शोषितांच्या राजकीय लढाईत वंचित बहुजन आघाडी प्रभावहीन ?
किरण गुडधे:
2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत वंचित बहुजन आघाडीचा मतदानाचा टक्का 64 टक्क्यांनी घटला. राज्यात झालेल्या एकुण मतदानाच्या तुलनेत फक्त 0.2 टक्के मते वंचित ला मिळाली. निवडणुकीत दलित, मुस्लिम, आदिवासी व ओबीसींची मते भाजप, कांग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना घेतात परंतु त्यांना घटनात्मक अनेक बाबतीत योग्य ते स्थान मिळत नाही म्हणून त्यांना सत्तेची भागीदारी मिळावी या करीता 2018 मध्ये वंचित, शोषित आणि बहुजन समाजाची आघाडी तयार करून महाराष्ट्रात तिसरा राजकीय पर्याय उभा केला. येथे अँड. प्रकाश आंबेडकर यांचे कौतुक करावे लागेल त्यांनी एक उमेद तयार केली की, शोषित वर्गही सत्तेचा भागीदार होवू शकतो. ब-याच प्रमाणात वंचित समाजाला एकत्र करण्यात ते यशस्वी झाले. परंतु 2019 लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत अपयश मिळाले. लोकसभेतील 41 लाखाचे मतदान घटुन विधानसभेत ते 23 लाखांपर्यंत घटले. याच वेळी संघटनात्मक पातळीवर जोमाने कामाला लागणे अपेक्षित असतांनाही योग्य नेतृत्व करणारे अनेक मुस्लिम, धनगर, माळी, ओबीसी, बौद्ध समाजाचे नेते कार्यकर्ते यांना योग्य तो मानसन्मान न देता त्यांना वंचित मधील काही फासिस्ट लोकांनी त्यांचाच गेम करून टाकला. पक्षश्रेष्ठी हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघत होते. नंतर अनेक कार्यकर्ते इतर पक्षात प्रवेश करतांना दिसले. अनेक वंचितच्या भक्तांनी त्यांना ट्रोलही केले. परंतु मुळात चुक दुरुस्त करण्यासाठी आत्मचिंतन केले गेले नाही. अँड. प्रकाश आंबेडकर यांनी असे काही ओला-उबेर सर्विस देणारे नेते हाताशी ठेवले ज्यांना संघटनात्मक राजकीय बांधणी करण्यात स्वारस्य नव्हते.
महाराष्ट्रात राजकीय खिचडी होत असतांना त्याचा फायदा वंचित ला घेता आला नाही. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत संघटन विरहीत राहुन, पक्षाचा अंतर्गत कलह दुर न करता, चांगल्या प्रामाणिक लोकांना-कार्यकर्त्यांना सोबत न घेता, कुठल्याही प्रकारचे नियोजन, कैडर कँम्प न घेता, हाँट्सअप युनिव्हर्सिटी च्या जोरावर आणि समाजाला केवळ भावनिक करून निवडणुकीत उतरले. ज्या नेत्याला सर्व मतदारांचा कल कुठे आहे हे जर हेरता आले नाहीतर, शोषितांची सामाजिक व राजकीय लढाई कसे जिंकणार! डॉ. आंबेडकर यांनी शेड्युल कास्ट फेडरेशन बरखास्त करून रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली होती. ह्याच संकल्पना अभ्यास करून, त्याचा प्रभाव जर वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्ते, संघटनात्मक पातळीवर तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले असते तर निश्चितच निकाल वेगळा लागला असता. आज मात्र वंचित, शोषित समुहाला घोर निराशा स्विकारावी लागली. पुन्हा वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रात सक्षम उभी होईल ही अपेक्षा आता सोडुन देणेच योग्य! बहुजनवादी, आंबेडकरवादी पक्षात एकेश्वरवाद चालत नाही. उदाहरणार्थ चार वेळा मुख्यमंत्री राहणाऱ्या बहन मायावती यांना या लोकसभेत उत्तर प्रदेश मध्ये एकही जागा जिंकता आली नाही. पक्षात योग्य प्रामाणिक मापदंड निर्माण करून सर्वांना समान संधी मिळावी यांची घटनात्मक रचना तयार केली तरच ते शक्य आहे. पण तसे वंचित बहुजन आघाडी व बहुजन समाज पार्टी मध्ये होतांना दिसत नाही.
-मा. किरण गुडधे,
मो.नं. 7769944245
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत