भारताच्या संसदेतील बाबासाहेबांच्या विचाराचा एकच वारसदार.


प्रा.डॉ.आर.जे. इंगोले
भारतीय समाजाला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एक मोठे विचारधन दिले आहे यात एक महत्त्वाचा विचार असा होता की, “ शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखे जगा.” आपल्या महाराष्ट्रात सुरूवातीला अनेक वक्ते या वाक्याचा वापर त्यांच्या भाषणात करीत असत. पण पुढे मग अनेक नविन विचार येत होते आणि हे वाक्य आता फार कमी प्रमाणात वापरले जाते. अर्थात यामुळे त्या विचाराचे महत्व कमी होत नाही. कोणताही विचार हा आचरणात आणला तर त्याचे परिणाम होतात असे आपणास तथागत बुद्धाने सुद्धा सांगितले आहे. आपण भारतीय राजकारणाचा विचार केला तर आपणास महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मोठा आदर्श आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कशा पध्दतीने काम करीत आणि कधीच समाजाच्या हितापूढे त्यांनी स्वार्थ पाहिला नाही. त्याचे अनेक प्रसंग आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना एक राजकीय पक्ष या देशात बहुजन समाजाचा अपेक्षित होता. परंतु त्याची स्थापना बाबासाहेबांच्या नंतर म्हणजे 1957 ला झाली आणि त्यामुळे त्या पक्षाचा विचार आणि पुढे कसा वाढला पाहिजे याचा अंदाज त्याकाळी असणार्या राजकीय लोकांना आला नाही. आणि त्याकाळातील नेत्यावर डॉ. बाबासाहेबांचा जो एक नैतिक धाक होता तो नंतर राहिला नाही. त्याकाळातील अनेक नेते स्वार्थासाठी गडबड करण्याचा प्रयत्न करीत होते पण बाबासाहेब असल्यामुळे त्यांना काहीच करता आले नाही. परंतु ज्या राजकीय नेत्यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण प्रसंगी शपथा घेतल्या होत्या तेच नेते कोंग्रेसला जाऊन मिळाले. आणि आपल्या समाजाचे राजकीय तुकडे पडायला सुरुवात झाली. ती आजपर्यंत एक होऊ शकली नाही. यामागे एकच कारण आहे स्वार्थ आणि अहंकार आणि त्यामुळे राजकीय पक्ष आणि राजकारण आणि आपल्याला जो आणखी एक संदेश दिला आहे आपल्या बापाने की, “ जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा तुम्हाला शासनकर्ती जमात व्हायचे आहे.” आता शासनकर्ती जमात याचा अर्थ व्यापक आहे पण त्यापैकी एक भाग राजकारण आहे. आणि राजकारण एक मोठी ताकत आहे की, ज्यामुळे आपण समाजात मोठे परिवर्तन करू शकतो. याबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात की, “ Political Power is the Master key to change Society.”
हे सर्व आठवण होण्याचे कारण म्हणजे आताच 2024 च्या लोकसभा निवडणुका झाल्या आणि त्याचे निकाल 4 जूनला लागले. आणि आपण सर्व उत्सुकतेने वाट पाहत होतो की, किती लोक महामानव डॉ. बाबासाहेबांच्या विचाराचे निवडून येतील आणि या संसदेत काहीतरी समाजात परिवर्तन होईल अर्थात ही सुद्धा एक भाबडी अशा आहे. पण म्हणतात ना मानव आशेवर जगतो. त्यामुळे लोक पाहत होते पण देशात जे जे पक्ष स्वत:ला आंबेडकरी विचाराचे म्हणतात असे कोणी निवडून येते का अशी अशा होती. पण निकाल लागले आणि कारणे काहीही असतील पण एकही खासदार निवडून आला नाही. आणि मग देशात अनेक लोकांना याची माहिती नसते अशा घटना असतात. सुरूवातीला सोशल मिडियावर आणि मग प्रिंट मीडियावर एक नांव दिसत होते की, उत्तर प्रदेशातून एक खासदार निवडून आला आहे. आणि तो खासदार मोठया राजकीय पक्षाच्या उमेदवारांना पराभूत करून जिंकला आहे हे फार विशेष वाटले. आणि त्यांचे नांव आहे आझाद समाज पार्टीचे मा. चन्द्रशेखर आझाद. भारताच्या समाजकारणात भीमआर्मीच्या रूपाने हे नांव अगोदरच अनेक वर्षापासून चर्चेत होते आणि मागच्या 2019 च्या लोकसभा पासून आझाद समाज पार्टी या पक्षाचे नांव होते. आणि मागे कांही दिवस ते जेलमध्ये होते तेंव्हा ते नांव जास्त प्रमाणात चर्चेत होते. भारतात सामाजिक अन्याय झाला की, कोणत्याही भागात हे चन्द्रशेखर आझाद जात असत आणि त्यांना पोलिस यंत्रणा किंवा अनेक राजकीय पक्ष अडवण्याचा प्रयत्न करीत पण त्यांनी आपले सामाजिक काम चालूच ठेवले. या वर्षाची लोकसभा निवडणूक फार चर्चेत असतांना एक साधा व्यक्ती आणि त्यांचा नविन पक्ष पैशाचे काहीच पाठबळ नसतांना सुद्धा निवडून येणे हे लोकशाहीचा मोठा विजय आहे. आणि मग सर्व चित्र समोर आले की, आपल्या देशात विनाकारण आपण वारसदार हे रक्ताचे असतात हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो पण तसे नसते तर वारसदार हे विचाराचे असतात हेच यावरून सिद्ध झाले हे आपल्याला मान्य करावे लागेल.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा हे स्पष्ट केले आहे की, वारसदार कोणाला म्हणावे तर “ ज्या समाजात आपला जन्म झालेला आहे त्या समाजाला गुलामीतून मुक्त करणारा जो कोणी प्रयत्न करीत असेल तोच वारस. बहुजन समाजाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी ,त्यांना मानवी जन्मसिद्ध अधिकार मिळवून देण्यासाठी जो आपले आयुष्य समर्पित करेल आणि त्यासाठी कोणतीही किंमत मोजण्यास तयार असेल तोच बाबासाहेब आंबेडकरांचा वारसदार असेल.” बाबासाहेब त्यांचे मिशन ,आंदोलन चालविण्यासाठी वारस शोधत होते ,परंतु त्यांना तो वारस दिसत नव्हता. मान्यवर कांशीराम साहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य बाबासाहेब आंबेडकर यांच्या मिशनसाठी समर्पित करून बाबासाहेबांचे आंदोलन पुढे नेले. म्हणून बाबासाहेबांचा खरा वारसदार कोणी असेल तर तो म्हणजे मान्यवर कांशीराम साहेब. ( संदर्भ : आंबेडकरी चळवळ जीवंत आहे , लेखक – राहुल मखरे) आता याचा जर आपण विचार केला तर मा. चन्द्रशेखर आझाद हे मा. कांशीराम साहेब यांना आदर्श मानून आपले काम अनेक वर्षापासून उत्तर प्रदेशात करीत आहेत. आणि त्यांची तळमळ आणि प्रामाणिकपणा याचा विचार केला आणि आजचा लोकसभेचा विजय पाहिला तर आपल्या लक्षात येईल की, एक प्राथमिक शिक्षकाचा मुलगा आणि कायद्याची पदवी आणि स्वत: चा काहीही स्वार्थ नसलेला एकच तरुण दिसत आहे. सोशल मीडियावर त्याचे व्हिडिओ पहा अनेक ठिकाणी अन्याय झाला तर हे तरुण मंडळ जाते आणि त्यांना मदत करते. आणि त्यांची स्टाईल पहा गळ्यात निळा रुमाल , भारदार मिशा आणि मिश्यावर पीळ देऊन हा तरुण जेंव्हा बोलतो त्यावेळी एक स्वाभिमानी कार्यकर्ता कसा असावा याचे एक उत्तम उदाहरण आहे. आणि जेंव्हा ते लोकसभेत जात होते त्यावेळी गळ्यात तोच निळा रुमाल आणि कपाळावर उभा निळीचा टीका लावलेला मी तर आजपर्यंत पाहिला खासदार पाहिला आणि याला आपण जमिनीवर असणे म्हणतो ते हेच आहे. म्हणजे कार्यकर्ता असतांना जो आहे तेच राहणीमान त्यांनी खासदार झाल्यावर कायम ठेवले यात काहीही बदल केला नाही. म्हणजे मा. कांशीराम साहेब बघा ते एक केंद्रीय सेवेत अधिकारी होते तेंव्हा ते जसे राहत होते आणि शेवटपर्यन्त ते तसेच राहिले आणि आज मा. चंद्रशेखर आझाद यांचे सुद्धा तेच आहे. म्हणजे मी मोबाइलवर तो व्हिडिओ पहिला तेंव्हा माझ्या अंगावर शाहरे येत होते आणि मला असे मनात वाटत होते की, हा तरुण आपल्या भारतासाठी काहीतरी करेल. आज आपल्याकडे आपण अनेक लोक पाहतो की, ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य फार प्रामाणिक आणि जिवाची पर्वा न करता करीत आहेत पण आपल्या भारतीय समाजाची एक मानसिकता आहे त्यानुसार आपण त्यांना फार मान्यता देत नाही. पण हे चूक आहे जे कोणी बाबासाहेबांचे कार्य पुढे नेइल तोच खरा वारसदार आहे. मला आता कांही दिवसापूर्वी मुंबई भागातील डोंबिवली येथील सुरेशभाई छप्परवाल यांचा फोन आला आणि त्यांनी मला लेख लिहण्याबद्दल सूचना दिली आणि मला सांगितले की, ते सर्व कार्यकर्ते वाल्मिक समाजाचे आहेत आणि त्याठिकाणी ते डॉ. बाबासाहेबांचे काम करतात तर दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करतात तर मला हे सर्व कार्यकर्ते आपल्याच महामानवाचे विचाराचे वारसदार आहेत असे वाटले. कारण ते प्रामाणिक कार्य करतात. आणि त्यांना काम करतांना कोणताही स्वार्थ दिसला नाही.
आज भारताच्या संसदेत एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा वारसदार गेला आहे आणि कामकाज चालू असतांना सर्व सत्ताधारी खासदारांना एक नैतिक धाक असणार आहे. आणि कोणतेही चुकीचे काम करतांना नियंत्रण असणार आहे. हीच तर ताकत असते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची पण आपल्या लोकांना ते समजले नाही. चन्द्रशेखर आझाद यांनी रस्त्यावर आंदोलन केले आणि आज ते संसदेत आहेत. सडक से संसद तक हा प्रवास मोठया संघर्षाचा आणि कठीण आहे. आणि हा भारतातील पहिला खासदार आहे की, जो निवडून आल्यावर लोकांच्या पाया पडत होता आणि अनेक महिला त्यांना आशीर्वाद देत होत्या. म्हणजे निवडणुकीपूर्वी तर कोणीही हात जोडतो आणि ते ढोंग असते हे आजपर्यंत सर्वांनाच माहीत आहे. पण निवडून आल्यावर सुद्धा याची जाणीव ठेवणे म्हणजे हा प्रतींनिधी आपला आहे असे लोकांना वाटले पाहिजे. म्हणजे ज्या चंद्रशेखर आझाद यांना रस्त्यावर आंदोलन करीत असतांना आजपर्यंत पोलिस अडवत होते ,कुठे अन्याय झाला आणि हे जर त्या अन्यायग्रस्त लोकांना भेटण्यासाठी जात होते त्यावेळी जे पोलिस त्यांना अडवत होते किंवा अटक करीत होते. तेच पोलिस आज त्यांना संरक्षण देत आहेत ही भारताचे संविधान आणि लोकशाहीची ताकत आहे. आजपासून हा डॉ. बाबासाहेबांचा वाघ संसदेत आता अन्यायाविरुद्ध डरकाळी फोडणार आहे. आणि आपल्याला माहीत आहे की, लोक सर्कसमध्ये असणार्या वाघाला सुद्धा घाबरतात आणि हा तर जंगलातील वाघ आहे जो कोणाच्याही नियंत्रणात नाही. आणि या वाघाला कोणीही थांबवू शकत नाही. जेंव्हा काही चुकीचे होईल तेंव्हा हा निर्भीड कार्यकर्ता आवाज उठवणार आहे. नेहरूची संसद महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना का घाबरत होते तर ते प्रामाणिक होते आणि प्रामाणिक माणसाची ताकत खूप मोठी असते हे आपल्या समाजातील नेत्यांना कधी समजलीच नाही. आणि त्यामुळे अनेक वर्षापासून आपले प्रश्न आहेत तिथेच आहेत. आणि पुढे जर भारतीय समाज जागृत झाला आणि अनेक राज्यातील विधानसभा निवडणूकात जर आझाद समाज पार्टीला मत देऊन जर आपले प्रतींनिधी पाठवले तर पुढील काळात या देशाचे चित्र फार बदललेले असेल यता शंका नाही. कधी भारताच्या राजकरणात दिल्ली राज्यात AAP सारखा पक्ष सत्तेत येईल असे कुणाला वाटले नसेल, पण झालेच ना परिवर्तन आणि आज त्यांचे लोक इतर राज्यात सुद्धा निवडून येत आहेत. जर असेच झाले आणि इतर अनेक राज्यात आझाद समाज पार्टीचे लोक निवडून आले तर बहुजन समाजाचे कल्याण होईल आणि अनेक वर्षापासून हे कार्यकर्ते भीम आर्मीच्या रूपाने काम करीत आहेत. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ते प्रामाणिक आहेत.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, “ शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो हे प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.” आणि आज तेच होत आहे. मा. चन्द्रशेखर आझाद हे कायद्याचे पदवीधर आहेत आणि सर्वात महत्वाचे प्रामाणिक आहेत त्यामुळे ते संसदेत गुरगुरल्याशिवाय राहणार नाहीत. आणि हा वाघ डॉ. बाबासाहेबांचे विचार डोक्यात घेऊन जात आहे. त्यामुळे साहजिकच समोरील लोकांना धडकी भरणार आहे. भारताच्या संसदेत आजपर्यंत अनेक खासदार आणि आमदार राखीव जागेत निवडून आले आणि संसद आणि विधानसभा याठिकाणी गेले पण त्यांना आपण इथे का आलो आहोत ? आणि आपले कर्तव्य काय आहे ? याचा विसर पडला आणि ते ज्या पक्षाकडुन निवडून गेले त्यांचे आदेश पाळत राहिले आणि काहींना पक्षाने निवडून न येता पाठवले ते तर काहीच करू शकत नाहीत. पण हे लोक एक विसरले की, आपल्या बापाने संविधान लिहले आणि त्यामुळे आपल्याला संधी मिळत आहे. जर संविधान येण्यापूर्वी आपली सावली यांना नको होती तर ते आपल्याला बरोबरीने बसू देतील का ? पण आता उपकार कर्त्यांना जर विसरले तर मग काय करणार ? हा भारतीय समाज खूप सहनशील आहे. पण एकदा जर यांना समजले म्हणजे हे जागृत झाले तर मग परिवर्तन होण्यास वेळ लागणार नाही. भारताचे संविधान पूर्ण तयार झाल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता की, “ तुम्ही आज फार खुशीत दिसत आहात.” यावर बाबासाहेब त्या पत्रकाराला म्हणाले की, माझ्या अस्पृश्य बांधवांना मी आज अधिकार दिले आहेत. पण त्यावर तो पत्रकार बाबासाहेबांना म्हणतो की, “ या लोकांना शिक्षण नाही आणि त्यामुळे हे लोक पैशाच्या लालसेपोटी हा मतदानाचा अधिकार विकतील त्याचे काय ? ” यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्या पत्रकाराला उत्तर देतात की, “ आज असे होईल पण जेंव्हा उद्या हेच लोक शिक्षण घेतील आणि जागृत होतील तेंव्हा मात्र असे होणार नाही,” आणि आज ती वेळ आली आहे असे दिसत आहे. आज समाज जागृत होत आहे आणि त्यामुळे देशात एवढे वातावरण असतांना आणि एक साधा शिक्षकाचा मुलगा खासदार म्हणून लोकांनी निवडून दिला. आणि असाच समाज जागृत झाला तर पुढील काळात आपला बहुजन समाज नक्कीच नेतृत्व करेल यात शंका नाही. आज देशात अनेक असे तरुण आहेत की, ते मा. चन्द्रशेखर आझाद यांना आपला आदर्श मानतात ते जर पुढे अनेक निवडणूकात निवडून आले तर ही बाबासाहेबांच्या विचारांची ताकत आणखी वाढणार आहे. पुढील काळात देशात होणार्या विधानसभा , जिल्हा परिषदा आणि ग्रामपंचायत तसेच नगरपालिका अशा अनेक निवडणूकात आपल्याला याच विचारांच्या लोकांना निवडून द्यावे लागेल आणि आपल्या बहुजन समाजाचा रथ पुढे न्यावा लागणार आहे. जे आपल्या फुले ,शाहू आंबेडकर यांचे स्वप्न होते.
प्रा.डॉ.आर.जे. इंगोले
नाशिक ( 9423180876 )
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत