राजाभाऊ ढाले यांच्या स्मृतीदिनी लिहिलेला लेख
आयुष्मान साराभाई वेळूंजकर यांनी कालकथित राजाभाऊ ढाले यांच्या स्मृतीदिनी लिहिलेला लेख आज राजाभाऊंच्या पाचव्या स्मृतीदिनी पुनरुपी सादर !!
आज आमचे नेते आणि आम्हा चळवळीतल्या कार्यकर्त्यांना आंबेडकरी विचारांचं पाणी पाजून सशक्त करणारे, राजा ढाले आपल्यात नाहीत, हे मनाला कितीही समजावलं तरी मानायला तयारच होत नाही. सारखं वाटत राहतं आता साहेबांचा फोन येईल नी चळवळीतले मुद्दे समजावतील. पण तंद्रीतून जागं झालं की मन पुन्हा शून्य होऊन जातं. राजा ढाले व्यक्ती राहिले नव्हते तर बाबासाहेबांचा बुध्दीवादी विचार झाले होते. बाबासाहेबांच्या विचारांचा प्रवाह जनते पर्यंत पोहचविणारे ते एक विद्यापीठ झाले होते. प्रत्येक क्षेत्र पादाक्रांत करणारे ते प्रज्ञावंत होते. म्हणून तर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्री जोशी १९७४ साली म्हणाले होते की, शब्दांमधून आगीच्या ठिणग्या पेरीत जाणारा राजा ढाले, पँथरच्या चळवळीत सामील झाल्यामुळे, मराठी भाषा एका टोकदार टीकाकाराला मुकली आहे.
त्यावेळी लक्ष्मणशास्त्रींचं वय होतं ७५ वर्षे आणि राजा ढाले फक्त ३३ वर्षांचा जवान! कारण राजा ढाले साहित्यात लिटिल मॅगझिन चळवळ चालवत होते. लिटिल मॅगझीनचे येरू, आता, तापसी, दैनिक चक्रवर्ती, असे अंक चालवत होते नी त्यांचे सहकारी कोण होते माहीत आहे? त्यांचे सहकारी होते, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, कोसलाकार भालचंद्र नेमाडे, वसंत गुर्जर, सतीश काळसेकर, तुळशी परब, चंद्रकांत पाटील, प्रदीप नेरूरकर, अनिल बांदेकर, गजानन बुकडेपोचे समर्थ बंधु, शिरवाळे, लचके इत्यादी.
या लिटिल मॅगझीन चळवळीने प्रस्थापितांची झोप उडवून दिली होती. त्याकाळी मराठी साहित्याला वाहिलेलं लेख, कवितेची उंची, खोली, रुंदी काढून भल्या भल्यांचं साहित्य परत पाठविणाऱ्या “सत्यकथे”ची तर पार भंबेरी उडवून दिली होती. म्हणून सत्यकथा छापले जायचे त्या मौज प्रकाशनचे मालक, प्रा.श्री.पु. भागवतांनी शेवटी कबूल केलं की सत्यकथेला दोन लोक कधीच शरण आले नहीत ते म्हणजे, राजा ढाले आणि भालचंद्र नेमाडे. अशा या ढाण्या वाघाने पँथर वळवळ रेघारुपाला येण्यापूर्वीच हा पठ्ठा पुणे जिल्ह्यातल्या पेशवाईच्या जातीवादाने बरबटलेल्या इंदापूर बावड्याला, जो दलितांवर बहिष्कार टाकला होता तो मोजक्या सहकऱ्यांसह जाऊन त्या शहाजी पाटलाचा पाटीलकीचा नक्षा उतरवून, बहिष्कार मागे घ्यायला भाग पाडून आला.
एलिया पेरूमल कमीटीचा अहवाल १० एप्रिल १९७० रोजी प्रसिध्द झाला. त्या अहवालात देशभर अत्याचारांचा आगडोंब उसळलेला दाखवला गेला होता. त्यात परभणी जिल्ह्यातल्या शिरसगावच्या आमच्या बहीणींची नग्न धिंड असो, की रामदास नारनवरेचा बळी असो प्रत्येक अत्याचाराला वाचा फोडण्याचं काम करता करताच १५ ऑगस्ट१९७२ च्या साधना साप्ताहिकातल्या “काळा स्वातंत्र्य दिन” या लेखाने प्रधानमंत्र्यांसह तमाम भारतीयांची झोप उडवून दिली. कोणी म्हणे राजा ढालेंनी देशद्रोह केलाय, त्याला शिक्षा झाली पाहिजे, कोणी काय, नी कोणी काय. हजारोंची हजार मतं. तरीही हा खराखुरा पँथर डगमगला नाही. राजा ढालेंच्या त्या एका लेखाने पँथर देशाच्या काना कोपऱ्यात पोहचली. राजा ढालेंना चित्रकला उत्तम येत होती. १० जानेवारी १९७६ ला शहीद दिनाच्या दिवशी एका चित्रकाराने आठ दिवस घेऊनही शहीद रमेश देवरुखकरचं चित्र बरोबर काढलं नाही म्हटल्यावर, त्याच्याकडूनच ब्रश आणि कागद, रंग घेऊन त्याच्या समक्ष रमेशचं हुबेहूब चित्र उभं करून कार्यक्रमाला घेऊन पण आले.
भोईवाडा इथे झालेल्या कार्यक्रमातच भय्यासाहेब आंबेडकर, राजा ढालेंकडे बघून म्हणाले होते, पँथर ही लोखंडाचे चणे पचविणारी चळवळ आहे.
राजा ढालेंचा संगिताचाही अभ्यास होता. ते त्याकाळी पंडीत जितेंद्र अभिषेकींकडे संगीत शिकत होते. म्हणून त्यांनी त्यावेळी आसावरी रागाच्या संकल्पनेवर आधारीत कविता केली होती.
“अभिसारिका”
किती वाट पहायची
चांदण्याच्या झाडाखाली
फुटे अस्फुट पहाट
भिजे पदर पाण्यात
पापणीच्या देठातच
उभी रात्र डोहावली!
अशा ह्या कवि मनाच्या सिंहाच्या छाव्याबद्ल काय आणि किती लिहावं असा प्रश्न माझ्यासमोर आहे, इतकं त्यांच व्यक्तीमत्व बहुआयामी, बहुपेढी होतं. त्यांच्यासारख्या वादळाला आकळंवून चौकटीत बसविता येणं शक्य नाही. इतके ते प्रभावी आणि प्रवाही व्यक्तीमत्व होतं.
चित्रकार, कवी, लेखक, समीक्षक, संशोधक आणि कॅलिग्राफरसुध्दा होते. असा प्रवास चालू असतांनाच बुलढाणा जिल्ह्यातल्या धाकलीच्या गवयी बंधुंचे डोळे गावातल्या नराधमांनी काढले, तिथे धाव घेऊन त्यांची कैफीयत थेट भारताच्या प्रधानमंत्री इंदिरा गांधींपर्यंत नेली. गवयी बंधुंना न्याय तर मिळवून दिलाच, पण सरकारचा गुंड प्रव्रुतीच्या लोकांवर वचक राहिला नाही म्हणून त्यावेळचे मुख्यमंत्री वसंतराव नाईकांना पदावरून जावं लागलं. ७ मार्च १९७७ ला, आंबेडकरी विचाराला शह देण्यासाठी कम्युनिस्ट घुसखोरी करताहेत अशी जाणीव होताच, पँथर बरखास्त करून ७ मार्च १९७७ लाच “मुक्तीपथिक आंबेडकरी समाज संघटन” म्हणजेच “मास मुव्हमेन्ट” या संघटनेची स्थापना केली.
ग्लॅमर असलेली संघटना सोडली, पण आंबेडकरी विचारांपासून तसूभरही ढळले नाहीत. ते नेहमी आम्हाला सांगत असत की, कीर्तीचा लोप होणं क्षुल्लक गोष्ट आहे, मात्र प्रज्ञेचा लोप होणं ही महा भयंकर गोष्ट आहे. मासमुव्हमेंटच्याच काळात नामांतराची लढाई ते “मराठवाडा हा बौध्दांचंच वस्तीस्थान होतं हे पुराव्यानिशी पुस्तिका लिहून मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांना दिलं. मराठवाड्याचे ३५० विद्यार्थी जेव्हा बाबासाहेबांना अपशब्द बोलून मुर्दाबादच्या घोषणा देत आमदार निवासाच्या बाहेर पडले, तेव्हा त्यांना झोडायला पुढाकारही त्यांनीच घेतला.
१२ सप्टेंबर १९७९ चा पस्तीस हजारांचा मोर्चा यशस्वी केल्यानंतर ६ डिसेंबर १९८० ला महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यावर पत्रक पाठवून १९८१ च्या जनगणनेत बौध्द म्हणून नोंद करण्याचं आवाहन करायला ही ते विसरले नाहीत.
मुंबई आणि सांगली इथे त्यांनी डॉ.भदन्त आनंद कौसल्यायन यांच्या अध्यक्षतेखाली धम्मपरिषदा घेतल्याच, त्याचबरोबर रिडलस इन हिंदुइझमची लढाई त्यांच्या आवेशपूर्ण, माहितीपूर्ण, घणाघाती भाषणांनी आणि “धम्मलिपीतल्या अभ्यासपूर्ण आणि धारदार लेखनीने, एकहाती जिंकून दिली.
त्यांच्या संशोधक लिखाणाने फुलेंचा जन्म ११ एप्रिल १८२७ झाला नसून, २६ जानेवारी १८२८ साली झाल्याचं पुराव्यासह मांडले.
झाशीच्या लढाईत रणांगणात लढली ती झलकारीदेवी ही मागास समाजाची तरुणी होती, लक्ष्मीबाई नव्हती हे मराठी भाषिकांना पहिल्यांदा दाखवून दिले.
सम्यक क्रांती या संघटनेच्या नाशिक येथील दि. २४ मे १९९२ च्या सभेत जे भाषण केलं, त्यामुळं हजर असलेले कार्यकर्ते अगदी भारावू गेले होते. ते म्हणाले होते:
“या देशातली उगवणारी प्रत्येक सकाळ अन्यायाची, दुपार अत्याचाराची, सायंकाळ बलात्काराची आणि रात्र….!
रात्र आमच्या निद्रीस्त वस्त्यांची राखरांगोळी करणाऱ्या वैऱ्यांची, तिन्ही त्रिकाळ चालणाऱ्या या छळसत्रातून, आमच्या बांधवांची कायमची मुक्तता करण्यासाठी आम्हाला स्वप्ने पडतात दलितांच्या स्वतंत्र्याची, आमच्या मनात उमलणारी पहाट असते ती फुले-आंबेडकरांच्या मानवमुक्तीच्या विचारांची आणि आम्ही वाट पहात असतो, ती सकाळ असते सम्यक क्रांतीची!”
असा हा प्रत्येक तरुणात स्फुलिंग पेटवारा लढवया महान पुरूष अस्तांगत झाला तो दु:खद, नी आमच्या डोळ्यावर अंधारी आणणारा दिवस होता: १६: जुलै २०१९.
अशा थोर पुरूषाबद्दल महाकारुणिक बुध्दाने म्हटलंय :
“कुलीन पुरूष तो दूर्लभ असतो।
न तो जन्मतो सर्व स्थळी।।
जिथे जन्मतो धीर पुरूष तो
होत असे ती धन्य कुळी।।
राजा ढाले नावाच्या धगधगत्या ज्वालामुखीला स्म्रुती दिनानिमित्त विनम्र अभिवादन…
-साराभाई वेळुंजकर.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत