क्रांतिसिंह नाना पाटील; ब्रिटिश, दलाल आणि गद्दारांच्या पायात पत्र्या ठोकून “प्रती सरकार” अर्थात “पत्री सरकार” स्थापन करणारे भारतमातेचे थोर सुपुत्र.
राजकुमार कदम, बीड.
ब्रिटिश आणि त्यांना सामील गद्दारांच्या पायात पत्र्या ठोकून ब्रिटिशांच्या नाकावर टिच्चून “प्रती सरकार” अर्थात “पत्री सरकार” स्थापन करणारे भारतमातेचे थोर सुपुत्र क्रांतिसिंह नाना पाटील यांची आज जयंती. स्वातंत्र्य जवळ येताच स्वातंत्र्य चळवळीच्या मुख्य प्रवाहात अर्थात कॉंग्रेसमधे भांडवलदारासह संस्थानिक, वतनदार मोठ्या प्रमाणावर सामील झाले. ते जी भाषा बोलू लागले त्यावरून कॉंग्रेस शेतकरी, कामगार आणि कष्टकरी वर्गाला न्याय देणार नाही याची खात्री क्रांतिसिंहास पटली आणि त्यांनी तो पक्ष सोडून शेतकरी कष्टकरी वर्गाशी इमान असलेल्या “शेतकरी कामगार पक्षात” प्रवेश केला. लवकरच “कामगार किसान पक्षात” आणि तेथून नाना पाटील “भारतीय कम्युनिस्ट पक्षात” आले. श्रमिक-कष्टकरी वर्गाच्या हिताचे राजकारण करणा-या देशव्यापी पक्षाचे नाना पाटील नेते झाले. पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत सातारा लोकसभा मतदार संघातून आणि 1967साली बीड लोकसभा मतदार संघातून क्रांतिसिंह लोकसभेवर निवडून गेले. बीड लोकसभा लढण्यासाठी नाना पाटील बीड येथे आले ते कपडे आणि थोडे सामान असलेली एक पत्र्याची पेटी घेऊन. बीडचे खासदार झाल्यावर ते पाच वर्षे बीड येथेच राहिले. पहिले अडीच वर्षे त्यांचा मुक्काम पाटोदा ग्रामपंचायतीच्या एका खोलीत होता. ” कर्ज फिटलं म्हणा” ही क्रांतिसिंहांची घोषणा त्यावेळी खूप गाजली. शेतकरी इमानदारीने शेतात राबतो. त्याच्या शेतीमालास उत्पादन खर्चावर आधारित भाव दिला जात नाही. तो शेतीत खर्च करतो त्या प्रमाणात शेतीमालास भाव मिळत नाही. उत्पादन खर्चावर आधारित भाव नसल्याने त्याला कर्ज काढावे लागते. हे कर्ज म्हणजे त्याचे चोरलेले श्रम आहेत. म्हणून तो कुणाचेही कर्ज देणे लागत नाही. अशी बिनतोड भूमिका नाना पाटील यांनी अगदी लोकसभेतही मांडून देशातील पहिली शेतकरी कर्जमाफी मिळवून घेतली. क्रांतीसिंह नाना पाटील आणि तमाम स्वातंत्र्य सैनिकांनी जुलमी इंग्रजी सत्तेविरुद्ध जो रणसंग्राम लढला तो स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि देशातील प्रत्येक नागरिकाला अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षणाच्या समान संधी मिळाव्यात यासाठीच. परंतु… आताच्या राज्यकर्त्यांना याचे भान राहिलेले नाही. ही व्यवस्था भांडवलदारांची बटीक झाली आहे. “फोडा, झोडा आणि राज्य करा” याच आपल्या गो-या बापाच्या तत्वावर त्यांचा राज्य कारभार चालू आहे. शेतकरी आत्महत्या करतो आहे, कामगार आणि कषटक-यांना देशोधडीला लावले जात आहे. तरूणांच्या हाताला काम नाही. महागाई आभाळाला टेकली आहे…! राज्यकर्ते आपल्याच विलासात, सत्तेच्या कैफात आणि भावी शेकडो पिढ्यांचे कल्याण साधण्यासाठी झटत आहेत…! कार्पोरेटशहांना सर्व देशावर ‘मालकी’ पाहिजे आहे तर त्यांच्या बरोबर सत्तेचे भागीदार असलेल्या ‘जात्यंध’ शक्तींना “चातुर्वर्ण्य” व्यवस्था प्रस्थापित करून आपले गतवैभव मिळवायचे आहे. त्याच नादात नागरिकांना शिक्षण,आरोग्य, पाणी,…पुरविणे आमची जिम्मेदारी नाही अशी भूमिका यांनी घेतली आहे. आम आदमीला कुणीही वाली राहिलेला नाही. इंग्रज आणि यांच्यामधे काहीच फरक राहिलेला नाही. क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन करताना या प्रवृत्तींना पुन्हा एकदा पत्र्या कोण ठोकणार असा प्रश्न निर्माण झाला आहे….
-राजकुमार कदम, बीड.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत