महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

ll आंबेडकरी चळवळ आणि कार्यकर्ता ll

पक्ष अथवा संघटना मग ती राजकीय असो किंवा सामजिक कार्यकर्ता हा आलाच. ज्या संघटनेत मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते असतात ती संघटना मोठी.आणि ज्या संघटनेत जास्तीत जास्त तरुण कार्यकर्ते असतात ती संघटना अधिक ताकतवान व प्रभावी ठरते. त्यामुळे कार्यकर्ता हा कोणत्याही पक्षाचा, अथवा संघटनेचा महत्त्वाचा पाया असतो.

आज आंबेडकर चळवळीतील काही संघटना अशाही आहेत की ज्यांच्याकडे दहा-पंधरा कार्यकर्ते सुद्धा नाहीत. फक्त संघटनेचे नाव आणि दोन-चार टकली दिसतात. अशा पायलीच्या प्ननास संघटना अस्तित्वात आहेत. या संघटनाचा कुठलाही सामाजिक अजेंडा नाही आणि कामही नाही. त्यामुळे समाजावर त्यांचा प्रभाव नाही. त्या नामधारी निवडणुकांपुरता वळवळ करतात व गप्पं बसतात.

कार्यकर्ता कोणाला म्हणायचं तर जो सामाजिक बांधिलकी मानून कार्य करतो,किव्हा काम करतो त्याला कार्यकर्ता म्हणतात. पक्ष आणि नेता याच्या मधला दुवा हा कार्यकर्ता असतो. कार्यकर्ता आपल्या पक्षाचं तत्त्वज्ञान, भूमिका आणि जनआंदोलने, लोकांपर्यंत पोहोचवण्याच काम करतो लोकांचे प्रश्न हाताळल्याने कार्यकर्त्याला लोकांचा पाठिंबा मिळतो. पक्षाला लोकसंग्रह मिळवून देण्यास कार्यकर्ता महत्त्वाची भूमिका बजावतो.

कुठल्याही पक्षाला आपलं उचित ध्येय गाठण्यासाठी स्वतःचं तत्वज्ञान आणि ध्येय हे पक्क ठरवावं लागतं. पक्षाच्या वाढीसाठी वैचारिक भूमिकेतून कार्यकर्ते घडवावे लागतात. कोणत्याही मोहाला, लाभाला,आणि मोठेपणाला बळी न पडता कार्यकर्त्यानी पक्षाचा गाडा हाकणे, पक्षाला लोकभिमुख करणे, पक्षाची ध्येयधोरणे कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणे व पक्षाला हळूहळू आपल्या ध्येयापर्यंत नेणे हे काम, पक्ष नेता आणि कार्यकर्ता या दोघांचेही असते. यासाठी कार्यकर्त्याला घडवणे व पायरी पायरीने त्यांच्यावर पक्षाने जबाबदारी सोपवणे म्हणजेच कार्यकर्त्यांना त्या त्या पातळीवर नेतृत्व करण्याची संधी देणे होय.

पुरोगामी चळवळीमध्ये कम्युनिस्ट चळवळ सोडली तर इतर कुठलेही पुरोगामी पक्ष वैचारिक भूमिकेतून कार्यकर्ते घडवत नाहीत. त्यामुळे पुरोगामी पक्षातील कार्यकर्ते प्रस्थापित उजव्या पक्षांमध्ये गेलेले आपण पाहिले. याला कम्युनिस्ट अपवाद आहेत. उदाहरणार्थ वरळी कोळीवाडा विभागातील मनीशंकर कवठे हे कम्युनिस्ट पक्षाचे पन्नास वर्ष नगरसेवक होते. त्यांना कुठल्याही पक्षात प्रवेश करून पालिकेतील महत्त्वाच्या पदावर बसता आले असते. परंतु पक्ष, तत्व, निष्ठा त्यानी कायम अंगी बाळगली पक्षाशी शेवटपर्यंत प्रामाणिक राहिले. त्यांच्या जागी कुणी दुसरी व्यक्ती असती तर त्याने लाभाचे पद मिळवण्यासाठी पक्ष त्याग केला असता. आज असे अनेक कार्यकर्ते आहेत. किंवा निवडून गेलेले लोकप्रतिनिधी पहा ते वैयक्तिक लाभासाठी दर सहा महिन्याला पक्ष संघटना बदलतात.

आंबेडकरी चळवळीला एक इतिहास आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा आहे. निश्चित दिशा आणि ध्येय आहे. असं असून सुद्धा आंबेडकरी चळवळीला संघटनात्मक उंची गाठता आली नाही. आजही ती विस्कळीत अवस्थेत (fragmented society) म्हणूनच अस्तित्वात आहे.

आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता हा वैचारिक प्रगल्भता असलेला कार्यकर्ता असायला हवा. त्याला देशातील राजकीय सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक आणि इतर क्षेत्रातील ज्ञान असायला हवे.त्याला कुठल्याही विषयावर वैचारिक युक्तिवाद करता आला पाहिजे. खेदाची गोष्ट अशी की आज असं ज्ञान असणारे दहा टक्के सुद्धा कार्यकर्ते आंबेडकरी चळवळीत नाहीत. जे काही आहेत ते “अर्ध्या हळकुंडाने पिवळे” झालेले आहेत ज्यांना कुठलीही वैचारिक भूमिका नाही. दिशा नाही.अभ्यासतर अजिबात नाही. ते जास्तीत जास्त भावनिक आहेत. निवडणूक जवळ आली की उगाचच छाती फुगउन,आता शंभर टक्के आम्हीच येणार, असे म्हणणाऱ्यांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे.आंबेडकरी चळवळीतील ही वैचारिक दिवाळखोरीच म्हणावी लागेल.

खरंतर इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत आंबेडकरी चळवळीला कार्यकर्ते हा सहज उपलब्ध झालेले आहेत. त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक आणि राजकीय विचारांची पार्श्वभूमी आहे. आपल्याला जे काय मिळालं ते बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार क्रांतीमुळे मिळालेल आहे. म्हणून आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीसाठी काहीतरी योगदान दिलं पाहिजे असा एक वैश्विक विचार त्या पाठीमागे आहे. एखाद्या विद्यार्थी जेव्हा शाळेत प्रवेश घेतो तेव्हा तो प्राथमिक अवस्थेत असतो. त्याला घडवने आणि भविष्याच्या दिशेने मार्गक्रमण करणे हा रस्ता त्याला शाळाच दाखवते. कार्यकर्ता हा वैचारिक प्रगल्भ होण्यासाठी चर्चासत्रे, शिबिरे, व्याख्याने, परिसंवाद, कार्यशाळा असे अनेक उपक्रम राबवावे लागतात. अशा माध्यमातून कार्यकर्ते घडवले जातात. यातून कार्यकर्त्यांची भूमिका व वैचारिक पाया घट्ट होतो. तो कुठल्याही मोहाला, अमिषाला बळी पडत नाही. तो पक्षासाठी आयुष्यभर काम करत राहतो.

आज आपण प्रतिगामी पक्षाकडे पाहिलं तर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ता आणि त्यातल्यात्यात तरुण कार्यकर्ता वर्ग दिसतो. त्याचं कारण त्यांना ते सहज उपलब्ध झालेले नाहीत तर त्यानी ते कार्यकर्ते आपल्या शोधक शक्तीने मिळवले आहेत. या कार्यकर्त्यांना त्यांनी आपल्या विचारसरणीतून घडवले. वेळप्रसंगी त्यांच्या “भाकरीचीही” पूर्ण सोय केली. त्यामुळे असे कार्यकर्ते इतर कुठल्याही संघटनेत प्रवेश करत नाहीत. कुठल्याही मोहाला बळी पडत नाहीत. तर ते अविरत आपल्या पक्षासाठी काम करतात. प्रतिगामी पक्ष आज अशाच कार्यकर्त्यांच्या जोरावर बलशाली झालेला दिसतो.

आंबेडकरी चळवळीतील पक्ष संघटनांमध्ये कार्यकर्ते घडवने आणि त्यांना नेतृत्वापर्यंत आणणे ही प्रक्रिया घडतच नाही. मुळात कार्यकर्ते सुद्धा नेत्यांच्या आंधळ्या प्रेमापोटी अतिभावनिकपणे काम करीत असतात. नेत्यांना सुद्धा असे होयबा असलेले कार्यकर्ते लागतात.

कार्यकर्त्याच्या घरातील चुलीवर काय शिजत आहे याची माहिती नेत्यांना असावी लागते. इतकं घट्ट नातं नेता आणि कार्यकर्ता यांचं असायला हवं. जोपर्यंत असे होत नाही तोपर्यंत नेता आणि कार्यकर्ता याच्यामधील दरी कमी होत नाही. कार्यकर्त्याचं दुःख व्यथा वेदना याबद्दल जर नेत्याला कणव नसेल तर कार्यकर्त्यानेही अशा नेत्यांबरोबर का काम करावे. किंवा आदर का? बाळगावा हा ही प्रश्न येतो.

कार्यकर्ता आणि नेता यांचं नातं काय असावं याबद्दलचं हनुमंतराव बळवंतराव वराळे यांचं “डॉ. बाबासाहेब आंबेडकर माझा सांगाती” हे पुस्तक प्रसिद्ध आहे. ते कार्यकर्त्यांनी आवर्जून वाचावे हे पुस्तक वाचल्यावर कार्यकर्त्यांच्या लक्षात येईल बाबासाहेब कार्यकर्त्यांशी किती आपुलकीने प्रेमाने वागत असत.

किमान दोन दशकतील काळाचा अनुभव सांगावा तर ज्यांना मी आंबेडकरी चळवळीमध्ये प्रामाणिकपणे काम करताना पाहिलं. जे संघटनेसाठी आयुष्यभर झटले, त्यातील काहीजण निवर्तले, असे कार्यकर्ते नेते पदी कधीच पोहोचू शकले नाहीत. त्यांना दुय्यम दर्जाचे नेते पदही मिळालेलं नाही.

आंबेडकरी चळवळीत कार्यकर्त्यांना अधिष्ठान मिळवून देण्यात बाबत नेतृत्वाने कधीच भूमिका घेतलेली नाही. याचं दुसरं कारण अस असू शकतं की, नेतृत्वाला अंतर्गत स्पर्धेची भीती वाटत असावी. तिसरी गोष्ट अशी की स्टेबल झालेला कार्यकर्ता नेतृत्वाला आपल्यापेक्षा वरचढ होईल ही भावना असावी.

चळवळीत काम करणारे कार्यकर्ते हे महत्त्वकांक्षी असलेच पाहिजेत. जेव्हा सामान्य कार्यकर्ते नेते पदापर्यंत पोहोचतील तेव्हाच चळवळी, संघटना, पक्ष मोठे होतील जनमानसांच्या होतील नाहीतर नुसत्या नवापूर्त्या राहतील.

आज या विषयावर चर्चा करताना वैचारिक मांगल्य ठेवून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन नेत्यांनी तळागाळातील सामान्य कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात पुढे आणले आणि त्यांना नेतृत्व दिलं त्यामध्ये शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे या दोन नेत्यांची नाव अग्रेसरपणे घ्यावीच लागेल. ही नाव घेतल्यामुळे काहींच्याजनांना पोटदुखी होण्याची शक्यता आहे. परंतु वस्तुस्थिती नाकारता येत नाही.

“बोलेगा तो मा मरेगी नही बोलेगा तो बाप कुता खायेगा”
अशी सर्वात वाईट अवस्था आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची झाली आहे. या संक्रमण अवस्थेतून कार्यकर्त्यांनी बाहेर पडून स्थिरवादी भूमिका न घेता स्थित्यंतर वादी भूमिका घेऊन वास्तवाशी जुळून घेऊन नवपरिवर्तनवादी मार्ग स्वीकारायला हवा.

महाकवी वामनदादा असे म्हणतात
आता भीम नाही. आता भीम नाही
समाजा आता तू सावध राही.
तुझ्या भाकरीचे तुझे तूच पाही.
दुज्या कोणी आता पाहणार नाही.
समाजा आता तू सावध राही.

प्रदीप नाईक
१९ / ६ / २४

(लेखक हे संपादक व सामाजिक कार्यकर्ते आहेत)
८ .

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!