निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

रिपब्लिकन शक्ती उद्‌ध्वस्त; राजकीय क्षितिजावरून रिपाइं गायब:

नागपूर – पाच दशकांपूर्वी रिपब्लिकन पक्षाची शक्ती नजरेत भरणारी होती. नागविदर्भ चळवळ, काँग्रेसच नव्हे तर जनसंघासमोर ‘रिपब्लिकन पक्ष’ गजराजासारखा भक्कमपणे उभा होता. १९६७ पर्यंत पक्षाला राष्ट्रीय मान्यता प्राप्त होती.
पण बदलत्या काळाच्या ओघात स्वार्थाच्या गॅंगरीनमुळे रिपब्लिकन शक्ती उद्‍ध्वस्त झाली.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत तर पक्षाचा उमेदवार इव्हीएमच्या ‘बॅलेट’वर नव्हता. बाबासाहेबांच्या रक्ताशी नाते सांगणाऱ्या रिपब्लिकन नेत्यांनी आपआपली ‘प्रायव्हेट रिपब्लिकन पार्टी’ काँग्रेस, भाजपपासून शिंदे सेनेच्या दावणीला बांधल्याने राजकीय क्षितीजावरून ‘रिपाइं’ गायब झाला आहे.

३ ऑक्‍टोबर १९५७ मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना झाली. पक्षाचे पहिले अध्यक्ष म्हणून शेड्यूल कास्ट फेडरेशनचे अध्यक्ष पी. एन. राजभोज झाले. सचिव बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे होते. उपाध्यक्ष बाबू आवळे तर सदस्य म्हणून दादासाहेब गायकवाड, बी. सी. कांबळे यांनी काम केले.
वर्षभरातच पक्षात दुरुस्त-नादुरुस्त असे गट पडले. दुरुस्त गटात बी. सी. कांबळे, दादासाहेब रूपवते, एन.एम. कांबळे, बाबू हरिदास आवळे तर नादुरुस्त गटात दादासाहेब गायकवाड एन. शिवराज, बी. पी. मौर्य, बॅरिस्टर खोब्रागडे हे होते. तेव्हापासून रिपब्लिकन पक्षाला फुटीचा आणि ऐक्‍याचा इतिहास लाभला आहे.

१९६७ पर्यंत रिपब्लिकन पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता प्राप्त होता. दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाला लोकसभा निवडणुकीत ११.६६ टक्के मते मिळाली होती. त्यावेळी विधानसभेच्या तीन जागा जिंकल्या होत्या. १९६७ च्या लोकसभा निवडणुकीत १२.७१ टक्के मते मिळाली होती. या दोन्ही निवडणुकीत दादासाहेब गायकवाडांचा गट हा संयुक्त महाराष्ट्र एकीकरण समिती सोबत तर बी. सी. कांबळे गटाने प्रजा समाजवादी पक्षासोबत युती करून निवडणूक लढविली होती.

रिपाइंचे राजकारण

कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या निधनानंतर रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष कोण? बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे की, रा. सु. गवई यावरून पक्षात वाद झाले. तेव्हापासून रिपब्लिकन पक्ष फुटतच गेला. गायकवाड गट, कांबळे गट, भंडारे गट यानंतर गवई गट, खोब्रागडे गटाची , पीरिपा अशा गटांची भर पडली.

मात्र १९९५ सालच्या रिपाईच्या ऐक्य प्रयोगातून १९९८ च्या लोकसभा निवडणुकीत रा. सु. गवई, रामदास आठवले, ॲड. प्रकाश आंबेडकर, प्रा. जोगेंद्र कवाडे हे चार खासदार निवडून आले होते. परंतु पुढे हे चार गट एकमेकाविरोधात उभे ठाकले. टी. एम. कांबळे गट, खोरीपाचे चार गट पडले. रिपाईत गटाधिपतींची संख्या ५२ पत्त्याच्या पुढे गेली. रिपब्लिकन गट नेत्यांची संख्या वाढत असताना कार्यकर्त्यांची मात्र वजाबाकी होत गेली.

मिला तो भी भला, ना मिला तो भी भला
रिपब्लिकनांच्या फुटीला कंटाळून रिपब्लिकन मतदार बसपाकडे वळला. कांशीराम हयात असेपर्यंत बसपची महाराष्ट्रात मतांची टक्केवारी वाढली. बसपचा खरा चेहरा दिसू लागला अन बसप टक्केवारीत घट झाली. मतदार वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभा झाला. जातीअंताच्या लढ्याला बळ दिले, परंतु ‘वंचित’चा लाभ कुणाला होतो, या विचारचक्रात जनता अडकली आहे. वंचितची शक्ती निश्चित वाढली.

मात्र सत्तेच्या पटलावर दिसली नाही. लाभार्थी भाजप होत असल्याने शंकेचे वातावरण निर्माण झाले. लोकसभेच्या निवडणुकीत रिपाईतील ढाण्या वाघापासून तर ड्रॅगनच्या शिल्पकार भाजपाची साथ देतात, तर सरसेनापतीनी एकनाथ शिंदेचा धनुष्यबान हाती धरला, यामुळे रिपब्लिकन नेत्यांची अवस्था जुगाराच्या खेळातील ५२ पत्त्यातील जोकरांप्रमाणे झाली असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेप, भाजप, एकनाथ शिंदे या साऱ्यासोबत रिपब्लिकन नेते ‘मिला तो भी भला ना मिला तो भी भला’ हे मानून ‘जोकर’ बनून काम करत आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!