महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामान्य ज्ञान

डॉ. आंबेडकरांनी दिले भाऊरावांना २० रुपये सोमवारी ऐतिहासिक भेटीच्या स्मृती जागणार !

अरुण विश्वंभर जावळे

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या धनिणीच्या बागेतील बोर्डिंगला २९ जुलै १९२८ साली भेट दिली होती. या भेटीच्या संदर्भाने भीमराव आणि भाऊराव यांच्या ऋणानुबंधाला उजाळा मिळावा, यासाठी सोमवार दिनांक २९ जुलै रोजी धनिणीच्या बागेत सायंकाळी ५ वाजता ऐतिहासिक भेटीचा ९६ वा वर्धापनदिन साजरा करण्यात येणार आहे. यादरम्यान विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाणार असून प्राचार्य डॉ. अरुण गाडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत व विद्यार्थी दिवसाचे प्रवर्तक अरुण जावळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सातारच्या जिल्हा न्यायालयात एका खटल्याच्या निमित्ताने आले होते. तेव्हा सलग तीन दिवस त्यांचा मुक्काम साताऱ्यात होता. या दरम्यान त्यांनी मातोश्री भीमाई आंबेडकर यांच्या समाधीजवळ जाऊन तिथे अभिवादन केले. जिथे त्यांचे बालपण गेले आणि ज्या वास्तूत मातोश्री भीमाई यांनी अखेरचा श्वास घेतला तेथेही जाऊन बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरु केलेल्या शाळेकडे रवाना झाले. भाऊरावांचे शैक्षणिक कार्य आणि एकूणच त्यांची धडपड याबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कमालीचा आदर होता. भाऊरावांनाही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल अभिमान होता. बहुजनांच्या उत्थानाकरीता हे दोन्ही महापुरुष प्रयत्नशील होते.

धनिणीच्या बागेत शाहू बोर्डिगमध्ये जेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पोहचले तेव्हा तिथे त्यांचे तिथे स्वागत झाले. जिल्हा न्यायालयात महार समाजाचा खटला डॉ. आंबेडकरांनी जिंकला होता याची खबर सर्वदूर पोहचली असल्याने भाऊरावही बाबासाहेबांना भेटावयास उत्सुक होते. त्यामुळे तिथे बाबासाहेबांचा यथोचित पाहुणचार करण्याचा मानस भाऊरावांचा होता. त्यांनी उत्तम भोजणाची व्यवस्थाही केली. मात्र तेथील मुलांसोबत साधे जेवण करण्यातच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धन्यता मानली. मुलासोबत जेवताना त्यांच्याशी गप्पा झाल्या तेव्हा विविध जातीधर्मातील मुलांचे शैक्षणिक संगोपन भाऊराव किती जिव्हाळ्याने करताहेत हे त्यांच्या लक्षात आले. यादरम्यान डॉ. आंबेडकरांनी भाऊरावांच्या शैक्षणिक कार्यासाठी २० रुपये देणगीसुध्दा दिली. शिवाय अभिप्राय देताना लिहाले “I am extremely happy to have been able to pay this visit to the hostel. It is a unique and deserves support of every man who cares for the best interests of the nation.”

भीमराव आणि भाऊराव यांचा बहुजनांच्या शिक्षणाबद्दलचा आणि एकूणच माणसाच्या सर्वागीण उत्थानाबाबतचा व्यापक दृष्टिकोन किती निकोप होता हे त्याच्या ऐतिहासिक भेटीतून स्पष्ट होते. याच भेटीच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी भीमाईभूमीतील विविध परिवर्तनवादी संस्था संघटनांच्या वतीने भेटीचा ९६ वा वर्धापनदिन साजरा होत आहे. सोमवारी सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमासाठी वहीपेन घेऊन बहुसंख्येने उपस्थित रहा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.

अरुण विश्वंभर जावळे
प्रवर्तक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन तथा विद्यार्थी दिवस.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!