एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो …
लीना पांढरे
खासदार व अभिनेत्री कंगना रणौतला ६ जून रोजी चंदीगड विमानतळावर महिला CISF कुलविंदर कौरने थप्पड मारली. कुलविंदर कौर ३५ वर्षाची असून ती दोन मुलांची आई आहे .त्याच विमानतळावर तिचा पतीही कार्यरत आहे .प्रस्तुत घटनेची दखल घेऊन कुलविंदरला नोकरीतून निलंबित केले गेले आहे .तसेच तिला अटक झालेली आहे आणि आता त्याच्यावर कोर्ट इन्क्वायरी सुरू होणार आहे . या संदर्भात या घटनेचा निषेध आणि स्वागत करणाऱ्यांची घमासान चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.
कुलविंदरने कायद्याच्या दृष्टिकोनातून गुन्हा केला आहे असे मत मांडणाऱ्यांचीही संख्या पुष्कळ आहे. त्याचबरोबर कुलविंदरने जे केलं ते योग्य आहे असं म्हणणाऱ्यांचीही संख्या भरपूर आहे. कुलविंदरचे कुटुंबीय, तिचे सारे गाव तसेच पंजाब मधील आणि महाराष्ट्रामधील अनेक लोक तिच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत.महाराष्ट्रातील काही संघटना तिचा सत्कार करणार आहेत. तिची नोकरी गेली असेल तर तिला बॉलीवूडमध्ये काम दिलं जाईल अशी ऑफरही दिलेली आहे. तर एका बिझनेसमनने एक लाखाचे बक्षीस तिला जाहीर केलेले आहे . तिला अनेक ठिकाणी नोकरीच्या ऑफर्सही येत आहेत.
आजपर्यंत अनेक नगरसेवक ,खासदार ,आमदारांनी ु सुपार्या देऊन किती जणांना ठार मारले आहे , अपमानित केले आहे , खळ्खटाक करून त्यांच्या इस्टेटीवर कब्जा केला आहे .
मीरा भाईंदरची नगर सेविका गीता जैन. तिने एका तरुण अभियंत्याला थप्पड मारून वर सर्वांसमोर अपमानास्पद बोलून स्वतःच्या कृतीबद्दल जराही खेद व्यक्त न करणारी मग्रूर स्त्री. कोणत्या अधिकारात तिने हे कृत्य केले हा जाब विचारला तेव्हा?
शेतकरी आंदोलनात रस्त्यावरती खिळे ठोकले गेले. त्या शेतकऱ्यांवर अश्रुधूर सोडला गेला .त्यांच्यावर लाठीमार झाला त्यांची नाकेबंदी करण्याचा पूर्ण प्रयत्न केला गेला. त्याचे काय?
अयोध्येत मंदिर बनवताना जो हमरस्ता तयार केला गेला त्यासाठी २२०० दुकाने ,८०० घरं , ३० मंदिरं , ९ मशीदी , ६ दर्गा तोडले गेले आहेत. बेघर झालेल्या स्त्रियांचे व्हिडिओ उपलब्ध आहेत हे सर्व घडत असताना निषेध करावा , अहिंसेचे तत्व आठवावे असं आज कंगनाची बाजू घेऊन येणाऱ्या आणि कायद्याची चिंता पडलेल्याना कसं काय वाटलं नाही?
कंगना कायम विवादाच्या भोवऱ्यात राहिलेली आहे.तिचे ट्विटर अकाउंट तिच्या प्रक्षोभक विधानांमुळे काही काळासाठी स्थगित केले गेले होते. किसान आंदोलनात तिने किसानांच्या विरुद्ध अत्यंत अश्लाघ्य उद्गगार काढलेले आहेत.
किसान आंदोलनात धरण धरून बसलेल्या एका ८० वर्षाच्या स्त्रीला तिने बिल्किस बानो असे संबोधले आहे. शंभर रुपया साठी ही स्त्री आंदोलनात धरण धरून बसलेली आहे असेही ती म्हणालेली आहे .बिल्किस जिच्यावर बलात्कार केले गेले आणि आजही तिची वणवण संपलेली नाही त्या मुस्लिम स्त्री संदर्भातील कंगनाचा तिरस्कार यातून व्यक्त होतो . तसेच ८० वर्षाच्या वृद्ध स्त्रीबद्दल तिला खरेदी करता येईल असे असे तुच्छतावादी अनुद्गार तिने काढलेले आहेत हा अपमान सर्व स्त्रियांचाआहे. कुलविंदरची आई या शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी होती . याचा राग कुलविंदरच्या मनामध्ये धुमसत असणार. तिने मारलेली थप्पड ही संपूर्ण शेतकरी समूहाच्या सामूहिक नेणीवेचे प्रक्षेपण आहे.
क्रांती ही बंडखोरी मधूनच होत असते.साधी माणसं त्यांचा राग , संताप, प्रेम , दुःख मोकळेपणाने व्यक्त करतात. पुढील परिणामांचा विचार कॅलक्यूलेटेड पद्धतीने करत नाहीत. एका खासदार स्त्रीला थप्पड ठेवून देणे याला हिम्मत लागते , पागलंपण लागतं .या कृतीचा परिणाम म्हणून नोकरी जाईल ,अटक होईल ,आपल्या लेकरांचं काय होईल हा कुठलाही विचार या स्त्रीने केला नाही. लोक तिला सपोर्ट करोत अथवा न करोत पण तिची लढाई ती हिमंतीने नक्कीच लढणार आहे .तिच्या या एका कृतीतून अधिकार पदावर असणाऱ्या , सत्तेचा माज असणाऱ्या लोकांना संदेश गेला आहे की त्यांचं बेताल वक्तव्य आणि वर्तन खपवून घेतले जाणार नाही .
चॉकलेट हिरोंचे हिंदी सिनेमातील पर्व संपवून जेव्हा अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन पडद्यावरती अवतरला .तेव्हा कोट्यावधी सामान्य लोकांना आपली इच्छा पूर्ती झाल्याचा आनंद मिळाला .कारण सामान्य माणूस सत्ताधाऱ्यांना गुंडांना बडवून काढू शकत नाही , विजयी होऊ शकत नाही . काही वर्षापूर्वी दूरदर्शनवरील प्रिया तेंडुलकरची ‘ रजनी ‘ ही मालिका यामुळे लोकप्रिय झाली होती .
मला स्वतःला कुलविंदर कौरला कडकडीत सलाम ठोकावासा वाटतो कारण मला आयुष्यभर तिच्यासारखं वागता आलं नाही .नोकरी आणि इतर हितसंबंध सांभाळण्यासाठी, संसार आणि लेकराबाळांच्या काळजीने ,कर्जांच्या हप्त्यांचा विचार करता करता आणि फक्त भाकरीच नव्हे तर भाकरीवरील लोण्याच्या मागेही धावताना अनेक कॉम्प्रमाईज करावे लागले .अनेक उच्चवर्गीय, उच्च वर्णीय पांढरपेशा नोकरदार संसारी माणसांप्रमाणे अनेक ठिकाणी शेपूट घालावी लागली .कान पाडावे लागले म्याव म्हणावे लागले. आपला आत्मा सैतानाला विकावा लागला.
माझ्याप्रमाणेच अनेक पांढरपेशी ,मध्यमवर्गीय , उच्च मध्यमवर्गीय ,उच्चशिक्षित , नोकरदार माणसं हा समझोता करतात आणि म्हणतात ” कौन कहता है की हम रोटी खा रहे है
असल मे रोटी हमे खा रही है ! “
आपल्या बिल्डिंगमध्ये आलेल्या रामनल्लाच्या नावाने अक्षता वाटणाऱ्या समूहाला हाकलून लावण्याचे धाडस दाखवणारे , मोदीचे घोटाळे आणि अण्णा हजारेचे घोटाळे , न्यायाधीश लोयाच्या खुनी अमित शहा आहे असे पुस्तक लिहिणारे निरंजन टकले , हिंदू व मुस्लिम दोन्हीकडून हल्ल्याची भीती असतानाही निडरपणे कविता लिहिणारे जाहीर कार्यक्रम सादर करणारे जावेद अख्तर यांना फक्त मनोरंजन म्हणून युट्युब वर ऐकून आणि वाचून सोडून द्यायचे असते का?
कुठलही पाठबळ नसताना एक सामान्य स्त्री विद्रोह करते तेव्हा तो दबल्या गेलेल्या कष्टकरी समूहाच्या नेणिवेतील सामूहिक उद्गार असतो ! नैतिक दृष्ट्या थप्पड मारावीशी वाटणे योग्य आहे पण कायदेशीर दृष्ट्या चुकीचे आहे अशा पद्धतीने दोन्ही डगरीवर मला पाय ठेवायचे नाहीत . कसला कायदा ?कुठला कायदा ? प्रचंड विषारी असणाऱ्या नागीणीसाठी कायदा ? दुग्धपानं भुजंगानाम् केवल विषवर्धनम् !
दारावर घोळका करून येणाऱ्या आणि गणपतीची, नवरात्राची वर्गणी मागणाऱ्यांना आयुष्यभर घाबरून मी वर्गणी देत आले आणि चकरा मारायला नको म्हणून सरकार दरबारी पैसे सरकवतं आले , ‘बॉस इज ऑलवेज राईट ‘म्हणून पंगा घेणं टाळत आले , एक खाडकन लगावावी असं वाटत असताना
सुद्धा खडीसाखरी बोलत आले .मुलं मोठी झाल्यावर मात्र मी बंडाचे निशाण फडफडवले आणि त्यामुळे अर्थातच बदल्या , कटकटी अंगावर ओढवून घेतल्या .
५५ व्या वर्षी नोकरी बदलली तेव्हा नवीन नोकरीमधे पेन्शनला त्रास देऊ नये म्हणून नास्तिक असून , भाजप विरोधी असून अयोध्या राम मंदिराला५ हजाराची देणगी सुद्धा दिली . त्याची पावती येथे शेअर करते आहे आणि जाहीर पाप कबुली देते आहे .
त्यामुळे कुलविंदर कौरला माझा दिल से सलाम !
लीना पांढरे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत