रोजी जगभर महिला समानता दिवस साजरा होत आहे. ह्याच दिवशी 26 ऑगस्ट 1920 रोजी अमेरिकन राज्य सचिव ब्रेनब्रिज ह्यानी अमेरिकन महिलांना मतदानाचा घटनात्मक अधिकार बहाल करण्याच्या   विधेयकावर सही केली. समानते साठी 1970 च्या राष्ट्रव्यापी महिला संपानंतर आणि पुन्हा 1973 मध्ये समान हक्कांसाठी लढा चालु असतांना न्यूयॉर्क च्या कॉंग्रेसवुमन बेला अबजूग यांनी 26 ऑगस्ट हा महिला समानता दिवस साजरा करण्याचा ठराव मंजूर केला. जगभरात तो दिवस साजरा होत असतांना नेमक्या त्याच दिवसाच्या वृत्तरत्न सम्राटमध्ये बातमी छापुन आली आहे की ,औरंगाबाद शहरातील बजरंग चौक परिसरातील महिला डॉक्टर प्रतीक्षा प्रीतम गवारे  ह्या उच्चशिक्षित महिलेने पतीच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. हा निव्वळ योगायोग नसून ह्या आधुनिक काळात देशातील महिला सुरक्षित नाहीत. ह्याचेच चित्र आहे. 
          हल्ली वर्तमानपत्र वाचायला घेतले  किंवा दूरदर्शनवरील बातम्या  बघण्याचा प्रयत्न केला तर नित्य नेमाने लहान मुली, तरुणी, विवाहित महिला  ह्यांच्यावर अन्याय, अत्याचार, बलात्कारा  संबंधित बातम्या हमखास दिसतात.  मग ती बातमी कोलकाता मधील महिला डॉक्टरांची बलात्कार करून हत्या केल्याची असो वा बदलापूर मधील साडे तीन चार वर्षांच्या अजाण बालीकांचे लैंगिक शोषणा संबंधित  असो. किंवा कुणी लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा प्रकार असो अशा एक ना अनेक घटना नित्य नेमाने घडत असल्याचे दिसते.  सध्या महिला अत्याचाराने कहर केला असून एकट्या रायगड जिल्ह्यात जानेवारी ते जुलै  2024 च्या दरम्यान  सात महिन्यांच्या काळात 221  महिलांवर अत्याचार झाल्याचे सरकारी आकडेवारीनुसार समोर आले आहे. माणसाने नराधमपणाची इतकी खालची पातळी गाठली आहे की, केरळ राज्यातील अलप्पूझा जिल्ह्यात एका 70 वर्षीय वृद्ध स्त्रीवर बलात्कार केल्याची  घटना शनिवारी रात्री घडली आहे. मग प्रश्न असा पडतो की,  माणूस आताच असा बेबंद का झाला आहे ? ज्या प्रेयसीवर त्याने कधीकाळी प्रेम केलेले असेल, तिची निर्दयपणे हत्या तो कशी करू शकतो? एखाद्या तरुणीला आपल्याविषयी प्रेम नसेल किंवा आवडत नसू म्हणुन तिने नकार दिल्याने,  तिला ठार मारण्यासाठी शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यातील सदाशिव पेठेत भरदिवसा कोयता घेऊन पाठलाग करणे उचित आहे का? भविष्याची सुख स्वप्नं सगळेच बघतात. त्या दृष्टीने एखाद्याला लग्नास  नकार दिला म्हणुन त्याने अँसिडने तिला विद्रूप करणे मानवतेला काळिमा लावणारे नाही का? आधुनिक जगातील माणसाकडून जर असे  घडत असेल तर त्याला माणूस म्हणावे का? मग सहाजिक प्रश्न पडतो की  कधी नव्हे त्या  घटना आताच वारंवार  का घडत आहेत?  माणसाला माणूसपण देणार्‍या प्रेम,  ममता, कणव,  कदर, जाणीव ह्या भावना लुप्त झाल्या आहेत का? माणूस कधी नव्हे तो इतका निर्दयीपणे का वागू लागला आहे? अशा प्रकारचे मानवनिर्मित प्रश्न अनेक आहेत पण त्यांचे समर्पक व समाधानकारक उत्तर आपल्यालाच शोधावे लागेल आणि त्यावर उपाय देखील आपल्यालाच काढण्याशिवाय गत्यंतर नाही. असे जर झाले नाही तर माणसाचा आणि त्याच्यात शिल्लक असलेल्या मानवतेचा अंत जवळ आल्याचा तो संकेत ठरेल. इतकी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. ह्यापूर्वी इतक्या मोठ्या प्रमाणात अशा घटना  का घडत नव्हत्या? ह्या गोष्टींचा मागोवा घेतल्यास असे दिसून येते की,  तेव्हाही हीच पुरुष प्रवृत्ती होती आणि आताही तीच प्रवृत्ती आहे. मग आताच ह्या गोष्टी का होत आहे? ह्याचा विचार करतांना त्याचा अनेक अंगाने परामर्श घेणे आवश्यक आहे.
          ह्या विषयाच्या मुळाशी जातांना ह्याची बीजे मनुवादी संस्कृतीतील कुटुंब व्यवस्थेत मुरलेली दिसतात.  त्या वेळच्या कुटुंब पद्धतीमध्ये महिलांना अतिशय दुय्यम स्थान होते. तिला चूल आणि मूल इतके मर्यादित केले होते. तिला शिक्षणाचा हक्क नव्हता. कुटुंबातील सर्व निर्णय पुरुष घेत. ते चूक की बरोबर ह्यावर देखील मत व्यक्त करण्याचा तिला अधिकार नव्हता. पुरुषाने कितीही लग्न केली तरी  तिला मुकाटपणे सहन करावे लागे. पुरुषाने वाट्टेल तसे गुण उधळले तरी ती ब्र काढू शकत नव्हती. थोडक्यात एका वाक्यात सांगायचे झाले तर ती विनावेतन पूर्ण वेळ गुलाम होती. आपल्या देशातील ही पुरुषी मानसिकता पिढ्या दर पिढ्या रुजुन वाढीस लागल्याचे दिसते. ह्याच समाज व्यवस्थेने महिलांना मानसिक गुलाम करून ठेवल्याचे दिसते. कुटुंबाचा सर्व भार तीच पेलवत आली आहे. परंतु याबरोबरच कुटुंबाच्या सुख, समृद्धीसाठी अनेक प्रकारची व्रत, वैकल्ये, उपास तापास तिच्याच माथी मारल्याचे दिसत असून, पुढील सात जन्म हाच पती मिळावा म्हणुन वडाची पूजा करण्याची कामगिरी देखील तिच्यावरच सोपवलेली दिसते.  मग त्या अनुषंगाने विचार केल्यास कुटुंब तिचे एकटीचे असते का? त्या कुटुंबाच्या सुख, समृद्धीसाठी पुरुष वर्ग किती आणि कोणती व्रत वैकल्ये किंवा उपास तापास करतात? मग हीच पत्नी पुढील सात जन्म मिळण्यासाठी त्यांना एखादे तरी व्रत करण्याचा  विधी आहे का? नसल्यास का नाही?

कारण गुलामांना फक्त कर्तव्य करायचे असते. त्याबदल्यात त्याला कोणताही अधिकार नसतो. ह्या महिला रुपी गुलामाने प्रश्‍न विचारायचे नसतात. तिने कर्तव्यपूर्तीसाठी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत झुंजत राहिल्याचे विदारक चित्र आपल्याला दिसते. आणि ह्यामध्ये पुरुषी अहंकार असा दिसून येतो की, लग्न झालेल्या स्त्रीचा पती निधन पावला तर तिने धगधगत्या चितेवर सती जायचे. कारण त्याच्या निधनानंतर त्या स्त्रीचा कुणी उपभोग घेऊ नये. ही दृढ झालेली मानसिकता. मग पुन्हा प्रश्‍न पडतो की, ह्या न्यायाने किती पुरुष पत्नीच्या निधनानंतर तिच्या चितेवर सती गेले?
आपला एकमेव देश जगामध्ये असा आहे की, ज्या देशाच्या समाजव्यवस्थेत पती निधनानंतर पत्नीला सती जावे लागत होते. जर इंग्रज ह्या देशात आले नसते तर एकूणच समाज मनाचा विचार केल्यास या काळात सुद्धा आपण त्याच व्यवस्थेत भरडले गेलो असतो. हे विसरू नका. इंग्रज काही आपल्या उन्नतीसाठी आले नव्हते. परंतू सर्वसाधारण जनमत आपल्या विरोधी जाऊ नये. तसेच त्यांच्या व्यापाराच्या दृष्टीने फायदेशीर असेल त्याच्यामध्ये त्यांनी निश्चित सुधारणा केल्या. आणि त्याचा आपल्याला आजही उपयोग होत आहे. . परंतु ह्या देशात प्रशासकीय पातळीवर किंवा शिक्षण घेण्याचा मक्ता एकाच वर्गाकडे होता व त्यांच्या शिवाय पान हालत नव्हते. ती लोकं ह्याचा उपयोग फक्त स्वतःसाठी करीत असल्याचे इंग्रजांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रथम सतीची चाल बंद केली. सर्वांना शिक्षण खुले केले. ह्या सर्वावर कडी केली ती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी. त्यांनी संविधानाच्या माध्यामातून महिलांना अनेक अधिकार प्रदान करून मोकळे आकाश करून दिले. त्यांनी महिलांना शिक्षण सक्तीचे केले. मतदानासह पुरुषांच्या बरोबरीने अधिकार बहाल केले. तिला समाजव्यवस्थेच्या जाचक रूढीं मधून मुक्त करण्यासाठी तसेच स्थैर्य प्राप्त होण्यासाठी हिंदू कोड बिल सादर केले. एक दलित व्यक्ति देशातील समस्त हिंदू स्त्रियांच्या उत्थानासाठी आणि त्यांना अधिकार देण्यासाठी बिल सादर करतो. ही गोष्टच मुळी त्यावेळच्या समाज धुरिणांच्या आणि राजकारण्यांच्या पचनी पडली नाही. म्हणुन त्यांनी बिलाला विरोध करीत ते स्थगित केले. त्यामुळे बाबांनी तडकाफडकी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. नंतरच्या काळात तेच बिल चार नावांमध्ये विभागून मंजूर केले. त्यामुळेच आधुनिक युगातील स्त्री स्वावलंबी झाल्याचे दिसून येते.
ही संधी मिळताच भारतीय स्त्रीचा दबलेला हुंदका, ज्या प्रमाणे पृथ्वीच्या पोटातील दबलेला लाव्हारस उसळी मारून बाहेर पडतो. अगदी त्याप्रमाणे स्त्रियांना संवैधानिक अधिकार प्राप्त होताच, त्यांनी ह्या संधीचे सोने केल्याचे सर्वत्र दिसते.
सध्याच्या परिस्थितीचा विचार केल्यास स्वातंत्र्योत्तर काळात स्त्रियांनी गरुडझेप घेत प्रगती केली आहे. तिने बहुतेक क्षेत्रांमध्ये पुरुषांना मागे टाकले आहे. शिक्षण क्षेत्रात तिचीच मक्तेदारी दिसून येते. त्यामुळे ती पुरुषांच्या इतकीच किंबहुना त्यापेक्षा थोडी जास्तच स्वावलंबी आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम झाली आहे. त्यामुळे ती स्वतः निर्णय घेऊ लागली आहे. वेळ पडल्यास ती एकक पालक होऊ लागली आहे. तिच्या आवडी निवडी जोपासू लागली आहे. पूर्वीप्रमाणे स्वतःला पसंत असो किंवा नसो ती पालकांनी ठरविल्या प्रमाणे निमुटपणे बोहल्यावर उभीy राहत होती. परंतु आता वेळ बदलली आहे. तिच्या आवडी नुसार ती जोडीदार निवडू लागली आहे. प्रसंगी एखाद्याला नकार देण्यासही ती कचरत नाही .आणि नेमका इथेच पुरुषी अहंकार जागृत होतो . जी स्त्री युगानुयुगे पुरुषी वर्चस्वाखाली दबून
त्याची मनमानी सहन करीत होती. ती स्त्री बोलू लागली आहे. निर्णय घेऊ लागली आहे. त्यामुळे पुरुषी अहंकार दुखावला गेला आहे. त्याचे वर्चस्व झुगारून देण्याइतपत ती सक्षम झाली आहे. त्यामुळे त्याचे वर्चस्व लोप पावले आहे. त्या अहंकारातून अशा घटनांना ऊत आला आहे. महिलांचा मानसिक छळ करणारा आणि त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारा पुरुषांचा एक मोठा वर्ग सुप्तपणे समाजात वावरताना दिसतो. तो म्हणजे संशयी वृत्ती असणाऱ्यांचा. ही माणसं स्वतः ही आनंदाने आणि समाधानाने जगत नाहीत. आणि जोडीदाराला देखील कायम दडपणात ठेवतात. अशी व्यक्ति एखाद्याच्या आयुष्यात आली तर त्या व्यक्तीचे जगणे मुश्किल होऊन जाते. मग ह्यावर उपाय आहे की नाही?
भगवान बुद्धांनी सांगून ठेवले आहे की, जगात कायम मन्वंतर होत असते. तो सिद्धांत लक्षात घेऊन बदललेल्या परिस्थितीत पुरुषांनी आपली मानसिकता बदलून स्त्रीवर मालकी हक्क गाजवणे बंद केले पाहिजे. आता ती पूर्वीची अबला राहिली नसून सक्षम, कार्यक्षम, आणि निर्णयक्षम बनून वावरत असल्यामुळे पुरुषी अहंकाराला भीक घालत तर नाहीच याउलट त्याला कडाडून विरोध करीत त्याचा मुकाबला करतांना दिसते. त्यामुळे तर कौटुंबिक हिंसा वाढल्याचे दिसते. हे सर्व पुरुषी स्वभावाच्या पचनी पडत नाही. त्याच्या परिणाम स्वरुप कुटुंब न्यायालयांमध्ये खटल्यांचा ढीग लागला आहे. मुळातच तिला एखादी निर्जीव वस्तू न समजता, ती आपल्यासारखीच हाडामांसाची व्यक्ति असून तिला देखील मन, इच्छा, भाव, भावना, अधिकार आहेत ह्याचे भान ठेऊन तिच्याशी वागायला शिकले पाहिजे. ती सन्मान पात्र झाली आहे. तिने बरोबरीचा दर्जा मिळविला असून घरगुती निर्णयात सहभागी करून घेण्यास भाग पाडले आहे. ह्या गोष्टी मान्य करण्याचा मोठेपणा पुरुषांनी दाखवला पाहिजे. मला एक गोष्ट कधीच समजली नाही की, अल्पवयीन बालीकांचे लैंगिक शोषण करून ह्यांना कसला आनंद मिळतो? ही नराधम माणसं विकृत मनोवृत्तीचे तर असतातच, त्याच बरोबर ती मानसिक रुग्ण असतात. त्यांचे वेळीच समुपदेशन करून योग्य उपचार केला तर अशा घटनांना पायबंद बसेल. जर कुणाला एखादी मुलगी आवडली व तिने नकार दिल्यास पुरुषी अहंकार बाजूला ठेऊन तो विषय तिथेच सोडून देणे उचित ठरेल. विनाकारण डोक्यात राख घालून एखादे दुष्कृत्य केल्यास मुलीचे नुकसान तर होतेच पण त्यापेक्षा जास्त स्वतःचे देखील न भरून येणारे, आयुष्याची माती करणारे नुकसान होते. हे कसे विसरून चालेल. कारण आयुष्य एकदाच मिळते. त्या सुंदर आयुष्याचा पुरेपूर आनंद घ्यावा आणि इतरांनाही द्यावा. आपण सर्वांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवले पाहिजे, ती म्हणजे दुसर्‍याचे नुकसान करून स्वतः चा कधीच फायदा होत नाही. ह्या मालिकेत सगळ्यात चिंताजनक गोष्ट जर कोणती असेलy तर ती म्हणजे संस्कारक्षम लहान वयांत मुलांच्या हातात मोबाईल देणे. त्यामुळे नको त्या वयात, नको त्या गोष्टी त्यांच्या नजरेस पडतात. त्यातून एक विकृत मन तयार होऊन तारुण्याच्या उंबरठ्यावर त्यांच्या कडून नको त्या गोष्टी घडतात. त्यामुळे लहान मुले, तरुण, तरुणी आणि वयस्कर मंडळी ह्यांच्यासाठी वेगळ्या मोबाईलची तजवीज असावी. बरं, ह्या मोबाईलने फक्त
लहान मुलांचाच ताबा घेतला नसून, तरुण पिढी, वयस्कर मंडळी ह्यांना देखील त्याने वेड लावले आहे. त्या मोबाईल मध्ये खूप चांगल्या गोष्टी आहेत. त्या बघण्यास कोणाचीही हरकत असण्याचे कारण नाही.
परंतु एका सर्वेनुसार जगामध्ये पोर्नy फिल्म बघणाऱ्या देशांमध्ये भारताचा दुसरा नंबर आहे. ही अतिशय चिंतेची बाब आहे. ह्या बाबत सरकारने तज्ञ
लोकांची समिती गठीत करून योग्य निर्णय घेणे अपेक्षित आहे.
.
जयभीम.

अरुण निकम.
9323249487.
मुंबई.
दिनांक…26/08/2024.
.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!