
आपल्या देशातील हजारो वर्षापासूनची परंपरा ही, हिंदुधर्म निष्ठाधित असून, त्यात माणसा माणसांमध्ये उच्च नीचतेची
मोठी दरी निर्माण केली आहे. एकूणच समाज विभिन्न जाती, उप जाती, पंथ, यात वाटला गेला असून, त्यांच्यामध्ये देखील, उच्च नीचतेची दरी निर्माण करून, त्यांना कायम वेगवेगळे ठेवण्यात आले आहे. याविरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तहहयात संघर्ष केला. म्हणुन त्यांनी संविधान लिहितांना
सर्व धर्म समभाव स्विकारून समता, बंधुता, स्वातंत्र्याची संकल्पना मांडून देश अखंडित राहील ह्याची काळजी घेतली आहे. आपल्या देशात संविधानानुसार राज्य पद्धती सुरू झाल्यानंतर , काही काळ त्याचा चांगला अपेक्षित परिणाम देखील दिसून आला. परंतु ह्या त्रिसूत्रीला, ज्या सनातनी समुदयाने पहिल्यापासून विरोध केला , त्यांच्या वर्तमान वारसांनी गेल्या काही वर्षांमध्ये हिंदु दहशत वादाच्या नावाखाली ह्या देशात प्रचंड उलथापालथ घडवून आणल्याचे भयावह चित्र दिसून येते. इतकेच नाही तर धर्माने राजकारणावर कुरघोडी करीत सत्तेवर मांड ठोकून बसल्याचे मन विषण्ण करणारे दुर्दैवी चित्र वर्तमानात दिसत आहे. ह्यातूनच धार्मिक उन्माद वाढून जाती, धर्माचा आधार घेत
नाना प्रकारे अन्याय, अत्याचाराचे प्रकार घडू लागले आहेत. आता तर ह्याची व्याप्ती इतकी वाढली आहे की, लोक जातीभेदाची सीमा ओलांडून भाषा, प्रांत ह्याचा आधार घेत एकमेकांचा तिरस्कार करू लागले आहेत. म्हणुनच मुंबई सारख्या जाती, प्रांत भेद रहित शहरामध्ये मराठी गुजराती वाद वाढत असल्याचे असंवेदनशील चित्र पाहण्याचे नशिबी आले आहे. ही भारताच्या एकतेच्या दृष्टीने गंभीर गोष्ट आहे. परंतु ह्या दुष्परिणामांकडे
दुर्लक्ष करीत सगळेच राजकारणी, आपापल्या राजकारणात मश्गुल आहेत.
आपण फक्त महाराष्ट्राचा जरी विचार केला तर, ह्याच भावनेतून ख्रिश्चन, मुस्लिम ह्यांच्या बरोबर गेल्या काही वर्षांमध्ये बौद्धांना देखील लक्ष केले जात आहे. त्याची आतापर्यंतची कितीतरी उदाहरणे देता येतील.
ह्याचे ताजे उदाहरण म्हणजे परभणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या समोरील काचेच्या बॉक्स मध्ये ठेवलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना. त्यामुळे झालेले आंदोलन,
पोलिसांचे अमानुष कोंबिंग ऑपरेशन प्रसंगी आंबेडकरी जनतेवर केलेली अतिरेकी मारझोड, त्यात गेलेले दोन बळी, परभणी ते मंत्रालय लाँग मार्च ह्या अगणित घटना घडल्या आहेत. परंतु इतके मोठे आंदोलन होत असतांना, त्याची एकाही प्रस्थापित वृत्तपत्राने आणि चोवीस तास बातम्या प्रसारीत करणार्या विविध वाहिन्यांनी म्हणावी तशी दखल घेतली नाही. परंतु ह्या बातम्या दैनिक वृत्तरत्न
सम्राटने सातत्याने पाठपुरावा करीत प्रसारीत केल्या. त्यामुळे ते अभिनंदनास पात्र आहेत.
आजच्या दैनिक वृत्तरत्न सम्राटमध्ये पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील उत्रोली येथील विक्रम गायकवाड या तरुणाची, मराठा मुलीशी लग्न केल्यामुळे जातीय तिरस्काराच्या मानसिकतेमुळे निर्घृण खून करण्यात आला असल्याची बातमी वाचून मन विषण्ण झाले. माणुसकीला काळिमा फासणार्या या घटनेत त्या तरुणावर बावीस वार करण्यात येऊन त्याचे छिन्नविछिन्न प्रेत मिळाले आहे. त्या नराधमांचे एवढ्याने समाधान झाले नाही म्हणुन त्यांनी त्याचे लिंग कापून धडावेगळे केले. किती हे क्रौर्य! म्हणुन तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सातत्याने सांगायचे की, आम्हीही तुमच्यासारखेच हाडामांसाची माणसं आहोत. मग आम्हाला इतकी नीच वागणूक का देता? म्हणुन तर कंटाळून त्यांनी धर्मांतर करून बौद्ध धम्म स्विकारला. त्यांनी सर्वांना शहराकडे जाण्याचा आग्रह केला. ज्यांनी त्या आवाहनाला प्रतिसाद देऊन शहराची वाट धरली. त्यांच्या पुढच्या पिढ्या शिकून सवरून स्वावलंबी झाल्या. त्यांची शिक्षणामुळे झालेली प्रगती पाहून ह्याच पिलावळीचे पित्त खवळते. आणि ह्या मनोवृत्तीतून असे प्रकार घडतात कारण विक्रम गायकवाड एम. पी. एस. सि. च्या पहिल्या परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. व 9 मार्च रोजी त्याची प्रत्यक्ष मुलाखत होती. ह्या ही वेळेस परभणीची
पुनरावृत्ती झाल्याचे दिसून आले आहे. ह्या प्रकरणात देखील पोलिसांची कार्यवाही संशयास्पद असल्याचे दिसून येत असून राजकिय दबावाखाली त्याची योग्य प्रकारे हाताळणी होत नसल्याचे दिसते. विशेष गोष्ट ही आहे की, या दोन्ही प्रकरणांमध्ये भविष्यात समाजाला ललामभूत ठरू पाहणारे दोन उच्च शिक्षित तरुण बळी पडले आहेत. म्हणुन मला असे वाटते की, भविष्यात हाताबाहेर जाणार्या परिस्थितीला अटकाव करायचा असेल तर आपल्याला सर्व आंबेडकरी पक्ष, गट, सामाजिक संघटना ह्यांनी एकत्रित येऊन ह्यावर तोडगा काढणे काळाची गरज आहे. नाहीतर इतिहास तुम्हाला माफ करणार नाही.
महाराष्ट्रातील बौद्ध समाज अतिशय संवेदनशील असून, तो तात्काळ क्रियेला प्रतिक्रियेने उत्तर देतो. हे आतापर्यंतच्या घटनांनी सिद्ध झाले आहे. आंबेडकरी समाज म्हणुन ही फार मोठी ताकद आहे. बाबांच्या महापरीनिर्वाणा नंतरचा
इतिहास बघितला तर असे दिसून येते की, प्रस्थापित समाजातील राजकिय पक्ष, त्यांचे नेते ” आंबेडकरी समाज एकत्रित राहू नये”
ह्याची काळजी घेतांना दिसतात. त्यांच्या मोहपाशात आंबेडकरी नेते बळी पडल्याचे दुर्दैवी चित्र दिसते.
मी नेहमी म्हणतो की, आपण मान्य करू या की, तुमच्यामध्ये पराकोटीचे मतभेद आहेत. परंतु आंबेडकरी समाज म्हणुन तर एकत्रित या ना.!
जर असे होणार नसेल समाजातील धुरीण, विचारवंत , सामाजिक बांधिलकी मारणारे कार्यकर्ते ह्यांनी एकत्रित बसुन ह्यावर तोडगा काढावा. तरच अशा घटनांना पायबंद बसेल.
ह्या विषयाची व्याप्ती खूप मोठी असून ” आपण जर एकत्रित आलो तर?” यावर सविस्तर चर्चा करू.!
जयभीम.
अरुण निकम.
9323349487.
दिनांक…20/02/2025.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत