महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ
‘स्वातंत्र्य सूर्याची किरणे’
डॉ.अनंत दा. राऊत
माझा ‘स्वातंत्र्य सूर्याची किरणे’ हा नवीन ग्रंथ सिद्ध होऊन नुकताच हाती आला आहे. आपण या ग्रंथाचं नक्कीच स्वागत कराल. या ग्रंथाचा अल्पसा परिचय आपल्यासाठी….
'स्वातंत्र्य सूर्याची किरणे' हा डॉ.अनंत दा. राऊत लिखित ग्रंथ स्वातंत्र्य संकल्पनेचे मूलभूत पैलू मांडतो. भारत पारतंत्र्यात जाण्याची वस्तुनिष्ठ कारणमीमांसा करतो. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे काही दैदीप्यमान पैलू नव्या पिढ्यांच्या समोर प्रभावीपणे मांडतो. भारतीय स्वातंत्र्य योद्धयांचा उदात्त ध्येयवाद आणि देशासाठी जीवन समर्पित करण्याची मूल्यनिष्ठ मनोवृत्ती मनामनात पेरतो.
अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे इंग्रजी सत्तेवर झालेले परिणाम नोंदवतो. विविधतेने तुटलेल्या व फाटलेल्या भारतीयांच्या मनात स्वातंत्र्यलढ्याच्या काळात एकराष्ट्रीयत्वाच्या भावनेचा विकास कसा झाला याची मीमांसा करतो. मवाळ व जहाल मानसिकतेच्या नेत्यांनी घेतलेल्या भूमिकांची चिकित्सा करतो.
स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांच्या उदात्त ध्येयवादाची बीजे नव्या पिढ्यांच्या मनात पेरणे हे या ग्रंथाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. म्हणून हा ग्रंथ महात्मा गांधी यांच्या लढ्याची सत्य, शांती, अहिंसा, असहकार व कायदेभंगाची आगळी रीत बलाढ्य इंग्रजी सत्तेला कशी नमवत होती याची जाणीव देतो. सरदार वल्लभ भाई पटेल यांचे देशाच्या स्वातंत्र्यासाठीचे व स्वातंत्र्योत्तर एकजीवतेसाठीचे पोलादी समर्पण अधोरेखित करतो. मौलाना अब्दुल कलाम आझाद यांची हिंदू मुस्लिम एकतेची भूमिका उजागर करतो. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्यासाठी केलेला खूप मोठा त्याग मांडून आधुनिक भारताची बुद्धिवादी वैचारिक घडण करण्यातील त्यांचे योगदान मांडतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकता अधोरेखित करून त्यांच्या समतावादी राष्ट्रनिर्माणातील उदात्त असा मानवताभाव प्रकट करतो. नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे शौर्य धैर्य नव्या पिढ्यांना समजावून देतो. शहीद भगतसिंगांचे इन्क्लाबी बलिदान स्वातंत्र्योत्तर नागरिकांनी कधीच विसरता कामा नये याची जाणीव देतो. आपण आपल्या स्वातंत्र्य लढ्याला सांस्कृतिक प्रतिष्ठा देऊन समृद्ध राष्ट्र घडणीची प्रक्रिया सातत्याने सुरू ठेवावी असे आवाहन करतो.
प्रकाशक
कैलाश पब्लिकेशन्स
छ. संभाजीनगर
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत