वर्षावास आणि उपोसथ
अनिल वैद्य
तथागत बुद्धांनी लोकांच्या कल्याणासाठी मानवाला हितकारक असा जो धम्म सांगितला तो धम्म लोकांपर्यंत पोहचावा आणि मानवाचे जीवन सुखकारक व्हावे यासाठी तथागत बुद्धांनी आपल्या भिक्खु संघाला धम्म प्रचार प्रसारासाठी जो आदेश दिला तो पुढील प्रमाणे…
” चरथ भिक्खवे चारिकं, बहुजन हिताय, बहुजन सुखाय, लोकानुकम्पाय, अत्थात हिताय देवमनुस्सानं ।
देसेथ भिक्खवे धम्मं, अदिकल्याणं मज्झकल्याणं, परियोसानकल्याणं, सात्थ सब्यञजनं ब्रम्हचरियं
पकासेथ ॥ “
( मराठी अर्थ : भिक्खूहो, बहुजनांच्या हितासाठी, सुखासाठी, लोकांवर अनुकंपा करण्यासाठी, मानवांना कल्याणकारी, धम्मपदेश करण्यात तुम्ही प्रवृत्त व्हा. प्रारंभी कल्याणपद, मध्यंतरी कल्याणपद आणि शेवटीही कल्याणपद अशा या धम्म मार्गाचा लोकांना उपदेश करा.
तथागत बुद्धांनी भिख्खू संघाला आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत, एकाच ठिकाणी विहारात राहून धम्माचा अधिक अभ्यास करीत आसपासच्या परिसरातील उपासकांना धम्म ज्ञान देण्याबाबत सूचना दिल्या. आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा हा काळ वर्षावास म्हणुन तेव्हापासुन संपन्न होऊ लागला.
वर्षावास इ.स. पूर्व ५२७ म्हणजे तथागत बुध्दांच्या काळापासून वर्षावास सुरू आहेत. तथागत बुध्दांनी त्यांचा पहिला वर्षावास इ.स.पूर्व ५२७ ला मृगदाय वन ऋषीपतन सारनाथ येथे व्यतीत केला व इ.स.पूर्व ४८३ ला शेवटचा ४५ वा वर्षावास केला. त्यानी स्वतः श्रावस्ती, जेतवन, वैशाली, राजगृह इत्यादी विहारात वर्षावास केले.
वर्षावास काळात
भंते प्रवचन देतात.उपासक सुद्धा आवर्जून भंतेचे प्रवचन ऐकायला उपस्थित राहतात.आणि काही उपासक वर्षावास काळात उपोसथ सुध्दा करतात.
१४ ऑक्टोबर १९५६ ला नागपूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी
आपल्या लाखो अनुयायांसोबत हिंदु धर्म सोडून बौद्ध धम्म स्वीकारला. जुन्या धर्मातील अनिष्ट परंपरा सुध्दा नाकारल्या .पण काही बौद्ध संस्कृती मध्ये असलेल्या परंपरा हिंदू परंपरेसमान वाटत असल्याने काही धर्मांतरित बौद्धांकडून विरोध असल्याचे निदर्शनास आले. त्यापैकी उपवास हा हिंदू लोक करतात तर बौद्ध परंपरे मध्ये उपोसथ आहे.बुद्ध
परंपरेतून बऱ्याच गोष्टी इतरांनी आत्मसात केल्या आहेत.दोन्हीही नामाभिधान सारखे वाटत असल्याने; बौद्ध उपासकांचा गैरसमज होतो.
काही बौद्ध बांधव तर बुद्धाने व डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी उपोसथ सांगितलेच नाही असेही म्हणतात. तर काही म्हणतात की ,ते फक्त भिक्खू साठी आहे, असे उपोसथ विरोधी लोक उपोसथ करणाऱ्याचा उपहासही करतात.
म्हणून बौद्ध साहित्यात असलेले संदर्भ बघू या!
बौद्ध परंपरेत उपोसथ हे पौर्णिमा व अष्टमीला करतात.तर हिंदूंचा उपवास दिवसानुसार असते. कुणी सोमवार धरतो. कुणी,शनिवार, कुणी शुक्रवार इत्यादी देवाच्या तिथी नुसार ते उपवास करतात.
तसे बौद्ध परंपरेत नाही. हाच तो फरक. तथापि हिंदू बांधव सुध्दा श्रध्देने
उपवास करतात.
त्रिपिटकाचे अंगुत्तर निकाय मधे खालील उल्लेख आहे
“चतुर्दशी (अमावास के एक दिन पूर्व का दिन), पूर्णिमा, अष्टमी तथा प्रातिहारिय-पक्ष (अतिरिक्त छुट्टी) को ही उपोसथ” दिखाई दिया हैं ।
अंगुत्तर निकाय :
चातुद्दसिं पञ्चदसिं,
या च पक्खस्स अट्ठमी !
पाटिहारियपक्खञ्च अट्ठंगसुसमागतं ।
उपोसथं उपवसेय्य, योपिस्स मादिसो नरो’ति ।।
अर्थ : जो भी नर मेरे सदृश होना चाहे, वह पक्ष की चतुर्दशी (अमावास के एक दिन पूर्व का दिन), पूर्णिमा, अष्टमी तथा प्रातिहारिय-पक्ष (अतिरिक्त छुट्टी) को आठ शीलों वाला उपोसथ करें ।
संदर्भ : अंगुत्तर निकाय ।
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेल्या
भ बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात
“सप्ताहामागून सप्ताह उपोसथ करा”
असे स्पष्ट नमूद केले आहे.( भ बुद्ध आणि त्यांचा धम्म पृष्ठ ३४५)
बौद्ध परंपरेत पौर्णिमा ,अष्टमी, चतुर्थी या दिवशी उपोसथ करण्यासाठी त्या दिवशी आठ शील पालन करतात. पंचशील आणि तीन अधिक शील
दुपारी १२वाजे पूर्वी जेवण करतात व सायंकाळी किंवा रात्री भोजन करीत नाहीत.
उपोसथ करण्याचा उपदेश देण्यामागे
उपासकाच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी उपोसथ चांगले असल्याने बुद्धाने उपासकाला उपोसथ करण्याचा उपदेश दिला असावा. बुद्ध विनाकारण तर उपदेश देणार नाहीत.ते स्वतः व भिक्कू संघ एकदाच भोजन करायचे.
भ बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात उपोसथा बद्दल खालील उल्लेख आहेत.
‘हिंसा, चोरी, असत्य भाषण, सुरापान, व्यभिचार ह्या पासून परावृत्त व्हा.
’सप्ताह मागून सप्ताह, उपोसथाचे वत ग्रहण करा आणि श्रद्धामय अंत:
करणाने अष्टशील चे पालन करा.
‘प्रातःकाळी पवित्र श्रद्धामय चित्ताने वरील उपोसथ व्रत स्वीकारल्यानंतर यथाशक्ती भिक्खूंना अन्न आणि पेय द्या.
‘आपल्या आईवडिलांचा सन्मान राखा. उपजीविका सन्मानाने करा.
असा एकनिष्ठ उपासक दिव्य जगात प्रदेश करील.’(पाहा भ बुद्ध आणि त्यांचा धम्म .प्रकरण भिक्कूचा धम्म आणि उपसाकाचा धम्म .पृष्ठ ३४५ इंग्रजी ग्रंथ पेज ३९९)
बुद्ध परंपरेत
भगवान बुद्धांना, धम्माला व संघाला तीन वेळा वंदन केल्यानंतर त्रिशरण ग्रहण केल्यावर हे आठ शील ग्रहण करण्याची प्रतिज्ञा घेतात. ते खालीलप्रमाणे आहेत.
१)पाणातिपाता वेरमणी, सिक्खापदं समादियामि । मी प्राणी हिंसा करणार नाही, अशी प्रतिज्ञा करतो.
२)आदिन्नादाना वेरमणी, सिक्खापदं समादियामि ।
मी चोरी करणार नाही, अशी प्रतिज्ञा करतो. ३)कामेसूमिच्छाचारा वेरमणी, सिक्खापदं समादियामि । मी कामवासनेच्या अनाचारापासून अलिप्त राहीन अशी करतो
४) मुसावादा वेरमणी, सिक्खापदं समादियामि. मी असत्य बोलणार नाही, अशी प्रतिज्ञा करतो.
५) सुरा मेरय मज्ज पमादह्मणा वेरमणी, सिक्खापदं समादिया मी मद्यपान करणार नाही, अशी प्रतिज्ञा करतो.
पंचशीलाशिवाय अधिक तीन शील भगवान बुद्धांनी सांगितले आहेत. एकूण आठ शील आहेत, त्याला अष्टशील म्हणतात उपासकांना पंचशील अनिवार्य आहे. उपोसथाच्या दिवशी उपासकांना खालील तीन शिलांचे पालन करतात.
६)विकाल भोजना वेरमणी, सिक्खापदं समादियामि अवेळी भोजन करणार नाही, अशी प्रतिज्ञा करतो.
७)नच्च- व-गीत-वादित – विसूक-दस्सना, माला-गंध-विलेपन धारण मण्डन-विभूसनट्टाना, वेरमणी, सिक्खापदं समादियामि नृत्य, संगीत आणि तमाशा यांच्यात रममान होणार नाही अशी प्रतिज्ञ करतो. पुष्पमाळा, अत्तर, सुगंधी द्रव्य किंवा अलंकार धारण करणा नाही अशी प्रतिज्ञा करतो. ८ उच्चासयना – महासयना वेरमणी, सिक्खापदं समादियामी । उच्च बिछाना यापासून अलिप्त राहाण्याची प्रतिज्ञा करतो. या शिवाय अष्टांगिक मार्गाचे पण पालन केले जाते .ते असे १- “सम्यक दृष्टी “या तत्वाची व्याख्या केली आहे .सम्यक दृष्टी म्हणजे परिपुर्णता होण्यासाठी असलेली दृष्टी.. जग हे आंधळ्याची जत्रा आहे..वासनेने हपापलेल्या लोकांना जीवनचा मार्ग दिसत नाही जेव्हा आपण अष्टशिलाचे पालन करू तेव्हा ती जीवनाची पहिली पायरी आहे सम्यक दृष्टी..म्हणजे मुक्त चिंतन ,मुक्त चित्त. २–सम्यक संकल्प :-.यांचा अर्थ असा की आमचे ध्येय ,आमचे कर्म ,आमच्या अपेक्षा ,आमच्या आकांक्षा श्रेष्ठ कल्याणकारी असाव्या त्या अयोग्य असू नये .. ३— सम्यक वाणी मनुष्याने सत्यच तेच कथन केले पाहिजे ,असत्य कथन करू नये ,दुसर-याप्रति अभद्र कथन न करणे,निरर्थक ,व्यर्थ,
मुर्खतापूर्ण कथन न करणे.
४.सम्यक कर्मात—योग्य आचरणाची करणे.
५ ,—सम्यक आजीविका उपजीविका करण्याचे अनेक मार्ग आहेत ,काही हीन आहेत का ही श्रेष्ठ आहेत ,हीन मार्ग इतरांना दुःखी करतात इतरांवर अन्याय करतात श्रेष्ठ मार्ग इतरांचे नुकसान करीत नाही इतरांवर अन्याय करत नाही सम्यक आजीविका असलीच पाहिजे.
६—सम्यक व्यायाम–म्हणजे मनात चांगले विचार संवर्धित करणे या साठी परिश्रम घेणे.
७—-सम्यक स्मृतीचा अर्थ असा की ,विचारप्रणवता आणि चित्ताची एकाग्रता ,यांचा अर्थ चित्ताची निरतंर जागृकता ,चित्ताने अकुशल वासनांवर निरतंर दृष्टी ठेवणे व ते दूर ठेवणे यालाच सम्यक स्मृती म्हणतात.
८—सम्यक समाधी–मनाला चांगल्या गोष्टीचा विचार करण्याची सवय लावणे.
या अष्टनियमाचे पालन करून जीवन संस्कार घडविण्याचे मार्ग आहे..
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहीले की,
“गंधमाला धारण करू नका.आपला बिछाना भूमीवर पसारा.प्रत्येक उपोसथाच्या दिवशी हे व्रत ग्रहण करा आणि सिद्ध अंतःकरणाने हे अष्टांगिक व्रत सना सारखे पाळा
प्रात काळी हे व्रत ग्रहण करून धर्मशाली व श्रद्धायुक्त चित्ताने याचकाना अन्न पाणी दान करा”
(संदर्भ:-भ बुद्ध व त्यांचा धम्म :-प्रकरण सदचरणात परिपूर्णता कशी साधता येईल? पृष्ठ३०२)
तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेल्या पाली शब्दकोशात उपोसथ चा उल्लेख आहे
उपोसथ
(संदर्भ :डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषण खंड १६ पृष्ठ ३८६)
याचे स्मरण व्हावे की,भ बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी नव दिक्षितांसाठी लिहला.तसा मनोदय डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ४ डिसेंबर १९५४ ला व्यक्त केला होता .
१४ ऑक्टोबर १९५६ ला धम्म दिक्षेनंतर,नागपूर येथे शाम हॉटेलला आले.ते तेथेच थांबले होते.त्यांनी कार्यक्रमाची टेप ऐकली म्हणाले
“आज माझ्या जीवनातील अती महत्वाचा दिवस आहे. या जन्मामधे मला जे साध्य करायचे ते मी केले.आज माझे उपोसथ आहे.आज मी रात्रीचे जेवण घेणार नाही “
(संदर्भ: धम्म दिक्षेचा अविस्मरणीय इतिहास.लेखक वामन गोडबोले.पृष्ठ १६२)
धम्म हा विवेकवादी
आहे. आपल्या
शरीराला योग्य वाटेल तसा धम्म
आचरणात आणने
अतिरेक न करणे
हाच विवेक आहे.
तीन महिने उपोसथ करणे काही सोपे नाही.म्हणून
बौद्ध उपासकांनी वर्षावासात उपोसथ केलेच पाहिजे असे मात्र कोणत्या ग्रंथात मला आढळले नाही. परन्तु उपासकांनी उपोसथ केले तर धम्म विरोधी कृतीही होणार नाही. चांगलेच!
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भ बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात असे म्हटले की,जे जे उपदेश भिक्खूला केले ते उपसकांनाही लागू पडणारे आहेत.(पाहा भ बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रकरण भिक्खूचा धम्म आणि उपासकांचा धम्म पृष्ठ ३४३)
भिक्खूनी मात्र ते कटाक्षाने कडकपणे पालन करायचे आहे ,उपासकाला कडक निर्बंध नाहीत ,उपासक स्वेच्छेने निर्णय घेऊ शकतो. हाच तो फरक.
अनिल वैद्य
दिनांक २२जुलै२०२४
✍️✍️✍️✍️
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत