हेमंत सोरेन यांचे ;संघ भाजप ला आव्हान !
🌻रणजित मेश्राम
(लेखक ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत आहेत)
झारखंड राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे संघ पुरस्कृत व्यवस्थेच्या ठाम विरोधात आहेत ! राजकारणातही ते भाजप विरुद्ध आहेत. दोन्ही पातळ्यांवर हा तरुण आदिवासी नेता, भूमिकेला घेऊन म्हणून लक्षवेधी ठरत आहे !
भलेभले नामी नेते 'इडी'च्या भयाने गर्भगळीत झाले असतांना हा तरुण निर्भय राहीला. मुख्यमंत्री असतांनाच पाच महिने तुरुंगात जाणे पसंत केले. पण खचला नाही.
साडेआठ एकर कथित जमीन घोटाळ्यात हा तुरुंगवास झाला. काका चंपई सोरेन यांचेकडे पदभार सोपवून हा पट्ठा ‘जेल’कडे निघाला. जाण्यापूर्वी सभागृहात हेमंत म्हणालाय, ‘मी रडणार नाही. अजिबात नाही. आसवा जपून ठेवेन. तसेही या देशात आदिवासी, दलित, ओबीसी यांच्या आसवांना काही किंमत नाही. मला ठाऊक आहे, मी निर्दोष आहे. मला खोट्यात अडकवले गेले. मी जवाब देईन. शेवटपर्यंत लढेन.’
अखेर रांची (झारखंड) उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आर मुख्योध्यापाय यांनी हेमंत सोरेन यांना जामीन दिले. सकृतदर्शनी कोणताच ठोस पुरावा दिसत नाही असेही स्पष्ट केले. गेल्या २८ जुन ला हे जामीन मिळाले. त्यानंतर वेगाने घटना घडल्या. हेमंत सोरेन पुन्हा झारखंडचे मुख्यमंत्री झाले.
आता पुन्हा ‘इडी’ सर्वोच्च न्यायालयात गेल्याचे वृत्त आहे.
तोंडावर झारखंड विधानसभेच्या निवडणुका आहेत. कदाचित महाराष्ट्र, हरयाणा, जम्मू काश्मीर सोबतच इथे निवडणुका होतील. ८१ सदस्य संख्या असलेले हे राज्य आहे.
हेमंत सोरेन हे मुख्यमंत्री सोबतच झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाचे नेते आहेत. सध्या झामुमो (३०), कांग्रेस (१६) व राजद (१) अशी ४७ ची आघाडी आहे. बहुमताला ४१ लागतात.
भाजप कडे २५ सदस्य आहेत. सोबत झारखंड विकास मोर्चाचे ३ सदस्य आहेत. तर भाकप माले पक्ष झामुमो आघाडी सोबत आहे.
विशेष म्हणजे तुर्तास झालेल्या लोकसभा निवडणुकीत झारखंड मध्ये भाजपला जबर फटका बसला. तेव्हा हेमंत सोरेन तुरुंगात होते. झारखंड मध्ये आदिवासी साठी सुरक्षित (राखीव) असलेल्या पाचही लोकसभा जागेत भाजपचा पराभव झाला. एकीकडे मध्यप्रदेशात सर्व आदिवासी सुरक्षित जागेत भाजप जिंकलेली आहे. यामुळे भाजपला हा धक्का आहे.
पाचपैकी दुमका, सिंहभूम व राजमहल झामुमो ला तर खुंटी व लोहरदगा जागा कांग्रेस ला मिळाल्या.
हेमंत सोरेन हे राजकीय दृष्ट्या 'इंडिया आघाडी' सोबत आहेत. त्याचवेळेस सामाजिक व सांस्कृतिक बाबतीत संघाच्या कडक विरोधात आहेत.
संघाने योजिलेल्या 'आदिवासींचे हिंदुकरण' याला हेमंत सोरेन यांचा जबर विरोध आहे. अलीकडे आदिवासी समाजात 'शबरी मेळा' वा 'शबरी कुंभ' खूप प्रसारित आहे. ते प्रस्थ वाढलेय. हनुमान, सुग्रीव, अंगद, एकलव्य हे हिंदू अस्मितेचे रक्षक असे पेरले जाते.
आदिवासी जर निसर्गपूजक असतील तर पंचमहाभूते (पृथ्वी, जल, वायू, तेज, आकाश) हिंदू मानतातच असे सांगितले जाते.
या सर्व प्रकारांना हेमंत सोरेन यांचा व झामुमो चा विरोध आहे. त्यांचे मते, आदिवासी हिंदू नाहीत. आदिवासींचा कोणताच धर्म नाही. फार आग्रह केला तर 'सोरेन धर्म' लिहू. फारच बळजोरी झाली तर, बौद्ध धर्माचा स्वीकार करु.
आमची आदर्शे दोनच. बिरसा मुंडा व बाबासाहेब आंबेडकर असेही हेमंत सोरेन सांगतात.
आदिवासी शिकावा. सुखी व्हावा. इतरांच्या बरोबरीने यावा. विकसित व्हावा. जज्ज व्हावा. राजनेता व्हावा. प्रशासक व्हावा. असे यांना वाटतच नाही.
तो जंगलात असे. जंगलात रहावा. अशीच मानसिकता आहे. कमालीची घृणा अनाकलनीय असल्याचेही हेमंत सोरेन म्हणतात.
४९ वर्षीय हेमंत सोरेन हे उच्च शिक्षित आहेत. बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत शिक्षण झाले. हिंदी इंग्रजी दोन्हीवर पकड आहे.’अंततोगत्वा’शब्द हा ज्या सफाईदारपणे हेमंत हिंदीत बोलतात त्यावरून हिंदीवर पकड स्पष्ट होते.
हेमंत सोरेन यांचे वडील शिबू सोरेन हे झारखंड चे मुख्यमंत्री होते. ते हयात आहेत.
भविष्यात संघविचारसरणीला आव्हान ठरु शकेल असा देशपातळीवरील नेता हेमंत सोरेन होऊ शकतील, यात शंका नको !
० रणजित मेश्राम
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत