17 सप्टेंबर भैय्यासाहेब आंबेडकर स्मृती दिना निमित्त पूर्वतयारीचे कार्यक्रम

श्रीपती ढोले
सूर्यपुत्र भय्यासाहेब तथा यशवंतराव भीमराव आंबेडकर म्हणजे आंबेडकरी चळवळीचे समन्वय सूत्र होते. त्यांनी, “माझ्या वडिलांनी जे जे उभे केले ते कोणत्याही परिस्थितीत लयास जाता कामा नये;” म्हणून स्वत: प्रचंड अवहेलना व अपमान सहन केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सख्खे चिरंजीव असून सुद्धा दुय्यम दर्जाचे नेते म्हणून त्यांना वागणूक देण्यात आली. असे असूनही भय्यासाहेबांनी आपला संयम कधीही ढळू दिला नाही. तेच भय्यासाहेब आंबेडकर मोठ्या मुश्किलीने बळवंतराव वराळे चेअरमन असताना 1975 ला पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे मेंबर झाले. त्यानंतर अल्पावधीतच त्यांचे निधन झाले. त्यांच्या रिक्त जागेवर नांदेडच्या
डॉ. एस. पी. गायवाडांची वर्णी लागली. नऊ वर्षांपेक्षाही जास्त काळ डॉ. एस. पी. गायकवाड हे पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन होते. एक नैतिक जबाबदारी म्हणून त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शाखांमधून सूर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकरांचा स्मृती दिन व जयंती महोत्सव साजरा करण्याची प्रथा पाडायला पाहिजे होती;परंतु तसे झाले नाही. जेव्हा सर सेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन म्हणून सूत्रे हातात घेतली तेव्हा मी स्वतः पुढाकार घेऊन नांदेडच्या नागसेन हायस्कूलमध्ये ही प्रथा सुरू केली व 2015 साली औरंगाबादच्या नागसेनवनात सर्व प्राचार्ये, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व आजी-माजी विद्यार्थी यांना संघटित करून नागसेनवनात जाहीररित्या चेअरमन आनंदराज आंबेडकर साहेबांनी आंबेडकरी समूहाला संबोधित करावे अशी विनंती केली आणि त्यांनी ती मान्य सुद्धा केली होती. त्यांची ती ऐतिहासिक भाषणे मी स्वतः संपादित केलेल्या ‘आनंदपर्व’ या औरंगाबादच्या आनंदराज प्रकाशनाने काढलेल्या विशेषांकात न नंतर ‘आनंदचेतना’ नावाने रजिस्ट्रेशन मिळालेल्या व माझे छोटे बंधू बाबासाहेब ढोले यांनी संपादित केलेल्या मासिकात शब्दबद्ध केली आहेत. हे सर्व सांगण्याचे कारण हे की, मी आता सेवानिवृत्त झालेलो आहे. मी सेवेत असताना सुद्धा ही परंपरा चालू ठेवताना मला प्रचंड अडथळे निर्माण केले जात होते; परंतु मी हे सर्व रेटून नेत होतो. मी सेवानिवृत्त झाल्यानंतर पोलीसात तक्रार देऊन मला शाळेत येण्यासाठी पावबंद करण्याचे आदेश मिळाल्याचे माझे मुख्याध्यापक शिवाजी गव्हाणे यांनी मला सांगितले होते; परंतु कारण काय दाखवावे? हे त्यांना कळत नव्हते. ज्या नागसेन हायस्कूलमध्ये मी 37 वर्षे इमानेइतबारे सेवा दिली त्या माझ्या ज्ञान मंदिरात येण्यापासून पोलीसांमार्फत पावबंद करण्याचा विचार केला जातो हे ऐकून माझ्या मनाला किती वेदना झाल्या असतील याची आपण कल्पना करू शकता. ते तसे करू शकत नाहीत हे मला कळते;परंतु हा विचार तरी का करावा? सूर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकरांची जयंती करणे आणि त्या कार्यक्रमासाठी त्यांच्याच चिरंजीवांना निमंत्रित करणे ही एवढी वाईट गोष्ट आहे का? आता मात्र मी ठाम निर्णय घेतला आहे. ज्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शाखेत मी माझे आयुष्य घातले आणि त्याच पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या पहिल्या फोर्ट भागातील मुंबई येथील सिद्धार्थ कॉलेजमध्ये मी विद्यार्थी म्हणून सेवानिवृत्तीनंतर ऍडमिशन घेतले त्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या कोणत्याही कॉलेजच्या, शाळेच्या, वसतीगृहाच्या, संशोधन केंद्राच्या किंवा पीपल्स एज्युकेशन सोसायटीने चालवलेल्या कोणत्याही प्रकल्पाच्या कोणत्याही प्रमुखास, कर्मचाऱ्यास, विद्यार्थ्यास भेटण्यासाठी कोणाची तरी विशेष परवानगी घेण्याची आवश्यकता आहे; असे मला अजिबात वाटत नाही. माझ्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संस्था व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कुटुंब हेच सर्वस्व आहे. सूर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकरांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने नांदेडमध्ये व जयंती महोत्सवाच्या निमित्ताने औरंगाबादमध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेजेसचे प्राचार्ये, शाळांचे मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व आजी-माजी विद्यार्थी यांना भेटून, त्यांना ऑनरेबल चेअरमन आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली संघटित करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि दरवर्षी नांदेडच्या नागसेन हायस्कूलमध्ये व औरंगाबादच्या नागसेनवनात बाबासाहेबांच्या समाजाला निमंत्रित करून बाबासाहेबांच्या कुटुंबाने या निमित्ताने समाजाचे प्रबोधन करावे यासाठी प्रयत्न करणार आहे. 17 सप्टेंबर रोजी भय्यासाहेबांचा स्मृती दिन जवळ आल्याने त्याच्या पूर्वतयारीची बैठक गुरुवार दि. 25 जुलै 2024 रोजी ‘चक्षुमान बुद्ध विहार’ श्रावस्ती नगर नांदेड येथे मी स्वतः पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा एक घटक म्हणून आयोजित करायला सांगितली होती. संदीप मांजरमकर, मोहन लांडगे, ऍड. बाळासाहेब शेळके, रवी सोनकांबळे, विशाल वाघमारे या तरुणांनी विशेष पुढाकार घेऊन वातावरण निर्मितीला सुरुवात केली आहे. अशीच सुरुवात औरंगाबादमध्ये ‘सूर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव’ साजरा करण्या संबंधी करणार आहे. त्यानंतर ऑनरेबल चेअरमन आनंदराज आंबेडकर साहेब यांच्याशी चर्चा करून कार्यक्रमाचे स्वरूप ठरवणार आहे. तसेच सूर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकरांच्या स्मृती दिनाच्या दिवशी डॉ. एस. पी. गायकवाड यांनी आपण पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ऑनरेबल चेअरमन आनंदराज आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वात होत असलेल्या प्रगतीच्या आड येणार नाही असे जाहीर करावे यासाठीही प्रयत्न करणार आहे. एकतर भय्यासाहेबांच्या रिक्त झालेल्या जागेवर नियुक्त झाल्याचे औचित्यही साधले जाईल व डॉ. एस. पी. गायकवाडांबद्दल समाजाचा असलेला रोष सुद्धा कमी होईल.
श्रीपती ढोले, मुंबई
शनिवार दि. 27 जुलै 2024
मो. 9834875500
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत