मुलांच्या लग्नापूर्वी शांत विचार करूनच निर्णय घ्या
अशोक तुळशीराम भवरे
समाजात नविनच प्रथा पडु लागल्या आहेत, आणि त्याचा मुलांच्या वैवाहिक जीवनावर फार मोठा परिणाम होवून एक भयंकर विदारक चित्र तयार होत आहे, याचा विचार करणे आवश्यक झाले आहे.
अवास्तव अपेक्षा असणाऱ्या वर किंवा वधु पित्यानी आपल्या मुलाचे किंवा मुलीचे स्थळ शोधणे सुरू करण्या अगोदर तुम्ही जिथे वास्तव्यास असाल त्या तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील फॅमिली कोर्टात फक्त एकदा तरी फेर फटका मारून यायला हवा. आणि मग घरी येऊन विचार करा की नेमके कसे स्थळ तुम्हाला पाहिजे ते.
तुमच्या पेक्षा जास्त श्रीमंत स्थळ तुम्हाला हवे, की सर्वसाधारण असले तरी चालेल परंतु संस्कारी सुन-जावई, चांगली माणसे हवीत!
कायद्याचा अभ्यासक म्हणून माझे बरेचदा कोर्टात जाणे येणे असते. सद्यस्थितीत कोर्टात वादविवाद, गुन्हेगारांपेक्षा जास्त प्रकरणे ही घटस्फोट घेणाऱ्या मुला-मुलींची दिसायला लागली आहेत.
थोडं खोलात शिरण्याचा प्रयत्न केल्यावर लक्षात येतं… घटस्फोट का हवा आहे, तर मुला मुलींकडून खूप मजेशीर उत्तरे मिळतात. मागच्याच वर्षी लग्न झालेल्या एका जोडप्याला जज साहेबांनी विचारले… तुमच्या लग्नाला किती वर्षे झालीत व तुम्ही किती काळ सोबत होते, त्यावर दोघांचे उत्तर होते, आमचे मागील वर्षी लग्न झाले व आम्ही 2 महिनेच एकत्र होतो.
दोघेही खूप शिकलेले. त्यात मुलगा प्रायव्हेट जॉबला चांगल्या पोस्टवर, तर मुलगी शासकीय जॉबला! जज साहेबांनी विचारले… मग तुम्हाला वेगळे का व्हायचे आहे? त्यावर दोघांचे उत्तर होते… आमचे विचार जुळत नाहीत.
मुलगा व मुलीच्या तोंडून हे उत्तर ऐकूण जज साहेबांच्या कपाळावर आठ्या पडतांना दिसल्या. एक काळ होता, जेंव्हा आपल्या आई-वडिलांची लग्न झालीत तेव्हा त्यांना मुलगा किंवा मुलगी आवडते का हे ही विचारले जायचे नाही. आमच्या वेळेस फारच फार तर मुलगी कशी वाटली, एवढेच विचारल्या जात असे. घरातल्या मोठ्या व्यक्तींनी ठरवले तर विवाह होत असत, आणि ते विवाह शेवट पर्यंत टिकत होते.
मग आजच्या मुला-मुलींना इतके स्वातंत्र्य असल्यावर ही वेळ का येऊ लागली आहे? अजून एक गोष्ट माझ्या प्रकर्षाने लक्षात आली… गरीब कुटुंबातील व हातावर पोट भरणाऱ्या कुटुंबातील, जेमतेम शिक्षण असलेल्या मुला-मुलींची भांडणे कोर्टात आलेली दिसत नाहीत.
कोर्टात घटस्फोट घेण्यासाठी आलेली जास्त जोडपी एकतर जास्त शिकलेली, नवश्रीमंतीच्या काल्पनिक प्रतिष्ठेच्या कोषात वावरणारी, लग्नाच्या वेळी अवास्तव मागण्या केलेली व त्या पूर्ण न होऊ शकल्यामुळे कोर्टात येणारी मंडळी दिसतात.
केवळ मुलाच्या बापाकडे खूप प्रॉपर्टी आहे व मुलगा खुप शिकलेला असून चांगल्या नोकरीला आहे म्हणून आपली मुलगी सुखात राहील? ही कल्पनाच मुळात मुर्खपणाची ठरते.
मग पुढे भविष्यात… जावई व्यसनी आहे, तो आता मुलीला रोज त्रास देतो, म्हणून मग आता घटस्फोट. जावयाला लाख भर पगार आहे, परंतु शहरात मोठा फ्लॅट किंवा गाडी घ्यायची आहे, म्हणून मुलीला सासुरवास केला जातो… तिचा छळ केला जातो, म्हणून घटस्फोट हवा. दोन चार महिने सासरी राहिलेली मुलगी जिच्या अंगावरची हळद ही निघालेली नसते, मुलगी सुखात राहावी म्हणून आपले सर्वस्व पणाला लावून देणारा बाप जो आपल्या मुलीचे लग्न लावून देताना पार भिकेला लागतो… तो बाप आणि पोर जेव्हा कोर्टात येते, त्या वेळेस डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहत नाही.
म्हणून सांगतो… मुलाचे असो वा मुलीचे… स्थळ शोधताना माणसे चांगली शोधा. केवळ पैसा, प्रॉपर्टी, पॅकेज, उच्चशिक्षण, गाडी, फ्लॅट पाहू नका. मुलगा कमी पॅकेजवाला, टेम्पररी नोकरीला असलेला असो की व्यवसाय करणारा… फक्त त्याच्या मनगटात जोर असलेला, सुसंस्कारी निर्व्यसनी हवा. आपल्या मुलीला दोन वेळचे खाऊ घालून सुखात ठेवणारा असावा. नाहीतर महाल विकून झोपड्यात येणारे ही बहाद्दर समाजात आहेत हे लक्षात घ्या.
मुलाच्या परिवारा कडे किती प्रॉपर्टी आहे हे पाहण्या पेक्षा तो मुलगा स्वतःच्या हिमतीवर काय करू शकतो हे पारखा. त्याच्या आई-वडिलांचे स्वभाव, संस्कार, वळण लक्षात घ्या! सुसंस्कृत, निर्व्यसनी, होतकरू, कष्ट करणारा मुलगा असेल आणि गरीब जरी असेल, तरी असे स्थळ हातचे जाऊ देऊ नका. नक्कीच तेथे तुमची मुलगी सुखात राहील यावर विश्वास ठेवा. मुला-मुलीच्या आई वडिलांनी याचा नक्कीच जरूर विचार करायला हवा. हे जरा कटू आहे पण सत्य आहे.
मुलीच्या बाबतीत सुद्धा केवळ तीचे रंग रूप शिक्षण जॉब पॅकेज न बघता, तीच्या परिवाराचे संस्कार संस्कृती संवयी स्वभाव व वर्तमानात घरापासून लांब जॉब करणारी मुलगी कुठल्या संस्कृतीत वावरत आहे, ते मुलाकडच्यांनी लक्षात घ्यायला हवे. चमकतं ते सगळंच सोनं नसतं, याचे भान ठेवायला हवे.
आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे, मुलीच्या संसारात मुलीच्या माय-बापाचा गरजेपेक्षा जास्त हस्तक्षेप टाळायला हवा. बहुतांश प्रकरणात मुलीचा संसार उद्ध्वस्त होण्यास कारणीभूत तीची अती महत्वाकांक्षी, अती हुशार जन्मदात्री आईच आढळून येते.
आयुष्य खुप सुंदर आहे, ते आनंदाने जगा. तसेच दुसऱ्यालाही आनंदात जगु द्या. एकमेकांना प्रेम द्या, अडचणीत एकमेकांना समजून घ्या, मदत करा, संकटसमयी धीर घ्या, आधार द्या.
स्वतःची व आपल्या कुटुंबाची, परिवाराची व सामाजीक स्वास्थ्याची काळजी घ्या.
सावध राहा, सुरक्षित राहा, सतर्क राहा.…
विवाह पूर्व संदेश प्रसारक
अशोक तुळशीराम भवरे सिडको, नांदेड.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत