उपेक्षितांचे नायक लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे उपेक्षितच..!!
सुरज साठे वाटेगाव
आजवरच्या जगाच्या इतिहा सात असा एकच साहित्यिक होऊन गेला. ज्याने आपल्या लेखणीतून एका भिकाऱ्याला आपल्या कथेचा नायक बनवला अन् एका वेश्येला कथेची नायिका बनवली. ते साहित्यिक म्हणजे लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे.
अण्णाभाऊ साठे यांची सुलतान कथा व चित्रा ही कादंबरी रशियन भाषेत भाषांतर झाली. अन् रशियन लोकांनी भारताचा मॅक्झिम गोर्की ही उपमा अण्णाभाऊ साठे यांना दिली. रशियन लोक अण्णाभाऊंना सुलतान फेम अण्णाभाऊ म्हणू लागले. खर बघायला गेलं तर काय असेल या दोन्ही कथांमध्ये की रशियन जनतेने अण्णाभाऊंना थेट भारताचा मॅक्झिम गोर्की घोषित केलं. खर तर सुलतान नावाचा एक अनाथ तरुण बेकारीला अन् धर्मांधतेला कंटाळून शेवटी भिकारी झाला. अन् आपल्या फाटलेल्या झिंदगीला ठिगळ लावू लागला. अन् अखेर या जगाला क्रांतिकारी धडा तो देऊ लागला. अशा या तरुणाला सुलतानाला त्याच्या दारिद्र्य, व्यथा, संघर्षाला अण्णाभाऊंनी भारतासमोर नाही तर जगासमोर मांडल.
दुसरी महत्त्वाची कादंबरी जिला संपूर्ण रशियाने डोक्यावर घेतलं ती कादंबरी म्हणजे चित्रा. खरतर या कादंबरीची नायिका एक वेशा स्त्री आहे. इथली व्यवस्था अन् या व्यवस्थेतील नपुंसक मानस एका स्त्रीला या नरकात कसे ढकलतात अन् ती ही नायिका आपल्या जीवनाशी या व्यवस्थेशी कसा संघर्ष करते हा पट अण्णाभाऊंनी मांडला. अशा हजारो उपेक्षितांना प्रथमतः जग पटलावर कोणी नेल असेल तर ते अण्णाभाऊ साठे हेच आहेत.
मी मूळचा वाटेगावचा असल्याने लहानपणापासून चळवळ माझ्या डोक्यात भिनतच होती. मी इयत्ता सहावीत असताना, माझ्या जीवनातील पहिलं पुस्तक म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची फकिरा कादंबरी वाचली. अन् ती कादंबरी वाचत असताना माझ्या डोळ्यातून आपोआप पाणी गळायच अन् कंठ दाटून यायचा. माझं मन मला म्हणायचं माझ्या गावातला, माझ्या रक्तातला हा नायक अन् ते माझे पूर्वज इथल्या जुलमी व्यवस्थेशी लढतात, झुंजतात, प्राणाची बाजी लावतात. अन् ही जुलमी व्यवस्था, इथले धनदांडगे साऱ्या दुनियेचं दुःख त्यांच्या पदरी टाकून मोकळे होतात. माणूस असून त्यांना जनावराची वागणूक देतात. त्यांना दावणीला बांधतात, त्यांचा कडेलोट करतात, त्यांना साखळदंडात जोखडतात हे सर्व वाचून माझ्या अंगाची लाही लाही व्हायची अन् अस वाटायचं की फकिराचा तो लढा आपण तलवार हातात घेऊन पुरा करायचा अन् या जुलमी व्यवस्थेला कापून काढायचं. ती फकिरा कादंबरी इयत्ता सहावीत असताना माझ्या तोंडपाठ झाली होती. माझं वय वाढत होत पण हृदयातील ती आग थंड होत नव्हती. वाढत्या वयानुसार समज येत गेली अन् तलवारीची जागा लेखणीने घेतली. अन् ती लेखणी घेऊन या व्यवस्थेविरुद्धच्या लढाईला मी आरंभ केला. ही गोष्ट सांगायचा हेतू एवढाच की अण्णाभाऊ साठे यांचं एक पुस्तक हजार पुस्तकांच्या बरोबरीच आहे. खरतर अण्णाभाऊ नसते तर फकिरा हा नायक जगासमोर कधीच आला नसता. अण्णाभाऊंनी अशा हजारो नायकांना आपल्या लेखणीतून, वाणीतून जगासमोर मांडले अन् खऱ्याअर्थाने अण्णाभाऊ साठे हे उपेक्षितांचे नायक झाले.
हेच उपेक्षितांचे नायक अण्णाभाऊ या अण्णाभाऊंना मात्र या देशाने अजूनही उपेक्षितच ठेवलेलं आहे. आजवरच्या शासनर्त्यांनी अण्णाभाऊंना उपेक्षितच ठेवलेलं आहे. एवढ्या मोठ्या महान क्रांतिकारकाच राष्ट्रीय स्मारक या देशात अद्यापही नाही. या देशातील शासनकर्ते या देशाचा सर्वोच्च भारतरत्न हा पुरस्कार माणसाचं कर्तृत्व बघून नाही तर जात बघून देतात. ही या देशाची शोकांतिका आहे. अण्णाभाऊ आपल्या एका सहकाऱ्याला म्हणाले होते की मी जगात वाढणार अन् खरच आज अण्णाभाऊ जगात गाजत आहेत.
आज 18 जुलै साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्यास्मृतिदिनानिमित्त त्यांच्या क्रांतिकारी लढ्यास व विचारांस त्रिवार विनम्र अभिवादन..!!
लेखक/कवी – सुरज साठे, वाटेगावकर
9370626619
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत