पवार साहेब, ‘रयत’ मध्ये केशव बळीराम हेगडेवाराचे पुतळे उभे करा !
दत्तकुमार खंडागळे संपादक वज्रधारी, मो. मो.9561551006
कर्मवीर अण्णांनी आयुष्यभर पायपीट करून, आयुष्य वेचून उभी केलेल्या संस्थेत आज त्यांच्याच विचाराला गालबोट लागताना दिसत आहे. प्राध्यापिका मृणालिनी आहेर यांना एका कार्यक्रमात कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या पुस्तकाचा संदर्भ दिला म्हणून नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. सातारा जिल्ह्यातील पाचवड या गावातील महाविद्यालयात त्या प्राध्यापिका म्हणून काम करत होत्या. तिथल्या शिवप्रतिष्ठान, बजरंग दलवाल्या जातीय टोळक्यांनी त्यांना त्रास दिला. धमक्या, दमबाजीचे प्रकार केले. या जातीयवादी टोळक्यासोबत वर्दीवालेही होते. पण या सगळ्यावर कडी म्हणून रयत संस्थेच्या पदाधिका-यांनीही त्यांना छळले. भुईंजच्या पोलिसी भामट्याच्या पत्राची दखल घेत मृणालीनी आहेर यांच्यावर रयत संस्थेने चौकशी लावून बदलीची कारवाई केली. या सगळ्या कालखंडात मृणालिनी आहेर यांच्या मागे जातीयवादी भामटे हात धुवून लागले होतेच पण रयत संस्थाही त्यात होती. ज्या सत्यशोधक विचारातून अण्णांनी ‘रयत शिक्षण संस्था’ उभा केली त्या संस्थेत जातीयवाद्यांशी झगणा-या अण्णाच्या लेकीला एकाकी झुंजावे लागत होते. रयत संस्थेचे काही पदाधिकारी, कर्मचारीही त्यांना त्रास देत होेते. या सगळ्या विरोधात त्यांना कोर्टात जाऊन न्याय मागावा आणि मिळवावा लागला. हा सगळा प्रकार दु:खद आहे. विशेष म्हणजे या प्रकाराकडे शरद पवारांचे लक्ष नाही. शरद पवार ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत तिथे या बाजारबुणग्यांचे फावतेच कसे ? शरद पवाराना हा प्रकार माहित नव्हता की माहित असून त्यांनी दुर्लक्ष केले ? नक्की काय ?
कर्मवीर अण्णांच्या रयतमध्ये जातीयवाद्यांची सरशी व्हावी ? अण्णांच्या झुजार लेकीला एकाकी पडण्याची वेळ यावी ? याचा अर्थ काय ? राज्यातील सगळ्या पुरोगामी चळवळीचे राजकीय व सामाजिक क्रेडीट घेणारे दस्तुरखुद्द शरद पवार रयतचे अध्यक्ष असताना हे घडत असेल तर लाजिरवाणे आहे. शरद पवारांनी सत्ताकारण जरूर करावे. सत्तेसाठी उलट्या-सुलट्या कोलांट्याउड्या जरूर माराव्यात पण मुळ नाळ अबाधीत ठेवावी. तुमची नसेल ठेवायची तर नका ठेऊ. तुम्हाला सत्यशोधक विचारांचा वारसा जपायचा नसेल तर नका जपू मात्र कर्मवीर अण्णांनी उभा केलेल्या रयत सारख्या संस्थेचा 'सत्यशोधक विचार आत्मा आहे. तिथे तो जपला गेलाच पाहिजे. तिथे भिडे गँग व बंजरग दलवाल्यांची दादागिरी चालतेच कशी ? त्याला संस्थेतील जातीयवादी म्हसोबांची साथ मिळते हे भयंकर आहे. संघाच्या एखाद्या शाळेत असं घडू शकलं असतं का ? संघवाल्यांनी एखाद्या त्यांच्याच विचाराच्या माणसावर अशी कारवाई केली असती का ? त्याला एकाकी पाडले असते का ? या प्रश्नांची उत्तर तपासली पाहिजेत. खरेतर हा कर्मवीर अण्णांच्या रयतचा नव्हे तर तिचे अध्यक्ष म्हणून काम करणा-या, तिथे तळ ठोकून बसणा-या शरद पवारांचा पराभव आहे. "सत्तेसाठी तुम्ही आर एस एस वाल्यांशी चुंबाचुंबी करा, बाहेरून पाठींबा द्या, आतून मुके घ्या !" पण तुमचा मुळ विचार अबाधीत ठेवा. तुम्हीच बुडाच्या चड्ड्या काढल्या तर संघवाले तुम्हाला नागडं केल्याशिवाय सोडणार नाहीत याचे भान ठेवा.
फुले, शाहू, आंबेडकरांची विचारधारा केवळ सभा-संमेलनापुरती उपयोगाची नाही. प्रातिनिधीक स्वरूपात राजकीय मलिद्यासाठी डोक्यावर पगड्या घालण्यापुरती गरजेची नाही. ती तळापर्यंत रूजवाला हवी. तिचा प्रचार-प्रसार करायला हवा. या विचारधारेचा उपयोग राजकीय नौटंकी म्हणून केला तर त्याला अर्थ उरत नाही. याचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही. असे केले तर पुरोगामी विचार बाजूला जाऊन जातीयवाद्यांची सरशी होणारच. यात शरद पवारांचे काहिच बिघडणार नाही. पण महाराष्ट्राचा आत्मा हरवल्याशिवाय राहणार नाही. शरद पवारांनी सत्तेच्या नाटकबाजीत ज्यांना फुलेंची पगडी घातली ते शरद पवारांना सोडून संघाच्या चड्डीत गेलेच ना. पुतण्या असलेले अजित पवाराही गेले त्याच काय ? तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करूणानिधी आज हयात नाहीत. त्यांच्या माघारी त्यांची मुलं पुरोगामी विचारांची लुंगी सोडून संघाची चड्डी घालायला तयार नाहीत. त्यांनी तिथे फुले, पेरियारांचा विचार जपला आहे. मग महाराष्ट्रातच ही अवकळा का ? शरद पवारांनी आयुष्याच्या संध्याकाळी तरी हे सगळं नीट करावं. आयुष्यभर सत्तेचे खेळ केले. हव्या तशा कोलांटउड्या मारल्या. जेव्हा जेव्हा पवारांच्या हातात सत्ता आली तेव्हा तेव्हा राज्यात संघवाल्यांची सत्ता आल्यासारखे चित्र होते. संघवाल्यांना ढिल्या हाताने मदत केली गेली. संघवाले आणि शरद पवार नेहमीच हातात हात घालून आले. आघाडी सरकारच्याच काळात मोठ्या धर्माधिकारींना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला गेला. नंतर फडणवीसांनी सलग पुरंदरे व ज्युनियर धर्माधिकारींना महाराष्ट्र भूषण देत जातभाईंचे सगसोयरे धोरण जपले. महाविकास आघाडीच्या अडीच वर्षात काळात एखादा पुरस्कार पुरोगामी चळवळीत योगदान देणा-या कुणाला तर देता आला असता पण नाही दिला गेला. शरद पवार जवळपास पन्नास वर्षे सत्तेच्या परिघात राहिले. नेहमीच सत्ता उपभोगली. पण दुस-या बाजूने राज्यात पुरोगामी विचार काळवंडत गेला त्याचे कारण काय ? त्याला कोण जबाबदार ? तो का आणि कुणामुळे काळवंडला ? राज्य चालवणा-या कारभा-यांच्या काय चुका झाल्या ? याचे आत्मपरिक्षण करायला हवे. पवार अँड कंपनीने या चुका केल्या नसत्या तर बारामतीत येवून पवारांना आव्हान देण्याची हिम्मत देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांची झाली असती काय ? त्यांची तेवढी कुवत तरी आहे का ? चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या भंपक माणसाने पवारांना संपवण्याची भाषा करावी ? अशी भाषा करण्याइतकी त्यांची तेवढी औकाद तरी आहे का ? तरीही त्यांच्यात ती हिम्मत का येते ? याचे चिंतन व्हायला हवे. पवारांनी आयुष्यभर सत्तेच्या बेरजेसाठी ज्या चुका केल्या त्या आता आयुष्याच्या संध्याकाळी तरी निस्तारव्यात. सत्तेसाठी केलेल्या पापाचे प्रायश्चित जरूर करावे. अजित पवार धरणात मुतून झाल्यावर कराडात यशवंतराव चव्हाणांच्या पायाजवळ बसायला गेले होते. आता ते गोळवळकरांच्या मुतारीजवळ बसलेत हा भाग वेगळा. शरद पवारांनी खरोखर प्रायश्चित म्हणून आयुष्याचा उरलेला काळ महाराष्ट्रातील ही घाण नष्ट करण्यासाठी घालवावा. आज महाराष्ट्राला याच कामाची खरी गरज आहे. हे काम शरद पवार खुप शिताफीने करू शकतात. "सत्ता गेली चुलीत !" असे म्हणत पवारांनी इथल्या मातीतला पुरोगामी विचार जपावा, वाढवावा. त्याचे रक्षण करावे. सत्ता राखण्यासाठी आकड्याची बेरीज गरजेची होती पण विचारांची वजाबाकी नको होती, पण ती पवारांनी केली. त्यामुळेच आज उतारवयातही पायाला भिंगरी लावून पळावे लागत आहे. महाराष्ट्रात माजलेले हे आर एस एस चे जातीयवादी तण समुळ नष्ट करणे गरजेचे आहे. त्यावर फुले, शाहू आणि आंबेडकरांच्या विचारांचे जालिम औषध फवारायला हवे. तरच हे तण नष्ट होवू शकते. ते कसे फवारायला हवे ? त्यासाठी नेमकं काय करायला हवे ? हे सांगणारे पुरोगामी विद्वान राज्याच्या गल्ली-बोळात आहेत. ते सांगतील, सल्ला देतील. नसेल तर तुम्ही फक्त तुमचं राजकारण करा. फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घ्यायचे धंदे बंद करा. रयतसह राज्यभर केशव बळीराम हेगडेवाराचे पुतळे उभे करा. अजित पवार गोळवळकरांच्या मुतारीकडे गेलेत. आता तुम्हीही म्हातारपणी खाकी चड्डी घाला आणि छातीवर हात ठेवून "संघ दक्ष" म्हणायला जा. सुप्रिया ताईंना संघाच्या महिला मंडळाची अध्यक्षा करून टाका. फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार इथल्या मातीच्या कणाकणात जीवंत आहेत. ते कधी ना कधी तरारून येतीलच. जातीयवाद्यांच्या छाताडावर बसतीलच यात शंका नाही. कर्मवीर अण्णांच्या सत्यशोधकी विचाराने घडलेली त्यांचीच लेक असलेली एखादी मृणालिनी उभी राहिल, पुरंदरेंच्या "संघ" टित बदमाशीला नागडं-उघडं करणारा एखादा द्नानेश महाराव समोर येईल आणि पुन्हा या शिवबाच्या मातीतला पुरोगामी विचार बलदंड होईल. जातीयवादी भामटे तो कधीच संपवू शकत नाहीत. दोन्ही छत्रपती गेलेले असताना औरंग्याला मातीत घालणारे, महाराष्ट्राच्या मातीत त्याचे थडगे बांधणारे संताजी-धनाजी इथेच जन्माला येतात हे कुणी विसरू नये.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत