महामानवांच्या विचारांवर आधारित, सद्धम्म चर्चा भाग-३६ (१३ जुलै २०२४)(अस्पृश्यतेच्या उत्पत्तीचा सिद्धांत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर)
संकलन व संपादन: प्रकाश डबरासे,
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संशोधनातून अस्पृश्यतेच्या उत्पत्तीसंबंधीचे पुढील दोन सिद्धांत मांडलेत.
१. बौद्ध धम्माबद्दलचा तिरस्कार हेच अस्पृश्यतेचे मूळ आहे.
२. गोमांस भक्षण हेच अस्पृश्यतेच्या उत्पत्तीचे कारण आहे.
३. अस्पृश्यतेचे मूळ – बौद्ध धम्माबद्दलचा तिरस्कार (Contempt for Buddhists as the root of Untouchability: बाबासाहेबांच्या मते, १९१० च्या अहवालामध्ये प्रथमतःच हिंदूंचे विभाजन तीन वर्गांमध्ये करण्यात आले:
(१) हिंदू,
(२) निसर्गपूजक आदिवासी आणि वन्य जमाती,
(३) दलित किंवा अस्पृश्य
हिंदू धर्मातील शंभर नंबरी हिंदू कोणते? जे शंभर नंबरी हिंदू नव्हते, त्यांचे विभाजन करण्यासाठी जनगणना अधिकाऱ्यांनी काही निकष वापरले होते. ते निकष जनगणनेच्या वेळी काढलेल्या पत्रकामध्ये नमूद केले होते. त्यामध्ये वरील दोन वर्ग वेगवेगळे करण्यासाठी त्यांनी काही खास कसोट्या दिल्या होत्या. त्यापैकी शंभर नंबरी नसलेल्या जातींची व जमातींची निवड पुढील बाबी लक्षात घेवून करण्यात आली होती.
१. ब्राम्हणांचे श्रेष्ठत्व अमान्य करणारे,
२. कोणत्याही ब्राम्हणाकडून अथवा अन्य मान्यवर हिंदू गुरूंकडून गुरुमंत्र न घेणारे,
३. वेदांचे प्रामाण्य नाकारणारे,
४. हिंदू देवदेवतांची पूजा न करणारे,
५. चांगले ब्राम्हण ज्यांचे पौरोहित्य करीत नाहीत असे,
६. ज्यांच्यामध्ये ब्राम्हण पुरोहित मुळीच नाहीत,
७. हिंदू देवळांमध्ये ज्यांना प्रवेश नाकारण्यात आला आहे,
८. ज्यांच्या स्पर्शामुळे किंवा ठराविक अंतराच्या जवळ आल्यास विटाळ होतो,
९. ज्यांच्यामध्ये प्रेत पुरवण्याची रूढी आहे,
१०. जे गोमांस खातात व गाईला पूज्य मानत नाहीत.
या दहा कसोट्यांपैकी काही हिंदूंना वन्य जमाती व आदिवासी यांच्यापासून वेगळे करतात, बाकीच्या हिंदूंना अस्पृश्यांपासून वेगळे काढतात. अस्पृश्यांपासून वेगळ्या करणाऱ्या कसोट्या २,५,६,७ व १० व्या क्रमांकाच्या आहेत.
भारतातील सर्व प्रांताशी संबंधीत सर्व अधिकाऱ्यांचे खालील गोष्टींबाबत एकमत झालेले आढळून येते:
१. अस्पृश्य लोकं ब्राम्हणांकडून गुरुमंत्राचा स्वीकार करीत नाहीत.
२. अस्पृश्यांना श्रेष्ठ ब्राम्हणाची सेवा मुळीच उपलब्ध होत नाही.
३. अस्पृश्यांनी त्यांच्यातील स्वतःच निर्माण केलेले उपाध्याय पूजाऱ्यांचे कार्य करतात.
ब्राम्हण व अस्पृश्यांमध्ये अस्तित्वात असलेली भिन्नता आणि श्रेष्ठ-कानिष्ठत्वाच्या भावना, या संदर्भात जनगणना अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, ब्राम्हणांनी अस्पृश्यांवर बहिष्कार टाकला. या संदर्भात बाबासाहेब म्हणतात की, जनगणना अधिकाऱ्यांनी दिलेला हा निर्णय एकपक्षीय आहे. कारण, अस्पृश्य देखील ब्राम्हणांचा तिरस्कार करतात, ही बाब त्यांनी प्रकाशात आणली नाही. म्हणून, जनगणना अधिकाऱ्यांचा हा शोध अपूर्णच राहिला. त्यामुळे, अस्पृश्यांच्या उत्पत्तीसंबंधीचे जनगणना अधिकाऱ्यांचे हे कथन सत्य मानता येत नाही(क्रमशः..बाबांसाहेबांचा सिद्धांत पुढील भागात).
संकलन व संपादन: प्रकाश डबरासे,
(मा. प्रदीप आगलावे यांच्या, समाजशास्त्रज्ञ डॅा. बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथातून)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत