महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

पदर आईचा अन् आयुष्याचा.

खरं तर आईच्या पोटातच आधी आईची ओळख झाली
आणि मग नऊ महिन्यांनी तिच्या
पदराची ओळख झाली.

पाजताना तिनं
पदर माझ्यावरून झाकला,
आणि मी आश्वस्त झालो …
तेव्हापासून तो खूप
जवळचा वाटू लागला

आणि मग तो भेटतच राहिला …
आयुष्यभर

शाळेच्या पहिल्या दिवशी
तो रुमाल झाला

रणरणत्या उन्हात
तो टोपी झाला,

पावसात भिजून आल्यावर
तो टॉवेल झाला

घाईघाईत खाऊन खेळायला पळताना
तो नॅपकीन झाला

प्रवासात कधी
तो अंगावरची शाल झाला

बाजारात भर गर्दीत कधीतरी
आई दिसायची नाही
पण पदराच टोक धरून
मी बिनधास्त चालत राहायचो …
मग त्या गर्दीत
तो माझा दीपस्तंभ झाला

गरम दूध ओतताना
तो चिमटा झाला

उन्हाळ्यात लाईट गेल्यावर
तो पंखा झाला

निकालाच्या दिवशी
तो माझी ढाल व्हायचा.

बाबा घरी आल्यावर,
चहा पाणी झाल्यावर,
तो पदरच प्रस्ताव करायचा ….

छोटूचा रिझल्ट लागला…
चांगले मार्क पडले आहेत
एक-दोन विषयात कमी आहेत,
पण …
पण आता अभ्यास करीन असं म्हणतोय..

बाबांच्या संतापाची धार बोथट होताना
मी पदराच्या आडून पाहायचो
हाताच्या मुठीत पदराच टोक
घट्ट धरून !

त्या पदरानेच मला शिकवलं
कधी – काय – अन कसं बोलावं

तरुणपणी जेव्हा पदर
बोटाभोवती घट्ट गुंडाळला
तेव्हा त्याची खेच बघून
आईने विचारलंच,
“कोण आहे ती…
नाव काय??”

लाजायलाही मला मग
पदरच चेहऱ्यापुढे घ्यावा लागला.

रात्री पार्टी करून आल्यावर …
जिन्यात पाऊल वाजताच,
दार न वाजवता …
पदरानेच उघडलं दार.
कडी भोवती फडकं बनून …
कडीचा आवाज दाबून …

त्या दबलेल्या आवाजानेच
नैतिकतेची शिकवण दिली

पदराकडूनच शिकलो सहजता

पदराकडूनच शिकलो सौजन्य

पदराकडूनच शिकलो सात्विकता

पदराकडूनच शिकलो सभ्यता

पदराकडूनच शिकलो सहिष्णुता

पदराकडूनच शिकलो सजगता

काळाच्या ओघात असेल,
अनुकरणाच्या सोसात असेल
किंवा
स्वतःच्या “स्व”च्या शोधात असेल,

साडी गेली…
ड्रेस आला
पँन्ट आली…
टाॅप आला
स्कर्ट आला…
आणि छोटा होत गेला

प्रश्न कपड्याचा नाहीच आहे ,
प्रश्न आहे तो, आक्रसत जाऊन ,
गायब होऊ घातलेल्या पदराचा !

कारण पदर हे पद नसून , जन्मभराची फक्त आणि फक्त जबाबदारी आहे . आणि ती जाणीवपूर्वक व नि:स्वार्थपणे – पेलू शकते केवळ आई !

खरं तर – शर्टालाही फुटायला हवा होता पदर …
पण खरं सांगू … शर्टाला तो झेपणार नाही !!

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!