मुख्य पान
_बुद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे.
अशोक तुळशीराम भवरे
!! भाग १ !!
" सोमवार दिनांक १५ ऑक्टोबर १९५६ रोजी सकाळी १० ते १२ पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बौद्ध धर्माचा स्वीकार यासंबंधी उद्बोधक, स्फूर्तिदायक आणि अत्यंत तळमळीचे, माहितीपूर्ण भाषण दीक्षामंडपात झाले. लाखो लोक. ते भाषण उन्हात उभे राहून व जागा मिळेल तसे बसून एकाग्रतेने ऐकत होते." ते आपल्या भाषणात म्हणाले, सर्व बौद्धजनहो आणि उपस्थित पाहुणे मंडळी,
काल आणि आज सकाळी जो बौद्ध दीक्षा घेण्याचा व देण्याचा विधी समारंभ या ठिकाणी घडून आला त्याचे स्थान, विचारवंत लोकांना कदाचित अवघड वाटत असेल. त्यांच्या व माझ्याही मताने कालचा समारंभ आज व आजचा समारंभ काल व्हावयास पाहिजे होता. आपण हे कार्य अंगावर का घेतले, त्याची जरूरी काय व त्याने काय होईल, याची छाननी करून घेणे आवश्यक आहे. ते समजावून घेण्यानेच आपल्या कार्याचा पाया मजबूत होईल. हे समजावून घेण्याचे कार्य आधी व्हावयास हवे होते. परंतु काही गोष्टी अशा अनिश्चित असतात की त्या आपोआपच घडत असतात. आता या विधीबाबत व्हावयाचे तसे घडले आहे खरे, तथापि अशी दिवसांची अदलाबदल झाली तरी मोठेसे काही बिघडले नाही.
पुष्कळसे लोक मला असा प्रश्न करतात की या कार्याकरिता तुम्ही नागपूर हेच शहर का ठरविले ? अन्य ठिकाणी हे कार्य का केले नाही ? काही लोक असे म्हणतात की आर. एस. एस. ची-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची-मोठी पलटण नागपूर येथे असल्यामुळे त्यांच्या उरावरती म्हणून आम्ही ही सभा या शहरात घेतली आहे. हे मुळीच खरे नाही. त्यासाठी नागपूर येथे हे कार्य घेतलेले नाही. आमचे कार्य इतके मोठे आहे की आयुष्यातील एक एक मिनिट देखील कमी पडतो. आपले नाक खाजवून दुसऱ्याला अपशकून करण्यासाठी मजजवळ वेळ नाही.
हे ठिकाण निवडण्याचे कारण निराळे आहे. ज्यांनी बौद्ध इतिहासाचे वाचन केले असेल त्यांना हे कळून येईल की भारतात बौद्ध प्रसार जर कोणी केला असेल तर तो नाग लोकांनी केला. नाग लोक आर्याचे भयंकर शत्रु होते. आर्य व अनार्य यांच्यामध्ये लढाया व तुंबळ युद्धे झाली. आर्य लोकांनी नागांना जाळून टाकल्याचे दाखले पुराणात सापडतात. अगस्ती मुनीने त्यातून फक्त एक नाग मनुष्य वाचविला. त्याचेच आपण वंशज आहोत. ज्या नाग लोकांना एवढा छळ सोसावा लागला त्यांना वर येण्यास कोणीतरी महापुरुष हवा होता; त्यांना तो महापुरुष गौतम बुद्ध भेटला. भगवान बुद्धाचा उपदेश नाग लोकांनी सर्व भारतामध्ये पसरविला. असे आपण नाग लोक आहोत. नाग लोकांची मुख्य वस्ती नागपूर येथे व आसपास होती असे दिसते. म्हणून या शहरास' नाग-पूर' म्हणजे नागांचे गाव असे म्हणतात. येथून सुमारे २७ मैलावर नागार्जुनाची टेकडी आहे. नजिकच वाहणारी जी नदी आहे ती नाग नदी आहे. अर्थातच या नदीचे नाव येथे राहाणाऱ्या लोकांवरून पडले आहे. नागांच्या वस्तीमध्ये वाहणारी जी नदी ती नाग नदी आहे. हे स्थळ निवडण्याचे हे मुख्य कारण आहे. नागपूर यामुळे निवडले आहे. यामध्ये कोणालाही खिजविण्याचा कोठेच प्रश्न नाही. तशी भावनाही नाही. आर. एस. एस. चे कारण माझ्या मनाला शिवलेही नाही. तसा कोणी त्याचा अर्थ करून घेऊ नये.
इतर कारणावरून कदाचित् विरोध वाटू शकेल. हे ठिकाण विरोधासाठी पसंत केलेले नाही हे आता मी सांगितलेच आहे. मी हे जे कार्य आरंभले आहे त्यासाठी माझ्यावर अनेक लोकांनी व वृत्तपत्रांनी टीका केलेली आहे. काहींची टीका कडक आहे. त्यांच्या मते मी माझ्या गरीब बिचाऱ्या अस्पृश्य लोकांना भलतीकडेच नेत आहे. आज जे अस्पृश्य आहेत ते तसेच अस्पृश्य राहातील व जे हक्क अस्पृश्यांना मिळाले आहेत ते मात्र नष्ट होतील, असे सांगून आमच्यातील काही लोकांना ते बहकवीत आहेत. आमच्यातील अज्ञ लोकांना पगदंडीने जा असे ते म्हणतात. आमच्यातील काही तरूण व वयोवृद्ध लोकांवर कदाचित त्याचा परिणाम होत असेल. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये संशय निर्माण झाले असतील तर त्या संशयाची निवृत्ती करणे हे आपले कर्तव्य आहे आणि अशा संशयाची निवृत्ती करणे म्हणजे आपल्या या चळवळीचा पाया मजबूत करणे आहे.
मागे आपण लोकांनी मांस खाऊ नये म्हणून चळवळ केली होती. त्यामुळे स्पृश्य लोकांवर मोठी गदा आल्याप्रमाणे त्यांना वाटत होते. त्यांनी जिवंत म्हशीचे दूध प्यावयाचे आणि ती म्हैस मेल्यानंतर मात्र आम्ही मृत म्हशीला खांद्यावर घेऊन जावयाचे, हा प्रकार विचित्र नव्हे काय ? आम्ही त्यांना म्हणतो की तुमची म्हातारी मेली तर तिला आम्हाला का नेऊ देत नाही ? त्यांनी मेलेली म्हैस द्यावी तशी म्हातारीही द्यावी. त्यावेळी कोणीतरी मनुष्य 'केसरी' मधून पत्रव्यवहार करून, अमुक अमुक गावी दर वर्षाला ५० ढोरे मरतात, त्यांच्या कातड्यांची, शिंगांची, हाडांची, मांसाची, शेपटीची, खुरांची मिळून ५०० रुपया इतकी किंमत होईल; व मृत मांस सोडल्यामुळे एवढ्या प्राप्तीला हे लोक मुकतील, असा प्रचार त्यावेळी केसरी मधून होत असे. त्याच्या प्रचाराला उत्तर द्यावयाची आवश्यकता खरे म्हणजे काय होती ? पण आमच्या लोकांना असे वाटे, या गोष्टीला आमचा साहेब उत्तर देत नाही, तर साहेब करतो तरी काय ?
एकदा मी संगमनेरला सभेला गेलो होतो. सभा झाल्यानंतर संध्याकाळी जेवणाची व्यवस्था केली होती. त्यावेळी मजकडे एक चिट्ठी केसरीच्या त्या बातमीदाराने पाठविली व मला विचारले, "अहो, तुम्ही तर तुमच्या लोकांना मेलेली ढोरे ओढू नका म्हणून सांगता. त्यांची हलाखी किती आहे ? त्यांच्या बायकांना लुगडे चोळी नाही, त्यांना अन्न नाही, त्यांना शेतीवाडी नाही, अशी त्यांची अत्यंत बिकट परिस्थिती असता, दरवर्षी त्यांना मिळणारे कातड्यांचे, शिंगांचे, मांसांचे ५०० रुपयांचे उत्पन्न फेकून द्या म्हणून सांगता, यात तुमच्या लोकांचा तोटाच नाही काय ? "
मी म्हणालो, तुम्हाला याचे उत्तर कोठे देऊ? ते येथे पडवीत देऊ की सभेत देऊ ? लोकांच्या 'समोरच सवालपट्टी झालेली बरी. मी त्या गृहस्थांना विचारले तुमचे म्हणणे एवढेच की आणखी काही आहे ? ते गृहस्थ म्हणाले, " एवढेच म्हणणे आहे व एवढ्याचेच उत्तर द्या." मी त्या गृहस्थास विचारले, तुम्हास मुले, माणसे किती आहेत ? त्यांनी सांगितले मला पाच मुलगे आहेत, भावालाही ५/७ मुले आहेत. मी म्हणालो तर तुमचे कुटुंब मोठे आहे. तेव्हा तुम्ही व तुमच्या नातेवाईकांनी त्या गावची मेलेली सर्व ढोरे ओढावीत; आणि ५०० रुपयांचे उत्पन्न घ्यावे. हा फायदा तुम्ही अवश्य घ्यावा. शिवाय दरवर्षी मी स्वतः तुम्हाला ५०० रुपये वर देण्याची व्यवस्था करतो, माझ्या लोकांचे काय होईल, त्यांना अन्न, वस्त्र मिळेल की नाही ते माझे मी पाहीन, मग एवढी फायद्याची गोष्ट तुम्ही का सोडून देता ? तुम्ही का हे करीत नाही ? आम्ही हे काम केले म्हणजे फायदा होतो, आणि तुम्ही केले म्हणजे फायदा नाही ? ओढा ना तुम्ही मेलेली ढोरे !
काल एक ब्राह्मणाचा मुलगा मजकडे येऊन म्हणाला," पार्लमेंट, असेब्ल्यांमध्ये तुमच्या लोकांना राखीव जागा दिल्या आहेत, त्या तुम्ही का सोडता ? " मी त्यास म्हणालो, तुम्ही महार व्हा व त्या जागा पार्लमेंट, असेंब्ल्यामध्ये भरा. नोकरी खाली असली की त्या जागा भरतात. त्यासाठी कोणा ब्राह्मणांचे, कोणा इतराचे किती अर्ज येतात ! मग नोकऱ्यांच्या जागा भरतात तशा या राखीव जागा तुम्ही ब्राह्मण लोक महार बनून का भरत नाही ?
आमचे नुकसान झाले तर तुम्ही का रडता, असा माझा त्यांना सवाल आहे. खरे म्हणजे मनुष्यमात्राला इज्जत प्यारी असते, लाभ प्यारा नसतो. सद्गुणी व सदाचारी बाईला व्यभिचारामध्ये किती फायदा असतो हे माहीत असते; आमच्या मुंबईत, व्यभिचारी बायांची एक वस्ती आहे. त्या बाया सकाळी ८ ला उठल्या की न्याहारीसाठी शेजारच्या हॉटेलात वर्दी देतात आणि म्हणतात (डॉक्टरसाहेबांनी यावेळी आवाजात फरक करून नक्कल करून सांगितले) " सुलेमान, अरे खिम्याची प्लेट व पावरोटी घेऊन ये." तो सुलेमान ते घेऊन येतो, शिवाय चहा, पाव केक वगैरेही आणतो. पण माझ्या दलितवर्गीय भगिनींना साधी चटणीभाकरी देखील मिळत नाही; मात्र त्या इज्जतीने राहातात. त्या सदाचारानेच राहातात.
आम्ही झगडतो आहोत ते इज्जतीकरिता ! मनुष्यमात्राला पूर्णावस्थेस नेण्याकरिता आम्ही तयारी करीत आहोत, त्यासाठी वाटेल तो त्याग करण्याची आमची तयारी आहे. हे वृत्तपत्राचे लोक (त्यांच्याकडे वळून) माझ्या मागे गेली ४० वर्षे हात धुवून लागले आहेत. माझ्यावर केवढी टीका त्यांनी आजवर केली ! मी त्यांना म्हणतो, अजून तरी विचार करा, आतातरी पोरकटपणाची भाषा सोडून काही प्रौढ भाषा वापरा.
आम्ही बौद्ध धर्मीय झालो तरी राजकीय हक्क मी मिळवीन याची मला बालंबाल खात्री आहे. (डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष व प्रचंड टाळ्या) मी मेल्यावर काय होईल हे सांगता येणार नाही. या चळवळीसाठी फार मोठे काम करावे लागेल. आम्ही बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे काय होईल, अडचणी आल्याच तर त्या कशा टाळता येतील, त्यासाठी काय युक्तिवाद व खटाटोप करावा लागेल, याचा मी पूर्ण विचार केला आहे. माझ्या पोतडीत सर्व काही भरलेले आहे. ते काय प्रकाराने भरले आहे ते मला पूर्ण माहीत आहे. हे जे हक्क मिळविले ते मीच माझ्या लोकांच्यासाठी मिळविले. ज्याने हे हक्क मिळविले ते तो पुन्हा मिळवून देईलच ! हे हक्क व सवलती मिळवून देणारा मीच आहे; आणि मी पुन्हा या सवलती मिळवून देईन अशी मला खात्री आहे. म्हणून सध्या तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेऊन चालले पाहिजे. विरोधी प्रचारात काही तथ्य नाही हे मी सिद्ध करून देईन.
मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!
संकलन – महेश कांबळे
संदर्भ :-
१) डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड १८ भाग ३, पान नं ५२३ – ५३५_
२) डॉ. भी. रा. आंबेडकर चरित्र ले. चां. भ. खैरमोडे, खंड १२, पृ. ५७
_३) प्रबुद्ध भारत-आंबेडकर बौद्ध दीक्षा विशेषांक: २७ ऑक्टोबर १९५६
धम्म संदेश प्रसारक
अशोक तुळशीराम भवरे सिडको, नांदेड.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत