महाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ
दंगल नकोय,माझा महाराष्ट्र मंगलमय हवाय
महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची दंगल काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे.राजकीय पट काढण्यासाठी येणाऱ्या काळात महाराष्ट्रात विचित्र परिस्थिती निर्माण करून राजकीय फड जिंकण्यासाठी साम,दाम व दंड या निती शस्त्राचा वापर केला जाऊ शकतो. राजकीय डावपेच तुम्ही गुण्यागोविंदाने जिंका परंतु महाराष्ट्रात राजकीय अराजकता निर्माण करून राजकीय दंगल जिंकण्याचा प्रयत्न कोणी करू नये.
महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला सध्या महाराष्ट्र शांत व निर्मळ हवा आहे. महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसाच्या मनावर साधू संतांचे विचार रुजलेले आहेत. दया, क्षमा व शांती हीच महाराष्ट्राची खरी ओळख आहे.
आज महाराष्ट्रातील युवकांना दंगल किंवा दंगल सदृश्य परिस्थिती नको आहे. महाराष्ट्रातील युवकांना रोजगार हवा आहे.या रोजगारातून आपले कुटुंब कसे जगवता येईल याची भ्रांत पडलेली आहे परंतु राजकीय डावपेचामध्ये माझा हा सर्वसामान्य युवक भरडून निघू नये म्हणजे झाले. महाराष्ट्रातील तमाम युवा पिढींना माझी नम्र विनंती आहे की राजकीय लोकांनी कितीही पेटवण्याचा प्रयत्न केला तरी स्वतः आपण पेटू नका. स्वतः तुम्ही पेटला. तर तुमचे घरही पेटू शकते.घर लयाला जाऊ शकते.आपले आई- वडील, बायका-पोरं व हृदया जवळील माणसे उघड्यावर पडू शकतात. परंतु राजकीय टग्यांची मात्र चांदी होऊन जाईल.
आज महाराष्ट्रातील तमाम जनतेला व राजकीय नेते मंडळींना विनंती आहे की महाराष्ट्राला दंगल नको आहे तर महाराष्ट्र मंगलमय कसा होईल या विचारांच्या लोकांची गरज आहे. रोजगार,शिक्षण,आरोग्य,वाहतूक, सुरक्षितता,साक्षरता ,स्त्री पुरुष समानता, व्यवस्थापन ,उद्योगधंदे, पर्यटन, आधुनिक शेती,आधुनिक पशुपालन, शासनाच्या वेगवेगळ्या खात्यामधल्या भर्ती, भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र, सामाजिक व धार्मिक सलोखा हेच महाराष्ट्रातल्या तमाम युवकांना आवश्यक आहे. यातूनच महाराष्ट्र मंगलमय होऊ शकतो. दंगलीतून फक्त राजकीय सत्तापिपासू लोक सत्तेवर बसू शकतात. बाकी काहीच होऊ शकत नाही परंतु सर्वसामान्याच्या घराची राख रांगोळी करून स्वतःच्या घराचे मंगल करू पाहणार्या राजकीय जमातींचे भविष्य मंगलमय होऊ शकते.
आता तरी सावधान ... सावधान......महाराष्ट्रातील युवकांनो कोणी कितीही भडकाऊ भाषण करू द्या.तश्या भाडखाऊ लोकांपासून महाराष्ट्राला वाचवण्याची आपली स्वतःची जबाबदारी आहे. भडका करून काही लोक नामा निराळे होतील. यांच्या कुटुंबातील एकाही व्यक्तीवर केस किंवा अटक होणार नाही. परंतु लक्षात ठेवा आपल्याला दंगल सदृश्य महाराष्ट्र पाहायचा नाही.तर मंगलमय महाराष्ट्र पाहायचा आहे. हीच आर्त हाक महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रेरणादायी ठरू शकते.✒️✒️
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत