धम्मकारणाचे अर्थशास्त्र
भदन्त
विमलकीर्ती गुणसिरी
बंधुंनो- डॉ .बाबासाहेब आंबेडकरांना जो एक स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वावर आधारित नवा आदर्श समाज घडवायचा होता, ते त्यांचे ध्येय पुरते धुळीस मिळाले आहे . त्यांच्या नावाचा जयजयकार करण्यात धन्यथा मानणाऱ्यांनी केलेल्या, अज्ञानातून का होईना, परंतु हा बाबासाहेबांचा सर्वात मोठा विश्वासघात आहे, असे नाईलाजाने म्हणावे लागते. आता वस्तीचे मर्यादित उत्पन्न हे दानातून नव्हे, तर प्रामुख्याने वर्गणीतून गोळा होऊ लागले आणि ते सर्व तेथेच किरकोळ औपचारिक स्वरूपात खर्च होऊ लागले. धम्मकार्याच्या नावाने केवळ रूढी परंपरा म्हणून वंदना घेणे, कोणातरी उपासकाची कोणत्यातरी विषयावर भाषणे ठेवणे, सार्वजनिक भोजनदान देणे आणि मिरवणुकीचे किंवा करमणुकीचे कार्यक्रम करणे याला धम्म-प्रचार समजून लोक भरकटले गेले. बुद्धविहारे धम्माचे प्रशिक्षण घेण्यासाठी आणि तसे आचरण करण्यासाठी असतात हेच मुळी कोणाला कळेनासे झाले. विहारांच्या वापरातील या दिवाळीखोरीमुळे लोकांचे विहारात येणे बंद झाले मग पुढारपण करणारे लोक केवळ बाबासाहेबांचा हवाला देऊन बौद्ध माणसाने दर रविवारी विहारात गेले पाहिजे असा त्यांना कोरडा उपदेश करू लागले. विहारात जे करण्यासाठी जायचे तेच होत नाही त्याचे काय ? याचा कोणी कधी विचारच करीत नाहीत. अशाप्रकारे बौद्ध माणूस आपल्या धम्माच्या आदर्शापासून पूर्णपणे तुटला गेला आहे. त्याची धम्मश्रद्धाच मुळातच पातळ झाली आहे. विचारवंतांचीही दृष्टी आंधळी झाली आहे. शाळेत माणूस शिकण्यासाठी जातो. दवाखान्यात उपचारासाठी जातो. धार्मिक स्थळे तो मानसिक शांती समाधानासाठी जातो. जर त्या त्या ठिकाणी अपेक्षित असे कार्य घडत नसेल, तर लोक तेथे जातील कशाला ? लोक विहारात जात नाहीत, याची खरी कारणे कोणी लक्षात का घेत नाहीत ? फक्त विहारात जायचे फुकटचे सल्ले देण्यात काय अर्थ आहे ? अशा प्रकारे धम्म प्रचाराच्या मुळावरच घाव घातला गेला आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. विहाराच्या नावाने जो काही निधी मिळायचा तो दिखाऊ कार्यात खर्च होऊ लागला. पर्यायाने कोणतेही महान कार्य करण्यास किंवा महाविहार उभारण्यास किंवा बौद्ध सेमिनरी काढण्यास किंवा बौद्ध शाळा काढण्यास किंवा समाजसेवेचा एखादा उपक्रम राबविण्यात कधी निधी उपलब्ध होऊ शकला नाही. बाबासाहेबांच्या संकल्पनेनुसार भव्य दिव्य विहारे स्थापन झाली नाहीत किंवा भिकूगणाच्या निवासाची आणि त्यांच्या प्रशिक्षणाच्या नित्यक्रमाची कोणतीच व्यवस्था निर्माण होऊ शकली नाही. बाबासाहेबांच्या संकल्पनेतील नवा भिकूसंघ निर्माण करण्याचा मार्ग कायमचा बंद झाला. तसा विचारसुद्धा कोणाच्या मनात उरला नाही. त्यामुळे कोणी उपासकांचा संघ स्थापन केला आणि आधुनिक काळात तोच खरा संघ आहे, अशीच जाहिरात करू लागला; तर कोणी पुरोहित वर्ग निर्माण करून त्यांनाच धम्मप्रचारक समजू लागला. काहींनी नवनव्या धम्मदीक्षा निर्माण करून लोकांना धार्मिक पदव्यांचे वाटप करणे सुरू केले आणि माणसाला हरभऱ्याच्या झाडावर चढवून ठेवले. धम्मचारी, बोदाचार्य, महा उपासक धम्मसेवक, आनागारिक अशा पदव्या धारण करणारे स्वतःला इतरांपेक्षा काहीतरी अधिक समजू लागले आणि त्या तोऱ्यात मिरवू लागले. त्यामुळे त्यांचा अहंकार वाढला आणि मानपानाने मिरवणे सुरू झाले. आचरण दूरच राहिले, ढोंग मात्र वाढले. त्यातून त्या माणसाचे जीवन बरबाद झाले आणि समाजाचेही धम्म जीवन भेदाभेदग्रस्त होऊन विस्कळीत झाले. सामाजिक ऐक्याची वाट लागली. धार्मिक पदव्या देणाऱ्यांचे लोक बांधील झाले. बुद्ध आणि बाबासाहेबांनाही ते दुय्यम मानू लागले . अशा पदवीधारकांनी आत्तापर्यंत काय करून दाखविले ते त्यांना विचारा. आपापल्या कुंपणाच्या बाहेर त्यांचे योगदान काय ? तर शून्य. त्यांचे सामाजिक योगदान काय ? तर शून्य. बौद्ध म्हणून सर्व समाजात एकात्मतेच्या भावनेने मिळून मिसळून राहण्यात त्यांचे योगदान काय ? तेही शून्य. शेवटी पदवी धारण करून मिरविणे म्हणजे अहंकाराचे पोषण करणे होय. त्या अहंकारात अडकून माणूस प्रथम स्वाभाविक विनयाला पारखा होतो आणि मग सत्य धम्मचरणास मुकतो. अशा प्रकारे धम्म प्रचाराच्या नावाने सर्वकाही चुकीचे घडत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. त्यामुळे धम्म शिकवण रुजली नाही. लोक नीटपणे बौद्ध झाले नाहीत. याचे एक प्रमुख कारण म्हणजे पारंपारिक पद्धतीची बुद्ध विहारांची संस्कृती स्वीकारली गेली नाही हे होय. विहार संस्कृतीच्या अभावी एवढे अनर्थ घडले आहेत. याची आता तरी सुज्ञ जणांनी दखल घेतली पाहिजे.
बंधुंनो उर्वरित भाग पोस्ट नंबर सहावर पहावा व तो वाचावा ही विनंती.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत