धम्मकारणाचे अर्थशास्त्र
पोस्ट नंबर ( ८ )
भदन्त
विमलकीर्ती गुणसिरी
बंधूंनो- एकूणच पाहता, धम्मकार्यासाठी मिळणाऱ्या दानाचे तसेच बुद्धविहारांमध्ये जमा होणाऱ्या दानांचे व्यवस्थापन भिकू संघासारख्या केंद्रवर्ती संस्थेतर्फे होणे हे धम्मकारणाचे खरे अर्थकारण आहे. ते अर्थकारण व्यक्तिगत स्वार्थापासून दूर झालेल्या नि:पक्षपातीपणे आणि बहुजन हिताय बहुजन सुखाच्या व्यापक आदर्श नुसार वापरात आणणे शक्य आहे. सर्व बौद्धांचे दान अशा प्रकारे एकत्रित होणे आवश्यक आहे. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय बौद्ध महासभेची स्थापना करून सर्व बौद्धांचे नाव एकत्रित होऊन शकेल आणि त्यातून धम्मप्रसाराला योग्य तो हातभार लाभेल असे नियोजन सुरू केले होते. पुढे सेमीनरीच्या माध्यमातून प्रशिक्षित नवा भिकू संघ निर्माण करून त्यांच्याकडे हे सर्व सोपविण्याचा बाबासाहेबांचा निश्चित विचार होता, हे उद्दिष्टांच्या रचनेवरून सिद्ध होते. भारतीय बौद्ध महासभेच्या सर्वसाधारण उपासकांकडे एवढी मोठी जबाबदारी सोपविण्याएवढे त्यांचे नियोजन उथळ होते असे कोणी म्हणू शकत नाही. त्या संस्थेच्या उभारणीचे ध्येयच मुळे धम्मप्रसाराला हातभार लावले हे होते .
To Pro- Mote Spread of Buddhism in India
असे बाबासाहेबांनी त्या संस्थेच्या ध्येय उद्दिष्टांच्या पहिल्याच कलमात लिहिले आहे. त्याचा मराठी मध्ये सरळ अर्थ होतो की, भारतात बुद्ध धम्माच्या प्रसाराला हातभार लावणे भिकू प्रशिक्षित असावा हा त्यांचा आग्रह होता. म्हणून बौद्ध सेमिनरी काढून भिकूंच्या आणि त्याचबरोबर उपासकांच्या धम्म प्रशिक्षणाच्या व्यवस्थेचे त्यांनी नियोजन केले होते. दर एकाने दरेकाला दीक्षा देण्याचा अधिकार आहे असे त्यांनी जाहीर केले होते. पण लोकांनी त्याचा चुकीचा अर्थ करून कोणीही कुणाला धम्मदीक्षा देत असल्याचे पाहून 17 नोव्हेंबर 1956 च्या प्रबुद्ध भारताच्या अंकात त्यांनी तसेच जाहीर केले होते आणि धम्मदीक्षा देण्यासाठी मी अधिकृत माणसे नेमणार असल्याचे सांगितले होते. तोपर्यंत दीक्षा देण्याचा अधिकार केवळ आपणासच आहे असे त्यांनी निक्षून सांगितले होते. म्हणजे प्रशिक्षित प्रचारक निर्माण केल्याशिवाय कोणी कोणाला धम्मदीक्षा देऊ नये, अशी त्यांची भूमिका होती. म्हणजेच योग्य प्रकारे प्रशिक्षित झालेल्या भिकू आणि उपासाकांकडे धम्मकार्याचा भाग सोपविण्याची त्यांची योजना होती. हे अगदी स्पष्ट आहे.त्यांच्या त्या मूळ नियोजनाप्रमाणे काहीच घडले नाही. अज्ञानी उपासकच सगळीकडे शिरजोर झाले. बुद्ध विहारांचे तेच मालक चालक झाले आणि धम्म उपदेशकही ते झाले. विहारे भिकूंना दान देण्याची प्राचीन परंपरा नष्ट झाली. सर्व विहारे स्वतंत्र झाली. भिकूसंघाच्या माध्यमातून संघभावनेने जोडली जाण्याऐवजी एकमेकांपासून वेगळी वेगळी झाली आणि प्रशिक्षित प्रचारक न लागल्याने ती धम्म संस्कार देण्यास असमर्थ ठरली. त्यामुळे वस्तीच्या अभिमानातून लोकांमध्ये मूळची संकुचित जातीवादाची प्रवृत्ती अधिक बळावली आणि धम्मकार्याच्या नावाने आपसापसात विरोधी भावना वाढली. एकाच वस्तीत अनेक विहारी झाली. काही पोट जातीच्या भेदभावाने तर काही प्रांत किंवा स्थानिक विरुद्ध बाहेरून आलेल्यांच्या भेदभावाने विहारे परस्पर विरोधकांची केंद्रे बनली. त्यातून स्वार्थासाठी गटबाजी सुरू झाली त्यामुळे संपूर्ण समाज एक संघ होण्याऐवजी फाटाफुटीच्या अनंत तुकड्यात वाटला गेला. मग हेच संकुचित वृत्तीचे लोक धम्माच्या नावाने केवळ देखाव्याच्या मनोरंजनाच्या आणि खाण्यापिण्याच्या दिखाऊ कार्यक्रमात धन्यता मानू लागले. जनतेचा धम्म निधी हजारो तुकड्यात वाटला गेला आणि त्याच्या वर सांगितल्याप्रमाणे टिकाऊ कार्यक्रमात खर्च होऊ लागला . बौद्ध माणूस आणि बौद्ध समाज धम्माचे बाबतीत कोरडाच राहिला. धम्माच्या नावाने समाजाचा दान निधी एकत्रित गोळा करण्याची बाबासाहेबांची योजना धुळीस मिळाली. त्यांनी ठरविलेल्या समाजसेवेच्या उद्दिष्टांपैकी एकही उद्दिष्ट प्रत्यक्षात येऊ शकले नाही.त्यामुळे आजही लोक केवळ नाम के वास्ते बौद्ध आहेत. वामनदादा कर्डक यांच्या युक्तीनुसार वाणिज भीम होता, करणीत भीम असता” या चालीवर वाणीत बुद्ध होता, तरी करणीत बुद्ध असता” असे म्हणण्याची वेळ आलेली आहे. अशा प्रकारे संस्कार शून्य बौद्ध उरले आणि धम्मकार्याचे तीन तेरा नऊ 12 वाजले. हा घडलेला इतिहास आहे.
बंधुंनो उर्वरित भाग उद्या पोस्ट नंबर ९वर पहावा ही विनंती.
धम्म प्रसारक बाळासाहेब ननावरे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत