आदिवासी हिंदू आहेतकी नाहीत ?
रणजित मेश्राम
या देशातील कोट्यवधी आदिवासी अलीकडे अस्तित्वाच्या तिढ्यात अडकलेत ! हा घोर तिढा म्हणजे आदिवासी हिंदू आहेत की नाहीत ?
खरेतर, संविधानाने आदिवासींना कोणत्याच धर्माचे मानलेले नाही. आदिवासींची म्हणजे अनुसूचित जनजातीची म्हणजे शेड्युल्ड ट्राईब्सची वर्गवारी मान्य करतांना संविधानाने त्यांची जगण्याची स्थिती व सांस्कृतिक आधार ही मानदंडे व मापदंडे स्वीकारली.
शेड्युल्ड कास्ट व ओबीसी यांची वर्गवारी मान्य करतांना सामाजिक विषमता व धार्मिक आधार हे स्वीकारले. अर्थात भारतातील आदिवासींचा हिंदू धर्मासह कोणत्याच धर्माशी तसाही संबंध नव्हता. याशिवाय संविधानाने संविधानाच्या ५ व ६ अनुसूचीमध्ये आदिवासींना विशेष तरतुदी व संरक्षण दिल्याने आदिवासींची स्वतंत्र ओळख अधोरेखित झाली.
परंतु आदिवासींच्या अलीकडच्या हिंदुकरणामुळे प्रश्न निर्माण झाला आहे.
स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काही वर्षे या देशात आदिवासींचे ख्रिस्तीकरण होत होते. तेव्हा अशी बाब चर्चेला नव्हती. पण जेंव्हापासून रा स्व संघाने आदिवासींचे हिंदुकरण अर्थात धर्मांतरण करण्यात योजनाबध्द लक्ष घातले तेव्हापासून ही बाब प्रकर्षाने उठली.
आदिवासींचे हिंदुत स्थान कोणते ? एस सी, ओबीसी की इतर कोणते ? चातुर्वण्यात काय ?
हिंदुकरण करतांना आधी संघाने आदिवासींना आदिवासी म्हणणे थांबविले. त्याऐवजी वनवासी शब्द रुढ केला. त्यानंतर वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून आदिवासीत शैक्षणिक, आर्थिक, राजकीय लाभार्थी वाढविले.
संघाचा जसजसा देशभर प्रभाव वाढत गेला, भाजपची सत्ता वाढत गेली तसे या कार्याचे प्रभावक्षेत्र वाढत गेले. शिवाय, वाढलेल्या लाभार्थ्यांनी आदिवासींनी हिंदू लिहावे ही मागणी उचलून धरली.
संघाची या कार्यामागे वैचारिक भूमिका असल्याचे संघवर्तुळात सांगतात. आदिवासी हे हिंदुच आहेत. ते वेगळे नाहीत. हिंदू एक 'रिलिजन' नाही. ती जीवनदृष्टी आहे. हिंदुत्व एक रुपाची (Form) गोष्ट करीत नाही. एकतेची वा एकत्वाची दृष्टी म्हणजे हिंदुत्व. म्हणून आदिवासी हे हिंदुपासून अलग नाहीत.आदिवासींची वेगळी सांस्कृतिक व पुजेची ओळख हिंदुसोबत कायम व सुरक्षित राहू शकते. म्हणून आदिवासींनी कागदोपत्री हिंदू लिहावे.
देशाच्या एकूण लोकसंख्येच्या ९ टक्के आदिवासी आहेत. भारतात आदिवासींच्या एकूण ७०५ जाती आहेत.महाराष्ट्रात ४५ जाती आहेत. सवलती व आरक्षणाचे प्रमाण ७.५ टक्के आहे. महाराष्ट्रात हे प्रमाण १३ टक्के आहे. प्रत्येक राज्यात, राज्याचे प्रमाण वेगवेगळे आहे. काही राज्ये आदिवासीबहुल आहेत. २० टक्के च्या वर तिथे आदिवासी आहेत.
पण एक खरे की, अस्पृश्यता, इतर मागासलेपणा, सामाजिक विषमता, संधीविहिनता या बाबींचा संबंध हिंदू धर्माशी होता. आदिवासींचे तसे नाही. ती त्यांची स्वतंत्र ओळख गणली गेली.
संघाच्या, आदिवासींनो हिंदू लिहा या आवाहनावर तीव्र प्रतिक्रिया उमटतात. झारखंड व आंध्रप्रदेश सरकारने तर विधेयक पारित करून आदिवासी हिंदू नाहीत हा निर्णय घेतला. शिवाय आम्ही हिंदू नाहीच, हे सांगण्यासाठी देशभर मोर्चे निघत आहेत. या मोर्चातून, आम्हाला स्वतंत्र धर्म कोड द्या अशी मागणी होत आहे. प्रामुख्याने आदिवासीतील नवी शिकलेली पीढी यात पुढाकार घेत आहे. हिंदू लिहिणाऱ्या आदिवासींच्या सवलती व जातप्रमाणपत्र रद्द करावे अशीही मागणी होत आहे.
दुसरीकडे संघवर्तुळातून आदिवासी हिंदुकरणाचे प्रयत्न सुरुच आहेत.
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी काही दिवसाआधी हार्वर्ड इंडिया कान्फरंसला संबोधन करतांना यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली.
ते म्हणाले, आदिवासी कधीच हिंदू नव्हते. आजही नाहीत. आदिवासींची संस्कृती, सभ्यता व व्यवस्था ही स्वतंत्र व वेगळी आहे. हे वेगळेपण हीच खरी आदिवासींची ओळख. आम्ही धर्म म्हणून हिंदू का लिहायचे ? सरना धर्म लिहू असेही ते म्हणाले.
आदिवासीतील जाणकार ही आता यासंदर्भात व्यक्त होऊ लागलेले आहेत. लिहित आहेत.
असे हे आदिवासी जगतात सुरू आहे. अर्थात, कळीचे मुद्दे बुचकळ्यात गेलेत !
कुठे मुसलमान घाबरवून आहेत. कुठे ख्रिस्ती घाबरून आहेत. आता आदिवासी संभ्रमात आहेत !
० रणजित मेश्राम
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत