परिसरातील बुद्ध विहारात जाऊन कधीच बुद्ध मूर्तीचे तोंड न बघणारे लोक देखील विठ्ठला तुझ्यातील बुद्ध दाखव म्हणतात!
प्रिय बौद्ध बांधवांनो आपल्यापैकी किती जण बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्या प्रमाणे दर रविवारी विहारात जातात? माझ्या माहितीप्रमाणे स्वतःला बौद्ध म्हणवून घेणाऱ्यापैकी 50% लोकांना अजून त्रिशरण आणि पंचशील व्यवस्थित म्हणता येत नाही. अतिशय अल्प प्रमाणात लोक असे आहेत जे की नियमित विहारात जातात. ती संख्या वाढवायची सोडून आपली लोक का बरे म्हणून नको तिथे बेंबीच्या देठापासून ओरडत असावेत हेच कळत नाही.
शिवजयंती जवळ आली की शिवाजी महाराजाला बौद्ध करण्याचा प्रयत्न करणे असो की आषाढी एकादशी दरम्यान विठ्ठल हाच बुद्ध आहे असा दावा करून विठ्ठल भक्तीत तल्लीन होणे. या गोष्टींचा काही उपयोग होणार आहे का?
आजच्या एकादशीला कित्येकांच्या परिवारातील व्यक्ती उपवास करतात ते तुम्हाला दिसत नाही का? कित्येक लोकांचे स्टेटस व स्टोरी आज बघायला मिळतील त्याबाबतीत शुभेच्छा देण्याबाबत मला काही एक अडचण नाही पण देवांचा विरोध करून त्याच देवांमध्ये बुद्ध शोधणे बंद करायला हवे. असे मला वाटते.
बुद्ध लेण्यावर असलेल्या अतिक्रमणावर जर असाच आवाज उचलला तर तिथे फायदा मिळू शकतो पण तिथे कोणी आवाज उचलत नाही उलट अश्या गोष्टींवर आपण वेळ घालवतो की जिथून आपल्याला काहीच सिद्ध करता येणार नाही. विदर्भातील एक बौद्ध भंतेजी आहेत ज्यांनी शिवाजी महाराज बौद्ध होते, राजमाता जिजाऊ महार होत्या असे वक्तव्य केले आहे तेच भंतेजी दरवर्षी कोरेगाव भीमा ते पंढरपूर पर्यंत दिंडी प्रमाने पदयात्रा काढतात. या गोष्टींचा भिखु संघाला किंवा बौद्ध उपासकांना काही फायदा आहे का? हल्ली मागेच एक पोस्ट फेसबुकवर बघितली होती त्यात विदर्भातील विक्तूबाबा च्या समोर जाऊन काही बौद्ध भंतेजी हात जोडून उभे होते. त्याविषयी बौद्ध लोकांच्या भावना तीव्र का होत नाहीत?
नवनवीन देवांना/राजांना बौद्ध म्हणून उगाच नाहक प्रयत्न करण्यापेक्षा जे बौद्ध सम्राट होऊन गेले त्यांना वंदन करणे, त्यांचा जयजयकार करणे आपल्या लोकांना जमेल ना… सम्राट अशोक यांच्यासारखा प्रचंड मोठा सम्राट अशोक बौद्ध अनुयायी होऊन गेला ज्याने आपल्या आयुष्यात बौद्ध धर्माचा प्रसार केला त्याला विसरून चालणार नाही…
आपण आपल्या बुद्ध, धम्म व संघ या त्रिरत्नांना वंदन करणे, आपली प्रतीके व आपली धम्मनायक असलेली लोक यांना आदर्श मानून त्यांच्या प्रमाणे वागण्याचा प्रयत्न करणे हे आपले कर्तव्ये आहे.
तुम्हाला एवढाच बुद्ध धम्माबद्दल पुळका आहे तर परिसरातील विहारात जा तिथे बुद्ध वंदना घ्या, आपल्या पाल्यांवर धम्म संस्कार करा, बौद्ध संस्कृतीचे पालन करा, बुद्ध लेण्यांवरील अतिक्रमण कमी करण्यासाठी एकत्र या…सोबतच आपल्या प्रतिकांबाबत व अस्मितेबद्दल जागरूक रहा…
सदरील पोस्ट ही आमच्या बौद्ध धर्मीय बांधवांसाठी आहे. हिंदू धर्मिय बांधवांना आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा… व बाकीच्यांनी पोस्टचा लोड घेऊ नये ही नम्र विनंती…
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत