स्वतंत्र मजूर पक्ष : निर्मिती व उद्देश
(८९ वा वर्धापन दिन दि.१५ ऑगस्ट १९३६)
प्रा.डी.डी.मस्के
👉 १९३५ च्या कायद्यान्वये १९३७ साली भारतात प्रांतिक कायदेमंडळाच्या सार्वत्रिक निवडणुका होणार होत्या.
👉 काँग्रेस पक्ष सोडला तर दुसरा कोणताही प्रमुख व प्रभावी पक्ष मुंबई प्रांतात नव्हता.
👉 लोकशाहीच्या निकोप वाढीसाठी विरोधी पक्ष प्रभावी असावा, असे लोकशाहीवादी डाॅ. आंबेडकरांना वाटत होते.
👉 १९२४ ते १९३५ या कालखंडात बहिष्कृत हितकारिणी सभेच्या माध्यमातून विविध चळवळी,आंदोलने केली होती.
👉हा लढा अस्पृश्यांचा होता.तो मर्यादित स्वरुपाचा होता.त्याला राष्ट्रीय स्वरुप प्राप्त व्हावे म्हणून त्यांनी कामगार,शेतकरी यांच्या लढ्यांशी अस्पृश्यांचा लढा संलग्न करण्याचे ठरविले.
👉 स्पृश्य व अस्पृश्य सहकाऱ्यांना सहभागी करुन घेऊन १५ ऑगस्ट १९३६ रोजी ” स्वतंत्र मजूर पक्ष” स्थापन केला. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली ही पहिली राजकीय संघटना होय.
👉 शामराव परूळेकर, बॅ.एम.बी.समर्थ, डी.व्ही.प्रधान, अनंतराव चित्रे, सी.टी.रणदिवे, एस.सी.जोशी,एस.जी.तटणीस आदी स्पृश्य सहकारी सहभागी झाले होते.
👉 पक्षाचे अध्यक्ष डाॅ बाबासाहेब आंबेडकर होये तर बॅ. एम.बी. समर्थ जनरल सेक्रेटरी होते. भाऊराव गायकवाड पक्ष प्रतोद होते.
👉 स्वतंत्र मजूर पक्षाच्या जाहिरनाम्यात…..
१. शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी लॅन्ड माॅर्गेज बॅंका.
२.शेतकरी सहकारी उत्पादक
सोसायट्या.
३. ज्या त्या भागात योग्य असे कारखाने
४. धंदेशिक्षण शाळा
५. जरुर तेथे सरकारी मालकीचे उद्योगधंदे.
६.खोतीविरोध व कुळ संरक्षण
कायदा.
७.कारखान्यातील कामगारांना जे
किमान वेतन मिळेल तसे
शेतमजूरांनाही मिळेल.
८.अन्यायी कर पद्धती बदलण्यात
येईल.
सांप्रत हा जाहिरनामा महत्वपूर्ण वाटतो.यातून डाॅ आंबेडकरांची दूरदृष्टी तसेच वैचारीक,व्यापक व सर्वसमावेशक दृष्टिकोनाचा प्रत्यय येतो.
👉 या निवडणूकीत भाषणं करताना अनेक मुलभूत बाबीविषयी परखडं मतं मांडलेली आहेत.
नाशिक जिल्ह्यात इगतपुरी, दिंडोरी, देवळाली कॅम्प, सिन्नर, ओझर आदी अनेक ठिकाणी केलेल्या भाषणात डाॅ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, “ह्या जागा मानाच्या नसून माऱ्याच्या आहेत.कायदेमंडळात जाणारा मनुष्य हा स्वतःसाठी जात नसून आपल्या समाजासाठी जात आहे…. कायदे-मंडळ हे आपल्या बचावाचे साधन आहे. तसेच तुमच्या मतांकरीता लोक तुम्हास पैशाची लालूच दाखवतील.कामापूरता मामा या न्यायाने गोड थापा मारतील. परंतू तुम्ही कोणत्याही मोहास बळी पडू नका मताचा मिळालेला अधिकार हे तुमच्या मुक्तीचे साधन आहे. मुक्तीचे मिळालेले साधन जर तुम्ही पैशावारी विकाल तर मग तुमच्यासारखे आत्मघातकी, समाजद्रोही व मुर्ख तुम्हीच.”
सोलापूरच्या सभेत बाबासाहेब म्हणाले की, “बंधुनो तुमच्या मताची किंमत मीठ मिरची सारखी समजू नका.तुमच्या प्राणाइतकीच किंबहूना जास्तच तुमच्या मतांची किंमत आहे. हे विसरु नका.भलत्याच उमेदवाराला मत द्याल तर खाटकाच्या हातात बकऱ्याने सुरी दिल्या सारखे होईल.”
👉 या निवडणूकीत स्वतंत्र मजूर पक्षाचे निवडणूक चिन्ह “घोडा” होते.
👉 जानेवारी १९३७ मध्ये झालेल्या निवडणुकीत स्वतंत्र मजूर पक्षाचे १८ उमेदवार उभे केले होते. त्यापैकी १४ सदस्य खालच्या (lower House) सभागृहात व ०२ सदस्य वरच्या (Upper House) निवडून आले होते. ते म्हणजे…….
१. मुंबई- डाॅ बाबासाहेब आंबेडकर
२. नाशिक- भाऊराव गायकवाड
३. पुणे- राजाराम भोळे (RR)
४. सातारा- खंडेराव सखाराम सावंत
५. बेळगाव- बळवंत हनुमंत वराळे
६. अहमदनगर- प्रभाकर जनार्दन रोहम
७. पूर्व खानदेश-दौलतराव गुलाजी जाधव
८. रत्नागिरी-गंगाराम राघोराम घाडगे
९. सोलापूर-जिवाप्पा सुभान ऐदाळे
१०. रत्नागिरी उ-अनंतराव चित्रे
११. पुणे पु- विनायकराव गडकरी
१२. रत्नागिरी द- शामराव विष्णू परूळेकर
१३. ठाणे द- रामकृष्ण गंगाराम भातनकर
१४. ठाणे उ- द.वा.राऊत
वरील विजयी उमेदवारापैकी भाई अनंतराव चित्रे, शामराव परूळेकर, विनायकराव गडकरी हे सवर्ण समाजाचे होते. साधारणपणे ८० वर्षापूर्वी सवर्ण समाजाच्या व्यक्तींनी बाबासाहेबांचे नेतृत्व स्विकारणे ही साधी बाब नव्हती.
संदर्भ:- १)समकालीन सहकाऱ्यांच्या आठवणीतील डाॅ बाबासाहेब आंबेडकर- संपादन-संकलक विजय सुरवाडे. लोकवाड़्मय गृह,पूणे २००३.
२)समग्र आंबेडकर चरित्र-खंड ११ वा ॲड. बी.सी.कांबळे, सुगावा प्रकाशन, पुणे द्वितीयावृती २००७
३) डाॅ भीमराव रामजी आंबेडकर खंड ७ चां.भ.खैरमोडे, सुगावा प्रकाशन पुणे तिसरी आवृत्ती २०११
४) डाॅ बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड १८ भाग-२ संपादक, वसंत मुन,हरी नरके व इतर,प्रकाशक- डाॅ बाबासाहेब आंबेडकर चरित्र-साधने प्रकाशन समिती, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन २००२.
प्रा.डी.डी.मस्के
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत