मनुवादी लोक मुस्लीमांना घुसखोर तर दलीतांना नक्षलवादी ठरवत आहेत !
— प्रा.डॉ.सुरेश वाघमारे
लातूर – खैबरखिंडतून भारतात येणारे आणि धर्माच्या नावाने मानवतेला नख लावणारे मनुवादी लोक आज भारताचे भूमिपुत्र असणाऱ्या मुस्लीमांना घुसखोर तर इथल्या शांतीप्रिय दलितांना नक्षलवादी ठरवत आहेत. हे लक्षात घेऊन आता बहुजन समाजाने सामाजिक न्यायाची लढाई लढताना आपली राजकीय भागीदारी मिळविली पाहिजे असे मत सुप्रसिध्द आंबेडकरी विचारवंत प्रा.डॉ. सुरेश वाघमारे यांनी व्यक्त केले.
लातूर येथील स्वरा वेलनेस सेंटर मध्ये राजर्षी शाहू महाराज यांची जयंती आणि प्रा.बलभीम सातपूते यांच्या 46 व्या वाढदिवसानिमीत्त आयोजित करण्यात आलेल्या ” सामाजिक न्याय आणि बहुजनांची राजकीय भागीदारी ” या विषयावरील जाहिर व्याख्यानात प्रा. वाघमारे बोलत होते.
आपल्या अभ्यासपूर्ण आणि ओघवती भाषणात ते पुढे म्हणाले की, छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा वाढदिवस सणाप्रमाणे सर्व बहुजन समाजाने साजरा करावा असे अवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले होते. कारण बहुजनांना न्याय देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. सामाजिक न्याय हा विषय शाहू महाराजाच्या चिंतेचा आणि चिंतनाचा विषय होता. यासाठी त्यांनी आपले आयुष्य आणि राजेपद पणाला लावले. शोषित आणि वंचित समुदायाला सामाजिक,शैक्षणिक, आर्थिक,राजकीय आणि सांस्कृतिक न्याय मिळावा यासाठी त्यांनी आरक्षण देण्याचा क्रांतीकारी निर्णय घेतला. जातीला आरक्षण नव्हे तर शोषित समाजाला प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी त्यांनी त्यांच्या राज्यात पहिल्यांदा आरक्षण लागू केले. आज सवलतींसाठी स्वतःला मागास म्हणून घ्यायला तयार होणारे लोक जातीमुळे मिळणारी जन्माधिष्ठीत प्रतिष्ठा सोडायला तयार नाहीत. परंतु समता प्रस्थापित करण्यासाठीच शाहू राजांनी आरक्षण दिले होते. याचे भानही आपण बाळगले पाहिजे. असेही त्यांनी सांगीतले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस छ्त्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पाहार घालून अभिवादन करण्यात तर प्रा. बलभीम सातपूते यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षपद – यांनी भूषविले. प्रास्ताविक नरसिंग घोडके यांनी केले प्रा.मकबूल शेख यांनी सूत्रसंचलन केले तर प्रा. बलभीम सातपूते यांनी सर्वाचे आभार मानले. यावेळी सर्वश्री प्राचार्य सोमनाथ रोडे, प्राचार्य आर.डी. निटूरकर, प्रा.डॉ. अशोक नारनवरे, प्रा.सुभाष भिंगे, प्रा.डॉ. हर्षवर्धन कोल्हापूरे, प्रा. अर्जुन जाधव, प्रा.दत्ता सुरवसे, नरसिंग घोडके, यु.डी. गायकवाड,बसवंतप्पा उबाळे, नागेश कामेगावकर, प्रा.डॉ. मारोती गायकवाड, प्रा. गायकवाड, प्रा. बुध्दाजी गाडेकर, श्रीधर शेवाळे, प्रा.के.डी. कांबळे, अॅड. किरण कांबळे, प्रा.पिंपळे मॅडम आदी मान्यवरांसह G-24 चे कार्यकर्ते आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत