महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

वटपौर्णिमेचे मिथक आणि ती..

प्रा. डॉ . प्रतिभा अहिरे

      समाजमनावर आजही वटपौर्णिमा गारुड करते आहे.  समाज मनावर म्हणण्यापेक्षा समाजातील स्त्री वर्गावर असलेले त्याचे गारुड अजून संपलेले नाही.

भारतीय समाज पुरुषप्रधान समाज आहे. वेगवेगळ्या भूमिकेतील पुरुष हा स्त्री समाजावर सातत्याने सत्ता गाजवित आला आहे, यामागे मनुस्मृत्यादी ब्राह्मणी धर्मग्रंथांचा धाक आहे. या धर्मग्रंथांमधून स्त्री ही विश्वासघातकी, चंचला, मोहाची जननी, नरकाचे द्वार आहे. ती स्वातंत्र्याला लायक नाही अशी स्त्रीद्वेष्टी मानसिकता हेतूत: घडविली आहे. मनुस्मृती म्हणते की, पुरुष कुठल्याही वयोगटाचा, देखणा किंवा कुरूप कसाही असला तरीही स्त्री त्याला मोहात पाडते म्हणून पंडित असणाऱ्या पुरुषाने स्त्री आप्त कोणीही असो तिच्यासोबत एकांतात बसू नये. कारण इंद्रिय प्रबळ असतात अशी स्त्रीवर गुलामी लादणारी दुटप्पी नियमावली पुरुषी धर्मशास्त्राने करून ठेवल्यामुळे स्त्री समूहास सातत्याने दाबून, दडपून ठेवण्यात आलेले आहे. धर्मशास्त्राने स्त्रीची गुलामी टिकवण्यासाठी विविध कथा दंतकथा रचून ठेवलेल्या आहेत. त्या दंतकथांचा उद्देश स्त्रीने पुरुषाच्या अंकित रहावे. कोणताही निर्णय स्वतः घेऊ नये, तिच्या तना मनाची दावेदारी पुरुषाकडे राहील. वैयक्तिक आणि सामाजिक जीवनामध्ये तिच्याकडे कोणतेही अधिकार असू नयेत. दिले जाऊ नयेत. तिला पायीची वहान म्हणूनच वापरावे. स्त्री कामलोलुप असते म्हणून तिला शय्यासुख, वस्त्र आभूषण, अलंकार यामध्ये अडकवून ठेवावे, म्हणजे पुरुष सत्ता गाजविण्याला मोकळा राहील असा छुपा हेतू त्यामागे आढळतो.
स्त्री अबला आहे. ती स्वतःचे संरक्षण करू शकत नाही. ती एक उपभोग्य वस्तू आहे आणि वस्तू कुणाच्याही मालकीची असू शकते. वस्तूची कोणीही चोरी करू शकतो म्हणून वस्तूच्या संरक्षणाची जबाबदारी पक्षपाती धर्मशास्त्राने विभिन्न भूमिकेतील पुरुषावर टाकलेली आहे. स्त्री अबला आहे म्हणून जन्म ते मृत्यूपर्यंत तिची जपणूक करणे, काळजी घेतली जाणे गरजेचे आहे असे मिथक तयार केले आणि म्हणून बालपणी पिता, तारुण्यात पती आणि वृद्धापकाळी पुत्राने तिचे संरक्षण करावयाचे आहे. पुरुष हा तिचा संरक्षक असल्याने आयुष्यभर वेगवेगळ्या भूमिकेतील पुरुषाचे तिने पूजन केले पाहिजे. त्याच्या दीर्घायुष्याची कामना प्रार्थना केली पाहिजे. असे सामाजिकरणाच्या माध्यमातून स्त्री मनावर रुजवले आहे. जेव्हा तू अबला आहे हे सांगितले जाते तेव्हा स्त्री मनावर तू कनिष्ठ आहेस असा संस्कार केला जातो आणि अशा संस्कारात स्वतःला दुय्यम मानणाऱ्या संस्कारात भारतीय स्त्री देहाने वाढते आणि मनाने मात्र दुय्यम बनत जाते. स्वतःच्या मन, भावना, लैंगिकतेवरील ताबा तिनेही सोडून दिलेला आहे. ती स्वतःचे मन मेंदू भावना यापासून परात्म बनवण्यात आली आहे. तिने अशी वेशभूषा केशभूषा बदलली तरीही मनोरचना पुरुषांना हवी असलेलीच बनविण्यात आल्याने कितीही उच्चशिक्षित झाली आणि आधुनिक झाली तरीही मनाने मात्र ती १८ व्या शतकात किंबहुना मनुस्मृतीच्या काळातच रांगते आहे आणि म्हणून ही ज्ञानाच्या विस्फोटाच्या काळातील माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगातील स्त्री सजवून अंगावर दाग दागिने घालून हातामध्ये पूजेचे ताट घेऊन वडाच्या झाडाला फेऱ्या मारण्यासाठी जाताना दिसते. जन्ममृत्यू विवाह या सर्व विधीमागचे शास्त्र कळाले तरी तिचे मानसशास्त्र मात्र अजूनही गुलाम असल्याने ही स्त्री जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून वडाला फेऱ्या मारून प्रार्थना करताना दिसते आहे. भारतीय समाज अंतर्विरोध आणि बरबटलेला समाज आहे आणि या समाजात जात वर्ण वय लिंग या आधारे स्तरीकरण निर्माण झालेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही दुय्यम असलेली स्त्री जात पुरुषाची दीर्घायुष्याची कामना करते. वेगवेगळ्या सण उत्सवांमध्ये ती अशी प्रार्थना करीत आहे मग ते करवा चौथ असो कोकिळाव्रत असो रक्षाबंधन असो भाऊबीज असो की मग वटपौर्णिमा. आजही भारतीय राज्यघटनेने समतेचा अधिकार देऊनही स्त्री स्वतःच्या स्वतंत्र अस्तित्वाचा स्वातंत्र्याचा विचार करण्याच्या प्रक्रियेपासून कोसो मैल दूर आहे. आजही हे विविध सण त्यामधील तिची भूमिका तिचे स्थान याचा कार्यकारण भाव शोधण्याची परिपक्वता तिच्यामध्ये येऊ शकलेली नाही. सातत्याने त्याच्या दीर्घायुष्याची कामना करणारी या स्त्रीला माझा प्रश्न आहे की, तू जन्मदात्री आहेस, तू पालन पोषण करते, तू घर सांभाळते आणि अर्थार्जन करतेस, तुझ्या दीर्घायुष्याची तुझ्या आरोग्याची काळजी म्हणून तुझं धर्मशास्त्र असा एखादा सण उत्सव व्रत वैकल्य पुरुषासाठी सांगते का आणि जर सांगत नसेल केवळ तुझ्याकडून सेवा प्रार्थना अपेक्षित करत असेल तर तुझ्या शोषणावर उभा असलेला हा धर्म ही संस्कृती तुला कबूल आहे काय? अजून तरी तुला सत्यवानाची सावित्री होण्यापेक्षा
ज्योतिबाची सावित्री होण्याचे स्वप्न कधी पडेल ? स्वतःला समर्थ म्हणून स्वतःचे अस्तित्व हक्क अधिकार टिकवले यासाठी संकल्प करणे, करण्याची सदबुद्धी तुला होवो ही सदिच्छा व्यक्त करते.
– प्रा. डॉ . प्रतिभा अहिरे

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!