बाबा तुम्ही नसते तर…….!

हंसराज कांबळे ✍️
8626021520
नागपूर.
ज्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे नमक खाल्ले असेल तोच स्वाभिमानी माणूस म्हणतो की , *आमच्या सारख्या बेईमान , नालायक लोकांसाठी बाबासाहेब तुम्ही तुमच्या ह्यातीत कृतीतुन खूप सार काही करून ठेऊन आम्हाला मुक्ती मिळवून दिली आणी आम्ही किती किती मजेत आहो*.... हे आपण सगळं काही जे लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या विचाराशी कर्तव्यशून्य आहेत त्यांच्याबद्दल भावविवेश होऊन लिहीत आहो. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या मनात आपल्या समाजाविषयी , देशाबद्दल यदकिंचितही अशी क्रोध , द्वेषाच्या भावनेचा लवलेशही मनात जागृत झाला नव्हता. हीच खरी महानता त्यांची दिसून येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी आणी अफाट अशी विद्वत्ता संपादन केलेले ज्ञानाचे प्रतीक होते. जर त्यांनी आपल्या बुद्धी चातुर्याच्या भरोशावर मनाशी पक्की गाठ बांधून मला माझ्या समाजाचे काहीच करायचे नसून देशाचे वाटोळे करून सुखी जीवन जगायचे आहे तर त्यांनी नक्कीच तसे केले असते. पण त्यांनी स्वतः डोळे भरून अतोनात हालअपेष्टा पाहिल्या , भोगल्या आणी माझ्या शिवाय माझ्या समाजाचे मुक्तीचे कार्य कोणीच करू शकणार नाही असा निर्णय घेतला.या भारत देशावर ब्राह्मणांचे वर्चस्व करकचून आहे. म्हणून त्यांनी मनाशी ठाम निश्चय करून *माझ्या समाजाला मी माझ्या ह्यातीत न्याय देऊ शकलो नाही तर मला विद्युत खांबावर फाशी द्यावी* सांगा असा ठामपणे कृतीतुन बोल देणारा कोणी पैदा झाला का ? आणी यापुढे होणार ही नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा दूरदृष्टीपणा अस्पृश्याचे प्रश्न आणि देशहित याविषयी महात्मा गांधी सोबत त्यांनी मार्मिकपणे उत्तर दिले ते म्हणतात -
अस्पृश्यांच्या प्रश्नासंबंधी तुमच्याशी माझे मतभेद असले तरी वेळ येईल तेव्हा मी या देशाला कमीत कमी धोका लागेल असा मार्ग स्वीकारून. म्हणून बौद्ध धर्म स्वीकारून मी या देशाचे जास्तीत जास्त हित साधत आहे. कारण बौद्ध धर्म हा भारतीय संस्कृतीचाच एक भाग आहे. या देशाची संस्कृती , इतिहास यांच्या परंपरेला धोका लागणार नाही अशी मी खबरदारी घेतली आहे
संदर्भ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र.धनंजय कीर.पृष्ठ. क्रं. पृष्ठ. क्रं. 554 पैरा – पहिला शेवटचा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिल्यानंतर आणी मी जगाचा निरोप घेतल्यानंतर माझ्या अज्ञानी समाज बांधवांनी पुढे कसे मार्गक्रमण केले पाहिजे संदेश देऊन काय म्हणतात ते पहा -
*आपले अनुयायी अज्ञानी आहेत. आपल्या ग्रंथातून आणि उपदेशातून बौद्ध धर्माची तत्वे त्यांच्या मनावर बिंबवीन. दलित वर्गीय आणि भाकरी पेक्षा प्रतिष्ठा अधिक पसंत केली आहे. तरीसुद्धा आपल्या आर्थिक परिस्थिती सुधारणा करण्याचा ते आटोकाट प्रयत्न करतील*
संदर्भ – उपरोक्त. पृष्ठ. क्रं. 554.पैरा – खालून दुसरा शेवटचा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी त्यांच्या ह्यातीत समाजातील काही पुढाऱ्यांना उच्च शिक्षणासाठी विदेशात पाठविले होते. त्यांनी समाजाच्या कामासाठी कसे कर्तव्यचुत असले पाहिजे पण त्यांच्या सारखा माणूस अजून ही त्यांना सात्विक भावनेचा दिसला नाही नाराजी व्यक्त करताना ते म्हणतात -
*पण एकच काम एका मार्गाने, एकाच ध्येयाने करणारा एकही मनुष्य अजून माझे पुढे आलेला नाही. शिक्षण, सामाजिक आणि आर्थिक अडचणी हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. ही कामे करण्यास प्रसिद्धीची अपेक्षा न करता काम करणारी माणसे पाहिजेत. जो तो प्रसिद्धीच्या मागे आहे. त्यामुळे पाहिजे तसे काम होत नाही. तात्पुरत्या कामाने महत्त्वाचे प्रश्न सुटत नाहीत. त्याकरिता अहोरात्र रात्र झटले पाहिजे*
संदर्भ – उपरोक्त. पृष्ठ. क्रं. 342 पैरा – पहिला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी त्यांच्या हयातीत ब्राह्मण लोक माझे वैरी नसून ब्राह्मणग्रस्त लोक माझे वैरी आहेत असा शब्दप्रयोग करून त्यांच्या बारशाचे जेवण मी जेवून आहो तुम्ही तरी त्यांच्या भूलथापेत जाऊ नका असा मोलाचा संदेश देऊन ब्राह्मणांच्या कार्याची पद्धती कशी आहे ते संघटितपणे कसे वागतात तसे तुम्ही वागले पाहिजे. त्याबद्दल ते म्हणतात -
*ब्राह्मण समाजाने आपल्या समाजावर अन्याय केला आहे. त्यांनी आपल्याला छळले आहे. हे सत्य आहे. पण त्यांची कामाची पद्धत इतकी चांगली आहे की , त्यांनी मिळवलेली सत्ता ते कायम टिकवून धरू शकतात. कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता मूळ पायाला किंवा धोरणाला घट्ट चिकटून काम करीत राहणारे ध्येयवादी कार्यकर्ते त्यांच्यात निपजतात. आपल्या कार्यकर्त्या मंडळींनी अजून निश्चयाने , निष्ठेने आणि निमुटपणे कार्य करावयास सुरुवात केल्यास आपली चळवळ पसरल्याशिवाय राहणार नाही*.
संदर्भ – उपरोक्त. पृष्ठ. क्रं. 342 पैरा – पहिला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आजही विचार ब्राह्मणी विचारधारा संघाच्या बाबतीत तंतोतंत खरे ठरत आहे. हाच खरा त्यांचा दूरदृष्टीपणा होता. त्यांची खरी शिकवण ही ब्राह्मणी संघाने आत्मसात केली असून आपले पुढारी आणी काही बौद्ध अनुयायी त्यांच्या विचाराला दूर सारून ज्यांनी आजन्म ब्राह्मणग्रस्त लोकांचा विरोध पत्करला त्यांच्याच गोठ्यात जाऊन मुसके बांधले असून आपल्या समाजाशी त्यांचे काही घेणे - देणे राहिलेले नाही असे ते वागतात. एकंदरीत ते त्यांच्या विचारांची दिशाहीन भटकंती करून पायमपल्ली करीत आहेत. ही शोचनीय आणि चिंतेची बाब आहे.
म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल शब्दात लिहायचे झाले तर –
कित्येक खर्च झाल्या
लेखण्या इथे….
भिम शब्दात बांधताना
तरीही लिहितील –
अजून लाख पिढ्या इथे
भिम नव्याने शोधतांना…
दि. 27 जून 24
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत