कुठल्याही हुकुमशाही राजवटीला आपल्या जनतेला भुलवायला आणि पाठिंबा द्यायला एक शत्रु दाखवावा लागतो.
आनंद शितोळे
आपल्या वाईटाला, आपला सुवर्णकाळ मातीत जायला हा शत्रूच कारणीभूत आहे अशी ठाम समजूत करून दिली जाते.
भारतात जे काही वाईट घडलेलं आहे त्याला मुस्लीम जबाबदार आहेत आणि हा देश सोनेकी चिडिया होता त्याची बरबादी व्हायला इस्लाम कारणीभूत आहे हे आपल्याला पटवून दिलेलं आहे.
आता आधुनिक काळात या प्रचाराची पुढची पातळी भारतातल्या मुस्लिमांची संख्या वाढून हिंदू खतरेमे येतील हि लोणकढी थाप मारली जाते.
सांख्यिकी आकडेवारीने या दाव्यातला फोलपणा कळून येईलही.
पण मुळात भारतातल्या हिंदुनी तत्कालीन काळात इस्लाम का स्विकारला हा कळीचा मुद्दा उरतोच.
धर्मांतर दोन प्रकारे होत होत.
एक म्हणजे तलवारीच्या धाकाने आणि दुसर लाभांच्या, अधिकारांच्या, सवलतींच्या अपेक्षेने.
तलवारीच्या धाकाने धर्मांतर झाल अस म्हणाव तर हि इस्लाम मध्ये गेलेली मंडळी पुन्हा पवित्र वगैरे करून हिंदू धर्मात आणण्याची सोय नव्हती का ? अशी इनकमिंग ची सोय सोपी सुटसुटीत असती तर अनुकूल काळ आल्यावर हि मंडळी पुन्हा हिंदू होऊ शकत होती.अशी सोय उपलब्ध होती का ?
सन्मानाच्या , लाभांच्या, अधिकारपदांच्या , सवलती मिळतील, रोजगार मिळतील या अपेक्षेने स्वेच्छेने इस्लाम स्विकारलेली जनता साहजिकच भौतिक सुखांपुढे धर्म गौण मानणारी होती म्हणूनच धर्म सोडून गेली, किंवा त्यांच्या धर्मविषयक जाणीव, धर्माबद्दल असलेली आस्था आणि आपुलकी अतिशय विसविशीत होती, कमकुवत होती हाच निष्कर्ष निघतो ना ?
मुळात हिंदू धर्मात असलेली असमानता केवळ जन्माने तुम्ही कुठल्या जातीत, वर्णात जन्मलेले आहात त्यानुसार तुम्हाला समाजात मिळणारा सन्मान, तुमच स्थान ठरवणार असेल तर साहजिकच अस अपमानित करणारा धर्म कुणाला आपलासा वाटणार आहे ?
मग ज्याच्या विषयी आपलेपणाची भावना नाही तो धर्म कवटाळून बसण्यात अर्थ तरी काय आहे ?
हिंदू धर्मात असलेल्या त्रुटी दूर केल्या, तिथे समानता आली, सगळ्यांना समान हक्क मिळाले तर कोण कशाला धर्म सोडून जाईल हि साधी बाब आपल्याला कळत नाही आणि आपण हिंदुनी धर्म सोडला हेच तथ्य इस्लामने धर्मांतर घडवून आणले अस उलट पद्धतीने मांडून खापर फोडतो.
हिंदू धर्मातून धर्म त्यागून इतर धर्म स्विकारणे थांबवण्यासाठी हिंदू धर्मातल्या खालच्या वर्गाला सन्मानाने वागवण्याची गरज आहे हे विधानच मुळात गंडलेल आहे.
हिंदू धर्मात हा वरचा तो खालचा या उतरंडी नष्ट केल्या आणि सगळे एकाच पातळीवर समान झाले, समानता हा हिंदू धर्माचा गाभा झाला तर कुणाला सन्मानाने वागवण्याची गरजच भासणार नाही ना ? कुणाला तरी सन्मानाने वागवण्याची गरज आहे अस आपण म्हणतो त्यावेळी आपण वरच्या पायरीवर आहोत आणि कुणीतरी खालच्या पायरीवर आहे हे गृहीतक मान्य करतो ना ?
दुसरी बाब आणि कळीचा मुद्दा.
हिंदू खतरेमे है आणि हिंदू धर्मातून इतर धर्मात जाणाऱ्या लोकांना माघारी आणल पाहिजे किंवा थोपवल पाहिजे अस जे म्हणतात त्यांना बेसिक प्रश्न.
समजा हिंदू धर्मातून कधीकाळी एखाद्याचे आजे पणजे मुसलमान झाले असतील आणि आता त्यांना पुन्हा हिंदू होण्यासाठी तुम्ही तयार असलात तरी त्यांना परत हिंदू होऊन मिळणारी जात कोणती असेल ? त्यांना त्यांची पूर्वीची जात मिळेल कि प्रमोशन होऊन नवी जात मिळेल ?
हा प्रश्न विचारला कि हा धर्म धर्म खेळणारी मंडळी थातुरमातुर उत्तर देऊन वेळ मारून नेतात.
या सगळ्या गोष्टींच सार फार सोप आहे.
हिंदू धर्माच्या उतरंडीत वरच्या वर्गात असलेल्या लोकांना खालच्या पायरीवर असणारी लोक फक्त आपले गुलाम आणि सोल्जर्स किंवा सेवेकरी म्हणून हवे आहेत.
हिंदू खतरेमे है च्या नावाखाली दंगलीत राडे करायला, गोरक्षक म्हणून केसेस अंगावर घ्यायला, प्रत्येक ठिकाणी हाणमार करायला हे सोल्जर्स हवे आहेत मात्र या सोल्जर्सला समानतेने वागवण्याची आमची तयारी नाहीये.
तुम्ही तुमच्या जन्मदत्त जातीनुसार तुमच्या पायरीनेच राहील पाहिजे आणि तुम्ही वैदिकांच्या पालखीचे भोई म्हणूनच जगल पाहिजे एवढाच सोपा अर्थ.
हि समानता जोवर हिंदू धर्म स्विकारत नाही तोवर हिंदू खतरेमे है या भंपकपणाला काहीही अर्थ नाही.
आनंद शितोळे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत